मनोगत

स.न.वि.वि.

‘गावकीच्या पारावर’ आपणां सर्व वाचक, हितचिंतकांचे हार्दिक स्वागत! 
आजपर्यंत लिहता-लिहता आपणां सर्वांच्या ज्या शुभेच्छा मिळाल्या, त्याच शुभेच्छ्‌यांच्या जोरावर आज हे ब्लॉगच्या घरात पहिले पाऊल टाकत आहे. यानिमित्ताने प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून अवघ्या जगभरात पोहोचण्याची संधी मिळाली आहे.

लहानपणापासूनच ग्रामीण जीवनाची साथसंगत लाभली. हे ग्रामीण जीवन जितकं मजेदार आणि वैविधतेनं नटलेलं आहे, तितकचं ते समस्यांनी वेढलेलं आहे. इथं एकमेकाविषयी कमालीचा जिव्हाळा आहे.. मायेचा उबारा आहे.. या जिव्हाळ्यामुळे इथला माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. इथं अज्ञान आहे.. रूढी आहेत.. परंपरा आहेत.. आणि त्यातही तो कमालीचा बांधला गेला आहे. हेच चित्र आयुष्याच्या उभारत्या टप्प्यावर माझ्याभोवती पिंगा घालू लागलं, आणि कागदावर उतरू लागलं. यथावकाश चाचपडत चाचपडत ग्रामीण कथा लेखनाचा प्रारंभ झाला. 

आजपर्यंत मी लिहलेल्या सार्‍याच कथांची पार्श्‍वभूमी ग्रामीण आहे.. प्रत्येक कथेत एक गाव आहे.. गावात गावकर आहे.. कधी तो खलनायक आहे.. कधी तो गावाचा कर्ता कारभारी आहे.. विषेश म्हणजे सार्‍याच कथा ‘जिव्हाळा’, ‘आरती’, ‘विपुल श्री’, ‘अक्षर वैदर्भी’, ‘चैत्राली’ अशा नामवंत दिवाळी अंकातून प्रसिध्द झाल्या. त्यांना राज्य आणि जिल्हास्तरावर पारितोषिकही मिळाली.

हे कथालेखन चालू असतानाच अनपेक्षितपणे एका क्षणी ‘पायरवबुवांच्या झाकन्या’ या कोकणातील संगमेश्‍वरी बोलीतील एकमेव वृत्तपत्रीय सदराचा शुभारंभ झाला. रोज एक कथा याप्रमाणे सुमारे आठ महिने लघुकथा प्रसिध्द झाल्या. व्हॉटस्‌ऍप, टिव्ही, आणि संगणकाच्या दुनियेत या ‘झाकन्यां’नी अमाप लोकप्रियता मिळविली. अनेक वाचक, कलावंत, साहित्यिक, नाट्यसंस्था यांनी या सदराला आपली पसंती कळविली. अनेक नमन मंडळांनी ती संहिता वापरत त्याचे सादरीकरणही केले. ‘पायरवबुवा, झिंगाटवाडी’ या टोपणनावाने हे सारे लेखन झाले.

अशा या अनेक कथा आज आपणांस या ‘गावकीच्या पारावर’ उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. आपण यापुर्वी जो उदंड प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आभारी आहे. 
आता या नव्या प्रवासालाही आपल्या शुभेच्छा लाभाव्यात, म्हणजे हा गावकीचा पार अधिकाधिक रंगवायला अधिक हुरूप येईल, हीच सदिच्छा!











आपला
अमोल पालये.
मो.९०११२१२९८४

दि.१५ ऑगस्ट. २०१८.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू