Posts

Showing posts from March, 2021

संकासूर (sankasur)

Image
संकासूर समस्त कोकणवासिय आणि चाकरमानी यांच्या जगण्याचे टॉनिक म्हणजे शिमगोत्सव! बारावाड्यांच्या गावदेवाला फुल लागलं, रुपं चढलं की कोकणात पालख्यांचे ढोल वाजू लागतात. गावभोवनीच्या देवांबरोबर गावभोवनीचे खेळे सजतात आणि घरोघरी फिरू लागतात. असा हा कोकणातला शिमगोत्सव अनेकप्रकारे वैशिष्ठपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ठ म्हणजे, हिंदू धर्मात भक्ताने देवालयात जावे, आणि देवाचे दर्शन घ्यावे, असा नियम आहे. कोकणातला शिमगोत्सव मात्र हा नियम दूर ठेवतो. येथे चक्क ग्रामदेव भक्ताघरी उंबरठा ओलांडून घरात येतात. येतात ते येतात, ढोल-ताशांचा शाही गोतावळा घेऊन येतात. दुसरं वैशिष्ठ म्हणजे, पालखीतले देव पौराणिक नाहीत. ब्रम्हा, विष्णू, महेश, राम-लक्ष्मण, कृष्ण असे प्रस्थापित देव नाहीत. पालखीतून गावभेटीला निघणारे देव हे पुराणाबाहेरचे आहेत. त्यांच्याकाही अवतार लिलाही माहित नाहीत, तरीही गेली हजारो वर्षे त्यांनी कोणतंही स्वत:च मार्केटिंग नसताना कोकणवासियांच्या मनावर गारूड केलं आहे. तिसरं विशेष म्हणजे, कोकणातल्या पालख्या पाहिल्या तर त्यात कमीत कमी तीन, जास्तीत जास्त पाच-सहा देव असतात. यातही सर्वाधिक असतात त्या स्त्री देवता.