डीजे

काळी घाई-घाईनेच कोपरेकरांकडे लग्नाचं देवक ठेवून झालं, सुटलो बुवा...! म्हणत बंड्या कोपरेकरांन जणू सुटकेचा श्‍वासच सोडला. बंड्याच्या लेकाचं- मन्याच लग्न आरंभलं होतं. सोमवारी साखरपुडा झाला आणि आज सकाळी देवक ठेवण्याचा कार्यक्रम पुर्‍या गावकीनं झटापटी पार पाडला...
प्रसंगच तसा बाका कोपरेकरांच्या भावकीवर ओढवला होता. मन्याच्या लग्नाचा मुहूर्त आणि भावकीतल्या दिप्या कोपरेकराच्या गर्भार बायकोचे दिवस एका घटीकेलाच बहूधा भरणार होते. तशी कुणकुणच यजमान्याला आणि पूर्‍या गावकीला लागली होती. काल रात्रभर तीच्या पोटात कणकणत होतं. त्या कणकण्यानं यजमाननींच्या पोटात जास्तीच धास्ती उठली होती. खरेतर तीच्या नऊ महिन्यांचा विचार आधी कुणाच्या लक्षातच आला नव्हता; पण जेव्हा बोलबाला झाला तेव्हा मात्र यजमान्यासमोर लग्नावर ओढवणार्‍या सुवेराची चिंता गडद होवू लागली होती.
अशावेळी बंड्याला काय करावे काही सुचत नव्हते. ऐन लग्नाच्या काळातच ती बाळंत झाली तर कोपरेकरांच्या भावकीवर सुवेर येणार आणि मग लग्न करता येणार नाही. सगळ्या आनंदाचा अक्षरश: विस्कोट होणार... पावणी रडत-कुडत राहणार... पोरांबाळांची, मुंबैकर चाकरमान्यांची मनं हिरमुसणार... मुंबैकरांची रेल्वेची तिकीट काढलेली... सुट्टी काढलेली... त्यांना मनस्ताप होणार, शिवाय सोयरीकही बोल लावणार.. एकुलता एक पोरगा त्याला काय वाटेल...? सारं चित्र बंड्यासमोर दिसू लागलं. कायतरी केलं पाहिजे आणि हे विघ्न अडवलं पाहिजे.. बंड्या आणि त्याची बायको चलबिचल झाली...खरेतर बाळंतपण म्हणजे एका नव्या जीवाचा या दुनियेत मंगलमय प्रवेश... पण चालीरितीनं तो प्रवेश म्हणजे धार्मिक विधीसाठी निषिध्द ठरवलेला. अखेर यजमानीनं बंड्याला धीर देत गावकाराकडे पाठविलं. ती वार्ता ऐकून गावकरही थोडासा चिंतेत पडला; पण मग म्हणाला, 
‘‘लगन गुरवारी दोनपारला होणार. सकाली देवाक ठेवणार... मग आपण असं करूया लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजे उद्याच, देवाक ठेवया... एकदा का देवाक ठेवून झालं की मग कसली अडचण र्‍हात नाय बघ बंड्या. निदान सुवेराची तरी... सुवेराला देवाक ठेवूनं लगन उरकलेलं चालतं. कोन मेलं तर मात्र काय खरं नाय, तेव्हा मात्र काय देवाचा विधी कामाचा नाय; पण सुवेराला हा तोडगा चालतो... वाटलं तर पुरूष्या भटाला विचारा...’’ 
बंड्याचा चेहरा खुलला. गावकार सांगतो म्हणजे सौ टक्का बरोबर असणार. याचा त्यालाच काय पुर्‍या गावकीला विश्‍वास होता. चार पावसाळे अधिक बघितलेल्या गावकाराच्या त्या तोडग्याने बंड्याला धीर आला. गावकारानं सांगितलं आणि आपण ऐकलं...! हाच त्याच्यासाठी अंतिम निवाडा होता, त्यासाठी पुरूष्याभटाकडे जाण्याची काहीच गरज नव्हती.मन्याचं लग्न ठरताच गावातही जणू नव्याची नवलाई आली...! लग्नाचा नवरदेव मन्या जितका सार्‍यांच्या कौतूकाचा विषय होता, तेवढंच मुंबैकर चाकरमान्यांचं आकर्षण सार्‍यांना वाटत होतं... तो सुप्य्रा आल्यापासून मोठ्या स्क्रिनच्या मोबाईलवर मोठ-मोठ्या बाता मारत होता... ‘‘ऐसा करनेका... वैसा करनेका...’’ असं हिंदी फाडत होता. गावकर्‍यांना त्याचं भारी कौतूक वाटलं, त्याच्याजवळ एवढा मोठा मोबाईल म्हणजे हा कोणतरी मोठा शेठ्या हाय बघा...! अशी त्यांची समजूत झाली होती. अजून गावकर्‍यांच्या त्या गावात मोबाईल आला नव्हता... इकडे मोबाईलवर बाता मारत सुप्य्रा भाव खात होता तर तो इज्या एवढ्याशा मोबाईलवर चॅक.. चॅक.. करत बारीक पोरांचे फोटो काढत होता, मग सारी पोरं त्याच्या मागं, ‘‘ए दादा माझा पण काढ ना फोटू...’’ करत त्याच्याभोवती गोळा होत होती. तो संतोष सेंटचा भपकारा मारून गावभर फिरत होता. नर्‍या मात्र आपण भारीच सिन्सिअर आहोत असं दाखवत होता. तो इनशर्ट करून आपण सोज्वळ असल्यासारखे फिरत होता. त्याला कारणही तसंच होतं. गावातली माली त्याला आवडली होती... कालच संध्याकाळी त्यानं तीचा खालच्या मळ्यात ती पाटाला पाणी लावत असताना पाठलाग केला होता... नर्‍या आल्यापासून त्याच्या मनात काय चाललंय ते मालीही जाणून होती... 
एकंदरीत काय नर्‍याचं काम आघाडीवर होतं, आणि गावात मन्याच्या लग्नापेक्षा मुंबैकरांच्या रुबाबाची... शायनिंगचीच जास्ती चर्चा होती. मन्याचं लग्न म्हणजे मुंबैकराचं लग्न होतं. त्यात नव्या पिढीचं नाविन्य होतं.. गावात डिजिटल क्रांती घडतेय, शहरी संस्कृती घुसतेय... त्याचचं ते पहिलं पाऊल होतं.
तोडगा मिळताच ताबडतोब बंड्याने गावकीला रातोरात देवक ठेवण्याचं आमंत्रण धाडलं. सकाळी सडा-सारवण पडलं. दारी केळीचं तोरण सजलं. कोपरेकरांच्या गावाच्या एका अंंगाला असलेल्या त्या घरात आज कित्येक वर्षानं ढोल-ताशा वाजला. लाउडस्पीकर फोकळला. बायकांचा कालवा झाला. लग्नाची गाणी बायकांच्या ओठावर आली. जेवणावळीच्या चुली धगधगू लागल्या. या सार्‍यांत खास लग्नासाठी आलेल्या गावातल्या मुंबैकर चाकरमानी पोरग्यांनी आणि मन्याच्या मित्रांनी तर जल्लोष उडवला. खर्‍या अर्थाने आज त्या घरात चैतन्य आले.मांडवात रांगोळीचा चौरस पडला. त्यावर गादी पडली. बारा नारळरूपी बारा देवस्थानं म्हणजेच ‘देवक’ मांडली गेली. मधल्या जागेत विड्याच्या पानांचा थाट सजला. गावकर- गावकारीन, सारे गावकरी, पोरं-बाळं, यजमानी आणि नवरदेव मन्या सारे सजले होते. 
अम्या भोवडानं मुंबैसून डिजिटल कॅमेरा आणला होता. तो दणादण फ्लॅश मारत होता. त्याच्या फोटोत येण्यासाठी गावकर्‍यांची नुसती घुसाघुस चालली होती. नवर्‍याचे फोटो काढण्यापेक्षा अम्या गावातल्या पोरीचेच क्लोजप् घेत होता. पोरीही लाजत मुरडत त्याला झक्कास पोज देत होत्या. एकूण काय अम्या खुश होता. नुसते फ्लॅश मारायला त्याच्या बापाचं काय जात होतं... ताशांच्या करकराटात देवकांची साग्रसंगीत पुजा झाली. गावकारांन देवकांना गार्‍हाणं घातलं, 
‘‘जय देवा सुकाय-सोमेश्‍वरा आज तुजा लेकरू बंड्या तोरसकरानं हा पाच पानाचा जा काय इडा भरलानं हाय ता मानून घे.. उद्या त्याच्या लेकाचा लगीन हाय, तरी त्याच्या कार्यात यास देस. जा काय यडावंगाळ आसलं ता पायाखाली चेपून धर...आणि ह्या कार्य सुखासमाधानांन पार पाड, कोणाचा एका जीवाचा दोन जीव काय करयाचा हाय ता सुखरूप कसली अडचण न येता कर रे म्हाराजा...’’
सार्‍यांनी अत्यंत भावूकतेनं साद घातली. आणि देवक ठेवून झालं.कोपरेकरांच्या घरात येणार्‍या विघ्नाला बाजूला ठेवून मंगलकार्याला सुरूवात झाली. बंड्या कोपरेकराचा मन्या एकुलता एक पोरगा. गावातल्या सार्‍या चाकरमान्यासारखाच तो एक हौशी चाकरमानी. दहावी पुरी केली आणि गाववाल्यांबरोबर मुंबैयला गेला. त्यामुळे त्याचं गावाशी नातं केवळ शिमगा, गणपतीपुरतचं होतं. त्यापेक्षा जवळचं नातं होतं ते मुंबैकर चाकरमानी गाववाल्यांशीच. तेच त्याचे आतापर्यंंतचे सुख-दु:खाचे साथीदार होते. उद्या त्याच्या हक्काचं माणूस त्याची सुख-दु:ख वाटून घ्यायला येणार होतं. त्यातही ‘पण’ होता. येणारी बायको चार दिवस त्याच्यासोबत राहिल, मग तो एकटाच उदासपणे मुंबईला जाईल...याच चाकरमानी मित्रांच्या लग्नसोहळ्यात मन्यानं एकेकाळी फुल्ल मजा केली होती. कधी त्यांची चेष्टा केली होती तर कधी धावत जावून एखाद्याला मदत केली होती, त्यामुळे त्याच्या दोस्तांचा सारा गोतावळा गेल्या चार दिवसांपासून एक एक करत गावी येत होता. मन्याचं लग्न म्हणून त्यांचाही उत्साह मोठा होता. सगळेच झाडून आले होते. त्यामुळे कायतरी वेगळं व्हावं की मन्याचं लग्न कायम आठवणीत र्‍हावं ही आस सगळ्यांनाच होती.
 गावात सण-उत्सव तसे बारामहिने होत असतात. गावकरी ते पार पडत असतात; पण मुंबैकर चाकरमानी पोरांना मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी या सण-उत्सवातल्या आनंदावर विरजण घालत वर्षांनूवर्षे कुढत रहावे लागते. कधीतरी गणपतीची सुट्टी मिळाली तरच गावाला यायचे, कोकणातल्या समुदकिनार्‍यावर दरवर्षी न चुकता ऑस्ट्रेलियन सिगल पक्षी पाहूणे म्हणून काही दिवस येत असतात. मुंबैकर चाकरमान्यांनाच्या नशिबी त्या सिगल पक्ष्यांसारखे भाग्य असेलच असे नाही... कोकण रेल्वेचे आरक्षण.. एस.टी. ची गर्दी... आणि मुंबई-गोवा महामार्गावरचे अपघात यातून जीव अक्षरश: मेटाकूटीला येतो. महामार्गावर कधी अपघात होईल आणि पुढ्यात काय वाढलेलं असेल याची शाश्‍वती नाही. चाकरमान्यांच्या नशिबी केवळ दिवसरात्र मुंबईची जीवघेणी धावपळ... ना सण- उत्सवातला आनंद, ना बायकोची ऊब.. बायकोसुध्दा स्वत:पासून दूर... सारेच निरस. आणि म्हणूनच की काय या मुंबैकर चाकरमानी पोरांची गावाला आल्यावर मात्र ही तुंबलेली हौस एमबीपेक्षा एकदम जीबीच्या प्रमाणात उसळून येते. हीच उर्जा एकाएकी मन्याच्या दोस्तांमध्ये उफाळून आली, त्यांनी ही ठरवलं,
‘‘ऐला, मन्या रात्री हलद रंगली पायजे यार, नाद नाय करायचा..’’
सुप्य्रा तोरसकराची ती आयडिया सार्‍यांनाच आवडली. इज्यानेही त्याला होकार दिला, 
‘‘आरे रंगली नाय फुल्ल झाली पायजे बघ. मी स्टॉकपण आणलाय...’’ 
सारे चमकलेच...
‘‘ऐला खरचं... दाखव.. दाखव..’’
स्टॉक म्हटल्यावर पोरं खुलली.
‘मग हलदीला डिजेचं पायजे... पायजे म्हजे पायजेच...!’’
मन्या काहीच बोलत नव्हता. बाप काय म्हणेल, गावकार काय म्हणेल याचीच त्याला चिंता होती.
‘‘मन्या, साल्या गप का.. तू काय पण म्हण. साल्या आमच्या लग्नात तू लय आमचा पिच्छा पुरवलास, आमी इसारलो काय? ता काय नाय, डिजे पायजे म्हजे पायजेच...’’ 
अम्यानेही हट्ट धरला. त्यांना नाराज करणे मन्याच्या जीवावरच आले होते. मुंबैत लग्न असते तर या गोष्टी ठिक होत्या.. इथं गावात डिजे आणि दारू आणायची म्हणजे बाप बिघडणार.. गावकार तरपासणार. सारंच कठीण होतं.
‘‘... अरे, पण बाबा नाय तयार व्हयाचा..’’ 
मन्या म्हणाला.
‘‘मी बोलतो बाबाजवळ...’’- सुप्य्रा.
‘‘...आणि गावकर...?’’
‘... आरे त्या म्हातार्‍याचं काय घेवनं बसलास, त्याला देवया एक बटली. काम एकदम ओके.’’ 
इज्यानं पर्याय सुचवल्यावर सारे जोरानं हसायला लागले.
‘... आरे पण इथं गावात कुठून आणणार तुम्ही डिजे? ही काय मुंबय हाय..?’’ 
मन्याच्या नकारघंटेने सारे वैतागले. त्याला कच्चा खाऊ की गिळू अशा नजरेनं पाहत इज्या म्हणाला, 
मेलास तू नवरदेव हायसं का कोण हायसं.. जरा मेला हौस नाय.. असा उद्या बायकोसमोर रडत बसलास तर पुढंच व्हयाचं कसं?.. मी जातो रत्नांग्रीत, आणि आणतो डिजे..’’ 
मग सारे मन्याची टेर खेचू लागले.नाय होय करता करता विषय यजमान्याच्या कानावर गेला. कमालीची गोष्ट म्हणजे, यजमानीही तयार झाला. त्याला कुठे माहित होतं डिजे म्हजे काय भानगड असते ती... त्याने फारतर बॅन्जो पाहिला होता. इज्या ताबडतोब रत्नागिरीला डिजेची ऑर्डर द्यायला गेला. गावातल्या पोरांमध्ये हा हा म्हणता वार्ता पसरली, ‘मन्यादाच्या लग्नात डिजे हाय... रात्री नाचायचं हाय... ढिंच्याक... ढिंच्याक...’ पोरांना भारीच हौस वाटली. गावात ताशावर नाचणार्‍या त्या पोरांना शहरातल्या डिजेचं अप्रुप मोठं होतं.
दुपार झाली. लग्न घरात मोठीच्या मोठी जेवणावळ उठली आणि एकाएकी पुन्हा एक चिंतेचं सावट यजमान्यावर पसरलं. तसं हे सावट सोसाट्याच्या वादळासारखं फसवं होतं. रो रो करत येतं आणि एकदम सुममध्ये गायब होतं. गावकर्‍यांना त्याची आता सवयच झालेय; पण ऐन लग्नाच्या दिवसातच ते पुन्हा काही कल्पना नसतानाच प्रगट झालं होतं, त्यामुळे यजमानी परत बिथरला... यजमान्याची म्हातारी म्हणजेच मन्याची आजी जरा जोरानचं तळमळू लागली. सकाळपासूनच ती जरा नरम होती. घरात लग्नाची गडबड म्हणून आधी तीच्याकडे कुणाचं लक्षच गेलं नाही; पण जसजसा दिवस वर चढू लागला तशी ती गार पडल्यासारखी झाली. जेवण काहीच घेत नव्हती, तोंडांन हावसय घालत वाळलेल्या शरीराचा भाता फुंकू लागली होती. काही बोलायची जेव्हा ती बंद झाली तेव्हा बंड्यानं हातपायच गाळले. सार्‍या सुना आजूबाजूला गोळा होवून कुणी पाय चेप, डोकं चेप असले उपचार करू लागल्या. कसले कसले लेप- औषधं तयार होवू लागली. सगळ्याच्याच चेहर्‍यावर चिंता दाटली होती. बायकांच्याही पोटात ती चिंता राहणे कठीण असल्याने ही वार्ता गावभर व्हायला वेळ लागला नाही... एकाएकी स्पीकरच बंद झाला. तशी सुन्न शांतता पसरली. म्हातारीनं जरा श्‍वासाची गती स्थिर केल्यासारखं वाटलं. स्पीकर बंद झाल्यानं मात्र गावाला कोडं पडलं. सारे कानोसा घेत कुजूबुजू लागले. गावकरही आला. बाकीचे गावकरीही जमले. मन्याही टेन्शनमध्ये आला. पोरं तर सुम्ममध्ये गप्प झाली होती. ही अशी कशी अचानक आजारी पडली? याचं त्या मुंबैकरांना मोठ्‌ठ कोडं पडलं. मन्या काहीशा रडवेल्या चेहर्‍यांन घरातून मांडवात आला. सारी पोरंही त्याच्या मागोमाग घुटमळू लागली. त्याची ती अवस्था गावकर्‍यांनी जाणली. कुणीतरी हसत म्हणालं, 
‘‘अरे काय नाय व्हैत तीला. सवयच हाय तीला अशा कार्यक्रमात घाबरवून सोडयाची. गणपती आला... ही पडली आजारी. नवरात्र आला... हीला भरली थंडी...’’ 
मग सारेच हसायला लागले.म्हातारीनं नव्वदी पार केलेय, त्यामुळे गावकरी म्हणत होते ते काही अगदीच खोटं नव्हतं. मागचा कोपरेकरांचा गणपती धाकधुकीतच आला. गणपती दोन दिवसांवर आला आणि म्हातारी पडली सिरीअस. सार्‍या चाकरमान्यांपर्यंत ही वार्ता पोचली आणि सार्‍यांनी आपलं कोकणकन्याचं रिझर्व्हेशन कॅन्सल करत गावाला येणं रद्द केलं. बिचार्‍यांचा हिरमोडच झाला. कोपरेकरांच्या भावकीनं सगळे देव जणू पाण्यात ठेवले. म्हातारीच्या त्या धाकधुकीत हरतालका पूजून झाल्या. हळू आवाजात गणपती आला... गवरसुध्दा आली; पण म्हातारी टिकली. गणपतीच्या आशिर्वादानं म्हणा; पण तीची तब्येत चांगली सुधारली. सगळ्या गावकर्‍यांचा हसून हसून जीव गेला. गणपती गेला आणि म्हातारी सड्यावर गुरा घेवनं कामाला जायाला लागली. तेव्हा सारे गावकरी तीची फिरकी घेवू लागले. म्हातारीनं तेव्हाच सार्‍यांना विश्‍वास देवनं ठेवलान, 
‘‘पोरांनो तुमच्या उत्सवाचा इस्कोट नाय रे मी करयाची... मी काय अशी तशी नाय जाणार, चांगली नातसून बघीन.. आणि पतवांड पण बघीन... तवाच जायनं...’’ 
म्हातारीच्या त्या बोलाची काहींना आठवण झाली आणि त्यांना जरा धीर आला. ते तसेच म्हातारी झोपली होती तिथं गेले. तीला साद घातली, 
‘‘म्हातारे, काय गडबड नाय हं करायची. मागं काय सांगतलंस हाय तं आठवणीत हाय नव्हं. उद्या लगन हाय. सगल्यांचं आनंदाचं दिस हायतं. तुज्या घरचं कार्य हाय.. तं नीट पार पडया हवं...’’ 
गाववाल्यांच्या त्या सादेला गावातल्या बायकांनी दुजोरा दिला. गंमत म्हणजे म्हातारीनं गालात हसत डोळे मिचकावले, त्याबरोबर मग सार्‍यांच्या मनात पक्की गाठ बसली... 
‘‘ऐला म्हातारी लय फसवी हाय... काय नाय व्हैत तीला..’’ 
तरीसुध्दा बंड्याच्या मनात ‘पण’ अडून होता. पोरांची मनं बैचेन होत होती. मग त्यांना काय सुचलं कुणास ठावूक. लागोपाठ एक दोघे डिजे आणायला गेलेल्या इज्याच्या मागावर गेले. ते साधारण चार-पाचच्या दरम्यान एक डॉक्टरलाच घेवून आले. म्हातारीला दोन झणझणीत इंजेक्शन बसली. जोडीला सलाईन लावली. पोरांनी डॉक्टरला पुन्हा पोचवलं. पैसे पण पोरांनीच दिले. आता जरा म्हातारीच्या जीवात जीव आला. सलाईन चालूच होती. क्षणभराचं म्हातारीचं वादळ नेहमीप्रमाणे शमू लागलं. तसा सार्‍यांच्यात परत उत्साह संचारला. 
हळद रंगणार होती. पोरं खुष होती. संध्याकाळ झाली तसा डिजेचा बाडबिस्तरा एका टेम्पोतनं आला, त्या डिजेवाल्या टेम्पोंच्या मागून बारीक पोरांच लांंबलचक लटांबर धुमशान घालत नाचत होतं. डिजे चालू होण्याआधीच हा उत्साह होता, मग नंतर काय परिस्थिती असेल याची मन्याला कल्पना आली; पण तेवढ्यात बंड्याच्या मानेवर मोडतारा आला...
‘‘काय नाय डिजे- बिजे वाजवायचा. घरात म्हातारी सिरीयस दिसते ना... नुसतीच हलद लागलंं...’’ 
बंड्या कडाडलाच. पोरांच्या पोटात गोळाच आला. सगळे गलपाटलेच. एवढा सारा अट्टाहास केला तो सारा वाया जातोय असं वाटू लागलं. सगळे कुजबूजू लागले, 
‘‘म्हातारी तर आता बरी हाय, मग काय हरकत हाय डिजे वाजवायला... आताच तर तीला सलाईन लावली...’’
सुप्य्रा तोरसकर अगदी रडकुंडीला येत यजमान्याला म्हणाला, 
‘‘असं काय करता भाऊ... बरी हाय ना आता आजी. काय नाय व्हैत तीला. आम्ही लावली हाय ना सलाईन, ताकदीची सलाईन हाय ती. अजून एक हाय... ती वाटल्यास रात्री लावू... डिजे पण आणला, असं ऐनवक्ताला नका हो माघार घेव...’’ 
सुप्य्राच्या त्या तक्रारीची सार्‍यांनीच री ओढली. मन्यानंही बापाला समजावलं. बंड्यानंही फार ताणून धरलं नाही. त्यालाही पोरांचे उपकार आठवले. म्हातारीच्या तब्येतीत इंजेक्शन दिल्यानंतर बराच फरक पडला होता. उठून बसली होती, गोड खिरीबरोबर जेवली होती, मग बंड्यालाही पाझर फुटला. म्हणाला, 
‘‘म्हातारी बरी हाय तर मग करा कायतं...’’
पोरांनी एकच हुर्यो केला. हळदीच्या तयारीला वेग आला. डिजेचीही जोडणी झाली. इज्या, नर्‍या, सुप्य्रा, संतोष, अम्या सारे भलतेच खुष झाले होते. दुपारी लावलेली म्हातारीची सलाईन संपली. म्हातारी आता चांगलीच टुकटुकीत दिसत होती; पण पोरांनी विचार केला दुसरी पण सलाईन लावूया म्हणजे काय टेन्शन नाय... सार्‍यांना ते पटलं. म्हातारी तयार नव्हतीच; पण दुसरीही सलाईन लावली...संध्याकाळ दाटू लागली. लग्न मांडवात बाया-बापड्यांची गर्दी होवू लागली. येणार येणार म्हणता बंड्याच्या लग्न घरात येणारी दोन्ही विघ्न दूर पळवून लावण्यात आली होती. सारेच चिंतेच्या सावटातून बाहेर आले आणि जरा सैलावले. हळदीच्या कार्यक्रमाची तयारी होवू लागली, म्हातार्‍या बाया लग्नााची गाणी म्हणून लागल्या..दारीच्या गं तुळशीबाई...तुजवरी भार गं कशाचा...तुजवरी भार गं हलदीचा...एकीकडे ते स्वर सुरू झालेले असतानाच अचानक डिजे सुरू झाला, आणि सार्‍या पोरां-टोरांसह चाकरमान्यांनी जल्लोष केला. डिजेचा आवाज जसा फुल्ल झाला तसे बायकांचे गाणे त्यापुढे नि:शब्द झाले. आवाज कसला तो... आवाजाचा विस्फोट होवू लागला होता जणू... घरादारातली सारी माणसं काय वाजायला लागलं म्हणून पटापटा बाहेर आली. स्पिकरपेक्षा डिजेचा आवाज प्रचंड मोठा होता. कुणीतरी जमिनीवर दे दणादण काहीतरी हाणतंय असा भास सार्‍यांना होवू लागला. पोरींनी कानात गच्च बोटं घातली... म्हातार्‍यांचे हात आपसूक छाताडावर गेले... सार्‍या बायका सैरभैर झाल्या. एकमेकींना विचारू लागल्या, 
‘‘काय गं बने जमीन हलते गं कशानं...?’’ 
अख्या वाडीतही तीच स्थिती होती. मातीच्या मापाच्या भिंती आणि पायाखालची जमीन थरथरते कशानं...? हेच कोडं गावकर्‍यांनाही पडलं होतं. कोपरेकरांकडं कायसं जोरांन वाजतंय, म्हणत त्या धावतपळत मंडपात आल्या... डिजे ही काय भानगड आहे, हे त्या बायाबापड्यांच्या गावीही नव्हते. डिजेचा तो दणदणाट आणि पोरांनी नाचताना माजवलेली हुल्लड ऐकून गावकाराला तर वाटले मांडवात पोरांमध्ये काय दंगा-बिंगा झाला की काय... कारण असा डिजे आणि असा हुल्लडपणा त्यानंही आजपर्यंत कधी पाहिला नव्हता, गावाचा गावकार असल्यानं त्याला फक्त करडी शिस्त माहित होती. त्यामुळे त्याचीही पावलं मांडवाकडे चालू लागली.सारी पोरंबाळं ‘बिलनची नागीण निघाली...’ गाण्यावर धुमशान घालत होती. मन्याचे चाकरमानी दोस्त फुल्ल झाले होते. इज्यानं आणलेल्या स्टॉकची सोय मागच्या खोपटात कुणाला पत्ता लागणार नाही अशा पध्दतीनं केली होती. संध्याकाळचे सात पंचेचाळीस झाले तसे स्टॉकवर स्टॉक रिचवायला सुरूवात झाली. 
आता डिजेच्या तालावर गावातल्या काही हौशी गावकर्‍यांनीही ताल धरला. ‘नवा नवीन पोपट हा... ’ अशी दादा कोंडकेंवरून सुरूवात होत, ‘शीला.. शीला की जवानी... ते अगदी ‘मुन्नी बदनाम हुई... शांताबाय’पर्यंत गाण्यांची फर्माईश होवू लागली. ती फर्माईश डिजे ऑपरेटर पूरवू लागला. त्या गाण्यांवर मग वाकडे तिकडे सारे नाचू लागले. कुणी हात उडवत... कुणी कुल्हे मुरडत... कधी कधी जमिनीवर लोळत तर कुणी कुणाला डोक्यावर घेवून नाचवत... अक्षरश: धुमशान चालले होते. एरव्ही हा धिंगाणा पाहून गावकर खवळला असता; पण एका बाटलीच्या जादूनं सारी किमया केली होती. गावकरीही गावठीवर डुलत होते. त्यात शाळकरी पोरंही अशी नाचत होती की, ती सुध्दा झिंगली आहेत की काय, असे वाटावे... त्यामुळे मुंबैकर पोरांचे खरे नाचणे कोणते आणि झिंगलेले नाचणे कोणते हा फरक ओळखणे त्या धुंद रात्रीत फार कठीण झाले होते. गावातल्या बायका-पोरी वगळता सारेच नाचण्यात तल्लीन झाले होते. कुणालाच शुध्द नव्हती.
देहभान हरपलेल्या संतोषची नाचता नाचता पॅन्ट एकसारखी खाली येत होती. पोरं, गावातल्या बायका त्याची ती अवस्था बघून मोठ्यामोठ्यांन खिदळत होत्या; पण संतोषला त्याचे भान नव्हते... तो नुसता घुमत होता. तरी नशिब त्याची बायको हळदीला आली नव्हती... नाहीतर संतोषचं काही खरं नव्हंत. तरीसुध्दा उद्या आपोआप संतोषची थेरं बायकोपर्यंत पोचतीलच...त्या उम्याचीही तीच तर्‍हा. तो यशवंतच्या बारक्या पोरग्याला डोक्यावर घेवून नाचवत होता; पण ते पोरगं एवंढ बारकं होतं की ते रडकुंडीला आलं होतं. त्यात डिजेचा आवाज त्याला सहन होत नसावा. त्यानं तोंड आंबट करत आये... आये... करायला सुरूवात केली होती; पण उम्याला ते कळत नव्हतं. तो जबरदस्तीनं त्याला नाचवतच होता. सुप्य्राची तर करामतच चालली होती. दोन दोन मिनटांन तो मागच्या खोपटात काळोखातनं चाचपडत जायचा आणि घसा ओला करून यायचा. त्यांच्यातला नर्‍या तेवढाच शुध्दीत होता, आज त्यानं घेतली नव्हती. म्हणजे तो घेत नाही असं नाही..; पण समोरच्या बायकांमध्ये गावातली माली बसली होती. त्यामुळे तो जरा शिस्तीत नाचत होता. झिंग्या पोरांपासून लांब नााचत होता. मालीला आवडतील असे हावभाव करत होता. मधंन मधंन दोघांची नजरानजर होत होती.. दोघं सुममध्ये हसत होती... नर्‍या कुणाचं लक्ष नाही हे पाहून तीला नाचायला खुणावत होता. मालीला पण नाचावसं वाटत होतं; पण गावात ते शक्य नव्हतं. सगळ्याचे डोळे मालीकडे लागले असते... 
‘‘ए नर्‍या चल साल्या, एक पेग मार ना..’’ 
सुप्य्रानं मोठ्यानं इशारा केला. त्याबरोबर नर्‍या भडकला. तो तसाच तरतरत मांडवातनं बाहेर आला. तिथंन सुप्य्राची कॉलर धरत त्याला मागे नेलं आणि बजावलं, 
‘‘ ए तुला हजारवेळा सांगितलंय, मालीच्या पुढ्यात माला नर्‍या म्हणू नुको...’’
‘‘ऍ... तॅ... काय व्हॉतयं...’’
‘‘नाय सांगितलंन ना.. नर्‍या एकदम गांवढळ पोरांसारंख वाटतं. नरेश म्हण नरेश... नरेश म्हणजे काय म्हायतेय काय..? राजा... राजा हाय मी तीचा!, मी तीचा राजा आणि ती माझा राणी... माझी राणी...’’
नर्‍या असा अडखळला की दारू कोण प्यायलं होतं आणि चढली कोणाला होती.
‘‘ए तू जरा पण नाय मारली...’’
‘‘नको रे मालीला काय वाटेलं... पटलीयं रे, आणि गावात बघण्यासारखी ती एकच पोरगी हाय. मुंबयला जाण्याआधी फिक्स करून जाणार...’’
‘‘अरे काय नाय वाटतं... तू घे, आरं तू नाय घेतलीस तर ती म्हणेल आयला मुंबयला र्‍हायला पण बुळचट र्‍हायला...’’
सुप्य्राचा आग्रह वाढत गेला... आणि अखेरीस दोघेही डुलत डुलत मांडवात आले.
रात्र वाढत होती... हळद रंगत होती...त्या गडबड गोंधळात मन्याला हळद लागली. पोरांनी त्याला पुरता पिवळा केला. एकुलत्या एका नातवाला मोठ्या उत्साहानं भागिर्थीनं हळद लावली. दुसर्‍या सलाईननंतर तीलाही जोश आला. आता ती चांगलीच टुकटुकीत दिसत होती. पोरं कशी मजा करतात ते उंबर्‍यात बसून पाहत होती. गालात खुदूखुदू हसत होती. नाचून नाचून जे दमत होते ते मागच्या खोपटात जावून तरतरीत होत होते. तर जे शुद्धीवर होते ते हळदीचं जेवण उरकत होते. तेवढ्यात माजघरात बायकांचा गोंधळ उडाला. काल पोटात कणकणंत म्हणून काळजीत पडलेल्या दिप्याची बायको आज चक्क डिजे बघायला आली होती; पण बर्‍याच वेळानंतर तीला चक्कर आल्यासारखे झाले होते. ती झपकन् खाली बसली. सार्‍या बायका तीच्याभोवती गोळा झाल्या. पाणी पाजलं. डिजेचा आवाज त्यात बायकांचा कलकलाट... त्यानं तीचा दोन जीवाचा एकजीव अस्वस्थ झाला. मग तीला कुणीतरी धरून घरी पोचवलं. बायकांना वाटलं तीची वेळ भरत आली...; पण दिसत तसे नव्हते.
बराचवेळ झाला तरी मांडवातून म्हातारी हलेना. तशी बायकांनी तीला घरात झोपायला सांगितले; पण ती दाद देईना. ती मग बायकांवरच खेकसू लागली, ‘‘तुमाला गो काय मी बसला ता वायट दिसता..? माज्या घरचं लगन... माज्या नातवाचं लगन.. मी कायपन करीन...’’ बायका मग गप्प झाल्या. मात्र म्हातारीचा उत्साह बघून बंड्या आणि पोरांची चिंता कुठच्या कुठे पळाली होती. नाचता नाचता म्हारोत्याला काय कळ सुचली, तो म्हातारीला नाचायला खुणावू लागला. म्हारोत्याला भलतीच चढलेली, आपण काय करतोय हेच त्याला कळत नव्हते. म्हारोत्या काय सार्‍यांचीच ती तर्‍हा होती. म्हारोत्या जसजसा म्हातारीच्या जवळ आला तसा बंड्याने त्याला रोखला, आणि पुढचा तमाशा टळला. रात्र वाढत होती तरी पोरांचा जोश काही उतरत नव्हता. म्हातारीही काही वेळानं झोपली. घड्याळाचा काटा बारावर पोचला तशी बायकामंडळीही कमी होवू लागली. अशी धुमशान हळद गावात कधी झाली नव्हती वा गावानं कधी पाहिली नव्हती. नर्‍या आणि मालीही कुठंतरी गायब झाली होती. त्यांच्या गायब होण्याची खबर कुणाला नव्हती. 
डिजेचा दणदणाट थांबायला रात्रीचे दोन वाजले, तेसुध्दा डिजेची बॅटरी उतरली म्हणून...झोप अशी लागलीच नाही. कारण पहाटे तीन-साडेतीनलाच स्पिकर लागला, तशी बायकांची कामाची लगबग उडाली. कचरा... सारवणं.. आंघोळ्या... जेवण... कपडे... सार्‍या तयारीला वेळ कमी पडेल की काय अशी स्थिती.मन्याचं आज लग्न होतं. त्याला तर रात्रभर झोप अशी लागलीच नाही. तो काही इतरासारखा नाचत नव्हता, मध्येच त्याला नाचायला पोरं ओढत होती; पण ते तात्पुरते. नाचण्यापेक्षा तो आणि त्याची भावी बायको यांनी रात्रभर व्हॉट्‌सऍपवर अपडेट राहण्यात जराही कुसर केली नव्हती. कधी एकदा आपण तीला पाहतो असं त्याला झालं होतं. 
नर्‍या सकाळीच मांडवात हजर... एकदम टकाटक... सुप्य्रा, संतोष, उम्या, इज्या सुर्य उगवला तरी उठायचं म्हणेनात... सगळ्याचे चेहरे नुसते सुजले होते. मन्याचं लग्न आहे याचं त्यांना भानचं उरलं नव्हतं.मुहूर्त दुपारचा असला तरी, सकाळच्या विधी बाकी होत्या. त्याची लगबग चालू झाली. गावकरी- बायका सकाळीच मांडवात हजर झाल्या. पोरां-टोरांच्या आंघोळ्या झाल्या. चाकरमानी पोरांनी नदीवर जावून आंघोळ्या केल्या. बायकांनी फाटंफाटं कामं उरकली. र्‍हाता र्‍हायली म्हातारी. बंड्याची बायको म्हातारीला आंघोळीसाठी उठवायला गेली. तीच तीने किंकाळी मारली. सार्‍या घरात ती किंकाळी घुमली...; पण तीची किंकाळी रात्रीच्या डिजेच्या आवाजाची मर्यादा मात्र ओलांडू शकली नाही... 


अमोल पालये.
रत्नागिरी.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू