गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून..
मु.भावेआडम हे रत्नागिरी तालुक्यातील तसं कुठे लेखी नसलेलं गाव माझं दुहेरी आजोळ आहे. गोरिवले आणि घवाळी अशी दुहेरी भावकी माझी आजोळ घरं आहे. याशिवाय इतरही बरीच नातीगोती याच गावात आहे. ती अशी एकत्र असल्याने एकाचवेळी भेटू शकतात, म्हणून जायलाही आवडतं. शिमगोत्सव हा या गावाचा लोकोत्सव. पार्वती घवाळीणीच्या कडेवर बसून मी इथला शिमगोत्सव पाहत आलो आहे. तो पाहण्याचं भाग्य आनंदाचं. दोन वर्षापूर्वी आडमच्या शिमग्याला गेलो होतो. त्यानंतर जाणे झाले नाही. यंदा योग जुळून आला आणि गांगोच्या चरणी माथा टेकला. पौर्णिमेला गांगोबा-आदिष्टीचा शिमगा सानेवर साजरा झाला. शिमगा संपला.. मी आलो, पण मन मात्र आदिष्टीच्या निर्जन सानेवर ठेवून आलोय. झरझरणारी वार्याची झुळुक अजूनही त्या मनाला घरी आणावीशी वाटत नाही.. यंदाच्या शिमग्यात इथं एक आधुनिक बदल दिसला. चाकरमान्यांचा ओढा या शिमग्यात मोठा असतो. यावर्षीही तो नटून-थटून आला होता. मात्र यावेळी बहुतेकसा चाकरमानी आपल्या दुचाकीवर बसून आला होता. सानेवर खूप गाड्या लागलेल्या. मी चालणारा माणूस. मला दगड-धोंड्यातून चालायला आवडतं. पण मामा म्हणाला, गाडीवरून जाऊ. आदिष्टीच्या कातळावरच्या द...