सोहोनी पेेंटर..!

‘सोहोनी पेेंटर..!’

 

गेल्याच आठवड्यात पेंटरांचा मेसेज आला होता. ‘अमोल अभिनंदन..’ माझ्या गावकी कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचं अनुदान मिळाल्याबद्दल त्यांनी केलेलं ते अभिनंदन होतं. त्यानंतर नाताळच्या आधी पेंटर नंदूकाका सोहोनींचे स्वामी समर्थ मुद्रेतील दर्शन दुकानाच्या बाजूला केलेल्या फळ्याआडून झाले होते. तेव्हा भेट घेणं टाळलं, त्याचं कारणही तसंच होतं.
पेंटरांकडे जायचं म्हणजे खूप विषय असतात, आणि त्यासाठी कमीत कमी दोन तास तरी मोकळे हवेत. ते त्यावेळी माझ्याकडे नव्हते. मग बातमी आली, ‘पेंटर लोटलीकरांकडे आहेत..’ कळताच पाहून आलो. लांबुडका चेहरा.. पुर्ण टक्कल, मिश्किल, टपोरे कवठाएवढे डोळे, आणि ओठांवर स्मितहास्य.. बसलेले पेंटर टवकारून पाहत होते. नाकात श्वासनळ्या.. ‘दम लागतोय रे..’ इतकंच बोलले. ते इतकंच बोलणं कसतरीचं वाटलं. कारण, पेंटर म्हणजे ज्याला कला क्षेत्रातलं जाणून घ्यायची, ऐकायची इच्छा आहे, त्याला दोन तास तरी सोडत नसतच. त्यामुळे त्यांचे दोन शब्दात आवरते घेणे, पाहवले नाही. सोबत त्यांचा लाडका आण्णा होता. तो निघता निघता म्हणाला, ‘घाबरू नका.’ ..आणि अचानक त्यांच्यातला धीरोदात्तपणा, सदा प्रयोगशील, उर्जावानपणा जागृत झाला. आजारपणाला उडवत पेंटर म्हणाले, ‘अरे मी कसला घाबरतो..? जा तू. मी नाही घाबरत..’ पण त्यांची त्या लढाईत ताकद कमीच पडली, आणि सोमवारी सकाळी पेंटर गेले!

 माझी आणि पेंटरांची ओळख अर्थातच लिहण्यातून झाली. मी तेव्हा नमनातील गणनाट्ये लिहायचो. त्यांनी ती पाहिली होती. ऐकली होती. त्यानंतर त्यांनी आण्णाकडे चौकशी केली. तेव्हापासून पेंटरांचे आणि माझे अभ्यासत्रच सुरू झाले. त्यानंतर अखेरपर्यंत माझं नमनावरचं पुस्तक निघावं, हा त्यांचा धोशा चालूच राहिला. नमनातली म्हण्णी-बतावणी-आख्यानं कागदावर यावी, ही संकल्पना माझ्या मनात पहिल्यांदा पेंटरांनी रुजविली. आज ती संकल्पना आकार घेतेय, ही पेंटरांची देणगी म्हणायची.
सोहोनी पेंटर ड्रेसवाला, हे त्यांचं स्वत:च दुकान. रत्नागिरीतील ते एकमेव, आणि बरंच जुनं. त्यामुळे रत्नागिरीतल्या सर्वच नमन मंडळांची डॉक्यमेंट्री त्यांना तोंडपाठ. शिवाय नाटक, जाखडी, ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक कलाप्रकारांची सामुग्री दुकानातल्या कोपर्‍या-कोपर्‍यात आणि पेंटरांच्या मनात खच्चून भरलेली. रत्नागिरीसह जिल्ह्यातल्या अनेक कलावंताना त्यांनी अक्षरश: मढवलं. ते नुसतंच मढवणं नसायचं. एखादा कलाकार त्यांच्याकडे आला की, आधी त्याला त्या पात्राची ओळख सांगायची, मग त्यानुसार त्याला सजवायचा. जे करावं, ते शास्त्राधार.. ही पेंटरांची खासियत. नमनातले रावण जड, ते नाचवताना लागतात, म्हणून त्यांनी पुठ्ठ्याचा रावण बनविला. वय वर्ष साठी पार.. या वयात काही करायला घेतलं की, हातही थरथरतात. पण बदलत्या काळानुसार पेंटरांनी तंत्रज्ञानाची कास धरली. आताच्या कलाकारांना काय हवंय, ते त्यांनी जाणलं. त्यांना नवनवीन नमनातली सोंग हवी आहेत. हे कळताच त्यांनी अभ्यास सुरू केला. गेल्यावर्षी त्यांनी रेड्याचं सोंग केलं. त्यासाठी आधी मातीच्या रेड्याचा मुखवट केला. मग त्यापासून पीओपीचा साचा तयार केला, त्यानंतर त्यांनी आकर्षक असा पुठ्ठ्याचा नमनातल्या यमाचा रेडा तयार केला. अतिशय देखणं जनावर तयार झालं होतं ते..

 त्यांच्याकडे असलेल्या प्रयोगशीलतेचं प्रचंड कौतूक वाटायचं. तेच त्यांच्या वाढत्या वयातल्या निरोगीपणाचं रहस्य असावं. अखेरचे काहीच दिवस वगळता पेंटर कधी अंथरूणाला टेकले नसावेत. उतारवयातही कामात रहा, मन रिझवा. तुमच्यासारखा सुखी कोण नाही.. हे तंत्र त्यांनी पाळलं. साठीनंतरच्या काळातही पहाटे चार वाजता त्यांचा दिवस सुरू होई. अगदीच काही शारीरिक कुरबुर झाली, तर ओठावर आयुर्वेद कायम वसलेला. झाडपाल्याचं औषध स्वत: करायचं. त्याची अनुभूती घ्यायची, आणि मग दुसर्‍यांनाही ऐकवायचं.
पेंटरांच्या कामात प्रचंड शिस्त. वटपौर्णिमेला गणपतीच्या कामासाठी दुकान उघडणारच, आणि गणेश चतुर्थीच्या आधी आठवडाभर गणपती पुर्ण रंगवून होणारच... तीन माणसात सारे गणपती नियोजनबध्द साकारले जात. कुणीतरी मामा साचे भरे. पेंटर गणपतीची बैठक बसवत, आणि आण्णा गणपतीला साज चढवे. हे झालं की, मग पेंटर दुकानाच्या दोन फळ्या उघडून रेखणी करायला बसत. गणपती झाले की, त्यांच्याकडे लाकडाच्या, पितळेच्या, मातीच्या अनेक प्रकारच्या गौरी रंगायला येत. ते सारे मुखवटे खूपच जुने असत. त्यामुळे त्यांचं महत्व अनन्यसाधारण. ते मुखवट्याचं प्राचीन विविधत्व पाहणं, हा एक दुर्लभ योग असायचा. 

 

गणपतीची चकचकीत शरीरयष्टी, गणपतीच्या मस्तकी हिर्‍या-मोत्याचं बाशिंग, आणि लोभस मुद्रा हे पेंटरांच्या गणपतीचं खास वैशिष्ठ. अलिकडे गणपतीवर हिरे चिकटविण्याची पध्दत आली, त्यामुळे मुर्तीकाराचं कौशल्य झाकोळलं जाऊ लागलं. हे हिर्‍या-मोत्यांनी मुर्तीकाराचं कौशल्य झाकणं, एक कलाकार म्हणून त्यांना नको वाटायचं. पण काळ बदलला होता, आणि ग्राहकांचा आग्रहही वाढला होता. अगदी तळहातावर मावेल एवढाही गणपती त्यांनी साकारला, अशा गणपतींना मग ‘परदेशवारी’ घडण्याचेही भाग्य लाभले.

त्यांची खरी ओळख ‘पेंटर’ हीच. पण गणपतीचे पेंटर इतकीच मर्यादित ही ओळख नाही. पेंटर हे जेजे आर्ट स्कूलचे विद्यार्थी. त्यामुळे अंगी अनेक हस्तकला होत्या. नाटकांचे प्लॅट त्यांनी तयार केलेच. अनेक नामवंत नटांबरोबर वावरण्याची, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे गाठीशी अनुभव मोठा. असे असलेतरी पेंटर म्हणून ओळख होण्याला कारणीभूत ठरली ती त्यांनी काढलेली सुंदर अशी तैलचित्रे. महाराष्ट्राचे विनोदवीर म्हणून ओळख असलेल्या नटवर्य शंकर घाणेकरांचे मुळ चित्र अतिशय दुर्मिळ होते. तेव्हा पेंटरांनी त्यांचे तैलचित्र रेखाटले. तेच चित्र आज सर्वत्र प्रसिध्द होते. अशी अनेक चित्रे त्यांनी काढली, जी लाखमोलाची आहेत.

पेंटर सगळीकडे पीओपीची बोंब आहे, तुम्हाला काय वाटतं..? असं त्यांना विचारताच, ते उसळत. म्हणत, ‘अरे कोण सांगत पीओपी विरघळत नाही...? पीओपी म्हणजे एक मातीचाच घटक आहे ना.. ती माती कशी प्रदुषित असेल..?  हा सगळा गोंधळ मोठ्या, अवाढव्य मुर्त्यांमुळे माजलाय.. असं ठासून सांगताच ते प्लॅस्टिकचीही बाजू घेत. ‘अरे प्लॅस्टिक तर आताआता आलं. मग तुम्ही कसं ठरवलं की, प्लॅस्टिक हजारो वर्ष नष्ट होत नाही..?’ हे ऐकून मग सारे शांत होत, आणि बाकी सगळे शांत झाले की, पेंटर सारा मुद्दा अगदी निगुतीने मांडत.


 

पुर्वीचं पेंटींग हे ब्रशने व्हायचं. पेंटर त्या काळातले. पण त्यांनी गन पेंटींग अंगिकारलं. तसं ते सर्वानीच अंगीकारलं, पण पेंटरांचे वैशिष्ठ हे की, ती गन त्यांनी खोलून पाहिली. तीची यंत्रणा समजून घेतली. आणि ती बिघडली तर कशी दुरूस्ती करावी, हे त्यांनी स्वत:च शिकून घेतलं. खरेतर गन ही नाजूक वस्तू. अनेक पेंटरांकडून ती हाताळताना बिघडायची, आणि दुरूस्तीसाठी पेंटरांकडे येऊन पडायची. कारण ती दुरूस्त करायला मुंबईला जाणं शक्य नसायचं. खरंतर हे दुरूस्त करण्याचं काम नव्या कलावंतांनी आत्मसात करण्याचं, पण साठीतही पेंटरांनी ती कला आत्मसात केली.. पेंटरांची प्रयोगशीलता म्हणतात ती हीच.

 पेंटर खूप श्रध्दावान.. सडये-पिरंदवणे त्यांच गाव. सडये-पिरंदवणेतील शेकडो वर्षांचा श्री सोमेश्वराचा महाशिवरात्रोत्सव पेंटरांनी कायम ‘दर्जेदार’ ठेवला. या उत्सवातील कीर्तन आणि नाटकांनी आमच्यासारख्यांची अभिरूची संपन्न झाली. सडयेतील महाशिवरात्र म्हणजे रत्नागिरीच्या घाणेकर आळीचं नाटक.. ही संकल्पना पेंटरांनीच रूजवून टाकली. ते स्वत: रत्नागिरीतील घाणेकर आळीत राहत. बरं यातही पेटरांनी फारच उदात्त भाव ठेवला. कधी महाशिवरात्रीला नाटक न ठेवता जन्मभूमीतल्या कलाकारांना नमन करण्याची संधी द्यावी, आणि चार पैसे त्यांच्या गाठीला द्यावे, असंही केलं.
गावातल्या कलाकारांचं नमन उभं रहावं, यासाठी पेंटर अगदी खंबीर पाठीशी उभे राहिले. ‘पेंटरानू, आन्नानं गवलनीचा आंबाडा मांगतलानं व्हता..’ असं सांगितलं की, राधा गवळणीसाठी लागणारा आंबाडा, पायातले चाळ, कमरेचा पट्टा.. आणि काय-काय.. असे गावपुजेच्या वर्गणीसहित पिशवीत भरून स्वाधीन करायचे. त्या प्रॉपर्टीवर नमनातली गवळण अख्ख्या मे महिनाभर सुपार्‍या मारायची. बदलत्या व्यावसायिक नमनाचा त्यांना फार तिटकारा. ते साहजिकच होतं, कारण त्यांना नमनातली म्हण्णी-बतावणी प्रिय. तीच जर नमनात नसेल तर ते नमन कसले..? हा त्यांचा रोकडा सवाल.
गावातल्या ग्रामदेवतांवर त्यांची नितांत श्रध्दा. दुर्गम अशा सड्येच्या कातळावर वसलेल्या श्री भराडणीचा तर त्यांनी उत्सवच सुरू केला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी मोठमोठ्या कलाकारांना रंगविलं. जादूचे खेळ केले. गणपती साकारले, फ्लॅट उभे केले. नमनाची सोंग तयार केली. नमनाचा ए टू झेड रंगपट तयार केला, याहून अलौकिक काम कोणतं केलं असेल तर ते कोकणातल्या शिमगोत्सवी पालख्यातल्या रुपांना-देवतांना स्वत:च्या मांडीवर घेऊन त्यांची नजर भरण्याचं काम.. हजारो कोकणवासियांसह चाकरमान्यांना आपल्या ग्रामदेवतांची नजर नेहमीच कृपाशिर्वादासारखी, मायाळू भासत आली आहे. ती कृपाशिर्वादी, मायाळू नजर अनेक देवतांच्या रुपांना पेंटर आपल्या कुंचल्यातून देत होते. तो थाट अतिशय विलक्षण असायचा. पेटंर स्वत: देवस्थळी जात. त्या जगनियंत्याला वंदन करत, आणि जो विश्वाचा कर्ता-करविता आहे, अशा मुर्तीरुप देवाला ते अलगद आपल्या मांडीवर घेत.. आणि तान्हा लेकरांना टिटू-मिटू करावं, तशा पध्दतीनं ते देवाचं रुपाला नेत्र भरत.. भुवया साकारत, पिळदार मिशांनी रुबाबदार करत.. तो क्षणच विलोभनीय! ..अवघ्या आयुष्यात एखाद्या कलाकाराला आणखी काय हवे..? 


 

नाटक, नमन, जाकडी, नेपथ्य, वेशभुषा, मुर्तीकला, शिल्पकला, जादूकला अशी ही पेंटर नंदकुमार सोहोनींची कलासाधना व्यापलेली होती. दि.25 डिसेंबरच्या नाताळपर्यंत ते शाळांमधले सांताक्लॉज सजवत राहिले. इतका हा माणूस कलेत रंगलेला होता. मी त्यांना गाडीतळावरचे ‘स्वामी समर्थ’ म्हणे. कारण, नेहमी समर्थ मुद्रेतच त्यांचे सकाळी साडेदहा वाजता दुकानाच्या फळ्याआडून दर्शन होत असे. योगायोग असा की, त्यांना सोमवारी मरण आलं. सोमवार ‘नटेश्वरा’चा वार मानला जातो. आयुष्यभर गावच्या सोमेश्वर शंकराला पुजणार्‍या या शिवभक्ताला म्हटलं तर भाग्यशाली मरण आलं. कलेत रंगलेला हा माणूस अखेरपर्यंत अतिशय तृप्ततेनं जगला, असं मला वाटतं. ही तृप्तता आयुष्यातील कार्यमग्नतेतून येते, हाच धडा पेंटरांकडून घ्यावा, आणि भावी कलाकारांनी कार्यरत रहावे, तीच खरी पेंटरांना श्रध्दांजली ठरेल!

- अमोल पालये.
मो.9011212984.



Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू