भुताची शिकार

नव्वदच्या दशकाआधी कोकणातल्या वाड्या-वाड्यात, झाडा-पेडावर बर्‍याच संख्येनं भुता-खोतांचं राज्य होतं. गावची सीमा, गावचा सडा, गावची पांदळ, गावातली झाडून सगळी वडाची झाडं, पिंपळ, वाघबिळं, देवाधर्माची-भूतम्हारक्याची ठिकाणं, स्मशानं, चिंचेंची झाडं अगदी गावच्या कोपर्‍या कोपर्‍यानं गावागावातून भुतं सुखासमाधानानं नांदत होती. टिव्ही, मोबाईल फारसा नसलेल्या त्या काळात भुतांच्या गप्पा अतिशय चवीनं रंगत. कधी शाळेतल्या वर्गात.. कधी शेताच्या बांधावर.. कधी रात्रीच्या जेवणानंतर.. गप्पा जशा रंगत तशा त्या अधिक भयावह होत जात. त्यातही गंमत म्हणजे कालच्या रात्रीतल्या गोष्टीत भूत पांढर्‍या साडीतलं असेल तर लगेच दुसर्‍या रात्री त्याच गोष्टीत त्याच भुताला उलटे पाय फुटलेले असायचे..! 
नव्वदच्या दशकानंतर कोकणातली भूतं फारच कमी होऊ लागली आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे भीती कमी होऊ लागली. ही भीती कमी होण्यासाठी गाववाड्यातून बरेच बदल व्हावे लागले. पुर्वी गावात भुतांचे वसतीस्थान असणारे वटवृक्ष वृक्षतोडीमुळे संपले. गावात तेव्हा वीजही नव्हती. अख्खी रात्र रॉकेलच्या दिव्यावर घालवावी लागे. आता मात्र घराघरातून दिवे लागलेच. शिवाय गावच्या रस्त्यावरही सौरदिवे पेटलेत. रात्री फिरताना आता पूर्वीसारखी भीती उरलीच नाही. मोबाईल, टिव्ही अशी मनोरंजनाची साधनं आली आली, आणि आजी-आजोबांनी सांगितलेल्या भुताच्या गोष्टीही कुणी ऐकेनासं झालं. परिणामी भुतमहात्म्याचे मौखिक साहित्यही लुप्त होत चालले. शिकलेल्या पिढीपुढे पुर्वीसारखे भुत पाहिल्याचे दावेही आता कुणी करत नाही..... तरीही कधीतरी, कुठेतरी भुताच्या गोष्टींना रंग भरतोच. आणि त्या घटना घडलेल्या घटनेपेक्षा अधिक रंगतदार होऊन अविश्‍वसनीय बनत जातात. 
अशीच ही एक भुताची रंगतदार कथा.. फार जुनीही नव्हे, आणि नवीही नव्हे. फक्त नऊ-दहा वर्षापूर्वीची. रत्नागिरी तालुक्यातील शहरापासून जेमतेम बारा-तेरा कि.मीच्या गावातली..(नाव मुद्दाम सांगत नाही.) आजही त्या घटनेची आठवण गावकरी काढतात.. जे भूत मानेवर बसतं.. होत्याचं नव्हतं करतं.. अशा सर्वसत्ताधीश भुताला ठार केल्याची ही रंगतदार कथा आहे. आणि खास त्या गावकर्‍यांच्याच शैलीत तुमच्यासमोर मांडली आहे..

‘‘...त्याचं काय झालं म्हायत्याय काय.. वैशाखाचं दिवस व्हतं. पावसं जवल आलीला. आनी आगोटीच्या कामाची नुसती वलाटीला धांदल उडाली व्हती. तं त्या दिवसी कोन कलमाचं कवाल तोडीत व्हता.. कोन भाजावलीचं खाजं टाकीत व्हता. आनी सांच्याला काम हुराकलं, तसं सगलं घराशी आलं. मग आंगोल-पांगोल केलीव. राधाकिस्नाची आरत केलीव. आनी जेवया बसलीव. मिट्ट कालोक पडलीला. तं काय सांगू तुमाला, यकायकी कोनसं मोटमोट्यानं हुंकारं मारयाला लागलं.. कोकलू लागलं.. काय कलना नाय म्हनू बाह्यरं बॅटरी मारून बगतलीलं तं कायपन दिसना नाय. कदी उगवतीला आवज येयं व्हता तं कदी मावलतीला.. तं कदी समशानाकडंन पन येय.. सगलीच बावारली. पोराबाला घाबारली. उरात टरकी भरलं असं कोनसं मोट्यानं वरडं.. रडंपन.. काय काय गडी बाह्यरं आलं आनी बगू लागलं, पन काय पन दिसना नाय हो.. पन मग लय रात पडली तसा आवाज थांबला यकदाचा..दुसरा दिवस सुकासुकी गेला. पन रातरी तीच तर्‍हा. सांजावलं तसं कालचचं कुकारं आयकया येव लागलं. गावात लय कंदाल उटली. सगलं कावकाव करया लागलं.. कोन आसलं नी कोन नाय.. काय पत्त्याच लागत नवता. आता आमचं क्यास यवढं काल्याचं पांढरं झालं, पन असला परकार कदी घडला नवता. गावाच्या खालच्या अंगाला नद लागते. नद वलांडली की सडा. परत वरच्या अंगाला पन सडा. मदी गाव. गावात लायट व्हती, पन रस्त्यावरनं सगला कालोख. रातरीचं बाह्यरं पडयाचं सगलं वांद. आनी या असल्या साडेसातीतनं बाह्यरं पडून काय बगयाचं म्हटलं तं बाया मानसा बाह्यर पडूच देत नव्हती. म्हनीत,
‘‘जाव नका भायरं. भूत हाय तं गावाच्या मानंवर बसया आलीलं.. भूतचं आसं वराडतं.. रडतं.. पंडीबायचं भूत हाय तं.. खानार गावाला. भोगा आता कर्माची फला..!’’
मग कायभूत म्हटल्यावर सगल्यांचीच टरकी उडाली. त्यातनं पंडीबायचं भूत म्हटल्यावर तरण्या पोरांची गालनच उडाली.तं भूत हरपरकारानं गावाला तरास देया लागलं. कधी कुकारं करी.. कदी रडं.. कदी यगलचं क्याक.. क्याक.. आवाज करीत सगल्यांची पाचावर धारन बसवी. सगल्या वलाटीला आडचं टरकी भरवलान व्हती. कदी ढगातनं आवाज येयं, तं कदी झाडावरनं.. कदी घरावरनं येयं.. बरं तितं बगया जाव तं तितं कोनपन नसं. पोराबालांनी ताप घेतलांनी, रातरीची बाह्यर पडनासीचं झाली. लगवीला बाह्यर येयाचं पन वादं झालं. बरं दिवसाचं काय तं कसलापन तरास देत नवंत. रात झाली की तेेचा दिवस झाला सुरू. काय करयाचं तचं कलत नव्हतं... बायकांनी तं नुसता इट आनलानी व्हता. तोंडाला येल तं बडबडत व्हत्या. शिव्या घालून भूताचं तलपाट करीत व्हत्या. त्या बडबडीतनचं या भुताला पंडीबायचं नाव पडलं व्हतं..तं तेचं काय झालं तं सांगता.हं भूत केकाटन्या कैक आदी कदीच्या बर्‍याच वर्षाची ही कंदाल...! पंडी ही वलाटीची देकणी पोर व्हती. गावातलं लय प्वॉर तिच्यावर लायन मारायचं. पन वलाटीच्या यकापन पोराच्या ती हाताशी काय लागली नाय. ती तिसर्‍याबरोबरचं पलून गेली. पन पुढं तिच्याबाबतीत लय भयानक आयकायला मिलालं. ती पलून गेल्यानंतर नदीच्या वरच्या आंगाला तिचा मुडदाच गावला व्हता. पोलिसांनी पंचनामा करून तेचा तपास चालू केला व्हता. पुडं काय झालं तं कललंच नाय. आता भूत बनून ती गावाला तरास देतेय.. असी सगल्यानीच काव काव सुरू केलानी.. आनी सगलं आनकीनच घाबारलं. त्यात पंडीवर लायनं मारनारं प्वारं तं अगदीच हडबाडलं. तेनला वाटलं आता पंडी आपल्याला खानार.. पन हं भूत कोनाला खायत पन नवतं, आनी कोनच्या मानवरं पन बसत नवतं.. फकस्त यकच करी, अख्या रानात रडारड.. वरडावरड करून कालजाचं पानी पानी करून टाकी.रोजच असं व्हयाला लागलं. देवाला नारल पन देलीला. पन काय गुन नाय. अशा कंदालीत म्हैना गेला. कसं दिवस काडलीलं तं आमचं आमाला म्हायतं.. घाबरून घाबरून कालजाला भोका पडली, पन भूत काय दमना नाय.. अकेरी अकेरीला काय झालं.. सगलंच चिडलं. म्हनू लागलं,
‘‘ह्यं भूत नाय अवदसा हाय.. ह्येला धडा शिकवाय लागलं..’’
वलाटीचं सगलंच प्वार खवाललं. मेलं सगलं भुताला मारयाचं म्हनू लागलं. पोरा बुदी तेरा.. अशी मेल्यांची अवस्था. आमी शान्यासुरत्यांनी तेनला सांगतलवं,
‘‘बाबानो, असलं काय करया जाव नका, म्हागात पडलं. पन तं प्वारं कसलं आयकतात.. बरकनदार तं. म्हनालं आता कायपन होवं दे, तेची वाट लावयाचीच..’’
पोरांनी जय्यत तयारी केलानी. बंदूका आनलानी. काडतूसा भरलानी. राकेलची केना.. गवताचं पेढं.. दगडी-धोंड.. काय इचारू नका. ती तयारी बगून सगलंच गाववालं तेंच्यात सामील झालं. आता भीती सोपली आनी राग डोसक्यात भरला व्हता..त्या दिवसीची तर्‍हा...रात झाली, तसा रोजचा परकार सुरू झाला. गेल्या म्हैन्याभराचा अंदाज पोरांनी घेतलांनी व्हता. हं भूत नदीच्या वरच्या आंगाकडच्या सड्यावर र्‍हात व्हतं. कारन कालोखातनं वरडत.. रडत तं तिकडनचं येयाचं. आनी अक्क्या वलाटीत धुमाकूल घालयाचं. पोरांनी बरोबर निशानी साधलानी व्हती.. कुनी नदीवर र्‍हायचं.. कुनी सड्यावर पलयाचं.. दगडी कुनी मारयाच्या.. ऍटमबाम कुनी फोडयाचंं.. कुनी काय काय करयाचं.. आसं सगलं ठरलं. वीस-पंचवीस पॉर तरी होतं खलाटीला. बारक्या पोरांनी दगडं-धोंडी पिशव्या भरून गोला केलांनी व्हतं. कदी नवं त्या बायकाही रातोरात घराबाह्यरं पडल्या. कुकार्‍याला सुरूवात व्हताच पोरांनी आवाजाच्या रोकानं दगडी मारयाला सुरवात केलानी.. वीस-पंचवीस दगडी आपल्या आगानं येताच भूत खवाललं, आनी तेच्या आंगाची आगच झाली. तसं मग तेचं भलं मोटं धुड वरवर फिरताना दिसया लागलं.. सगल्या बायकापोरांनी ‘ह्य बगा.. तं बगा.. तिकडं पलालं.. मारा.. मारा.. ’ असा नसुता किचाट केलानी. त्याबरोबर तं भूत आनकीनचं भडाकलं. बायामानसांचा किचाट... पोरांची दगडफेक.. बरकनदारांचा गोलीबार.. वलाटी नुसती पेटली व्हती! तेच्यात झालं काय, जरा कुटं बसयाला भूताला थाराच मिलाला नाय. कारन जरा कुटं झाडापेडात तं घुसलं की तिथं पोराबाला नुसती दगडी-धोंडं मारून तेला अर्धमेलं करीत..
लोका जेवान-खानं इसरून त्या भूताला सोपवायला बाह्यर पडली व्हती. रात उलटून जाव लागली, तरी तं भूत काय गावत नव्हतं आनी पोराबाला काय दमत नवती. पन दगडी मारून म्हना नायतं बंदुकीनं म्हना तं चांगलच घायाल झालं व्हतं.. आनी जसंजसं घायाल व्हैत व्हतं तसं तसं तं आनकीचनच केकटत व्हतं. तं जसं केकटं तशा बायका नको नको त्या शिव्या घालून तेचं वाटोलं करीत व्हत्या.अकेरीला भूताची ताकद आटपाय लागली. आज असं काय व्हैल असं तेला वाटलं नव्हतं.. पन तं जसं घायाल व्हयाला लागलं तसं तं रडया लागलं आनी नदीकडं धावया लागलं. पोरांनी, बरकनदारांनी तेचा पाटलाग केलानी. सडा चढता चढता पोरांचा भात्या फुगला. दमलं पन व्हतं.. भूताच्या आवाजाच्या रोकानं सगलं सड्यावर आलं. आनी अचानक त्या कालोकात आवाजच बंद झाला.. भूत कुटं गायब झालं, काय कलंना नाय. अक्का सडा पोरांनी काट्याकुट्यातून पिंजलांनी. पन छ्‌या... खय दिसनां. मग काय सुचलं पोरांनला. सगला सर्वा देलानी पेटवून.. हा धूर आनी आग उटली. म्हनू लागलं,
‘‘आसलं इतं तं जलून जायलं..’’ ..
पन काय चमत्कार झाला, आग जसी भडाकली तसं झालवंडातनं तं भूत परत वर उडालं. आनी केकटू लागलं. त्याबरोबर सगल्यानी एकच कंदाल केली. आता तं चांगलंच हेलबांडलं व्हतं. ताकद तेच्यात उरलीच नव्हती. वरच्या वर फडफडत व्हतं.. केकटत व्हतं.. रडत व्हतं.. बरकनदारांनी तिच संधी साधलानी.. नेम धरलांनी. धडाधड गोल्या मारलांनी!गेलं महिनाभर गावाला तरास देनारं ह्य भलं मोटं भूत धापकन खाली पडलं. सगल्यांनी यकच धाव घेतलानी. भूत खाली पडताच आनकी चारपाच गोल्या घातलानी. अकेरीच्या मरनाचा केकाट आला. भूत मेल व्हतं..! व्हय भूत मेलं होतं!! सगल्या बायकांनी शिव्या घालून तेला अभिशेक केलांनी आनी पायातल्या खेटरांनी तेची पूजा केलानी. सगल्यानी मग गवताच्या सर्व्यातच भूताला कांड लावून मुठमाती देलानी..

अशी ही चक्क भुताच्या शिकारीची कथा.कुकारं करणारं.. रडणारं.. चित्रविचित्र, बिभत्स आवाज काढत आक्रोश करणारं हे भूत म्हणजे दुसरं तिसरं कुणी नव्हतं. ते होतं एक मादी जातीचं बलाढ्य पंखाचं हिंस्त्र घुबड! या लक्ष्मी वाहन घुबडाला दिवसाचं दिसत नाही. फक्त रात्रीचं दिसतं. वलाटीला ते केवळ रात्रीचा त्रास देण्यामागे कारण हेच होतं. या मादी जातीच्या घुबडाची बहुधा शेताच्या बांधावरच्या कलमात ढोली (घरटं) होती. कवळ तोडल्यानं (कलम तोडल्यानं) ते घरटं अंड्यासहित नष्ट झालं. त्या गोष्टीची त्या काहीशा हिंस्त्र प्राण्याला भारी चीड आली. आपल्या अस्तित्वालाच... रहिवासालाच धोका निर्माण झाल्यावर हल्ली कोकणात बिबट्याची धाड थेट घरात घुसण्यापर्यंत पडू लागली आहे, हे आपण ऐकले असाल. हीच परिस्थिती त्या मादी जातीच्या घुबडाबाबत घडली. वलाटीला त्रास देण्यामागे हेच कारण होतं. 
आता घुबडाचा आक्रोश.. म्हणजे हुंकारणं.. रडणं.. वगैरे.. याबाबत बोलायचे म्हटले तर घुबड हे असेच विचित्र ओरडते की, एखाद्या कमजोर माणसाला त्याच्या ओरडण्याने हार्टऍटकही येण्याची शक्यता असते. तर अशा या घुबडाला त्या गावकर्‍यांनी भूत समजून केवळ अज्ञानापोटी मारले. ...अशा या कथेला तुम्ही भूताची कथा म्हणायचे की एक पर्यावरण कथा? याचा निर्णय वाचकांनी आपआपल्या रसिकतेनुसार घ्यावा.

- अमोल पालये.

Comments

  1. ������������ hahahahahhaha ......1 no....

    ReplyDelete
  2. तरी बरं, राकान नाय चालू केली. नाय ? बरं झालॅ यकदाचं गावलं नायतर क्ती जना गावली असती.

    ReplyDelete
    Replies
    1. गावलं म्हणू तिथल्या तिथं विषय सोपला, नाहितर कैक पिढ्या घाबरंवलंन असत्या.

      Delete
  3. हया बाकी बरा केलाव सायबानु, शेवटी शेवटी खरा काय ता सांगलीव बघा, नाय तर आम्ही जलमभर घाबरलीलोच राहयलो असतो... च्यामारीस त्या घुबडाच्या, जल्ला त्याचा कालीज करपाटला तं ...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद पाटिल सर
      सत्यकता म्हनतल्यावर खरं काय तं सांगयालाच हावं.
      काय समाजलंव!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू