कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू

तुम्हाला दगडाच्या घडीव आणि ताशीव ‘डोणी’ माहित आहेत..? 
नाही ना.. मग, ‘घिरट’...? बरं, ‘इरलं.. लामणदिवा.. तवी.. आयनापेटी.. कोनाडा.. माहित्येय? 
नाही ना माहित... अर्थात जे माहितच नाही ते पाहण्याची गोष्ट दुरच.. 
नव्या पिढीला कोड्यात टाकणारी ही नावं आहेत आपल्याच कोकणातील जुन्या गृह संस्कृतीतील हरवलेल्या वस्तूंची. खरचं या वस्तू हरवल्या आहेत.. 
त्यातील काही आता शोधूनही सापडणे कठीण, आणि समजा सापडल्याच तर त्या आता केवळ एखाद्या वस्तू संग्रहालयातच ठेवाव्या लागतील. कोकणातील प्रत्येक घरात दैनंदिन वापराच्या अशा अनेक वस्तू होत्या की, ज्या कालौघात काळाच्या उदरात गडप झाल्या.
कोकणात रस्ते आले. वीज आली, आणि हातात स्मार्टफोनही आला. त्यामुळे बैलगाडी गेली. उजेड पाडणारा कंदील गेला. पोरांच्या हातातला ‘विटीदांडू’ जावून ‘टॅब, स्मार्टफोन आला.. कालाय तस्मै नम:.. दुसरं काय?१२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार यांनी मिळून गावगाडा चालायचा, त्यामुळे आजच्यासारखे यंत्रयुग नसूनही स्वातंत्र्यपूर्व काळात खेडी समृध्द होती. सुतार नांगर बनवायचा. लोहार हत्यारं घडवायचा. कुंभार मडकी बनवायचा. मग कुंभाराकडचे मडके शेतकर्‍याने घ्यायचे आणि शेतकर्‍याने त्याला ठरलेला ‘बलुता’ म्हणजे धान्य द्यायचे. अशी ही देवाण-घेवाणीची अर्थव्यवस्था गेली आणि रूपयाची अर्थव्यवस्था रुजली. आणि हा.. हा.. म्हणता कोकण बदलू लागलं.. आज खेडीसुध्दा बदलाचा इतका आग्रह धरतायत की, पनवेलमधली खेडीसुध्दा आता आमचाही समावेश महापालिकेत करा असा आग्रह धरू लागली आहेत. (नुकतीच पनवेलची महानगरपालिका झाली आहे.)
गावचा गावकर म्हणतो, ‘आमच्या टायमाला फुकटात बैल मिळायचा..’ आता बैलाचीच किंमत लाखांवर आहे. त्यामुळे बैलाची जागा ट्रक्टरने घेतली. अशा अनेक जुन्या वस्तूंवर नव्या साधनांनी आक्रमण केले. त्यामुळे गावातल्या बलुतेदाराने बनवलेल्या वस्तूंचे महत्व कमी झाले, तिथं यंत्र आली. आणि कावड, कंदील, खुराडा, चिलिम अशा जून्या वस्तूंना अडगळीच्या खोलीत वाळवी लागली. अशाच काळाच्या उदरात गडप झालेल्या आणि होत चाललेल्या वस्तूंचे या लेखातून अखेरचे स्मरण केले आहे...

कणगी- 
पूर्वी भात ठेवण्यासाठी पिशव्यांचा उपयोग न करता बांबूच्या बेळांपासून तयार करण्यात आलेल्या कणगीचा वापर केला जात असे. ही कणग टोपलीप्रमाणे परंतू पाच ते सहा फूट उंच असते. आता प्लास्टिकच्या पिशव्या स्वस्त मिळतात. तसेच या कणगी तयार करणे आता बंद झाले आणि त्यांची किंमतसुद्धा प्लास्टिकच्या व गोणपटांपेक्षा जास्त असल्यामुळे या कणगीचा वापर करणे बंद झाले. 
तवी- 
तवी हा मातीच्या मडक्याचा प्रकार होता. या छोट्या पातेल्यासारख्या मातीच्या तवीत मासे शिजवले जात. मडक्यात शिजवल्यामुळे ते चविष्ट होत असत. आता तवीची जागा स्टीलच्या पातेल्याने घेतली.
रांजण- 
पाणी ठेवण्यासाठी पुर्वी मोठ्या आकाराची मातीची भांडी असायची. त्याला रांजण म्हणत. मात्र थंडगार पाणी पिण्यासाठी आजही काहीठिकाणी माठ वापरतात.सुगड- छोटी मडकी असतात त्यांना सुगड म्हणतात. आज ते मकरसंक्रातीला वापरले जाते.
शेर/ पायली- 
वस्तूची मोजमाप करण्याचे साधन म्हणजे शेर/पायली. शेर आणि पायली अशी ही दोन लाकडी भांडी पूर्वी गहू, तांदूळ मोजण्यासाठी वापरली जात. मोठा असेल ती पायली आणि त्याखालोखाल शेर असायचा.
घंगाळ-
लग्नघटिकेसमयी आजही घंगाळ लागते. विवाहमुहूर्त जवळ येईपर्यंत वधुला त्या घंगाळासमोर बसून रहावे लागते.
टमरेल- गावात जेव्हा संडासगृहांची व्यवस्था नव्हती तेव्हा सार्‍यांनाच टमरेल घेवून नदीकाठ गाठावा लागे.
पानपेटी- 
खाण्याच्या विड्याचे सामान ठेवण्याची पेटी म्हणजे पानपेटी. ही पत्रा किंवा पितळेची असायची. गावात पान खाण्याची सवय असल्याने पानपेटी प्रत्येक घरात असायची. त्यात तंबाखू, पानं, सुपारी, चुना, कात अशी सामग्री ठेवलेली असायची. पाव्हणा आला की पानपेटी समोर केली जाई. हल्ली निदान पानाचे ताट तरी असतेच.
पिकदाणी- 
मोठ्या घरांतून (म्हणजे खानदानी) किंवा एखाद्या गावातल्या प्रतिष्ठिताकडे भरपूर नोकरचाकर असले तर त्याच्याकडे पिकदाणी असायची. पान चघळून चघळून तोंडात रंगलेला रस त्या पिकदाणीत पचकन टाकला जाई, मात्र हे फार जुने झाले.
वणकी- 
नारळाच्या करवंटीला वरून आडवी दोन भोके पाडून त्यामध्ये काठी घालून डवली तयार केली जायची. या डवलीचा उपयोग पूर्वी आमटी वाढण्यासाठी तसेच भात उकडल्यानंतर तो भात टोपलीत टाकण्यासाठी केला जात असे. आता स्टीलच्या विविध आकाराच्या चमच्यांमुळे या डवलीचा उपयोग आता केला जात नाही. यालाच वणकी असेही म्हणतात.
आयनापेटी-
आयनापेटीत महिला वर्गाच्या शृंगाराच्या वस्तू ठेवल्या जात. या पेटीलाच आरसा बसवलेला असे. त्या पेटीतच कुंकू, फणी असे साहित्य ठेवले जाई.

दगडी साधने


व्हाईन व मुसळ-
पूर्वी कोकणातील प्रत्येक घरामध्ये लाकडी किंवा दगडी व्हाईन असायची. या व्हायनीचा उपयोग भात सडण्यासाठी केला जात असे. तसेच मिरच्या कुटण्यासाठी व गरम मसाल्याचे सामान या व्हायनाद्वारे कुटले जात असे. व्हायनात कुटण्यासाठी मुसळीचा उपयोग केला जायचा. ही मुसळ लाकडाची बनवली जात असे. खाली लोखंडाची रिंग बसवली जायची. अशी व्हायने आता फक्त जुन्या घरांमध्येच आपल्याला क्वचित दिसून येतात. आता या व्हायनाची जागा भात सडण्याच्या व मसाला कुटण्याच्या गिरणींनी घेतली आहे.घिरट - जात्यासारखी गोल सुमारे एक मीटर ते सव्वा मीटर व्यास असणारे दगडी घिरट असायचे. या घिरटाचा आतील भाग विशिष्ट प्रकारे कोरून खडबडीत केला जात असे. वरच्या बाजूला भात टाकण्यासाठी मध्ये पोकळ जागा ठेवली जात असे. याचा उपयोग भात भरडण्यासाठी केला जात असे. पूर्वी गिरणीचा शोध लागला नव्हता. त्यावेळी घिरटाचा उपयोग करून भात भरडले जायचे. हे भरडलेले भात नंतर व्हाईनात सडून वापरले जायचे. गिरणींच्या शोधामुळे या घिरटाचा वापर करणे बंद झाले. आता कोकणात क्वचित ठिकाणी अडगळीत टाकलेली घिरट आपल्याला दिसून येते. 
पाटा-वरवंटा-
कोकणात ग्रामीण भागात बहुतेक घरात आमटी, भाजीसाठी पाट्यावर वाटण केले जाते, असे पाट बनवणारे लोक आपणास बाजाराच्या ठिकाणी दिसून येतात. हा व्यवसाय करणार्‍यांना पाथरवट म्हणून ओळखले जाते. आता ग्रामीण भागातही विजेची सोय झाल्यामुळे मसाला वाटण्यासाठी सर्रास मिक्सरचा वापर केला जातो. त्यामुळे या पाट्याचा उपयोग करणे बंद झाले आहे.
जातं-पूर्वी दळण्यासाठी दगडी जात्यांचा उपयोग केला जात असे. आता वेळ, श्रमाची बचत करण्यासाठी गिरणीवर दळण नेले जाते. त्यामुळे घरात जाते असूनसुद्धा या जात्याचा उपयोग आता केला जात नाही. तरीसुद्धा बहुतेक घरांमध्ये जाते असते.
डोणी-
शेतात, दाराजवळ पुर्वी मोठमोठ्या डोणी असायच्या. आता हौद असतात. या डोणी किंवा हौदात पाणी साठवून ठेवले जाई. या डोणीचे वैशिष्ठ्य असे की, या डोणी एका दगडात गोल किंवा चौकोनात कोरलेल्या असायच्या. आता अशा डोणी कुठे पहायलाही मिळत नाहीत. 
कवडी-
कवडी हा शंखाचा एक प्रकार. कवडीची माळ गळ्यात घातली जाई, सध्या मात्र गोंधळी लोकांच्या गळ्यात कवड्याची माळ पहायला मिळते.
कोनाडा-
कोनाडा पूर्वी भिंतीत असायचा. हा कोनाडा म्हणजे आजच्या कपाटाचे जुने रूप. मातीच्या भिंतीत पोखरलेली जागा म्हणजे कोनाडा, तिथं नेहमीच वापरास लागणार्‍या आणि सहज हाताशी लागणार्‍या वस्तू ठेवत.
इरले- 
इरले आता कालबाह्य झालेे. पावसात शेतीची कामे करताना इरले वापरले जाई. हे इरले बांबूच्या बारीक काठ्यांपासून बनवले जाई. ते डोक्यात घातले की भिजायला होत नसे.
उंबरठा-
फ्लॅट संस्कृतीत घराचे उंबरठे गायब होवू लागले आहेत. पुर्वी घरातल्या प्रत्येक दरवाजाला उंबरठा असायचाच. आता जेमतेम बाहेरच्याच दरवाजांना उंबरठे असतात. आतले दरवाजे मात्र उंबरठ्याविनाच असतात.कावड-कावडीने पुर्वी पाणी आणले जाई. आपल्याला मात्र श्रावणबाळाची कावड ऐकून माहित असते. आडव्या बाजूला दोन्ही बाजुने शिंके करून त्यात मोठे माठ रचलेले असत. पुर्वी गावातून लांबून पाणी आणावे लागत असल्याने पुरूष माणसे हे माठ कावडीला बांधून पाण्याची वाहतूक करत.
कंदील-
विज नसलेल्या गावात कंदील म्हणजे महत्वाची वस्तू होती. उशाला आणि कुठेही बाहेर जायचे असल्यास गावकरी कंदील घेवूनच बाहेर पडायचे.
खुराडे-
गावातून अजूनही घरगुती कोंबडीपालन चालते. या कोंबड्या किंवा पिल्ले खुराड्यातून ठेवलेली असतात. खुराडे म्हणजे बांबूपासून बनवलेला पिंजराच.
चिलीम-
जुने गावकरी चिलिम ओढत. आता चिलीम ओढणारा कोकणात दुर्मिळच. चित्रात मात्र गजानन महाराज चिलिम ओढताना पहायला मिळातात. चिलीम मातीची नळीसारखी असते. या नळीत मध्यभागी तंबाखू भरला जाई, तर वरच्या बाजूला निखारे ठेवून तंबाखू जळला की चिलिमचे खालचे टोक तोंडात धरून धूर ओढला जाई.
झोपाळा-
पुर्वी कोकणातल्या चित्पावनांकडे घरात झोपाळा असायचाच. लहान मुलेच काय, घरातली मोठी माणसेही झोपाळ्यावर बसून पुस्तके वाचत असत.पाळणा-हा पाळणा म्हणजे आपण बाळाला जोजावतो तोच. पण आता पाळणे हे सुध्दा स्टील किंवा फोल्डींगचे मिळतात. पुर्वी पाळणे हे संपूर्णत: लाकडाचे असत. किंवा बांबूपासून विणलेले असत. ते घरातल्या बाराला टांगलेले असत, आणि त्यांना उभ्याने झोका द्यावा लागे.
मशाल-
फार वर्षापूर्वी गावातून मशालीचा वापर उजेडासाठी केला जायचा. मशालीला चूड असेही म्हणतात. एखादी पालखी, किंवा काही धार्मिक कार्ये रात्रीची असतील तर मशाल वापरली जाई. पण नंतर त्या मशालीविषयी गावांतून रहस्यमय भिती पसरू लागली. 
खुंटी-
पुर्वी घराच्या भिंतींना खुंट्या असत. या खुंट्यांचा वापर पिशव्या, कपडे लावण्यासाठी होत असे.
लामणदिवा-
शुभकार्यप्रसंगी लामण दिवा लावला जाई. आता तो चित्रातच पहायला मिळतो. हा पितळेचा असे आणि जड असे. दिवा लावण्यासाठी समईप्रमाणेच रचना. मात्र समईला उभी करण्यासाठी दांडा असतो. या दिव्याला दांडा नसे, कारण हा दिवा टांगून ठेवायचा असल्याने त्याला साखळदंड असे.
रोवळी/रोवळा-
बांबूच्या सुपाप्रमाणेच रोवळ्या बनवल्या जात. रोवळी म्हणजे बांबूचे खोलगट भांडेच जणू. छोट्या आकाराचे असेल तर रोवळी, मोठा आकार असेल तर रोवळा म्हणत. याप्रमाणेच मोठे ते सुप तर लहान ती शिंपली असे प्रकार सुपात असायचे.
आकडी/ कोयती- 
कोयती हे शस्त्र आजही पहायला मिळते. पण आकडी केवळ गावातच पहायला मिळेल. आकडी म्हणजे लोखंडी सळीचा आकडा. या आकड्याला दोरी बांधली जाई. ती कंबरेला गुंडाळून मागे राहिलेल्या आकड्यात कोयती सुरक्षितरित्या ठेवून झाडावरही चढता येई.
रहाट-
पंपाने पाणी खेचण्यापूर्वी प्रत्येक विहीरीवर रहाट असायचा. विहीरीवर रहाटाचा गोलाकार सांगाडा असे, या सांगाड्याला घेर मारून लोटे (मातीचे भांडे) बांधलेली माळ विहीरीत सोडलेली असे. रहाटाचा सांगाडा जसा गोलगोल फिरवला जाई तशी लोट्याची माळ फिरत राही. त्यामुळे विहीरीत बुडणारे लोटे भरून वरती येत व वरती येताच पन्हळीत रिकामे होत. यामुळे अख्या शेताला पाणी लावणे सोपे होई. याचाच दुसरा प्रकार म्हणजे, बैलरहाट. हा रहाट ओढण्याचे काम माणूस न करता बैलाद्वारे केले जाई, म्हणून त्याला बैलरहाट म्हटले जाई.
याशिवाय खलबत्ता, खवणी, बाजलं, गोफण, घुंगूरकाठी, तुळशीचे मातीचे वृंदावन, पत्रावळी, पोहरा, बटवा, गोधडी, रवी अशा एक ना अनेक वस्तू आपल्या नजरेआड होत चालल्या आहेत.

अमोल पालये, 

रत्नागिरी.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!