श्री सुंकाई मंदिर कलशारोहण सोहळा

 श्री सुंकाई मंदिर कलशारोहण सोहळा 


रत्नागिरी तालुक्यातील सडये-पिरंदवणे-वाडाजूनचे ग्रामदैवत श्री सुंकाई देवस्थानचा मंदिर कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. यानिमित्ताने काढण्यात आलेली कलश मिरवणूक तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी ठरली. लहानापासून आबालवृध्दांपर्यंत मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते.





सडये-पिरंदवणे-वाडाजून गावांचे ग्रामदैवत म्हणून ख्याती असलेल्या श्री सुंकाई मंदिराची देखणी वास्तू ग्रामस्थ, भाविक, दानशूरांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे. या मंदिराचा शनिवार दि.18 रोजी कलशारोहण सोहळा पार पडला. तत्पुर्वी मंदिराच्या कलशाची भव्त मिरवणूक सडये गावातून काढण्यात आली. 




तिन्ही वाड्यांची ढोलपथक, लेझीमपथक, यासंह सडयेतील तरुण, तरुणींनी तिन्ही वाड्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले. यात लहान मुलांनी गणपतीचे कुटुंब ही संकल्पना साकारली होती. तर जयश्री कुर्टे यांनी झाशीची राणी साकारुन इतिहास जागा केला. अंजली धुमक, सुशिल धुमक, स्वरित धुमक यांच्या छत्रपती शिवराय-जिजाऊ दर्शनाने सार्या शोभायात्रेत विरश्री संचारली होती. अमोल पालये यांनी आणलेल्या संकासुराने अवघ्या बालगोपाळांची घाबरगुंडी उडाली. योगेश धुमक यांचा उंदिरमामाचा नाच सर्वांच्या औत्सूक्याचा विषय ठरला. 





त्यानंतर सर्व संत मंडळींची वारकरी आणि विठ्ठलाच्या साथीने कलशयात्रेत दिंडी निघाली. अनंत धुमक यांनी या दिंडीचे सारथ्य केले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांचेही या कलशयात्रेत आगमन झाले. 




कलशयात्रेच्या अखेरच्या टप्प्यात सुरज माने यांची ताटको राक्षसीन, साहिल-सार्थक कुर्थे यांचे राक्षस यांनी कलशयात्रेत अक्षरश: सार्यांची भंबेरी उडवली. त्यापुढे कलश यात्रेत  स्वरित धुमक आणि अमन धुमक यांच्या धनुर्धारी राम-लक्ष्मणाचे आगमन झाले. त्यांनी कलशयात्रेत उन्मत्त झालेल्या ताटको राक्षसीनीचा बाणाने वध केला. दर्शन धुमक यांच्या भुताकोलाहीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.










त्यानंतर पुजा माने यांच्या महाकालीने कलशयात्रेत तांडव केले. निखिल पालये यांचा हनुमानही भाव खाऊन गेला. अखेरीस तेजस पालये यांनी लंकापती रावण नाचवला. अनिकेत कुर्टे, अनुज कुर्टे, सोहम कुर्टे, संजय लोखंडे यांनी जागोजागी पुष्पहंड्या बांधल्या होत्या, त्यावरुन पुष्पवृष्टी करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष बंधू कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने सार्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.










Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू