भराडणीची अरण्ययात्रा!

भराडणीची अरण्ययात्रा!


श्री क्षेत्र भराडणी




रत्नागिरीची ‘कातळशिल्प’ गेल्या काही वर्षात खूप चर्चेत आली आहेत. सरकार माध्यमातून त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्नही चालू झाले आहेत. माझी जन्मभूमी सडये-पिरंदवणेच्या सड्यावर-कातळावरही मुबलक कातळशिल्पे आहेत, त्यामुळे ‘कातळशिल्प’ हा विषय माझ्यादृष्ट्रीने कुतूहलाचा ठरला होता. गेेले कित्येक वर्षे त्यांचा शोध घेण्याचे आढावे आमच्या ‘रात्रीच्या बैठकीत’ ठरत होते, पण घडत काही नव्हते. 

यंदाच्या नवरात्रीत मी सडये-पिरंदवणे परिसरातील मातृदेवतांचा शोध घेणारी लेखमालिका ब्लॉगवर सुरू केली. ती खूप जणांना आवडली होती. त्यातील काही मातृदेवता मी पाहिल्या होत्या. काही ऐकीव माहितीच्या होत्या. त्याही पहायच्या होत्या, पण घडत नव्हते. नवरात्रीदरम्यानच्या ‘रात्रीच्या बैठकीत’ हा मुद्दा ऐरणीवर आला. बैठकीचे मेंबर आण्णा धुमक, बाळआण्णा धुमक, आप्पा धुमक, गुरू धुमक, मारूती धुमक, मी, चंपूआत्ते.. आणि इतर सारेच बोलू लागले, आणि ठरले. 

जांगलदेव


सारा कातळ धुंडाळायचा म्हणजे त्याला चांगला मार्गदर्शक हवा. आप्पा धुमक त्यासाठी विनाअट तयार झाले, त्यांचा तो नित्याचा मार्ग होता. कोरोनाचा काळ असल्याने नियमांचे पालन करणे भाग होते. त्यावर विचार झाला. पण हे सारे करताना आमचा हेतू हा होता की, हे सारं नव्या पिढीला माहित होणं गरजेचं आहे. त्यासाठी नवी पिढी विशेषत: विद्यार्थी वर्ग येणं गरजेचं आहे. यादृष्टीने जबाबदारी आण्णा धुमक यांच्याकडे दिली. सडयेतील एक हमखास विश्वासू माणूस होता, तो म्हणजे संजय लोखंडे. तो येणारच! ही पक्की खात्री होती, आणिक कुणी आले तर.. असे दहा-बारा जण आले तरी कैक झाले.

पाण्याचं टाकं

..अखेर दिवस उजाडला. तंतोतंत नऊला ही यात्रा सुरू झाली. वाट म्हणाली चल, आणि चालत गेलो. सडा चढत गेलो. वाटेत सडयेचे जुने दहीहंडी स्थान दिसले, त्यासंदर्भात माहिती दिली. पुढे सोमेश्वर देवस्थानचा भव्य देवराई परिसर दिसला. त्यासंदर्भात माहिती पुरवली, अखेर जांगलदेव आला.

हा गुराख्यांचा अर्थात जांगल्याचा देव! त्याची जन्मकथा ऐकवली. म्हारवड्याचा इतिहास सांगितला. जांगलदेवांची आरती करून गुरवांनी गार्‍हाणे घातले. ऊन वाढणार होते, त्यामुळे झरझर पुढची वाट धरली. काळा कातळ.. त्यात वाढलेलं भुरूभुरू गवत, आणि डोक्यावर सुर्य.. थोडं तापदायक होतं, पण उत्साह उदंड होता. आता सारी सुत्र आप्पांकडे गेली. कमरेला आकडी कोयती, हातात काठी, अंगात बनियन आणि गळ्यात नेहमीचा टॉवेल.. हे अस्सल गावकर्‍याचं रूप घेवून आप्पा वाट दाखवत होता. पहिलं दाखवलं पाण्याचं टाकं.

कातळशिल्प

आम्ही खूप उंचावर आलो होतो. इतक्या उंचावर एका हौदाएवढं हे पाण्याचं टाकं.. त्यात गार पाणी.. तेही स्वच्छ.. त्याकाळी या सड्यावरील गुराख्यांची हे टाकं तहान भागवी, आता जीवजनावरांची भागवतं.. मारूतीरायाने ते थोडं साफ केलं. पुढे सरकलो. मॅगी, वेफर्स, कॅडबरी खाणार्‍या अलिकडच्या पिढीला रानमेवा दाखवला. ती पोरं झाळीतल्या कन्हेरांवर तुटून पडली. आंबट-गोड चवीची कन्हेरं बहुधा गावातली पोरं असूनही पहिल्यांदाच खात असावी.. किती बेगडी जीवन जगत चाललोय, याचा प्रत्यय आला.

वळणं-वळणं घेत पुढे चाललो. सरळ मोकळा कातळ नव्हताच, कारण ज्याने-त्याने गडगे घालून आपली जागा अडविली आहे. वाटेत दिसली कातळशिल्प. एक ‘भेकरं’ हा प्राणी, तर दुसरी मानवाकृती. माणूस धडाच्या वर अस्पष्ठ झाला आहे. पण भेकरं स्पष्ठ आहे, हे शिकार चित्र असावं. मारूतीने त्याभोवती दगडाचं कडं केलं. कातळशिल्पांची माहितीही पुरवली. हे एकच नमुनेदाखल शिल्प पहायचं ठरवलं, कारण ऊन खूपच वाढत होतं.




तिथून पुढे दरमजल करत वाटचाल श्री क्षेत्र भराडणीकडे चालू केली. सुमारे 31 जणांचा हा तांडा प्रथमच चालत होता. पहिली-दुसरीतली पोरंही आली होती. छोटी तनया आणि आराध्या या नुसत्याच लहान नव्हत्या, तर शरीरानंही लुकड्या होत्या, पण न थकता चालत होत्या. त्यांच मला खूपच कौतूक वाटत होतं. दिनेश-आशिष हे हौशी तरूण सहभागी होते, पण नुकताच गाडीतून उतरलेला सतिश घवाळी हा चाकरमानीही सहभागी झाला, याच खूप भारी वाटलं. शालेय पोरं, कॉलेजची पोरं अशी बरीचजणं मोठ्या हौशीनं आली होती. 

वाटेत डुकरांचं खळंही दिसलं. डुक्कर लोळून कसा गदगदीत चिखल करतात, ते पाहताना खूप मजा वाटली. काहीवेळातच श्री भराडणीचा कळस दिसला आणि पायांनी वेग घेतला. भराडणीच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी सुका आड दिसला. वीस ते तीस फुट लांबीचा. अतिशय चिंचोळा. आड जरी नावानं सुका असला तरी त्यात पाणी होतं. वापर संपल्यानं त्याभोवती झाळवंड निर्माण झालं होतं.


श्री क्षेत्र भराडणीच्या छोट्याशा सुरेख मंदिरात पाय ठेवले. ही कोकणची आद्य मातृदेवता. सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या भराडीबाईची (देवीची) यात्रा प्रसिध्द आहे. ती भराडी आणि सडयेच्या सड्यावरील भराडीण वेगवेगळी नसून एकच आहे. सडये-पिरंदवणेच्या आसपास कासारवेलीतही सडा भागात भराडीण देऊळ आहे. भराडीण ही सुध्दा भुमका स्वरुपातील देवी आहे. सड्यावरील देवळात तीची चार भुजा, मुख अशी कोरीव मुर्ती नाही. तर आहेत ते केवळ पाषाण. मुख्य गाभार्‍यात तीन पाषाण आहेत, तर बाहेर दोन आहेत.


कोणत्याही गावात स्री देवता मोठ्या संख्येने आढळतात. सडये-पिरंदवणे त्याला अपवाद नाही. या सार्‍या देवस्थानांमागे गुढ इतिहास दडलेला आहे. हा इतिहास सडये-पिरंदवणेच्या संस्कृतीशी निगडीत आहे. सड्यावरील देवळात भराडीण एकटीच नाही. तीच्यासोबत अन्य गणगोतही आहेत. (ते कोण? याचा शोध चालू आहे.) सिंधुदुर्गात भराडणीला बाई म्हणतात. (देवी अपवादाने.) सडयेतील भराडीणही कुणी देवी नसावी, तर ती एक महापराक्रमी लढाऊ वृत्तीची बाईच असावी. कारण ती गावात न वसता सडये-पिरंदवणेच्या सीमेवर वसली आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान राहतात. सैनिक राहतात. भराडीण गावाची रक्षणकर्ती आहे, अशी भाविकांची श्रध्दा आहे. भराडीण जर रक्षणकर्ती असेल असेल. ती सीमेवर राहत असेल तर ती नक्कीच लढवय्यी असणार.. एका भुप्रदेशाची प्रमुख असणार.

कदाचित भराडणीचा कुठेना कुठे तरी संदर्भ मातृसत्ताक कुटुंबपध्दतीशी असण्याची शक्यता आहे. मातृसत्ताक पध्दतीतील ती शुरवीर रणरागिणी असावी. जेणेकरून आज तीचा डंका सर्वत्र वाजत असावा. तीचा उत्सव एकेकाळी जोरात व्हायचा, असे जाणकार सांगतात. ‘भराडणीशी नमन झाले..’ असे उल्लेख मिळाले आहेत. आज मात्र मोजकेच भक्त भराडीणला जाऊन पुजाविधी करत असतात. सडयेतील काही भाविक दिवाळीदिवशी भराडी-जाखमाता-सुखाई दर्शनाचा त्रिवेणी संगम साधत असतात.

रत्नागिरीचे पेंटर नंदू सोहनी हे भराडणी देवींचे निस्सीम भक्त आहेत. अगदी दूरवरूनही ते याठिकाणी हजेरी लावत असतात. चहुबाजुंनी पसरलेला काळा विस्तीर्ण कातळ.. वार्‍याची शीळ आणि निरव शांतता.. असे हे सर्वांग सुंदर स्थळ आहे.

अशा भराडणीसमोर आम्ही सारे नतमस्तक झालो. आतमध्ये पाषाणरुपी श्री भराडणीचा मुख्य तांदळा होता. त्याशेजारी अन्य दोन तांदळे होते. त्यांची पुजा केली, सर्वांनी नमस्कार केला. बाहेरही तांदळारुपी भराडणीचे गणदेव होते. आरती केली. गजर केला. मी भराडणीची उपलब्ध माहिती सांगितली. त्यानंतर सर्वांनी अल्पोपहार केला. टळटळीत दुपार झाली होती, त्यामुळे सर्वांच्या साक्षीनं पार पडलेल्या या उपक्रमाची साक्ष रहावी म्हणून फोटो काढले, आणि पिरंदवणे घाटीने घराकडची वाट धरली.

एक सर्वांग-सुंदर असा हा अनुभव होता. हरवलेलं काही शोधण्याचा हा प्रयत्न होता. पुढल्या पिढीला काही चांगलं दाखविण्याचा हा प्रयत्न होता. एक आगळं-वेगळं पर्यटन घडविण्याचा हा प्रयत्न होता..कोरोनानंतर एकत्र येण्याचा तो एक संयमशील प्रयत्न होता.. तो आम्ही यशस्वी करून दाखविला. केलं की सगळं चांगलं घडू शकतं, हा आशावाद घेऊन मी पुढे गेलो..


- अमोल पालये.

मो.9011212984.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू