पहिली माळ: श्री सुंकाई

पहिली माळ: श्री सुंकाई



सडये-पिरंदवणे-वाडाजून या गावची ग्रामदेवता म्हणून पुजली जाणार्‍या सुंकाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या बरोबर तिन्ही गावांच्या मध्यावर आहे. फार कर्मकांडात, आणि सण-उत्सवात न रमणारी अशी ही शांतप्रिय देवी आहे, असे सुंकाईबाबत म्हणावे लागेल.

सुंकाई बसणीच्या महालक्ष्मीप्रमाणे मुर्तीस्वरूप नाही. ती तांदळा स्वरूप आहे. हा तांदळाही साळुंकेत बसविला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनही पाहता ती मोठी शिवपिंडच भासते. मात्र ही साळुंका आसनस्वरूप आहे. तर तांदळा हीच मुख्य देवता आहे. महाराष्ट्रात तांदळा स्वरूपात अनेक देवीस्थानं आढळतात. त्यांचे तांदळा अर्थात निर्गुण-निराकार स्वरूपामुळे त्यांचा उगम कधीचा आहे, हे सांगणे तसे कठीणच. कोकणात भूमका आणि तांदळा स्वरूपात देवीची देवस्थाने आहेत. ती जितकी प्राचीन तितकीच जागृत मानली जातात. सुंकाई त्यापैकीच प्राचीन देवस्थान असावे.

सुंकाई नावात विशेष अर्थ जाणवत नाही. कदाचित मुळ शब्द ‘सुखाई’ असण्याची दाट शक्यता आहे. सुख देणारी आई ती सुखाई.. सामान्यत: बोलीभाषेत सुखाईचा अपभ्रंश होऊन कालौघात ‘सुंकाई’ असे नामाभिमान झाले असण्याची शक्यता दाट आहे.

सुंकाईचे विशेष म्हणजे तीच्या मागे बसलेले सारे तीचे सेनापती. हे सेनापती ‘भूतम्हारक्या’ म्हणून पुजले जातात. भूतम्हारक्या ही बहुजन समाजातील देवता आहे. त्यातील ‘म्हारक्या’ हा शब्द विशिष्ठ समाजदर्शक आहे. हे भूतम्हारक्याही तांदळा-पाषाण स्वरूपात आहेत. त्यांचे पुजाविधी सुंकाईप्रमाणेच श्रद्धेने केले जातात.

सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे सुंकाई ही कर्मकांडात आणि सण-उत्सवात न रमणारी देवी आहे. या देवस्थानात विशेष सण-उत्सव होत असल्याचे माहिती नाही, आणि असले तरी ते ‘तात्पुरत्या’ स्वरूपाचे. एक दिवशीय नाम एक्का ही परंपरा येथे पार पडते, मात्र ती खूपच अलिकडील असल्याचे गावकरी सांगतात. नवरात्रही येथे विशेषत्वाने साजरा होत नाही. कोणताही भक्तीजागर येथे होत नसतानाही सुंकाई घराघरात एका कारणास्तव श्रध्देय आहे ते कारण म्हणजे ‘राखण’. शेतकरी-बहुजन समाजात सुंकाईच्या सेनापती गणांच्या संतुष्टीकरणासाठी, शेतीवाडीच्या, कुटुंबाच्या भल्यासाठी घरगुती राखण दिली जाते. ही राखण भूतम्हारक्या या सेनापती देवांना दिली जाते. तो बहुजन देव असल्याने त्याला आरवत्या कोंबड्याचा बळी दिला जातो. कोंबड्याच्या बळीची ही राखण देवळामागील स्थानावर दिली जाते. तर देवीपुढे नारळ फोडला जातो. ही राखण देण्यापुर्वीचा विधी अंत्यत महत्वाचा आहे. आणि या विधीमुळेच सुंकाईचं स्थान घराघरात अधिक घट्ट आणि श्रध्देय झालेलं आहे. तो विधी म्हणजे ‘पाषाणाद्वारे देवीची राखणेला मान्यता घेणे...’

राखण देण्याआधी ती देण्यार्‍याने (यजमान्याने) देवीला राखण देतोय ती मान्य आहे की नाही..? याची विचारणा करावी लागते. गुरव मंडळी ती पाषाण हलवून करत असतात. गुरवांचा देवीशी पाषाण हलवून संवाद होतो. हा संवाद जनसमान्यांना अत्यंत भावतो, साक्षात देवीच आपलं गार्‍हाणं ऐकतेय... ही संकल्पनाच सामान्य शेतकरी, गावकरी यांना भन्नाट वाटत असते. पाषाण हलविण्याच्या संवादात देवी बर्‍याचदा भक्तावर रागावलेलीच असते. गुरव यजमान्याच्यावतीने तीची समजूत घालतात, आणि राखण मान्य करण्यास राजी करतात. अर्थात देवी संवादातून मान्यता दर्शवते. आणि पाषाण ‘हलका’ येतो. पाषाण हलका येणे म्हणजे सारेकाही देवीने मान्य केले आहे, आर्शीवार्द दिला आहे, याचे सुतोवाच.. यानंतर राखणेचा विधी पार पडतो.

कुटुंबाची जशी राखण मृग नक्षत्रात पार पडते, तशीच राखण सडये-पिरंदवणे-वाडाजून या गावांची ‘गावकीची राखण’ शिमग्यात देवीला दिली जाते. तिचाही विधी साधारणत: वरिलप्रमाणेच असतो. मात्र या राखणेत देवीच्या गार्‍हाण्याचं स्वरूप हे गावाच्या कल्याणाचं.. रक्षणाचं असं व्यापक असतं. राखणेचे बळीविधी हे देवळाच्या बाहेरील स्थानावर होत असतात, तरीही ‘सुंकाई’चे देऊळ हे सोमेश्वर देवस्थानातील अन्य देवस्थानांसोबत का नाही..?  ते असे कुटाबाहेर का..? ही शंका मात्र साहजिकच पडते.

सण-उत्सवाच्या गजबजाटात नसलेली ही देवी येथील गावकर्‍यांच्या मात्र अतीव श्रध्देचा भाग आहे, आणि म्हणूनच सडये-वाडाजून या दोन्ही गावच्या नमन मंडळांची नावे ही सुंकाईच्याच नावावरून ठेवण्यात आली आहे.

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त आज ही शब्दरूपी पहिली माळ सुंकाईला अर्पण करत आहे..

-अमोल पालये, सडये-पिरंंदवणे.

मो.9011212984.

Comments

  1. Very very good amol पालये तुझ्या आणि तिन्ही गावच्या वेशीवर बसलेली सुंकाई आई सर्व बालकांच्या व मुंबईकरांच्या सदैव पाठीशी राहो अशी देवीच्या चरणी प्रार्थना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू