सडये-पिरंदवणे-वाडाजून: 
एक संस्कृती दर्शन

उशाला ‘सडा’, पायथ्याला ‘मोडा’
मधी गाव वसलंय न्यारं..
स्वागत कमान, हिरवं रानं
स्थळ ते ‘तांबड-पीर’..
उसळे पाणी, गर्द रानी
रोखून धरी वारं..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥धृ॥

पळपळ कुरली, सळसळ बोयरं
गरजे ‘कांदळतीर’..
‘मळ्याची शेती’, ‘पुळणीची माती’
शेत पिकतंय भरपूर..
‘आडाचं पाणी’, ‘खेळ्यांची गाणी’
गाती गोड गळा शाहीर..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥1॥

 येई‘रवळनाथ’, पडते ‘थाप’
स्वारी फिरे घरोघर..
‘सोमेश्वरी’ सत्ता, ‘सुंकाई’ माता
कृपा ठेवी गावावर..
साठ्यांची ‘जोगेश्वरी’, देखण्या मंदिरी
होई शक्तीचा जागर..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥2॥

आई ‘भराडीण’, गावाची रखवालीन
जाखमाता क्षेत्रावर..
देवस्थानी आसन, करती पुजन
नांदे ‘धुमकांचा’ वठार..
गणपती पुजता, चाकरमानी येती
गर्जे भजनांचा ‘सुस्वर’..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये गावाच्या सीमेवर...॥3॥

उंच डोंगरी, मुर्ती साजिरी
‘टोळवाडी’ वसे ‘मोरेेश्वर’..
क्षणभर बसता, प्रसन्न चित्ता
वाटेवरी ‘दत्त मंदिर’..
हरे कृष्ण, ‘गोपाळकृष्ण’
भजे ‘भावे’ परिवार..
‘मारूतीराया नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥4॥

श्रावणमासी, हर्ष मनासी 
होई ‘हरिनामाचा’ गजर..
कृष्ण जन्म, अष्टमीला
ही परंपरा ‘शतकोत्तर’...
डोंगरी ‘म्हारवडा’, जून ‘वाडा’
‘भूतम्हारक्या’ साक्षीदार..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये गावाच्या सीमेवर...॥5॥

शिवरात्रीला, गजर शिवाचा
होई ‘नाट्य’ रंगतदार..
एकादशीला, शिव निघाला
जाई ग्रामभेटीवर..
ग्राम ‘प्रिंदवणे’, आहेचि जुने
द्वारी ‘मारूती कलाकार’..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर...॥6॥

श्रावणाची ‘वाफ’, शिमग्याची ‘राखण’
गार्‍हाणं घाली ‘गावकार’
मृदुंग रंगी, ‘पुरूषोत्तम’ दंगी
ऐसा कलावंत थोर..
भजो गोविंदा, भजो गोविंदा
‘बुवा सुर्वेंचा’ गजर..
‘मारतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥7॥

‘विनोदमुर्ती’, गाजे किर्ती
ऐसा ‘शंकर घाणेकर’..
‘साठे’ घराणे, जाणी पुराणे
‘वेदमुर्ती गोविंद’ थोर..
दु:खीतांचे, पुसी अश्रु
होता परशुराम सावकार’..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर...॥8॥

राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी
ऐसी ‘प्रगती शिवलकर’..
काळ्या पाषाणी, गुढ दडलंय
कोरीव ‘शिल्पे’ कातळावर..
कातळी ‘सर्वे’, हिरवे ‘तरवे’
‘जांगलदेव’ राखी गुरं..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥9॥

‘कुंवारतळे’, पाणी खेळे
‘देवराई’ डेरेदार..
हिरव्या रानी, ‘तळ्याचं पाणी’
केकारव करी ‘मोर’..
आडवाटा, चोहीकडे फाटा
‘सड्या’ची वाट खडतर..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर...॥10॥

मयाचे ‘मयेेकर’, शिवोली ‘शिवलकर’
इथं आले ‘गोयंकार’..
शेवग्याचा डांबा, दगड ‘जांभा’
देई घरां आधार..
कुळदाचं ‘पिठलं’, ‘आंबली’चं तपलं..
देती पिता ढेकर..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर..॥11॥

एकी तुटली, वेगल्या चुली
हिच तर्‍हा ‘घरोघर’..
‘चाकरमानी’ मिटले, ‘गावपण’ संपले
‘पोरं’ शहरी वाटेवर..
‘गुरं’ गेली, कटकट संपली
ओसाड पडलं या शिवार..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’गावाच्या सीमेवर..॥12॥

जाता दूर, येई आठवण
अरे जपावा ‘संकासूर’..
नको ती ‘आकडी’, नको ती कोयती
हवेत वकील-डॉक्टर..
शेवट करी, उर भरी
जोडोनिया दोन्ही कर..
‘मारूतीराया’ नांदतोयऽऽ..
‘सडये’ गावाच्या सीमेवर...॥13॥

लेखन- 
अमोल अनंत पालये.
मु.पो.-सडये, पिरंदवणे- रत्नागिरी.
मो.9011212984

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू