मी हिजडा.. मी लक्ष्मी

 मी हिजडा.. मी लक्ष्मी

- लेखक: लक्ष्मी नारायण त्रिपाठी.



(पुस्तक परिचय)

पत्रकारितेच्या सुरूवातीला एका वृत्तपत्रातील मुलाखतीने माझे लक्ष वेधले होते. साधारण 2010 सालची गोष्ट असेल.. ती मुलाखत एका वेगळ्या व्यक्तिीची होती. छायाचित्रांमुळे ती मुलाखत चांगली सजली होती. ठाण्यातील पत्रकार अशोक गावकर यांनी त्या मुलाखतीतून त्या व्यक्तिचं म्हण्णं मांडण्यासाठी तीला पुरेपूर जागा दिली होती. दोन-तीनवेळा तरी ती मुलाखत मी वाचली. त्या व्यक्तिचं त्या मुलाखतीमुळे माझ्यावर गारुड निर्माण झालं. त्यानंतर काही दिवसातच त्या व्यक्तिची जन्मकथा.. व्यथा मांडणारी लघुकथा मी लिहली. ती माझी प्रकाशित न झालेली पहिली लघुकथा. ‘धु्रव’ तीचं नाव. पण अखेरपर्यंत ती कथा कधीच मार्गा लागली नाही. कारण, त्या व्यक्तिला पुरेपूर जाणून घेणं, माझ्यासारख्याला शक्य नव्हतं. मुळात मी तेव्हा लिहतच नव्हतो..

ती मुलाखत आणि माझी पहिली कथा जिच्यामुळे लिहली गेली, ती असामी म्हणजेच ‘मी हिजडा.. मी लक्ष्मी’ या पुस्तकाची लेखिका आणि तृतीयपंथी- लक्ष्मी नारायण त्रिपाठी.

आयबीएन लोकमतवर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लोकप्रिय गे्रट-भेट कार्यक्रमातही तीची मुलाखत घेतली, आणि ती सर्वदूर पोहोचली. या मुलाखतीमुळे मला लक्ष्मीची प्राथमिक ओळख झाली होती. या मुलाखतीमुळे हिजड्यांविषयी माझा नकारात्मक-भीतीदायक दृष्टीकोन बदलून सकारात्मक झाला. 2012 मध्ये तीचं शब्दांकन केलेलं आत्मचरित्र आलं, आणि लक्ष्मी पुन्हा माझ्यासमोर उभी राहिली. ते पुस्तकही तेव्हा खूप लोकप्रिय झालं.

त्यानंतर वर्षभरातच ते पुस्तक मलाही मिळालं. मनातले सारे किंतू-परंतू दूर कर, अशी मनोदेवतेला प्रार्थना करून मी ते पुस्तक वाचून काढलं. पुस्तक वाचण्याआधीच लक्ष्मीच्या कम्युनिटीविषयी मी थोडं पुस्तकीय वाचून होतो. याआधी ‘मी विद्या’ हे तामिळनाडूतल्या एका तृतीय पंथीयाचे आत्मचरित्र वाचलं होतं. ते वाचतानाच प्रचंड अस्वस्थ झालो होतो. त्यादरम्यान क्रीडा क्षेत्रातील पिंकी प्रामाणिक या खेळाडूवर काही शारिरीक आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर ‘मी विद्या’ हे पुस्तक माझ्या हाती मिळाले होते. विद्याचं आत्मचरित्र वाचताना मला फारच अस्वस्थतेचा अनुभव आला. तृतीयपंथी समाजातील ‘निर्वाण’ विधी आजही हादरवून टाकतो.त्यामुळे ‘मी हिजडा..’ हे आत्मचरित्र वाचायला घेण्यापुर्वी मी बराच चलबिचल झालो होतो. पण लक्ष्मीचं कार्य जाणून असल्याने ती चलबिचलता दूर सारली, आणि पुस्तक वाचायला घेतले.

हिजडा कम्यूनिटी आणि लक्ष्मी याचं या पुस्तकात समग्र दर्शन होत नसलं तरी लक्ष्मीची जडणघडण. तीचं हिजडा कम्युनिटीप्रती कार्य आणि संघर्ष या पुस्तकात मांडला आहे. थोडं आपल्याविषयी सांगताना लक्ष्मी कमी पडते, पण तो तीच्या समाज नियमांचा एक भागच असतो.

हिजडा समाज हा नेहमीच उपेक्षेचं, अवहेलनेचं जीवन जगत आला आहे. भारतातील सर्वसामान्य माणसाचा दृष्टीकोनच या हिजड्यांप्रती बदलेल, तेव्हाच आपण हिजड्याला सन्मानाची वागणूक देऊ शकू. हे सारं घडून येण्यासाठी गरज आहे ती दोन्ही कम्यूनिटीमध्ये कायमचा संवाद घडून येण्याची. हाच संवाद साधण्यासाठी लक्ष्मी कायम कार्यरत राहिली. म्हणून ती यशोशिखरावर पोहोचली, आपल्या समाज बांधवांना या पुस्तकातून तीने हाच संदेश दिला आहे.

हिजडा कम्यूनिटीत येण्यापुर्वी लक्ष्मीनं खूप अन्याय, कुचेष्टा सहन केली, मात्र त्याचं रडगाणं गात ती राहिली नाही. तीने खूप संघर्ष केला. ती लढत राहिली, आणि म्हणूनच आज ती अढळस्थानी पोहोचली. या पुस्तकातून तीच्या जीवनसंघर्षाचं प्रतिबिंब उमटतं.

लहानवयात लक्ष्मी लैंगिक शोषणाचा बळी पडली. एका मुलाचेच लैंगिक शोषण मुलांनी केले. हे सारं मनाविरूध्द होतं, पण सांगणार कुणाला आणि कोणत्या तोंडाने..? यातून लक्ष्मीने मार्ग काढला तो धीटाईचा. तारूण्यकाळात आपला वापर होतोय, हे एकापाठोपाठ आलेल्या अनुभवानंतर लक्ष्मी या प्रकारापासून खूप दूर गेली. हिजडा झाल्यानंतर ती खूपच प्रामाणिक जगू लागली. कुणाशीच तीचे प्रेमसंबध जुळले नाही. पोरवयातील चुकांमुळे घडलेले वर्तन, असे म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष करून लक्ष्मीकडे पाहिलं तर तीचं उर्वरित आयुष्य म्हणजे समाजासाठी सदोदित झगडणारं वादळचं आहे.. अगदी अमेरिकेसारख्या मोठ्या देशात घोंघावून आलेलं वादळ!

लक्ष्मी कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे धीटपणे उभी राहिली. मात्र तीची स्वत:ची हुशारीही दुर्लक्षित करता येणार नाही. लक्ष्मी हाय लेवलचे इंग्लिश बोलणारी महाराष्ट्रातील एकमेव हिजडा असेल. शिवाय ती एक उत्कृष्ट नर्तक आहे. नृत्य ही कला म्हणून आणि छंद म्हणून लक्ष्मीने जोपासली. त्यात तीनं आपली ओळखही निर्माण केली.

आपल्या कुटुंबियांच्या पाठिंब्याविषयी लक्ष्मी भरूभरून लिहते. आपल्या वडिलांंंवर तीचे खूपच प्रेम असल्याचे दिसते. दुसरीकडे आपली हिजडा कम्युनिटी आणि परिवार यांचे ऋणही ती विसरत नाही. लतागुरुंबरोबर त्याचे मतभेदही होतात, मात्र एका हुशार चेल्याचा लतागुरुंना अभिमानही आहे.

लक्ष्मी आपल्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी अजूनही झगडते आहे. परदेशात जाणारा एकमेव हिजडा म्हणजे लक्ष्मी त्रिपाठी असेल. लक्ष्मीने अमेरिकेसारख्या अनेक देशात जाऊन भारतीय हिजड्यांच्या समस्या मांडल्या. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हिजड्यांना नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला. असं हे समाजासाठी व्यापलेल्या लक्ष्मीचं चरित्र निश्चितच वाचनीय आहे, कारण त्यामुळेच माझ्यासारख्यांची दृष्टी बदलेल. लक्ष्मीने समाजासाठी घेतलेले कष्ट दखलपात्र आहेत, ते तीने सविस्तर मांडले आहेत.

लक्ष्मी कायम समाजात राहिली. एकीकडे आपला समाज, दुसरीकडे हिजडा समाज या दोन्हींकडे तीला चांगली माणसं लाभली. लक्ष्मीच्या कार्यामुळे तीला अनेक भली माणसं भेटली. त्यांचीही ओळख या पुस्तकात लक्ष्मीने करून दिली आहे. कुटुंब पाठीशी असेल, तर सामान्य माणूसच काय हिजडाही यशस्वी होऊ शकतो, याचेच उदाहरण म्हणजे लक्ष्मी नारायण त्रिपाठी, हेच या पुस्तकातून वाचकाला शिकायला मिळते.

- अमोल पालये, रत्नागिरी.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू