पालकी जडावली

हा तं काय झालं. ढोलताशाच्या दनक्यात आनी गंगीन रांगोलीनं काडलील्या सोनपावलांवर पाय टाकीत रवलनात म्हाराज रवलनाताचे पयल्या फलीचे मानकरी, आनी रवलनाताचे लय मोटे पुंजारी.. झिंगाटवाडीचे सरपंच तात्या गावकरांकडे पालकीतनं आलं. गंगीन पाय धुवून रवलनाताला घरात घेतलानं, सोता तात्यांनी पालकीला खांदा देलानी व्हता. 
देव तात्यानंच्या घरात बसलंं. मंग सोता तात्या आनी गंगी गावकारीनं जोडयेनं पुंजा करया बसली. दोगावानी हात जोडलानी, आनी रवलनाताला ‘देवा बा रवलनाता, गुंडुंबा धावीची परिक्षा देताय. त्याला यास देस रं बा म्हाराजा..’ म्हनून गार्‍हानं घातलानी. नारल फोडलानी. पेढं वाटलानी. आनी मंग तात्यानंच्या खलात देव खेलया लागला.. आता तात्या मानकरी म्हनू तेंचेकडं रवलनात नाचतू, आमी साधमानूस. आमचीकडं फकस्त येतू, पावनाचार घेतू.. आनी जातू.. आसो. तं ता थोडाथोडाका नाय खेलतं. तात्या जोवपरयानं तेला जायाची परवानगी देत नाय. तोवपरयानं ता तितचं खेलत र्‍हानार.. आता तेला खेलवनार्‍यांची काय कमी नाय. ही झो गरदी. चाकरमनान्यांनंला तं काय सांगया नुको. आक्का दिस पन तं पालकी नाचवीत र्‍हातीलं. आता पालकी नाचवाय प्वारांनंला ज्वोर येया हावा, म्हनू कायतरी करया हावं.. 
तं आमचं तात्या यकदम बेस बंदोबस करतात. पालकीचं खेलं आसतात तेनंला रेटून जेवानं करतात. तं सुदं साधसुदं नाय.. आयंशी किलुचं कोबंड्याचं मटान चुलीवर रटरटवीत ठेवतात. तेच्याबराबर भात.. वरन्याची भाजी, कोलमाची वतल.. हं सगलं जेवानं झालं. तं तिकडं तात्यानंच्या गोट्यात ही टमरेला भरलीला दारवची. अक्कीच्या अक्की डरमा भरून दारू आदीच आनूनं ठेवतात. कोनला दारू हावी आसलं तं ती घेयाची. कोनला माडी हावी आसलं तं ती घेयाची.. प्वारा-बालानं घेतलानं तं कोनंची काय तकरार नाय.. आसो. काय बोलयाचं, आनी काय सांगयाचं.. आसली गत झाली हाय. ता रवलनात सगलं बगतोय. यकदिस ता काटी उगारील ना तवा सगलं भाह्रं निंगलं.. काय समाजलंव?तं पालकी नाचया लागली, आनी धुमशान चडलं. ही झो गरदी जमलीली. चाकरमानी तं लोटून आलीलचं पन खेल बगया बायका-प्वारां पन कोपर्‍याकोपर्‍यानं जमलीली. कोन पालकी गरगरवी.. कोनं भिरभिरवी.. कोन डोेसकीवरनं नाचवी.. ही नुसती झोंंबाझोंबी. तसचं तिकडं ढोल वाजवनार्‍याचं. ताड ताड हाताच्या शिरा तानीत तं ढॉल वाजवीत व्हतं. आनी जीवाची हवसं भागवीत व्हतं.. हालूहालू तासभर लॉटला, तसं यकयक खेलकरी.. ढोलकरी आटपाय लागलं. तसं मंग कोन मागल्या पडवीत जेवया जाव लागला. तं कोन गोट्यात घुसया लागला.. मंग गोट्यात घुसलीला घसा वली करी, आनी भाहरं येय. ता वायचं ताट झाला की, मंग परत ढॉलावर परत तुटून पडं. 
तिच गत पालकी नाचवनार्‍या प्वारांची.. वायचं मटानाचं ताट आनी दारवचं गिलास खाली करीत.. की झो परत पालकी नाचवाय जायतं. आसं आत-भाह्रं करता करता सगलं दमलं.. खावनं..खावनं.. पिवनं.. पिवनं.. नाचून आनी वाजवून फुगलं.. हेलपाटलं.. झेपा देया लागलं.. आटापलं..काय येलानं तात्यानी इशारा केलानी. पालकी नाचयाची थामली. तसा रवलनात सानंवर जाया निंगाला. पालकी जाव लागली, तसं खानकरी बोमा मारया लागलं, 
‘‘तात्या देव जायाचं नाय म्हनतो. पालकी जडावली.!’’ 
तात्या म्हनालं,‘‘आरं जडावनारच! देव कोनाचा..? तात्या गावकाराचा! तेला आमच्या घरातनं जावसं वाटलं तरी काय..? आवं हं आजचं नवं. दरवरसीचं हाय. देव आमचेकडं आला की, ता जायाचं म्हनीतच नाय. तेची पालकी जडावतेच..’’ 
आमी ती सगली नाटका बगीत व्हतवं. पालकी काय खांदकर्‍यांनला नेया येयना. तसं आमी यका बाबवंला बराबर घेतलंव. खांदा मारलाव, आनी तरातरा सानंवर पालकी घेवनं चालया लागलवं.
आवं यवडी दारू ढोसल्यावर.. आनी जेवानं रेटवल्यावर रवलनाताची पालकी तात्याकडं जडावलं नायतं काय व्हयलं सांगा बगू..? आवं पालकी नेयाची मंजे पाय तरी सिदं उबं र्‍हाया हावं की नुको..? तात्या आपलं कायतरी लॉकानंला सांगीत सुटलं, तरी आमी काय तं खरं मानीत नाय.. काय समाजलंव? आमी दारू पियालंव नवतंव. तेवा आमीपन, आनी आमचं पायपन शाबूत व्हतं. मजबूत व्हतं. म्हनूच आमी तरातरा आमच्या खांद्यावरनं रवलनाताला घेवनं सानंवर आनलंव.. काय समाजलंव?

-पायरवबुवा, झिगाटवाडी.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू