बारा नमनाची म्हणणी

बारा नमनाची म्हणणी

(ओळख नमन/खेळ्यांची)

कोकणची लोककला म्हणून ओळख असलेल्या नमन-खेळ्यांची सुरूवात ही बारा/सोळा नमनाने होत असते. देवतांना या नमनातून वंदन केले जाते. ही वंदनं प्रत्येक गावानुसार वेगवेगळी असतात. मात्र पहिले नमन हे धरती मातेलाच असते, आणि दहावे नमन हे दशमुखी रावणाला असते. हे एक यात साम्य आढळून येते. यामध्ये पहिले नमन धरती मातेला असण्यामागे ठोस कारण आहे. नमन/खेळे ही प्रामुख्याने कोकणातील कुणबी समाजाने जोपासलेली लोककला. कुणबी समाज हा शेतकरी असल्याने त्याचे नाते धरणी मातेशी जवळचे आहे. साहजिकच नमनामध्ये पहिले नमन हे धरणी मातेलाच असते.
दुसरी गोष्ट रावणाला नमन करण्याची..
रावण दुष्ट..रावण खलनायक.. रावणाने सीतेला पळविली.. ही रावणाची नकारात्मक बाजू असूनही रावणाला नमनात बारा नमनात स्थान मिळाले आहे, अनेकांना हे कोडे वाटते, आणि नव्या पिढीला खटकणारे वाटते. मात्र याबाबत नमन/खेळ्यातील बुजूर्ग रंगकर्मी जे सांगतात, ते विचार करायला लावणारे आहे. 
सुंकाई नमन मंडळ, सडये या मंडळाचे रंगकर्मी कै.पु.ल.माने यांनी सांगितले की, इतिहास हा नेहमी विजयी होणार्‍याच्याच बाजूने लिहला जातो. रावण पराभूत झाला असला तरी तो किती पराक्रमी होता हे सार्‍या जगाला ठावूक आहे. तो नुसताच पराक्रमी नव्हता, तो मातृभक्त होता. तो शिवभक्त होता. तो संगीतकार होता. त्याने रावणसंहिता लिहली. मात्र त्याला शक्तीचा गर्व झाला, तेव्हा त्याला धडा मिळणे गरजचेचे होते. मात्र ही बाजू वगळता तो अनार्याचा श्रेष्ठ राजा होता. या चांगल्या गुणांमुळेही त्याला नमनात स्थान मिळाले असावे. 
खाली नमनातील ही बारा नमने सगंमेश्वरी बोलीभाषेतून दिली आहे. अर्थात ही नमने प्रातिनिधिक आहेत. मंडळानुसार ती काहीअंशी वेगवेगळी असतात. ग्रामदैवते बदलत राहतात. नमनाला सुरूवात करण्यापूर्वी गावकर गार्‍हाणे घालतात, त्यानंतर श्रीफळ वाढविण्यात येते. त्यानंतर धरणीमातेला हस्तस्पर्श करून नमनाला सुरूवात होते ती अशी...

बोला गावदेवी... माते की जय..

हो पयलं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला..
हो पयलं नमानं धरतरे मातेला,
हो धरतरे मातेला॥1॥
हो दुसरं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो दुसरं नमानं गावीच्या देवाला,
हो गावीच्या देवाला ॥2॥
तिसरं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
तिसरं नमानं गनपती देवाला,
हो गनपती देवाला ॥3॥
हो चवथं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो चवथं नमानं रवलनाथ देवाला,
हो रवलनाथ देवाला ॥4॥
हो पाचवं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो पाचवं नमानं पाची या पांडवांना,
हो पाची या पांडवांना ॥5॥
हो सहावं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो सहावं नमानं वीर हो हनुमंता
हो वीर हो हनुमंता ॥6॥
हो सातावं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो सातावं नमानं साती या ऋषींना,
हो साती या ऋषींना ॥7॥
हो आठावं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो आठावं नमानं आटी या दिशांना,
हो आठी या दिशांना ॥8॥
हो नववं नमानं आमी बोलावे कोनाला,
हो नववं नमानं चांद हो सुर्याला
हो चांद हो सुर्याला ॥9॥
हो दहावं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो दहावं नमानं दशमुखी रावना,
हो दशमुखी रावना ॥10॥
हो अकरावं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो अकरावं नमानं खेलत्या गड्याला,
हो खेलत्या गड्याला ॥11॥
हो बारावं नमानं आमी बोलवे कोनाला,
हो बोलवे कोनाला
हो बारावं नमानं बैसल्या सभेला,
हो बैसल्या सभेला ॥12॥

वरील नमुना हा संगमेश्वरी बोलीतील खेळ्यांच्या म्हणणीचा झाला तर, गुहागरी खेळ्यांची सुरूवात त्याहून जरा वेगळी आहे.

शिवपारवती गजानना..रंगभरूदे आमच्या गना
हो पयलं नमानं आमी कोनाशी करू
हो धरतरे मातेला शरन जावू रं
शिवपारवती गजानना रंगभरूदे आमच्या गना..
हो दुसरं नमानं आमी कोनाशी करू
हो गनपती देवाला शरण जावू रं
शिवपारवती गजानना रंगभरूदे आमच्या गना..

(संकलन: अमोल पालये. मो.9011212084)

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू