संकासूर (sankasur)
संकासूर
समस्त कोकणवासिय आणि चाकरमानी यांच्या जगण्याचे टॉनिक म्हणजे शिमगोत्सव! बारावाड्यांच्या गावदेवाला फुल लागलं, रुपं चढलं की कोकणात पालख्यांचे ढोल वाजू लागतात. गावभोवनीच्या देवांबरोबर गावभोवनीचे खेळे सजतात आणि घरोघरी फिरू लागतात. असा हा कोकणातला शिमगोत्सव अनेकप्रकारे वैशिष्ठपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ठ म्हणजे, हिंदू धर्मात भक्ताने देवालयात जावे, आणि देवाचे दर्शन घ्यावे, असा नियम आहे. कोकणातला शिमगोत्सव मात्र हा नियम दूर ठेवतो. येथे चक्क ग्रामदेव भक्ताघरी उंबरठा ओलांडून घरात येतात. येतात ते येतात, ढोल-ताशांचा शाही गोतावळा घेऊन येतात.
दुसरं वैशिष्ठ म्हणजे, पालखीतले देव पौराणिक नाहीत. ब्रम्हा, विष्णू, महेश, राम-लक्ष्मण, कृष्ण असे प्रस्थापित देव नाहीत. पालखीतून गावभेटीला निघणारे देव हे पुराणाबाहेरचे आहेत. त्यांच्याकाही अवतार लिलाही माहित नाहीत, तरीही गेली हजारो वर्षे त्यांनी कोणतंही स्वत:च मार्केटिंग नसताना कोकणवासियांच्या मनावर गारूड केलं आहे.
तिसरं विशेष म्हणजे, कोकणातल्या पालख्या पाहिल्या तर त्यात कमीत कमी तीन, जास्तीत जास्त पाच-सहा देव असतात. यातही सर्वाधिक असतात त्या स्त्री देवता. एखादाच पुरूष देव असतो. हे विशेषत्व खूप काही सांगून जाते, आणि ते अभ्यासकांना मातृसत्ताक कुटुंबपध्दतीकडे निर्देश करते.
पालखीतले देव जरी अपौराणिक असले, तरी या पालखीसोबत एक पौराणिक पात्र गावभोवनी करत असते. हे पात्र जरी पौराणिक असले, तरी ते देव या गटातील नाही. तर ते आहे राक्षस या गटातले. कोकणातल्या शिमगोत्सवाची हीच खरी गंमत आहे. एक राक्षस कुळातील राजा शिमगोत्सवात गावभोवनी घेतो. त्याचं आदरतिथ्य होतं. त्याला मान मिळतो. या राक्षसाच्या वेठीचा मार खाणं, हे आशीर्वाद समजंल जातं. भाग्याचं समजलं जातं..? असा हा राक्षस म्हणजे कोकणवासियांनी गेली हजारो वर्षे काळजात जपून ठेवलेला संकासूर!
संकासूर हा अनार्य राजा. म्हणजेच राक्षस कुळातील. तो काही प्रस्थापित देवांसारखा देखणा नाही. त्याच्या हातात ना ढाल, ना तलवार.. दिसायला विद्रुप, काळाकुट्टं.. तरीही हा राक्षस कोकणात गेल्या हजारो वर्षापासून पुजला गेला. भजला गेला. काय आहे हे संकासुराच्या लोकप्रियतेचं गुढ...? खरचं कोण, कुठचा आहे तो..? त्याला कोकणवासियांनीच का आपलं मानलं...? कोकणातल्या शिमगोत्सवात तो कशासाठी येतोय..? काय आहे त्याचं सांगणं..? बापरे! असे एक ना अनेक प्रश्न.. पण, कोकणवासियांनी या प्रश्नांचा शोध कधी घेतलाच नाही. ते फक्त अविरत प्रेम करत राहिले संकासूरावर... आणि त्यांचं ते प्रेम पाहून मत्स्य पुराणात खलनायक असलेला हा संकासूर कोकणवासियांचा हिरो झाला. अशा या कोकणवासियांच्या काळजात घट्ट बसलेल्या हिरोची.. संकासूराची ही कहाणी..
- लेखन/संकलन: अमोल पालये, (रत्नागिरी).
..........................................................................
शिमगोत्सव सुरू झाला की, कोकणात हाकारे देत संकासुराचे, गोमुचे आगमन आजही होते. नमन/खेळ्यात जसा संकासूर येतो, तसाच तो दशावतारातही येतो. पुर्ण काळा वेश. डोक्यात शंकू आकाराचा मुखवटा. कपाळावर, दंडावर, अंगावर पांढर्या भस्माचे पट्टे. लांबलचक पांढरी दाढी, आणि त्यातून लोंबणारी लाल जीभ. कमरेला घुंगराचा चाळ.
गावाची वेस बदलत गेलं की, संकासूराच्या रुपड्यात किंचित किंचित फरक जाणवतो, पण संकासूर पहावा तो गुहागरचाच! त्याच्या कमरेच्या घुंगराचा चाळच चार किलो वजनाचा असतो. हातातली वेठी, आणि त्याचा नाच टक लावून पाहत रहावे असा. मानेला आणि कमरेला लचके देत तो दुडक्या चालीवर मागेपुढे करत नाचतो, ते पाहत राहण्यासारखे असते. आपली सखी गोमूसोबत तो नाचत असतो, कधी गोमूभोवती अक्षरश: तीच्याभोवती गोल गोल पिंगा घालतो. असा हा संकासूर लहानग्या पोरांपासून म्हातार्या-कोतार्यापर्यंत सार्यांनाच जीवाभावाचा वाटत आलेला आहे.
त्याची वेठी पाठीवर पडणे, हे भाग्याचे मानले जाते, आणि ती वेठी पाठीवर पडण्यासाठी चाकरमानी आसुसलेले असतात. ही वेठी कापडाच्या चिंध्यापासून तयार केलेली असते. ती संकासुराच्या कायम हातात असते, ती घेवूनच तो अख्खी गावभोवनी करत असतो. शिमग्याचे खेळे बाहेर पडतात. ग्रामदेवासमोर, सानेवर, गावातील घराघरात नाचतात. या बाहेर पडणार्या शिमग्याच्या खेळयांना गावभोवनीचे खेळे म्हणतात, किंवा गावभोवनीचा संकासूर.
नमनातल्या संकासुराबाबत दशमुखी रावणाप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात शंका येतात. यातील मुख्य शंका म्हणजे, संकासूर हा एक असूर.. त्याने ब्रम्हाचे वेद पळविले, आणि विष्णूने त्याचा मत्स्य अवतार धारण करून वध केला, अशी कथा पुराणात वाचायला मिळते. मात्र नमनात ही कथा कधीच सादर होत नाही, आणि कधी कुणी करणारही नाही, कारण नमनात आणि कोकणच्या जीवनात संकासूर हा खलनायक नव्हे, तर तो हिरो आहे.. आणि धकाधकीच्या जीवनात अडकलेल्या चाकरमान्यांचं तर तो जगण्याचं टॉनिकच आहे.
.. अनेकांना प्रश्न पडतो, पुराणात खलनायक असलेला संकासूर नमन/खेळ्यात पुजनीय कसा काय ठरला..? नमनात तर त्याचे स्थान गणपती आख्यानाआधी आले आहे. अग्रक्रम त्याला मिळाला आहे. गणपतीच्या आधी तो नाच करून जातो. हे कोडे काय..? याबाबत कोकणातले नमन रंगकर्मी एक मार्मिक स्पष्टीकरण देतात, ते अभ्यासकांना विचार करायला लावणारे आहे.
रंगकर्मीच्या मतानुसार, संकासूराने ब्रम्हाचे वेद पळविले नाहीच! मुळात चारही वेद अनार्यांचीच संपत्ती होती. ते अनार्यांचा राजा संकासुराचेच होते, आणि ते ब्रम्हानेच आपले वर्चस्व प्रस्थापित करत आपल्या ताब्यात ठेवले होते. ते संकासुराला पुन्हा मिळवायचे होते. म्हणून त्याने ते मिळविलेे. येथे संघर्ष निर्माण झाला, आणि या संघर्षात संकासूराचा पराभव झाला. नेहमीप्रमाणे इतिहास हा जेत्याच्या बाजूने लिहला जातो, त्यामुळे पराभूताची बाजू दुर्लक्षित होते. येथेही संकासूराच्या बाबतीत तेच झाले असावे.
असो.. जगाच्या दृष्टीने खलनायक असलेला संकासूर नमनात मात्र तसा नाही, एवढे पक्के. नमन/खेळ्यांनी संकासूराला आपला हिरो केला, आणि नमनात नाचवला. नमनात तो इतका मुरला, की तो एक पुराणिक व्यक्तिमत्व आहे, हेच सारे विसरून गेले. संकासूर काय, किंवा रावण काय.. या जगाच्या दृष्टीने खलनायक ठरलेल्या राजांना नमन/खेळ्यांनी एक विशेष आदराचं स्थान दिलं आहे. या पात्रांबाबतची ही आपुलकी या लोककलेत कशी रुजली..? याबाबत सखोल अभ्यासाची गरज आहे.
नमन/खेळ्यात गणपतीआधी रंग भरणार्या संकासूराबाबत कोकणातील रंगकर्मी अंत्यत सुरेख माहिती देतात. ते म्हणतात, संकासूर हा राजा होता. वेद ही संपत्ती शंकासूराचीच होती. ती त्याने बहुजन वर्गात वाटली. काल, आज आणि उद्या असं तिन्ही त्रिकाळ पवित्र असणारं ज्ञानदानाचं कार्य वेदांच्या माध्यमातून संकासूराने केलं, तेही बहुजन वर्गात! म्हणून त्याला पुजले जाते.
कोकणात संकासूराला जो तो आपापल्या श्रध्देनुसार पुजतो. तो बाळ-गोपाळात रमतो. त्यांच्या पाठीशी लागतो. त्यांचे मनोरंजन करतो. त्यांना घाबरवतो, म्हणून काहीजण त्याला श्रीकृष्णाचा अवतारही समजात. काहीजण त्याला ग्रामदेवीचा दूत असेही म्हणतात. तर काही त्याला गावाचा रक्षक असेही म्हणतात. या सार्या भावनांमागे संकासूर हा चांगलाच आहे, असे म्हटले आहे. त्याच्याविषयी कुठेही नकारात्मकता नाही. गावाचा रक्षक ही त्याच्यामागची उपाधी खूपच सुचक आहे, कारण कोकणात संकासुराचा दराराही तितकाच जबरदस्त आहे. गाव ही त्याची जबाबदारी आहे, ती तो इमानेइतबारे हजारो वर्षे पार पाडत आला आहे. त्या जबाबदारीपायीच तो शिमग्याच्या सणाला अख्खी गावभोवनी करतो, घराघरात-दारादारात जातो. पोरं-बाळं, म्हातारी-कोतारी या सार्यांकडे जातो, त्यांच्या पाठीवर प्रेमाने वेठी मारतो. एक खलनायक.. हे सारं कसं काय करू शकेल? हे एक रक्षकच करू शकेल. त्यामुळे तो खरोखरच रक्षक (अपभ्रंश: राक्षस) आहे.
अशा संकासूराला कोकणात नवसही बोलला जातोे. यावर्षीच्या शिमग्यात बोललेला नवस पुर्ण झाला, तर पुढल्या वर्षीच्या शिमग्यात ज्यावेळी फिरते/भोवनीचे खेळे दारी येतात तेव्हा तो यथाशक्ती फेडला जातो. यात सर्वाधिक नवस असतात ते चाकरमान्यांचे. नोकरी-धंद्यातील यश, संततीप्राप्ती, लग्नाची जुळवणूक यासंदर्भातील हे नवस गुळ-खोबरे या परतफेडीपासून संकासूराच्या कमरेचा चाळ, हातातली वेठी, नारळाचं तोरण, आणि जास्तीत जास्त तर संकासूरासहित येणार्या खेळ्याचं जेवण.. अशा स्वरूपाचेही असतात.
संकासुराच्या वेषभुषेविषयी...
रत्नागिरीचा संकासुर आणि गुहागरी संकासुर यांच्या वेषभुषेत थोडा फेरफार आहे. गुहागरी संकासुराची पांढरी दाढी ही भरगच्च असते. ती घोड्यांच्या केसांपासून तयार केलेली असते. किंवा नॉयलॉनचीही असते. त्यामुळे तो संकासूर दिसायला रुबाबदार दिसतो. तर रत्नागिरीकडील संकासुराची दाढी ही धाग्यांची असते. ती एका वर्षानंतर बहुधा झिरपते, आणि नावाची दाढी उरते. संकासुराची ही वेषभुषा मुंबईसारख्या मोठ्या शहरात ऐतिहासिक कपडेपट वाल्यांकडेच मिळते, तीची कमीत कमी किंमत पाच हजारापासून सुरू होते. ही झाली पोशाखाची किंमत, गुहागरी संकासूर कमीतकमी चार किलोचे चाळ कमरेला बांधतो, त्याची किंमत वेगळी. तीही हजारातच..
काळाच्या ओघात रत्नागिरीतली नमनं फार फार बदलली. व्यावसायिक नमन हा प्रकार कोकणात फार मातला. या मातलेपणात संकासूर पेटार्यात पुर्णत: बंदिस्त झाला. आज रत्नागिरीतल्या एकाही व्यावसायिक नमनात संकासूर पहायला मिळत नाही. काही व्यावसायिक मंडळे मिशीला कोकम लावल्यागत आम्ही संकासूर आणतो.. नाचवतो.. असे सांगत असतात, मात्र तो संकासूर येतो, आणि नाचून जातो. ते संकासूराचे येणे म्हणजे हसावे की रडावे..? असे असते. संकासूराचे येणे म्हणजे समोर बसलेल्या लहानग्याचे अख्खे अंथरूण ओले होणे, अशी क्रिया लहानग्याबाबत घडत असे. इतका संकासूर भयंकर, आणि तितकाच विनोदी असे. आताचा संकासूर म्हणजे अळवावरचे पाणी. खरा संकासूर तोच, जो बतावण्या मारतो!
नमनातल्या संकासूराची खरी ओळख होती ती त्याची बतावणी. आज ही ओळख व्यावसायिक नमनातून पुर्णत: पुसली आहेच, पण गुहागरसारख्या ग्रामीण आणि पारंपारिक नमनाचे क्षेत्र असलेल्या भागातही संकासूर बतावण्या मारताना दिसत नाही. हे असे का झाले असावे..? त्याला कारण एकच, नमन-खेळ्यांची म्हण्णी, बतावणी नव्या पिढीने, त्यातील नव्या कलाकारांनी आत्मसात केली नाही. ती कधी जाणून घेतली नाही. आज अशी अनेक दुर्मिळ म्हण्णी वा बतावणी, आणि आख्याने केवळ लिहलेली नसल्याने नष्ट होत चालली आहेत. रत्नागिरीतील नमनातील जेष्ठ रंगकर्मी कै.पु.ल.माने यांनी साकारलेल्या संकासुराच्या बतावणीचे संकलन पुढे दिले आहे. ते अतिशय दुर्मिळ आहे. या बतावणीतून संकासूर सकाळी उटल्यापासून ते जेवण्यापर्यंतची जी दैनंदिन कामे आहे, ती कशी करतो, ते विनोदी पध्दतीने सांगतो. त्याच्या जोडीला असतो नमनाचा म्हण्णीवाला. म्हण्णीवाला हाच नमनाचा म्होरक्या. त्याला संकासूर नायको (नायक) असे संबोधतो. नायको आणि संकासूर असा दोघांचा संवाद आणि नाच चालू असतो. याहून विशेष म्हणजे हा सारा संवाद पुर्णत: तिलोरी-संगमेश्वरी बोलीतून होत असतो. पुढील बतावणीत असे अनेक अत्यंत जुने तिलोरी-संगमेश्वरी बोलीतील शब्द आले आहेत, की ज्यांचा नेमका अर्थ आज लावणे कठीण झाले आहे, इतके हे शब्दवैभव जुने आहे.
नमनात मृदुंगाला अनन्यसाधारण महत्व आहे. मृदुंग केवळ म्हण्णीला/गाण्यांना साथ देत नाही, तर तो नमनातल्या संवादानाही लयबध्दता प्राप्त करून देतो. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे संकासूर आणि नायको यांच्यातील संवाद.
संकासूर आणि म्हण्णीवाला/नायको यांच्यातील संवाद वाचणं वेगळं, आणि त्याचं सादरीकरण करणं वेगळं. सादरीकरणात या दोन पात्राव्यतिरिक्त तिसरी भुमिका असते ती मृदुंगवाल्याची. या संवादांना तो मृदुंगाची संगीतसाथ करत असतो. मृदुंगाच्या संगीतामध्ये ते संवाद एकदम फिट बसावेत यासाठी म्हण्णीवाल्याच्या बोलण्यातही लयबध्दता आणावी लागते. त्यासाठी म्हण्णीवाला ते संवाद थोडे गायकी थाटात म्हणतो, किंवा त्यांचा पुन्नरुच्चार करतो..
उदा:
संकासूर: ओ नायको, आमी एक मौज पायली हो..
नायको: ती ओ कोनती..?
संकासूर: पाड्यावर पाडा...
नायको: पाडयावर पाडा...(पुन्नरुच्चार)
संकासूर: घोड्यावर घोडा...
नायको: घोड्यावर घोडा..(पुन्नरुच्चार)
वरिल संवादात संकासूराचाच संवाद पुन्हा म्हण्णीवाल्याने उच्चारला आहे. त्या उच्चारण्यामागणे कारण हेच, की ते सारे संवाद मृदुंगाच्या बोलात बसवले आहेत. त्यामुळे हे सादरीकरण दोन नव्हे, तर तीन पात्रांचे होत असते.
उदा:
संकासूर: पाड्यावर पाडा...
बेदमं बेदमंनाम..(मृदुंगध्वनी)
नायको: पाडयावर पाडा...
बेदमं बेदमंनाम..(मृदुंगध्वनी)
संकासूर: घोड्यावर घोडा...
बेदमं बेदमंनाम..(मृदुंगध्वनी)
नायको: घोड्यावर घोडा..
लोककलेतही पार्श्वसंगीत म्हणजे काय असते, आणि त्याचा किती कौशल्यपुर्वक वापर लोककलावंतानी खूप आधीपासूनच केला आहे, हे यातून नव्या कलावंताना समजू शकेल.
........................................................
संकासूर आगमनाची म्हण्णी-
वारवा रे कुणी खेलता देकला
तेरवा गडू रे पन्हलावर
तेरवा गडू रे पन्हलावर
वारवा रे कुनी तेवीस नटवं
तेवीस नटवं..
भावकाय देवीचे बालपुतरं
भावकाय देवीचे बालपुतरं
नालदेव पुजला नदीवरू
नालदेव पुजला नदीवरू
जानते जानते काय रं करू
जानते जानते काय रं करू
जानतेनं घातली यारी हो..
जानतेनं घातली यारी हो..
आई म्हनं बाल हुदुदुद्यानं खेलं
हुदुदुद्यानं खेलं..
मुंगसाच्या बिलावरी साप
भजन करी हो साप भजन करी
कोलनीच्या मात्यावरी
सल्पाची भारी हो सल्पाची भारी
शिवभोजन करी
हो सस्त्रभोजनं करी
टोलीयाच्या मुकावरी काय
ठेवीलं झाकनं हो ठेवीलं झाकनं
सकया हो साजनी
भरू गेल्या रांजनी
भरू गेल्या रांजनी
हो...
शब्दार्थ-
1.वारवा: वाळवीचे वारूळ, 2.तेरवा गडू: तेरावा खेळगडी, 3.तेवीस नटवं: तेवीस नटवे (आजच्या भाषेत रंगकर्मी म्हणू.), 4. भावकाय देवी: भूमका स्वरूपातील देवी. ज्या देवता वारूळरुपी असतात, त्यांना भूमका स्वरूप देवता म्हणतात. तशीच ही भावकाय देवी. कोकणात मोठ्या संख्येने भावकाय देवीची मंदिरे असून, त्यांचा शिमगोत्सव खूप मोठा असतो. त्यामुळे ती भूमका स्वरूपात न राहता, मुर्तीस्वरूपातही पहायला मिळते.
5.बालपुतरं: लहान मुलगे, नालदेव: बाळ जन्मण्याआधी गर्भाशयात मातेच्या नालेद्वारे बाळाचा विकास घडत असतो. ही नाळ म्हणजे बाळाच्या जन्माचे खरे मुळ आहे. याच अर्थी सार्यासृष्टीचा नाळदेव म्हणजेच मुळदेव, अशी संकल्पना येथे वापरली असावी.
6.हुदुदुद्यानं खेलं: मजामस्तीतला मुलांचा खेळ.
7.मात्यावरी: डोक्यावरी.
(- या म्हण्णीचा परिपुर्ण, तर्कसंगत अर्थ लावण्याचे काम चालू आहे.- संकलक.)
.........................................
संकासुराची बतावणी-
संकासूर: हु..हु...हु.. चोप.. चोप.. चोप.. चोप..
ओ नायको, हं टांब टिंब टांब टिंब काय वाजतं?
नायको: टांब टिंब टांब टिंब देवखोली वाजते
संकासूर: ओ नायको,
नायको: बोलावे..
संकासूर: संकासूर-बंकासूर कोनी टिकले?
नायको: संकासूर- बंकासूर आमी टिकले
संकासूर: कोनत्या कारनास्तव?
नायको: मंगलकारनास्तव
संकासूर: ओ नायको..
नायको: बोलावे..
संकासूर: ओ आमी एक मौज पायली हो..
नायको: ती ओ कोनती..?
संकासूर: पाड्यावर पाडा...
नायको: पाडयावर पाडा...
संकासूर: घोड्यावर घोडा...
नायको: घोड्यावर घोडा..
संकासूर: आनी बायकोखाली दादला हो..
नायको: ओहो..
संकासूर: ओ नायको,
नायको: बोलावे...
संकासूर: आमाला दोन पायजे..
नायको: दोन काय पायजे..?
संकासूर: दोन बेकर पायजे..
नायको: बेकर नाय ओ, नोकर!
संकासूर: हा..हा..तचं तं..
नायको: त्या नोकरांचा तैनाततामा मजूरा मोजावा लागलं.
संकासूर: आमी देव पाचशे
नायको: जास्त बोलावं..
संकासूर: आमी देव चारशे..
नायको: शंभरानं कमी आलात हो..
संकासूर: आमी देव दोनशे..
नायको: आनकी कमी आलात हो..
म्हण्णी- (तैनाततामा मजुरा मोजणे)
संकासूर:
दशावतारा गोविंदा.. दशावतारा गोविंदा
नमो नमो हो नारायना.. नमो नमो हो नारायना..
संकासूर: ओ नायको
नायको: आहा
संकासूर: नवं नोकर पुढं नेलं, नवं नोकर मागं आनलं..
नायको: हं असं काय हो केलवं..?
संकासूर: मागं येन्यास द्वार नाय, पुढं येन्यास स्वार नाय.
नायको: मंग व्हया नोकरांनी काय करावं?
संकासूर: व्हया नोकरांनी सकसकल उटावं.
नायको: सकसकल उटावं.
संकासूर: मुकमंडल धुवावं.
नायको: मुकमंडल धुवावं.
संकासूर: आयाबायांच्या उकरडी जावं.
नायको: आयाबायांच्या उकरडी जावं.
संकासूर: चिंध्याचोल्या जमवाव्या.
नायको: त्या चिंध्याचोल्या काय कराव्या?
संकासूर: त्या चिंध्याचोल्या रजकापाशी द्याव्या.
नायको: रजकापाशी द्याव्या.
संकासूर: रजकानं काय करावं..
नायको: आहा
म्हण्णी- (चिंध्याचोळ्या धुणे)
संकासूर:
धुवून चोलून...
धुवून चोलून... हो..
संकासूर: चिंध्याचोल्या धुवून चोलून झाल्या.
नायको: हा झाल्या..
संकासूर: आता त्या सुकशां घालयाच्या.
नायको: हा घातल्या..
संकासूर: मग त्या सुकल्या की, तेच्या घडया घालयाच्या..
नायको: घडया घालयाच्या..
संकासूर: हिरवी यकीकडं, पांडरी यकीकडे, तांबडी यकीकडे..
नायको: हा..हा..
संकासूर: घड्या घालून झाल्या..
नायको: हा घड्या घालून झाल्या.
संकासूर: की तेच्यातलं दोन जोड शिंप्याकडं नेयाचं.
नायको: तं कशा?
संकासूर: शिंप्यानं तेच्या चारपदरी दोन झोल्या बनवयाच्या.
नायको: कशा बनवयाच्या?
म्हण्णी- (चिंध्याचोळ्या शिवणे)
संकासूर:
टारटार टारटार
टारटार टारटार
संकासूर: चारपदरी दोन झोल्या तयार झाल्या.
नायको: हा..हा..
संकासूर: त्या दोन नोकरांच्या दोन काकेमध्ये द्याव्या.
नायको: त्या नोकरांनी काय करावं?
संकासूर: सातासमुद्रापार पल्लातीरा..
नायको: सातासमुद्रापार पल्लातीरा...
संकासूर: चंबलच्या बेटामध्ये..
नायको: चंबलच्या बेटामध्ये..
संकासूर: फुल्लांच्या झाडामध्ये..
नायको: फुल्लांच्या झाडामध्ये..
संकासूर: तिथं आमची बायलू!
नायको: हा.. हा..
संकासूर: या नोकरांनी काय करावं?
नायको: काय करावं?
संकासूर: या नोकरांनी साष्टी जावं..
नायको: साष्टी जावं..
संकासूर: पुन्यास जावं..
नायको: पुन्यास जावं..
संकासूर: ओ सगला गाव घेतला तरी सव्वाशेर तांदल्या!
नायको: अवो, यवडा गाव घेवनं पर सव्वाशेरच तांदल्या?
संकासूर: तेचं काय हाय नायको..
नायको: काय हाय..?
संकासूर: हल्ली म्हागाय-बिगायचे दिवस. कोन चोरून खातं, कोन मारून खातं.
नायको: बराबर.
संकासूर: म्हनू आपलं मापात आसलं की पुरवट्याला बरं पडतं!
नायको: आता त्या तांदल्या काय कराव्या?
संकासूर: त्या तांदल्या घेतल्या.
नायको: आहा..
संकासूर: की कुंभारकडं जायाचं.
नायको: आता कुंभाराकडं कशाला?
संकासूर: कुंभाराकडनं तोंडपसरी घेवनं ययाची.
नायको: तोंडपसरी म्हंजे काय हो..?
संकासूर: मडकी हो..
नायको: हो..हो..
संकासूर: हंडी हंडी..
नायको: हा हा.. मंग म्होरं काय करयाचं..?
संकासूर: तोंडपसरी आनली की, तीन धगड मांडायचं.
नायको: धगड नाय हो, दगड..
संकासूर: हा तच तं..
नायको: हा हा..
संकासूर: तं मांडलं..
नायको: हा मांडलं..
संकासूर: की त्या तांदल्या हंडीत वतल्या..
नायको: हा वतल्या..
संकासूर: त्यात पानी वतलं..
नायको: पानी वतलं..
संकासूर: खाली अग्नी पेटवला की, भाताला कढ आला
नायको: कसा आला..?
म्हण्णी- (भाताला कढ काढणे)
संकासूर:
गादगाद.. गादगाद..
गादगाद.. गादगाद...
नायको: हं व्हो काय..?
संकासूर: भाताला कढ आला..
नायको: हा..हा..
संकासूर: मंग भाजी केली.. आमटी केली..
नायको: व्वा..व्वा..!
संकासूर: हं सगलं झालं की, आमच्यावर कडतंवनी
नायको: कडतंवनी म्हंजे हो काय..?
म्हण्णी- (संकासुराची आंघोळ)
संकासूर:
शिवाशिवा हो नारायना..
आंगोल करी हो नारायना..
शिवाशिवा हो नारायना..
आंघोल करी हो नारायना..
संकासूर: हा रं..हुरं..
नायको: काय हो...?
नायको: आंगुल झाली..
सुत्रधार: झाली काय आंगोल..?
नायको: हा.. आता देवखोलयेत धाव मारयाची.
सुत्रधार: हो..हो..
नायको: सगलं देव यका नवरीत घेयाचं..
सुत्रधार: अरारा..
नायको: काय हो..? काय झालं..?
सुत्रधार: नवरीत नाय हो, रोवलीत!
नायको: हा हा रोवलीत घ्यायाचं. तं सगलं देव यका रोवलीत घेतलं..
सुत्रधार: हा..हा.. घेतलं.
संकासूर: की आता भरपूर पानी खय गावनार..?
सुत्रधार: कुटल्यातरी कोंडीवर जाया लागलं.
संकासूर: हा.. कोंडीवर जायाचं.
नायको: हा..
संकासूर: तितं सगल्या देवानंला आंगोलपांगोल घालयाची.
नायको: कशी घालयाची..?
म्हण्णी- (देवांची आंघोळ)
नायको:
आंगोल करी देव नारायना..
शिवा शिवा हो नारायना..
आंगोल करी देव नारायना..
शिवा शिवा हो नारायना..
संकासूर: चोप.. चोप.. चोप.. चोप..
नायको: ओहो.. हं हो काय केलवं?
संकासूर: तेचं काय हाय, व्हया रोवलेत काय देव ल्हान हायतं, काय देव मोठं हायतं. त्या ल्हान देवाच्या मानगुटीवर मोठा देव पाय देतो. म्हनू अगोदरच तेंनला दम देला ना, की तं नीट आंगोल करतात!
नायको: हा..हा..
संकासूर: चला, देवांची आंगुल झाली.
नायको: हो..हो..
संकासूर: देवानंला नीट पुसून काडलं.
नायको: हा पुसून काडलं.
संकासूर: देवार्यात सगल्यानंला नीट मांडलं..
नायको: हा..हा..
संकासूर: आता फुलपरडी घेयाची, आनी वरच्या बागेपासनं खालच्या बागेपरयानं जायाचं.
नायको: हा..हा..
संकासूर: सगली फुला बेडकानं खल्लीली हो..
नायको: ओ बेडकानं नाय ओ..
संकासूर: मग?
नायको: बेडका पावसाची, आनी रेडका उनाची..
संकासूर: हा रेडकांनं रेडकांनं.. चला फुला आनून झाली. आता गंध उगलयाचं.
नायको: कसं उगलयाचं..?
म्हण्णी- (गंध उगाळणे)
संकासूर:
गंध उगाली हो नारायना..
शिवाशिवा हो नारायना..
गंध उगाली हो नारायना..
शिवाशिवा हो नारायना..
नायको: काय ओ, असं काय केलवं?
संकासूर: आवं तं काय हाय म्हायतेय काय, धरनीची केली सान आनी आकाशाचं केलं ख्वाड!
नायको: होय काय.. व्वा..व्वा..!
संकासूर: हात नको, पाय नको घसघसवून टाकलं! ओ नायको
नायको: बोलावे
संकासूर: फुलां आनून झाली.. गन उगालून झालं..
नायको: हो..हो..
संकासूर: आता सगलं देव जागंवर मांडयाचं.
नायको: हा.. हा मांडलं..
संकासूर: तेंच्यावर पानी शिपडयाचं..
नायको: पानी शिपडलं..
संकासूर: तेंच्यावर गन घालयाचं.. अक्षता घालयाच्या..
नायको: गन घातलं, अक्षता घातल्या..
संकासूर: फुलां घातली.
नायको: फुलां घातली.
संकासूर: आता उजव्या हातात धुपाटनं, आनी डाव्या हातात घंटा..
नायको: बोला, पारवती पते, हरहर महादेव..!
संकासूर: पुजा झाली.
नायको: हा झाली..
संकासूर: आता देवानंला निवेद दाकवून झाला की, आपन पाटावरनं ताटावर.. ताटावरनं पाटावर..
नायको: हो..हो..
संकासूर: अहा..हा.. अव्हं.. अव्हं... अवो, पोट फुटून पोटाची कातडी भाह्यर आली..
नायको: एवढं कशा खल्लंव?
संकासूर: ओ नायको
सुत्रधार: बोलावे
संकासूर: जेवून झालं, पर मंतर म्हनयाचा र्हाला..
नायको: हो हो..
म्हण्णी- (प्रार्थना)
संकासूर:
समुद्र ज्यानं दूर घालविला
दैत्यासी त्यानं भडीमार केला
महेंद्र दिसतो भला कसा रं
या भार्गवासी भजतील सारं
संकासूर: ओ नायको,
नायको: बोलावे..
संकासुर: उरलं-सुरलं काय कोन..?
नायको: काय कोन..?
संकासूर: कुतंर.
नायको: कुतरं.
संकासूर: मांजरू..
नायको: मांजरू..
संकासूर: बायलू.
नायको: बायलू..
संकासूर: ओ नायको..
नायको: बोलावे..
संकासूर: लावतां त लावतां.. कुठं मिलते म्हायती हाय काय?
नायको: कुठं?
संकासूर: रत्नागिरंच्या आठवडा बाजारात!
नायको: हा..हा..
संकासूर: ती कशा आनयाची..?
नायको: कशाला?
संकासूर: हं दोगवं वाजवून वाजवून दमलंत ना, तेंच पाय चेपायला.
हु.. हुहु... हु.. हुहु..हुहु..
नायको: आरं इतली कता इंत र्हायली,
म्होरं वरतंमान काय घडलं हाये..रामाहारी।
बतावणीचा अर्थ:
संकासुराचे आगमन होताच त्याने नायकोशी अर्थात नमनातल्या म्हण्णीवाल्याशी संवाद साधायला सुरूवात केली. या संवादात त्याने नायकोला संकासूर कोणी टिकवून ठेवला, आणि तो कोणत्या कारणासाठी टिकवला असे दोन प्रश्न विचारतो. त्याचे मार्मिक उत्तर नायक देतो. हा संकासूर आम्ही (कोकणवासियांनी/खेळ्यांनी) टिकवला आहे, आणि तो मंगलकारणासाठी टिकवला आहे, असे तो सांगतो. त्यानंतर संकासूराने येतायेता पाहिलेली एक गंमत सांगितली. यामध्ये पाड्यावर पाडा.. घोड्यावर घोडा.. आणि बायकोखाली दादला.. ही ती गंमत. (या गंमतीचा अर्थ कदाचित समाजातील घसरलेली नितीमत्ता असा असू शकतो.)
त्यानंतर संकासुराने नायकोकडे दोन नोकरांची मागणी केली. नायकोने त्यांची मजूरी (पगार) मागितली. ती संकासुराने ठरविली. त्यानंतर तो नोकरांकरवी आयाबायांच्या मागीलदारी गेला. तेथून त्याने चिंध्याचोळ्या जमवून आणल्या.
त्या चिंध्याचोळ्या धुवून-चोळून काढल्या. त्यांनतर तो शिंप्याकडे गेला. शिंप्याकडून त्याने दोन भिक्षेच्या झोळ्या तयार करून घेतल्या. त्या झोळ्या घेवून संकासूरासहित दोन्ही नोकर भिक्षा मागण्यासाठी चंबळचे बेट पालथे घालून थेट साष्टीचं बेट पार करून पुण्यात आलेे. संकासूराने आपल्या नोकरांकरवी भिक्षा मागत जवळपास भूप्रदेश पालथा घातला. तो पालथा घातल्यानंतर त्याला जेमतेम (सव्वाशेर तांदळ्या) भिक्षा मिळाली.
त्यानंतर संकासुराने आंघोळ केली. (येथे संकासूर रंगमंचावर आंघोळ केल्याचा अभिनय करतो. या अभिनयात कोणतीच प्रॉपर्टी नसते. तरीही तो अभिनय बेमालुम असतो. अंगावर व्यवस्थित घागरीने पाणी ओततो, ते पाणी ओतल्यानंतर त्याला गार लागणार म्हणून तो थोडा गारठणार. मग अंग चोळणार.. हातपाय चांगले स्वच्छ धुणार.. अंगोळ घाली की आपली वस्त्र स्वच्छ धुणार. हातातली वेठी चांगली मजबूत पिळून भिजलेल्या कपड्यातील पाणी झडकून टाकणार. केस, दाढी सारं व्यवस्थित करणार..)
मग संकासुराने सार्या देवांना एका रोवळीत ठेवले, आणि तो त्यांना आंघोळीसाठी नदीवरील एका डोहात घेवून गेला. तेथे त्यांना देवांना अगदी यथेच्छ आंघोळ घातली.
त्यानंतर त्याने गंध उगाळले. (येथे संकासूर गंध उगाळण्याची क्रिया अतिशय अफलातून करतो. आपले ढुंगण म्हण्णीच्या तालावर गंध उगाळल्याप्रमाणे घासतो, आणि पायांच्या तळव्याने उगाळलेले गंध हातावर पुसून घेतो. ही त्याची क्रिया मोठी मजेशीर! पण नायकोला या कृतीबाबत शंका आल्याने त्याचे जे उत्तर देतो, तेही सुरेख. संकासूर म्हणतो गंध उगाळण्यासाठी धरणी केली सहाण, आणि आकाशाचे केले चंदनाचे खोड, असे हे गंध उगाळले आहे.) त्यानंतर देवादिकांची यथासांग पुजा केली. त्यांना नैवैद्य दाखवला. स्वत:चे भोजन केले. उरलेसुरलेले भोजन कुत्रे, मांजर, आणि बायको यांना दिले, आणि आपला अनोखा पुजाविधी संपविला. येथे ही संकासूराची बतावणी संपली. बतावणी संपल्यानंतर संकासूर जोरदार हुकारा करून निघून जातो.
................................................................................
शब्दार्थ:
1. टांबटिंब वाजणे: संकासुराच्या बाजुला होणार्या मृदुंग नादाला उद्देशून. 2. नायको: नायक, मुख्य, म्हण्णीवाला-सुत्रधार. 3. तैनातनामा मजुरा: कामाची मजुरी. 4. सकसकल: पहाटे. 5. मुकमंडल: तोंड, 6. उकरडी जाणे: घराच्या मागच्या बाजूला जाणे. 7. रजक: धोबी. 8. सुकशां घालयाचा: वाळण्यास घालायच्या. 9. टारटार..टारटार..: शिंप्याने झोळी शिवताना शिलाई मारल्याचा मशिनचा आवाज. 10. काकेमधे द्यावा: काखेत द्याव्या. 11. सातासमुद्रा पल्लातीरा: सातसमुद्रांच्या पलिकडे.
12. बायलू: बायलू म्हणजे बायको! येथे संकासूर चंबळच्या बेटात आमची बायलू (बायको) आहे असे सांगतो. यावरून तो चंबळच्या बेटातील रहिवासी नाही ना..? तिथं त्याचा काही जैविक संबध नाही ना..? असे प्रश्न उपस्थित राहतात.
सातासमुद्रापार पल्लातीरा..
चंबळच्या बेटामध्ये..
फुल्लांच्या झाडामध्ये..
तिथं आमची बायलू!
असे अत्यंत मोजक्या शब्दात हे प्रदेशवर्णन संकासूराने बोलीतून केलं आहे. याबाबतचे प्राथमिक निरसन तिलोरी-संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक, लेखक-कवी अरुण इंगवले (चिपळूण) यांनी महत्वपुर्ण माहिती दिली.
ते म्हणतात, 1. विंध्य पर्वतात जो डाकुंचा प्रदेश आहे, तो चंबळचे खोरे या नावाने ओळखला जातो, पण येथे संकासूर खोरे असा उल्लेख न करता बेट असा उल्लेख करतो आहे. त्यामुळे संकासूर चंबळ खोर्यातील आहे, असे बतावणीवरून म्हणता येत नाही. 2. समुद्राची पातळी दर शंभर वर्षांनी अर्ध्या मिटरने वाढते आहे. दोन तीन हजार वर्षापूर्वी कोकण पट्टीत अशी खूप बेटे होती. त्यापैकी एखाद्या बेटाचे नाव चंबळ होते असेल, जे कधीतरी बुडाले आणि त्याच्यासहित त्याचे नावही बुडाले असावे. 3.कदाचित संकासुराचे राज्य कोकणात असल्याचे पुरावे विष्णू पुराणात मिळतील, अशी आशा आहे..
अरुण इंगवले यांचे हे मुद्दे अंत्यत महत्वाचे आहेत. बेटाच्या उल्लेखाबाबतच्या त्यांच्या मताला संकासुरचं आपल्या बतावणीतून पुष्ठी देतो आहे, कारण तो चंबळच्या बेटाचा जसा उल्लेख करतो, तसाच तो साष्टी जावं.. असाही उल्लेख करतो.
संकासूर: या नोकरांनी साष्टी जावं..
नायको: साष्टी जावं..
संकासूर: पुण्यास जावं..
नायको: पुण्यास जावं..
येथे संकासूर म्हणतो, साष्टी जावं..
यातील साष्टी नावाचं बेट मुंबई उपनगर जिल्हा (महामुंबई) आणि ठाणे जिल्हा यांच्यात प्रशासकीयदृष्ट्या विभागले गेलेले अरबी समुद्रातील एक इतिहास प्रसिद्घ बेट आहे. याबाबत संकलित केलेली माहिती देत आहे...
उत्तरेस वसईची खाडी, दक्षिणेस मुंबई बेट (मुंबई शहर जिल्हा), पश्चिमेस अरबी समुद्र यांनी हे बेट वेढलेले आहे. मुंबई व साष्टी ही बेटे एकमेकांस जोडली गेली आहेत. बेटावरील एका प्राचीन गुहेतील लेखामध्ये ‘साळशेट’ असे याचे नाव आढळते. पोर्तुगीजांनी ते ‘सॅलसेट’ असे केले व पुढे मराठी अंमलात ते ‘साष्टी’ या नावाने प्रचारात आले. वांद्रे, कुर्ला, ठाणे, घाटकोपर, अंधेरी इ. या बेटावरील प्रमुख नगरे होत. बेटाच्या मध्यातून उत्तरेकडून दक्षिणेकडे लहान डोंगररांग पसरली आहे. ती कुर्ल्याजवळ कमी होऊन पुढे तुर्भेजवळ दक्षिणेला दिसून येते.
इसवी सन दुसर्या शतकापासूनचा साष्टीचा इतिहास उपलब्ध आहे. या बेटावरील कान्हेरी (कृष्णगिरी) येथे सापडलेल्या बौद्घ गुहांतील स्तंभांवर आणि स्तंभशीर्षपादांवर लेख आहेत. त्यांवरून साष्टी बेटावर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कारकीर्दीत (इ. स. सु. 173-211) गजसेन आणि गजमित्र या श्रेष्ठींनी लेणी खोदण्यास प्रारंभ केला असावा. ती लेणी खोदण्याचे काम पुढे राष्ट्रकूट वंशातील राजा पहिला अमोघवर्ष (कार. 814-880) याच्या वेळीही सुरू असल्याचे 78 व्या गुहेतील लेखावरून ज्ञात झाले. यावरून साष्टी बेटावर सातवाहन-राष्ट्रकूट राजांची सत्ता होती, असे दिसते. (तसा या बेटाचा इतिहास खूप मोठा आहे.) साष्टी बेटावरील उरलेल्या शेत जमिनीत मुख्य पीक भात असून डोंगर उतारावरील जमीन गवतासाठी संरक्षित आहे. समुद्राच्या काठी नारळ व पाम वृक्षांची वनराई असून मीठ उत्पादन, मासेमारी, भातशेती, हातमाग उद्योग इ. व्यवसाय पूर्वीपासून आहेत.
तर लेखक अरुण इंगवले यांनी दुसर्या साष्टी बेटाची माहिती दिली आहे.
ते म्हणतात, साष्टी नावाचे गोव्याजवळ बेट आहे. साष्टी आणि बार्देश ही गोव्यातील बेटे पोर्तुगीजांच्या ताब्यातून सोडविण्याचा फार मोठा प्रयत्न संभाजी राजेंनी केला, मात्र औरंगजेबाच्या सैन्याने रायगडावर हल्लाबोल केल्याने संभाजी राजांना मोहिम अर्धवट सोडावी लागली, आणि हातातोंडाशी आलेला विजय सोडावा लागला.
संकासूर आणि गोमू (कोळीण)
ऐतिहासिक आणि समृध्द असलेल्या बेटाचा उल्लेख नमन/खेळ्यातील एक दुर्लक्षित पण पौराणिक असलेल्या संकासुराने आपल्या बतावणीतून करून अभ्यासकांसमोर आव्हान निर्माण केले आहे, याचा वेध आपण घेतला. त्याबाबत आणखी काही ठोकताळे..
दशावतारातील कथेत विष्णू पाठीशी लागला म्हणून हयग्रीव नावाचा राक्षस समुद्रातील शंखात लपून बसला, म्हणून तो शंखासूर! अशी संकासूराच्या नावामागची कथा. त्याचा उल्लेख बोलीभाषेत गावात उच्चारताना कधी कधी संकासूर असतो तर कधी शंकासूरही असतो. ही जरी पुराणकथा असली तरी त्यातील संकासुराचे समुद्रात लपणे बरेच काही सांगून जाते.
हयग्रीव ज्याअर्थी समुद्रात लपून बसला, त्याअर्थी समुद्र आणि त्यातील चंबळ, साष्टीसारखी बेटे त्याची वसतीस्थानं असावी. राज्य असावी, आणि ती राज्य/वसतीस्थानं याच कोकणपट्टीत असावी. (अर्थात हे सगळे अंदाज झाले.) जेणेकरून कोकणवासियांना त्याचा लागलेला लळा आजपर्यंत टिकून राहिलेला असावा.
समुद्रावरून आठवण झाली ती, संकासुरासोबत नाचणार्या गोमूची! संकासुराबरोबर स्त्री वेशातील पुरूष नृत्य करत असतो. तिला बर्याचठिकाणी गोमू असे म्हणत असले तरी रत्नागिरीतील काही भागात तिला कोळीण म्हणतात. पुर्वी संकासुरासोबत मोराची पिसे घेवून नाचणारा एक नर्तकही असायचा. त्याला कुचेवाला असे म्हणत. त्याच्या डोक्यावर लहान बाळाच्या डोक्यावर जशी कुची (टोपी) असते, तशीच टोपी या कुचेवाल्याच्या डोक्यावर असते. म्हणून कदाचित त्याला कुचेवाला म्हणत असतील.
आता ही गोमू म्हणजे कोण..? गोमू म्हणजेच कोळीण असेल काय..? मग ही कोळीण म्हणजे आहे तरी कोण..? अशा प्रश्नांचा वेध घेऊया.
गोमू.. ही नमनातलीच गवळणच. व्यावसायिक नमनात संकासूर दिसत नसल्याने गोमू दिसण्याचा प्रश्नच नाही. गोमू सर्र्हास दिसते ती शिमग्याच्या गावभोवनीला. कुणातरी मिसरूड न फुटलेल्या पोर्याला साडी नेसवून तीला गोमू बनवले जाते, आणि संकासुरासोबत नाचवले जाते. आता जसजसा काळ बदलला तशी गोमूही बदलत चालली आहे. मात्र जुन्या पारंपारिक खेळ्यातील गोमू आपली पारंपारिकता टिकवून आहे. (अलिकडे गुहागरी नमन/खेळ्यात अशी जुन्या बाजाची गोमू पहायला मिळते.) साधारणत: कोळी बांधवांच्या कोळी नृत्यातील कोळीण जसा वेश करते, तसाच वेश नमनातल्या पारंपारिक गोमूचा असतो. म्हणजे कमरेला साडी तिचा पदरही कमरेलाचा बांधलेला, अंगात पोलके, त्यावर ओढणी, आणि इतर आभुषणं.. त्यामुळे वेशभुषेनं तरी ही गोमू म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून, ती कोळीणच असावी.
दुसरी गोष्ट. समुद्रावरचा नाखवा हा कोळी असतो. आणि नाखवाची नाखवीन ही गोमू असते. गोमू माहेरला जाते हो नाखवा.. हिच्या घोवाला कोकण दाकवा.. किंवा गोमू संगतीनं माज्या तू येशील काय.. अशी कोळीगीतं आपण ऐकली असतील. यातील गोमू म्हणजे कोळी समाजातील स्त्री, हे तर नक्की.
संकासुराने आपल्या बतावणीत आपल्या बायलूचा अर्थात बायकोचा उल्लेख केला आहे.
उदा:
संकासूर:
चंबळच्या बेटामध्ये..
फुल्लांच्या झाडामध्ये..
तिथं आमची बायलू!
यावरून कोकणची समुद्रपट्टी.. तिथली बेटं.. आणि आजही तिथं हजारो वर्षापासून राहिलेेला मासेमारी करणारा कोळी समाज.. तर संकासुराचे समुद्र-बेटासंदर्भातील उल्लेख.. त्यानं बेटावर आपली बायलू असल्याचे सांगणे आणि त्याच्यासोबत कायम नाचणारी गोमू अर्थात कोळीण.. या सार्यावरून गोमू-कोळीण हीच संकासूराची बायलू असावी, ती या कोकण पट्टीतील बेटावर राहत असावी, अशी शक्यता आहे.
शेवटी, पुन्हा पुन्हा संकासूर हा समुद्र.. समुद्रातील बेटं.. आणि त्याच्यासोबत नाचणारी कोळीण.. अर्थात गोमू..अशा कोकणपट्टीशी निगडित संकल्पनाभोवती पिंगा घालत राहिला आहे. तो खरचं काय सांगतोय..? बतावणीतून काय बोलतोय..? हे जाणण्यासाठी मात्र सखोल अभ्यासाची गरज आहे.
16. सव्वाशेर: वस्तू मोजण्याचे जूने माप. 17. तांदल्या: तांदळाच्या बारिक कण्या. 18. तोंडपसरी: मडके. 19. गादगाद.. गादगाद.. : भाताला कढ आल्याचा आवाज. 20 चोप.. चोप.. चोप..चोप.. : देवांना फटके मारल्याचा आवाज. 21. फुलपरडी: फुलपात्र. 22. सान: गंध उगाळायचा दगडी पाट- सहाण. 23. ख्वाड: चंदनाचे खोड येथे आकाशस्वरूप मानले आहे. 24. घसघसवून टाकणे: घासणे, उगाळणे. 25. पाटावरनं ताटावर.. ताटावरनं पाटावर..: जेवणाची घाई लागणे. 26. पोट फुटून पोटाची कातडी भाह्यर आली: जेवण अति होणे, अडस होणे. 27. लावता तं लावता: या शब्दाचा योग्य अर्थ उमगू शकला नाही. (कदाचित दारू असावी.) 28. हं दोगवं वाजवून वाजवून दमलंत ना... हा उल्लेख संकासुराच्या शेजारी दोघे मृदुुुंगी वाजवत आहेत, त्यांच्यासाठी केला आहे.
....................................................................................
- लेखन/संकलन:
अमोल पालये. मो.9011212984.
This comment has been removed by the author.
ReplyDelete