दुसर्‍याचं दु:ख

निवारचा आठवडा बाजार असल्यानं एस.टी.ला तुफान गर्दी होती. तरीही कंडक्टर काही केल्या डबल बेल देण्याचं नाव काढत नव्हता. तीनच्या सीटवर चार चार माम्या-मावश्यांनी जागा अडवली होती. शिवाय एसटीच्या मधल्या बोळात जी जागा उरते त्यातही जेमतेम उभे राहू इतकीच जागा होती. गंम्मत म्हणजे एसटीत केवळ माणसंच नव्हती.. प्राणीही होते. आठवडा बाजार असल्यानं माम्यानी रानमेव्याचा सारा बाजार काचक्या-बोचक्यांनी आणला होता. 
कुणाच्या आंब्याच्या टोप्या शिगोशिग भरल्या होत्या. काहींकडे काजू, काहींकडे करवंद.. कोकमं, कैर्‍या, सोललेले काजूगर, रामफळं.. असा बराजसा रानमेवा पिशव्यातून डोकावत होता. आधीच एसटी खचाखच भरलेली, त्यात या पिशव्यांनी जागा व्यापलेली.. आणि भरीस भर रस्त्यावरचे खड्‌डे एसटीला जणू नाचवत होते.. आणि त्या नाचाच्या तालावर आतली माणसं आणि पिशव्याही डोलत होती. त्यात उभ्याने एसटीची दोरखंड हाती धरून असणारे कामगार, शाळेचे विद्यार्थी, पेन्शनर एकमेकांला जणू दे धक्का करत होते. मग जरा कुठे गाडी आदळली की ड्रायव्हरच्या नावानं उद्धार होत होता.. 
गंम्मत म्हणजे जरा गाडीनं ब्रेक दाबता दाबता क्ररर.. केलं की, एका मावशीच्या पिशवीतून ‘क्वाक.. क्वॅ...क्वॅ..’ असा आवाज यायचा.. बाजारात विकायला तीनं पाय बांधून पिशवीतून कोंबड्या आणल्या होत्या, त्यांची मान तेवढी श्‍वासोश्‍वासाच्या काळजीपोटी किंचित बाहेर ठेवली होती. पण त्यांना धक्का मिळताच त्या कोंबड्याही का-कू करत होत्या. प्रवाशांच्या त्या कोंबाकोंबीत तेवढंच एक हास्य शाळकरी पोरांच्या चेहर्‍यावर उमटत होतं.. पण कोंबडी जसजसा मोठा आवाज करू लागली तसं मात्र त्या हास्याचे रूप हास्यकल्लोळात पालटले.. मग हा जोक अगदी पुढच्या सीटपर्यंत पोचला आणि सारेच त्यात सामील झाले... मग मात्र मावशी त्या कोंबड्याचंी अलगद मानच दाबू लागली, तसं ते कोंबड गप्प राहिलं.गाडी जसजशी पुढं जावू लागली, तशा आणखी काही मावश्या टोपल्या आणि पिशव्या घेवून एसटीत चढत होत्या. 
आधीच गर्दी असलेल्या एसटीत थोडी थोडी जागा करत ‘वायचं पुढं व्हा.. ओ भाउ सरका जरा..’ करत होत्या. वैंशिष्ट्य म्हणजे ‘प्रवासी वाढवा अभियान’ वगैरे काही नसतानाही या सार्‍या गर्दीपुढे विनम्र होत कंडक्टर सार्‍यांना गाडीत घेत होता.आचके-गचके देत गाडी गावकुसाबाहेर आली आणि सार्‍यांनी काहीसा सुटकेचा विश्‍वास टाकला, कारण आता काही या गाडीत टोपल्या येणार नाही. याची त्रासलेल्यांना खात्री वाटली. आता गाडीत वेगवेगळे वास सुटायला लागले होते. 
काजूचा.. पिकलेल्या आंब्याचा.. फणसाचा.. आणखी कसला कसला.. त्या सार्‍या वासाचं आता मिश्रण झालं होतं.. आणि ते मिश्रण आता सारं वातावरण कुबट बनवत होतं. उभ्या असलेल्यांचे.. शहरातल्यांचे पित्त खवळीत होतंगाडी बाजार परिसरात आली तशी माम्यांची गर्दी काहीशी कमी होवू लागली, एक एक मामी आपली फाटी घेवून खाली उतरू लागली. कष्टकरी माम्या-मावश्या, शेतकरी अशा एका वर्गानं काही वेळापूर्वी भरलेली ती गाडी रिकामी होवू लागली... आता गाडीत वेगळीच लोकं चढू लागली. नव्या वर्गाचं साम्राज्य एसटीत पसरंल. हा वर्ग पहिल्या वर्गापेक्षा खूप वेगळा.. स्वत:ला सुधारलेला.. पुढारलेला समजणारा, आणि जीवन संघर्षातूनही काहीसा स्थिरावलेला.. त्यात होते शाळामास्तर.. गंमतीचं कॉलेज अनुभवायला आलेली कॉलेजची पोरं.. सार्‍या जबाबदार्‍यातून पार पडलेले आणि काहीसे निर्ढावलेले पेन्शनर.. कामगारांपेक्षा ऑफिसला जाणारे साहेब.. एसटीचं एका वर्गाकडून दुसर्‍या वर्गाकडे झालेलं हस्तांतरण पाहणारा एकच साक्षीदार तिथं होता.. तो म्हणजे कंडक्टर... त्याला सारे सारखेच.एव्हाना सुखासुखी चाललेल्या त्या गाडीतल्या वातावरणानं आता वेगळचं वळण घेतलं. 
एक सेवानिवृत्त अचानक पिसाळला, अचानक म्हणण्यापेक्षा मघापासून तुंबलेला त्याचा राग उफाळून बाहेर आला.‘‘काय ओ, तुम्हाला काही कळते की नाही हो.. कसल्या टोपल्या-बिपल्या गाडीत घेता, ही काय मालगाडी वाटली तुम्हाला..? धड उभं रहायला जागा नाही इथे.. चला येतोच आता कंट्रोलरकडे आणि जाबच विचारतो..’’ असे गुरगुरत पायाजवळ असलेल्या एका पिशवीलाच त्याने ढुशी मारली.. मामीच्या ते लक्षात आलं नसावं.. तो पुटपुटत होता.. तापत होता.. पण कंडक्टर मात्र कमालीचा शांत होता. अखेर गाडी आगारात पोचली, तसा उतरण्यासाठी सार्‍यांनी एकच गलका केला. त्या गलक्याने पुन्हा पेन्शनर तापले.. आणि सर्वात शेवटी उतरले. मात्र उतरल्यावर महाशयांनी थेट कंट्रोलरचे केबिन गाठले. 
कंट्रोलर साहेबांचे केबिन सुरेख होतं.. टेबलवर दोन दोन फोन.. फुलदानी.. बाप्पाचा फोटो.. पाटी.. त्यावर नाव.. ‘भारत... ’ अमुकअमुक.. पुढे पदावली. सारचं सुखवस्तू होतं. नावातचं इतकं व्यापकत्व होतं की बस्स समाधान वाटावे. अखंड भारतीय जनतेच्या-प्रवाशांच्या तक्रारीचं निवारण करायलाच तो जणू बसला होता, असे वाटत होते.त्या सेवानिवृत्त प्रवाशांने मघाचाच तक्रारीचा पाढा कंट्रोलरपुढे त्राग्याने वाचून दाखवला, 
‘‘काय हो, काय चाललंय काय एसटीत..? कसल्या टोपल्या, पिशव्या घेतात तुमची माणसं गाडीत? ती घाणेरडी माणसं.. ती गर्दी.. तो वास.. डोकं उठलं..’’ 
कंट्रोलर साहेब शांतच होते. पेन्शनर साहेबांना मात्र आता कोडचं पडू लागलं की, आपण काहीही बोललं तरी एसटीतली ही माणसं एवढी गपारेगप का होताहेत..?’’त्या सेवानिवृत्ताचे आरोप ऐकूनही कंट्रोलर शांत होते. मग शांतपणे म्हणाले,
‘‘काय ओ साहेब, किती पेन्शन मिळते तुम्हाला?’’
पेन्शनराने आकडा सांगितल्यावर कंट्रोलर म्हणाले, 
‘‘होय ना, मग काय कमी आहे तुम्हाला? ती गोर- गरीब, बायाबापडी माणसं आपल्या पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी शहरात येतात.. या पै- पै मधून त्यांचा संसार चालतो. साहेब, तुमच्यासारख्यांच्या गरजा केव्हाच पूर्ण झाल्यात. पण त्या तळागाळातल्यांच्या गरजा दिवसभर हेलपाटे मारूनही पूर्‍या होत नाही. अशावेळी एसटीनं त्याना जवळ केलं तर तुमचं कुठे बिघडलं? गोरगरीबांचं दु:ख तुम्ही भले कमी करू नका, पण समजून तर घ्याल.. साहेब, ही एसटी जशी तुमची आहे, तशीच त्यांची पण आहेच ना..’’
कंट्रोलरच्या या उत्तराने तो पेन्शनर निरूत्तर झाला, पण दुसर्‍याचं दु:ख स्वत: समजून घेवून दुसर्‍याला सांगण्याची त्याची कणव एसटीतल्या त्या रानमेव्यापेक्षा अधिक गोड होती, तीला कुणीही ओल्या डोळ्यांनी सलाम करील..

अमोल पालये, 
रत्नागिरी.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू