कोकणातील गूढ कातळ-शिल्प

कोकणासारखा गुढ प्रदेश महाराष्ट्रात अन्यत्र कोठे नसेल. येथे रूढी- प्रथा, परंपरा आणि भुतं-खेतं अगदी देव-देवस्की, जारण-मारण यांचे जेवढे गुढ येथे आहे तेवढे गुढ कोठे आढळणे कठीण. या सार्‍या गुढांमागचे रहस्यही कोणाला अजून स्पष्ठपणे उलगडता आलेले नाही. कोकणात सध्या आणखी एक गुढ सध्या चर्चेेत आहे. ते म्हणजे कोकणातल्या जांभ्या दगडांवर कोरलेल्या कातळशिल्पांचे. कोणी कोरली असतील ही कातळशिल्प? का कोरली असतील? कधी कोरली असतील? काय असेल या कातळशिल्पांचा अर्थ? या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे सध्या तरी अनुत्तरीतच आहेत. ती उत्तरे शोधण्याचे स्तुत्य प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. कातळशिल्पांच्या गुढांमागचे रहस्य उलगडेल तेव्हा उलगडेल, पण त्याआधी आपल्याला त्या कातळशिल्पांचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोकणात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. कोकणवासियांनी आपल्या वहिवाटीच्या कातळावर गडगे घालून, कलमे लावून आणि चिरे खणी काढून ही कातळशिल्पे अज्ञानापोटी नष्ट करायला सुरूवात केली आहे. रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कातळ भाग आहे. या कातळभागावर अनेक गुढ आकृत्या आहेत. त्याच कातळशिल्पांविषयी थोडक्यात..
६००० वर्षे जुनी?राजापूरच्या कातळावर तब्बल चौदा चौरस किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत. मासे, जलकुंभ, जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती या कातळांवर कोरलेल्या आहेत. कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्प हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशांनी ही शिल्प समृद्ध आहेत. अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे अशी दुर्मिळ शिल्पे गायब झाली आहेत. ही चित्रे, नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इसवी सन पूर्व ६००० वर्षे जुनी असावीत.

विलक्षण अविष्कार
कोकणातील जांभा दगडाचा, विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की, इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती प्रामुख्याने काढली गेली आहेत. देवगड आणि विजयदुर्ग येथील सडा हा जांभ्याचे आदर्श असे कातळ आहे असे मानण्यात येते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला कातळ सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे. येथील कातळाची जाडी २५ मीटरपेक्षा जास्त असून, भूजल साठेही खूप खोल आहेत. राजापूरच्या कातळावर जुवाठी- उपळे- प्रिंदावण या त्रिकोणात उपळे गावाच्या सीमेवर आम्हाला चौदा चौरस किलोमीट कातळावर अनाकलनीय शिल्प आढळली आहेत. मासे, जलकुंभ, पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती यावर काढल्या आहेत. मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर त्यावर जलस्थानांशी संबंधित आकार दिसतात, असे स्थानिक नागरिक सांगतात. शास्त्रीय पद्धतीने या प्रदेशातील कातळ चित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे.

शोधनिबंधाद्वारे प्रसिध्दी
कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची सतरावी राष्ट्रीय कॉंग्रेस संपन्न झाली. राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेमध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी एका शोध निबंधाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांच्या सविस्तर माहितीचे छायाचित्रांसह सादरीकरण केले. स्वतः लळीत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

परस्पर संबध असावा?
या ठिकाणी असलेले मातृदेवतेचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. हिवाळे येथील सड्यावरही अशाच कातळशिल्पांचा शोध लळीत व त्यांचे बंधु प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी २००२ मध्ये लावला होता. पश्‍चिम किनारपट्टीवर गोव्यातील उसगाळीमळ, महाराष्ट्र - गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळे, कुडोपी, खानवली (राजापूर), निवळी (रत्नागिरी) अशा अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध (लिनिएज) असण्याची शक्यता लळीत यांनी आपल्या सादरीकरणाच्या वेळी व्यक्त केली.या परिषदेला देशभरातून जमलेल्या रॉक आर्ट क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच हौशी संशोधकांनी लळीत यांच्यासंशोधनाबद्दल आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच रॉक आर्टच्या नकाशावर येत असल्याबद्दल संतोष प्रकट तर केलाच. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच जगासमोर आलेला आपल्या देशातील हा अनमोल खजिना जतन करुन त्याची नीट प्रसिद्धी केल्यास सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा रॉक आर्टच्या जागतिक नकाशावरमानाचे स्थान पटकावेल, असा विश्‍वासही व्यक्त केला.निवळी फाट्यावर नकाशासिंधुदुर्गप्रमाणे कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या अन्य जिल्ह्यातही विविध ठिकाणी जांभा पाषाणावरकोरलेली लक्षणीय अशी चित्रे, नकाशे, काष्ठ शिल्पे, गुहा, लेणी, मंदिरे आढळून येतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्याच्या पुढे निवळी तिठ्याजवळ जांभा दगडावर कोरलेला एक भला मोठा पथदर्शक नकाशा हा कुतुहलाचा विषय होता. सध्या मात्र हा पथदर्शक नकाशा निदर्शनास येत नाही. बहुदा तो रस्ता रुंदीकरणाच्या कारणाने गायब केला गेला असावा. नव्या पिढीला या कोरीव नकाशाची फारशी माहिती देखील नाही. सदरनकाशा हा आंबा घाट, अणुस्कुरा घाट, गगनबावडा घाट, संगमेश्‍वर आदी ठिकाणाहून त्या काळात व्यापार -उदीमासाठी येणार्‍या व्यापार्‍यांना निश्‍चितच पथ- मार्गदर्शक ठरला असेल.

नाचण्यात नौकेच चित्र
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात एकेकाळी बंदर असलेल्या बारसू या गावातील मोठ्या डोंगरावर असलेलीकोरीव चित्रे ऐतिहासिक अभ्यासकांना व संशोधकांना आजवर एक आव्हान ठरली आहेत. ही चित्रे प्रत्यक्ष पाहताना ती कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी काढलेली असावीत असेच वाटते. मात्र ती चित्रे कोणी आणि कधी कोरली यासंदर्भातील शोध अद्यापही लागलेला नाही. रत्नागिरी नजिकच्या नाचणे या गावीही अशाच प्रकारचे जांभा दगडावर कोरलेले नौकेचे चित्र पहावयाला मिळते.शिलाहार काळाचा संदर्भरायगड जिल्ह्यात कान्हेरी, कुडेमांदाड, चौल गांधारपाले (महाड) तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पणदेरी, पन्हाळेकाझी, कोळकेवाडी, कळंबस्ते या ठिकाणची जीर्णावस्थेत असलेली लेणी हीसुध्दा बहुतांशी दुर्लक्षितच राहिलेली आहेत. कोकणात या व अशा अनेक लेण्यांची उभारणी इसवी सनापूर्वी २०० वर्षे आधी झाली असावी, असा अंदाज वर्तविला जातो. कोकणात बौध्द धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरणारे बौध्दभिक्खू हे या लेण्यांचा वापर त्यांच्या वास्तव्यासाठी आणि साधनेसाठी करीत असावेत, असे अनुमान काढले गेलेआहे. नंतरच्या मध्ययुगीन काळात कोकणात दीर्घकाळ शिलाहार राजांनी राज्य केले. त्या कालखंडात कलेचा खर्‍या अर्थाने विकास व संरक्षण झाले, असे अभ्यासकांचे मत आहे.
शिलाहार राजांच्या कालावधीमध्ये विकसित झालेली कला व कलाकारांना मिळालेले आश्रयस्थान याची साक्ष म्हणजेच कसबा- संगमेश्‍वर येथील हेमाडपंथी श्री कर्णेश्‍वरमंदिर, हे होय . या संपूर्ण परिसरात लहानमोठी सुमारे ३६० मंदिरे आढळून येतात. म्हणूनच या ठिकाणालापूर्वीच्या काळी दक्षिण काशी असेही म्हटले जात असे.कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्मित झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून ती फारच अतिप्राचीनआहे. या कलात्मक संस्कृतीची निश्‍चित कालगणनाही अद्याप झालेली नाही.तसेच ही कलानिर्मिती कोणत्या कारणासाठी, कधी, कोणासाठी निर्माण झाली आणि कोणी निर्माण केली, याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत किंवा त्यांचा साधा मागमूसही सापडलेला नाही.कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणि कुडोपीसारखी अनेक ठिकाणे पुरातत्वीयदृष्ट्या खूप महत्वाची असून ती या भागातील आदिम मानवी समूह वत्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध करून देऊ शकतील. मात्र, या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने परिक्षण होणे, हाती येणार्‍या माहितीचा संयुक्तिक अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्‍चित करणे इत्यादी बाबींवरलक्ष केंद्रीत करावे लागेल. अशा प्रकारच्या संशोधनामुळे कोकण प्रांताच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, ही ठिकाणे पर्यटनदृष्ट्याही विकसित केल्यास कोकणच्या पर्यटन विकासालाही त्यांचा निश्‍चितच हातभार लागू शकेल. मात्र त्यासाठी सरकारला संबंधित क्षेत्रे अधिग्रहीत करुन ती संरक्षित म्हणून जाहीरकरावी लागतील.मात्र अशी कृती आजपर्यंत कोणत्याच सरकारने केलेली नाहीत. कोकणातील लोकप्रतिनिधीही या बाबतीत उदासीन आहेत.

अमोल पालये, रत्नागिरी.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू