सखुचं भूत

सखुचं भूत


पाऊस विसावला होता, पण वारं काही थांबल्या थांबत नव्हतं. झाडं नुसती राक्षसी पिळवटत होती. वैतागवाडीच्या सार्वजनिक पार्‍याच्या खळ्यात तर पातेर्‍याचा नुसता खच झाला होता. चिखल, पाणी, वार्‍याने वातारवण चांगलंच गारठलं होतं. आधीच अमावास्या, त्यात पावसाच्या ढगांनी काळोख डोळ्यावर येत होता. चाकरमान्यांच्या राखणीला आलेले गावकरी घरी जाण्यासाठी पार्‍याच्या पडवीत बसून वारा विसावण्याची वाट पाहत होते. इतक्यात एखादी झुंड यावी तसाा वारा पार्‍याच्या पडवीत घुसला. त्यापाठोपाठ मोठ्याने काहीतरी पडल्याचा धडामधुम आवाज झाला. क्षणात पार्‍यासहित गावातले सगळे दिवे गेले, आणि आतापर्यंत शांत असलेल्या पार्‍यात एकच कालवा झाला.
‘‘पेटला..पेटला..पेटला.. सखुच्या डागंतला पिंपल पेटला..!’’
खालून कुणाचीतरी एकच किंचाळी ऐकायला आली. त्या किंचाळीने गावकर्‍यांच्या काळजात धस्सच झाले. पण मागोमाग आणखी दोघांतिघांचे स्पष्ठ आवाज आले. तसे सारे भानावर आले, आणि कापर्‍या अंगानं दूर टक लावून पाहू लागले.
रामाने चाचपडत रॉकेलचा दिवा पेटवला. पार्‍याच्या खिडकीतून आत वाकून पाहिलं. सगळी सुनशान शांतता, आणि मिट्ट काळोख. आतमध्ये दहा-बारा चाकरमानी क्वारंटाइन करून ठेवलेले आहेत, यावरही कोणाचा विश्वास बसला नसता, इतकी शांतता. तसे रात्रीचे साडेअकरा वगैरे वाजून गेलेही असतील. त्यामुळे सगळे झोपले असावेत. तरीही हयगय नको म्हणून रामाने हळूच बाहेरून दाराची कडी लावली.
‘‘अयं चाकरमान्यानूं, गप झोपा. लायटी गेल्यात हायत. पावसं वायचं आवारलायं, त्यावं घरी जातावं आनी पडतावं.’’
रामाने चाकरमान्यांना बजावलं, आतून फक्त चाकरमान्या मया साप्तेनं आवाज दिला, तसा रामा पुन्हा गावकर्‍यांच्या घोळक्यात बसला. पडवीतले पहारा देणारो गावकरी चिंतेत पडले होते. सखुच्या डागेतला पिंपळ पावसात पेटणे तसे नित्याचेच झाले होते. पाऊस आला की, हा पिंपळ दरवर्षी पेटतोच. त्यात आता काय नवे राहिलेले नाही. पिंपळ पेटतो म्हटल्यावर एखादा नवखा घाबरून गेला असता, पण वैतागवाडकर या पिंपळाच्या पेटण्याला सरावले होते. विहीरीवर असलेला हा पिंपळ इतका विस्तारला होता की, महावितरणच्या हायहोल्टेज वायरर्सना चिकटला होता. जरा वारा आला की, सळसळ पिसाटल्यासारखा पिंपळ डोलायचा, आणि या वायरर्सना स्पर्श करून दोन वायर्स एकमेकांना चिकटवायचा. त्याचं ते डोलणं पाहून वैतागवाडकर काय प्रकार तो समजून जायचे, आणि खाली मान घालून घरी धुम ठोकायचे. पिंपळ डोलायला लागताच, त्याच्या फांद्या वायरना चिकटल्या रे चिकटल्या की, ठारठार.. ठारठार आवाज करत सारा पिंपळ स्वत:च्या कर्मानं पेट घ्यायचा. वारा संथ होईपर्यंत हा खेळ चालू व्हायचा, पण पहिल्याच फटक्यात सार्‍या गावचा लाईट गुल व्हायचा. ते पाहून गावातल्या बायका भितीनं म्हणायच्या, 
‘सखु बगा कशी तरपासली हायती. नवर्‍याचा राग पिपलावर काढया लागली.. बग बग पिपलाला बग कशी पिलवटून काडते हाय..!’
पिंपळ इलेक्ट्रिक वायर्समुळे पेटतो, आणि वार्‍यामुळे डोलतो, हे गावातल्या  बायका कबुलच करायला तयार नव्हत्या. आताही तेच झालं होतं.. फरक एवढाच की, आज अमावास्या होती. होय गुढ सोसाट्याच्या वार्‍यात अडकलेेली अमावास्येची काळोखी रात्र..!
लाईट गेल्यावर वायरमन यायचे, काहीतरी थातूरमातुर करायचे. तेवढ्यापुरता लाईट यायचा, पुन्हा पंधरा दिवसांनी वारा आला की तीच तर्‍हा. गेले काही दिवस तर पावसाने धुमशानच घातले होते, कमी व्हायचे नावचं घेत नव्हता. त्यात कोरोना महामारीने तांडव घालून दुनियेला कामाला लावले होते. घरात बसून रहायला सरकार सांगत होते खरे, पण वैतागवाडकरांना घरातही बसून राहण्यासारखेही नव्हते. परिस्थितीच फार बिकट झाली होती. झाडून चाकरमानी गावाकडे येत होता, आणि वाडीतल्या सार्वजनिक पार्‍यात क्वारंटाईन होत होता. सुखासुकी कोणी येवून शांतपणे क्वारंटाईन होतो, तर कुणाची ना नव्हती. पण वैतागवाडीच्या चाकरमान्यांनी तर उच्छादच मांडला होता. क्वारंटाईन म्हणजे घरातून बाहेर न पडणे, पण वैतागवाडीचे चाकरमानी क्वारंटाईन तर व्हायचे, पण दिवसाचे गावभर उंडगायला सुटायचे. कधी व्हाळावर मासे पकडायला.. कधी कुर्ल्या पकडायला, तर कधी नदीवर पोहायला जायचे. हे चाकरमानी सुटारू बैलासारखे जर फिरत राहिले, आणि चुकूनमाकून कुणी त्यातलाच पॉझिटिव्ह निघाला, तर अख्ख्या गावात साथ पसरायची. त्यामुळे क्वारंटाईन चाकरमान्याचं फिरणं कसही करून थांबलं पाहिजे, हे जाणून गावच्या ग्रामसेवकाने वैतागवाडीच्या तात्या गावकाराला दम दिला.
एका सरकारी अधिकार्‍याने आपली काहीही चुकी नसताना गावच्या कारभार्‍याला दम देणं, हे तात्या गावकाराला फारच लागले. तोही पिसाळला, आणि गावकर्‍यांच्या पाळ्या लावून क्वारंटाईन चाकरमान्यांभोवती पहारा लावला. रात्रीच्या वेळीतर पार्‍याला बाहेरून कडीच लावण्याची आज्ञा केली होती, आणि तीच आज्ञा शिरसावंद्य मानून रामाने अलगद पार्‍याची कडी लावून तो बाकीच्या गावकर्‍यांमध्ये सामील झाला होता.
पावसाची रिपरिप परत वाढली, तशी गावकर्‍यांची पावलं पार्‍यातच रेंगाळली. तसा फाटक्याने नव्या विषयाला हात घातला.
‘‘माला बा हं कायसं यगलंच वाटया लागलं हाय.’’
त्याच्या गुढ बोलण्याने सार्‍याचेच कान टवकारले. 
‘‘काय रं बावा..? तुला काय यगलं वाटया लागलीलं हाय..?’’
रामाने फाटक्याला खोचरलं. तसा फाटक्या तारवटल्यासारखा उठला, आणि सखुच्या डागेच्या दिशेने टक लावून पाहत बोलू लागला.
‘‘ता पिपल बगा कसा धुमसाय लागला हाय ता.. माला तं कायसं हं सगलं अकरितच वाटया लागलीलं हाय. आदीच ता रोग आलीलं. तेच्यात तं वारं यवनं गेलं. काल रातरी सखुच्या डागंतला वड कोसाल्ला.. आज तितलाच पिपल पेटला..  या सगल्याचा अरथं काय लावयाचा..?’’
शेवटचं ‘या सगल्याचा अरथं काय लावयाचा..?’ हे तो इतक्या मोठ्याने ओरडला की, शिवरामा बसल्या जागी दचकला. त्याला सगळे हसायला लागताच शिवरामा फाटक्यावर खवळलाच.
‘‘अय्य वसाड्या, तू उगी मनच्या गोष्टी रंगवू नुको. आरं पावसं किती..पानी किती गेलं..? कैक वरसाचा ता वड.. उप्पाला, आणि उपाटला. तेच्यात अरथं काय लावयाचा..?’’
‘‘आरं पर अमोशेला कसा उपाटला..? आनी ता पर सखुच्या डागंतला..? आरं सखु र्‍हायाची तेच्यावर, काय समाजलास..?’’
‘‘हं. कावला बसया आनी फांदी तुटया यक झालं.. तेच्यात काय यवडं..?’’
फाटक्या आणि शिवरामाची कंदाल पेटायला सुरवात होताच पुन्हा एकदा धडामधुम काहीतरी पडल्याचा आवाज झाला. पुन्हा सारे एकदम गपारेगप झाले. मात्र परत काही क्षणात अगदी पुढ्यातच काहीतरी धापकन पडल्याचा आवाज झाला. आता मात्र सार्‍याच्या अंगाचे पाणी व्हायची वेळ आली. बराच वेळ झाला, पुढ्यात काय पडलं..? ते जवळ जाऊन पहायची कुणाची हिंमतच होईना. शेवटी हातातला दिवा सावरत रामा हळूहळू खळात उतरला, आणि खळात काय पडलं, ते उजेडात डोळे फाडून पाहू लागला..
‘‘ब्बा..ब्बा..दगड मारलानं रं कुणीसा..?’’
रामाने अक्षरश: बोंब मारत पडवीत माघार घेतली, आणि परब्याला चिकटून बसला. दगड मारला म्हटल्यावर सार्‍यांची पाचावर धारणच बसली. काहीवेळ कुणीच काही बोलेना. सगळे एकमेकांच्या तोंडाकडेच पाहत.
‘‘मरा.. मरा आता.. सखुचचं काम हं.. तीच.. तीच दगडी मारया लागली..’’
फाटक्या तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागला. शिवरामा उठला, आणि रामाच्या हातातला दिवा घेत दबकत दबकत खळात गेला. दगडाला निरखून पाहू लागला.
‘‘बगतोस काय, मासाचा घड आपल्या..?’’
फाटक्याने त्याची लांबूनच चेष्टा केली, तसा शिवरामा हसतच म्हणाला,
‘‘मेला सांगनार दगड.. आरं नारलं हाय हा..!’’
‘‘धोंड घाल कपालावर!’’ सार्‍यांनी सुटकेचा श्वास सोडला. वातावरण काहीसं निवळलं.
‘‘तरी बरं नारलंच पडला. जं खरा दगूड पडतो तं फाटक्यानं हेचा आरथं काय..? आस्सं इच्चारलानं आसतं.’’
शिवरामाने फाटक्याला टोचताच फाटक्या गुरूगुरू लागला. 
‘‘चला रं घराशी. नारल पर पडयां लागलं हायतं. जेंची राकानं करया आलीलं तं ढाराढूर पंढरपूर झालं, आनी आपून उगच पावसापानयातनं उंडागताव हाय.. चला..’’
गुरं हाकावी तसे रामाने सार्‍यांना हाकारले. तसे सारेच उठले. दिव्याच्या उजेडात पांदळीतून पुढे जाऊ लागले, तोच एक वार्‍याची झुळूक आली आणि रामाच्या हातातील दिवा विझवून गेली.
‘‘मरा आता.. व्हता ता उजेड पर गेला..’’
सगळेच कावकाव करू लागले. रामाने माचीसची काडी काढून दिवा पेटवायचा प्रयत्न केला, पण दिवा टिकेचना. तसे सारे सवयीची वाट असल्याने पांदळीतून चालू लागले. इतक्यात पुन्हा शिवरामाला फाटक्याची कळ काढावीशी वाटली.
‘‘तरी बरं फाटक्यानं आजून नाय इच्चारलानं, दिवा इझला. हेचा आरथं काय..?’’
पुन्हा सगळे हसायला लागले. पुन्हा शिवरामाच्या नावाने फाटक्या गुरुगुरू लागला. पुढे काही क्षण चालतात न चालतात तोच पुढे चालणारा परब्या जागच्या जागी थबकला, आणि मागून चालणारे सारे त्याच्यावर जावून धडपडले..
‘‘हा बग मेला, परब्या कसा मदीच थांबला..’’
इतक्यात परब्या सुक्या आवाजात पुटपुटला..
‘‘पुडं बगा काय तं..’’
..आणि समोर जे दिसलं, ते पाहून सार्‍यांची वाचाच बसली. सगळे लटपट कापायला लागले. वटवट करणारा शिवरामाही मुटकुळी मारून पांदळीतच बसला. कुणीच काही बोलेना. एकदम चिडीचुप शांतता.. पांढर्‍याशुभ्र रंगाची आकृती हातात पेटती चुड घेवून गावकर्‍यांच्या पुढे चालत होती. बराचवेळ ती पांदळीत दिसत राहिली, आणि पुढे पुढे जाताच दिसेनाशी झाली. ती दिसेनाशी झाली तरी गावकर्‍यांना बसलेला धक्का काही अजून विरत नव्हता. अक्षरश: झाडा-पेडाला सारे बिलगले होते. कुणीच अवाक्षर काढत नव्हतं. अखेर तो उजेड आणि तो चुडीवाला दिसेनासा झाला, तसे एकएक डोके बाहेर पडू लागले.
‘‘शिवरामा, मंगाशी माला सांगीत व्हतास ना, आता माला हेचा आरथं काय ता सांग..?’’
फाटक्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला शिवरामाकडे वाचाच उरली नव्हती. कुणीच काही बोलत नाही म्हटल्यावर फाटक्या बोलत सुटला.
‘‘सालं माला खुल्यात काडतात. हं सगलं व्हतं हाय तेची माला आदीपासनंच कुनकुन लागली व्हती.. आज आमोश्या.. काल सखूच्या डागंतला वड कोसाल्ला.. आता सकुची डाग मंजे काय भानगड हाय ती ठावी हायचं तुमानंला. आरं नवर्‍यानं सखूला बावीत ढक्कल्लानं. तेवापासनं सखू वडावर र्‍हायतं व्हती.. आरं तीचा ता निवारा व्हता. आधी नवर्‍यानं मारलानं.. आता पावसानं झोडपलानं आनी वड कोसाल्ला.. तीचीच हाय ही सगली करामत..!’’
फाटक्या कापत कापत बोलत होता. बाकीच्यांचीही फाटक्यासारखीच तर्‍हा होती.
‘‘सकुचचं भूत की काय तं..?’’
शिवरामाने किंचाळीच मारली.
‘‘गप मेलास लवकर नाय ता. मागं फिरलं तं तुज्या किचालेन..’’
परब्या शिवरामाच्या आंगावरच धावला.
‘‘माला पर आसचं वाटतं. सखूचा निवारा गेला नवं.. आता ती पिसाललं तरी, नायतं दुसरं घर सोदील..?’’
रामाने पुढची भिती व्यक्त केली.
‘‘पिसाललं..? अरं देवा.. आता..?’’
शिवरामा अधिकच टरकला.
‘तू गप रं. मेला शुभ बोल नार्‍या, तं नार्‍या म्हने मांडवाला आग लागली.’ असा इशारा देत परब्याने रामाला गप केले.
‘‘अमोशा ना रं आज..?’’
शिवरामाने विचारताच बाकीच्यांनी माना डोलावल्या.
‘‘मं बराबर, आरं व्हया चाकरमान्याच्या झेंगटात बवतेक तात्या सखूच्या डागत नारल देया इसारला रं.. इसारला.. मरा आता.. सखू रागावली, आनी गेली तात्याच्या मागावर..!’’
शिवरामाच्या तर्काने सारेच विचारात पडले.
‘‘तात्याच्या मागावर..? मं काय नाय व्हैत, तात्याचं बायगं लय तायठं हाय. ता सखूला उलटीपालटी करून टाकील.. ’’
सगळे हसू लागले.
‘‘चला रं पाटलाग करू..’’
फाटक्याने निवळलेल्या वातावरणात भलतेच काही सांगावेे, असे वाटल्याने सारे त्याचावर पिसाळले.
‘‘कोंंच्या..? भुताच्या..? झपाटलास नाय ना..?’’
‘‘नेवनं खय लोटील कलनार पर नाय.. तू जा मर..’’
तरीही फाटक्या उठलाच.
‘‘बगू तरी खयपरयानं जातं तं..’’
बाहेर पडायला आधी कुणीच तयार होत नव्हतं, पण भितीसोबत उत्सूकताही होती. ती उत्सूकता कुणालाच रोखू शकली नाही. सखु नावाच्या बाईमुळे ही उत्सूकता गेली कितीतरी वर्ष गावकर्‍यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. 
सखु.. सखु नावाची सासुरवाशीण आपल्या नवर्‍यासोबत निर्जन भागात रहायची. गर्द झाडी.. डोंगराळ चढ-उताराची निर्जन वस्ती म्हणजे सखुची डाग. ती आणि तीचा नवरा दोघचं त्या डागेत घर बांधून राहत होती. शेतीवाडी करायची. भाजीपाला पिकवायची. पण तिचा नवरा संशयी होता. भांडखोर होता. रोज संध्याकाळी त्यांची भांडण पेटायची, आणि गावाची अख्खी रात गाजवायची. शेरास सव्वाशेर अशी जुगलबंदी लागायची. त्या भांडणात भांडण असायचंच असं नाही, तर दोघांसाठी टाइमपास असायचा. ना शेजार-पाजार.. बोलणार कुणाशी..? म्हणून आपली भांडत राहत..
एकेदिवशी कसल्याशा कारणावरून नेहमीप्रमाणे सखु आणि बारक्याचं भांडण पेटलं, ते इतकं रात्रभर चाल्लं, की दुसर्‍या रात्री शांतता म्हणून गाववाले पहायला गेले, तर सखु विहीरीत तरंगत होती.. सखु मेली, पण सखुनंतर बारक्या अक्षरश: वेडा होवून मेला. वेड लागलं नव्हे, तर सखूनेच त्याला झपटवलं, आणि मारलं.. ही नवी गोष्ट त्यावेळी जन्माला आली. त्या गोष्टीतून सखूचं दिमाखदार भूत तयार झालं. ते डागेतल्या वडावर राहू लागलं. रात्री-अपरात्री मोठमोठ्याने किंचाळ्या मारू लागलं. कसलेबसले आवाज करू लागलं. त्या आवाजाच्या.. किंंचाळ्याच्या कथा गावात पारायणासारख्या घोळू लागल्या. त्या कथांनी काही बाया रात्रीच्या जाबडू लागल्या.. काही पोरं झोपेतच चालू लागली.. काही पोरं हट्टी झाली..काही लोकं दारू पिऊ लागले, काही शिवीगाळ करू लागले आणि हे सारं सखूच्या भुतामुळेच होतंय, असं समजून लोक चिंतेत पडले. अखेरीस हा विषय तात्या गावकाराच्या गावकीत आला, आणि गावकीच्या निर्णयाप्रमाणे सखूच्या डागेत अमावास्येचा नारळ दिला जाऊ लागला.
...आणि आज खरोखरच अमावास्या होती. प्रथेप्रमाणे सखुच्या डागेत नारळ दिला तर जात होता, पण यावेळी तो दिला की नाही..? हे काही कुणालाच ठावूक नव्हते. त्यामुळे गावकर्‍यांची भिती आणखीनच दाट झाली.
पायांचाही आवाज होणार नाही, असा आवाज करत एकएक फाटक्याच्या-परब्याच्या मागून सारे सरकू लागले. पाऊस गेला होता, आणि वारंही विसावलं होतं. त्यामुळे सारे वेगाने पुढे सरकू लागले, तोच पुन्हा एकदा तोच भगभगता उजेड.. तीच चुड.. तीच पांढरीशुभ्र आकृती साप्ते वाडीची वाट चढताना दिसू लागली. सारेच बुचकळ्यात पडले.
‘‘अरं भूत साप्त्याच्या घराकडं चाल्लं हाय वाट्टं..’’
फाटक्या सार्‍यांना थांबवत म्हणाला.
‘‘अरं देवा, साप्तीनं मेली मं..आता तीचं काय खरं नाय. तिचा नवरा तिकडं पार्‍यात कोरंटायनं हाय. घरात ही बाय यकटीचं.. काय झालं तं काय करयाचं..?’’
परब्याने शंका काढली.
‘‘अरं भूत हाय तं भूत.. भूताम्होरं आपलं काय चालनार..? काय व्हयलं तं बगीत र्‍हायाचं.. चला म्होरं..’’
फाटक्या बाकीच्याना समजावत पुढं चालू लागला, तसे त्याला सार्‍यांनी थांबविले.
‘‘बाबा रे, इतचं थांब. तेच्याजवल जावनं चालयाचं नाय. गंमत नवं ती. भूत हाय तं. इतनचं काय व्हतं तेचा पायरवं घे..’’
कुणीच तिथून हलेना. फाटक्याचा नाईलाज झाला. एकटा जायला तोही काही बहाद्दर नव्हता. सारे तिथेच दबा धरून राहिले..
झरझर चालणारं ते पांढरशुभ्र भूत हातातल्या चुडीचा भगभगता उजेड पाडत खरोखरच साप्तीनीच्या घराच्या मागच्या दारावर गेलं, आणि दार ठोठावू लागलं. मध्यरात्र झाली होती. त्यामुळे साप्तीनं ढाराढूर होवून इतकी जोराने घोरत होती की, क्षणभर सखुचं भूतही चरकलं असेलं. भुतानं आपल्या हातानं मागच्या दारावर धाडधाड आवाज दिला. एकदा.. दोनदा.. तीनदा.. साप्तीनं आतून काहीच दाद देत नाही पाहून भूतानं दारावर जोरदार दणकाच दिला, त्याबरोबर आतली दोनचार भांडी गदागदा खाली कोसळली, आणि साप्तीनं, ‘फटकी आली नाय ती बोक्यावर.. मेल्यानं झोपचं पुरं खोबरं करून टाकलानं हाय..’ करत तणतणत उठली, आणि जागच्या जागी थबकली. कारण पुन्हा दरवाजावर धाडधाड आवाज झाला, आणि पुन्हा दोनचार भांडी पडली. आता मात्र ही भांडी पाडणारा बोका नव्हे, याची तिला खात्री पटली, आणि ‘कोन हाय..?’ असे कातरतच बोल्ली.
‘‘दार उघड..’’
‘‘को..को..कोन.. हाय..’’
‘‘च्यायला दार उघड..’’
दरवाजात जरब होती.
‘‘कोन हाय..?’’
‘‘च्यायला, धगड तुजा, दार उगड. आनी आत घे माला..’’
साप्तीनीनं सरकन दार उघडलं. तशी समोरचं दृश्य पाहून चमकलीच. तीच हातात पेटती भगभगती चुड.. तीच पांढरीशुभ्र आकृती तीच्या समोर उभी होती.
‘‘अगेबाय तुमी..? आनी इतं..? मं तं कोरंटायनं..?’’
‘‘खड्ड्यात गेलं कोरंटायनं. माला काय रोग नाय झाला हाय कोरंटायनं व्हयाला’’
पांढरंशुभ्र कोरोनारक्षक पीपीई कीट घालून आणि हातात पेटती चुड घेवून गेल्यावर्षी लग्न झालेला चाकरमानी मया साप्ते बायकोपुढे उभा होता. गावात येऊनही विरह सहन न झाल्याने क्वारंटाईन केलेल्या पार्‍याची कौलं काढून तो बायकोला भेटायला आला होता. दार उघडल्याबरोबर तो झपकन आत शिरला, आणि चेकाळत बायकोमागे धावू लागला. तेवढ्यात साप्तीनं किंचाळत मागे सरली. तोही तिच्या मागे पळू लागला. ती पटकन देवाच्या खोलीत गेली..
‘‘थांबा तितचं, पुडं यवं नका.. माला तुमची भिती वाट्टे हाय. उंबयसून आलवं हाय. तिकडं काय म्हामारी हाय ती आमाला आयकू यते हाय. तुमी जावा इतनं. कोरंटायनचं र्‍हावा.. तं दिस पुरं झालं की येवा.. तेच्याबिगर घरात घेनारच नाय.. सात दिवस झालं, आजून सात दिवस र्‍हावा, मंग यवा.. जावा.. जावा सांगताय ना.. वायच कल काडा..’’
मया साप्ते बायकोवर भडकला.
‘‘चल हट, कसलं कोरंटायनं आनी कसलं काय..? माला कायपर कोरोना झालीला नाय हाय. मी यकदम यवस्तित हाय..’’ 
‘‘आसं सगलंच म्हंतात. तुमी पयलं इतनं जावा, नायतं लोका शान घालतील माज्या तोंडात..’’
तणतणत मयाच्या बायकोनं देवखोलीच्या दाराला कडी लावली, आणि मयाला भीक न घालता, आत निघून गेली. मयाचा अक्षरश: हिरमोड झाला.
इकडे साप्त्याच्या घरातून काहीतरी आवाज येतो, म्हणून दबा धरून बसलेले गावकरी हळूहळू चालत घरापर्यंत आले, साप्तीनीच्या घरात दारं-खिडक्यांतून टेहळणी करून पाहिलं, पण सखुचं भूतचं काय, भुताचा केसही दिसला नाही. साप्तीनीच्या घोरण्याचा आवाज सोडता सारं सामसुम.
सखुचं भूत पाहिलं, हा एक भितीदायक अनुभव घेतल्याचा आनंद घेत सारे मागे फिरले, तोच पुन्हा पहिल्या वाटेवर.. तीच पांढरीशुभ्र आकृती.. तीच भगभगती चुड.. परतीची वाट धरताना दिसली, आणि पुन्हा सारे थबकले.
‘‘माला वाटं आज अमोशेचं भूत आपल्याला खेलवताय. हं भुतासंगाती खेलनं नाय सोडलं, तं आपल्याला खेलवीत खेलवीत भूत खय नेवनं चेपील तं कलयाचं पर नाय, काय समाजलंव? तेच्यापरिस आपापल्या घराशी गेलीलं बरं..’’
शिवरामाने सार्‍यांची समजूत घातली. ती सार्‍यांना पटली, आणि सार्‍यांनी आपापल्या घरची वाट धरली. त्या दिवसापासून वैतागवाडीत सखुच्या भुताची आणखी एक स्टोरी कायमस्वरूपी लिहली गेली, आणि तीची पारायणं होवू लागली.

- अमोल पालये.
(सदर कथा काल्पनिक असून कथेतील पात्र, स्थळंही काल्पनिक आहेत. )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू