द्विशतकपुर्तीतला ‘संगमेश्वरी बाज’!

चार-पाच वर्षापूर्वीची गोष्ट असेल.. रत्नागिरी शहरात कोमसापचे साहित्य संमेलन भरले असता, तेथे एका कार्यक्रमात संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक आनंद बोंद्रे गुरूजींनी ‘सध्या मी एक संगमेश्वरी बोलीतले नाटक लिहत असून लवकरच ते तुमच्या भेटीला येईल, आणि ते जोरदार धुमशान घालील..!’ असा प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला होता. सध्याच्या नाटकांची परिस्थिती पाहता बोंद्रे गुरूजींच्या त्या आत्मविश्वासावर मला अविश्वास व्यक्त करणारे हसू आले, पण वर्षभरातच बोंद्रे गुरूजींच्या एकपात्री कार्यक्रमावर आधारित नाटक रंगमंचावर बागडू लागले. गेल्या तीन वर्षात या नाटकाचं बागडणं हे निव्वळ शहरातच नव्हे, रत्नागिरीच्या झापाच्या थेटरातही गुरूजींनी म्हटल्याप्रमाणे धुमशान घालत राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या ‘त्या’ आत्मविश्वासात काय ताकद भरलेली असावी, हे आज ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज..’ चे दोनशेपार प्रयोग पाहिले की दिसून येते. अशा या ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज..’चा द्विशतकपुर्ती सोहळा साजरा होत आहेे, त्यानिमित्त कित्येकवेळा पाहिलेल्या संगमेश्वरी साजचे हे ‘रसग्रहण’..
आजपर्यंत ‘संगमेश्वरी साज’ कित्येकवेळा उभा-आडवा पाहून झाला. सार्‍यानाच तो प्रत्येकवेळा नित्यनवा भासत आला आहे. ‘कोकणचा साज..संगमेश्वरी बाज’ हे पुर्णत: लोककलांचे सादरीकरण नाही, आणि पुर्णंत: नाटकही नाही. ते आहे लोकनाट्य. कोकणासारख्या मातीत हे लोकनाट्य रसिकप्रिय होणे, हे तसे नवलच! या रसिक प्रियतेला कारणीभूत ठरला तो नमन-खेळ्यांनी टाकून दिलेला आणि या लोकनाट्याने स्विकारलेला बोलीभाषेचा गोडवा! सध्याच्या नमन-खेळ्यांना शिष्टाचाराची पुटं इतकी चिकटत चालली आहेत की, शिकलेला खेळा ‘इतली कता इतं र्‍हायली, म्होरं वरतमानं काय घडलं हाये..’ अशी म्हण्णी म्हणण्याऐवजी ‘इथली कथा इथे राहिली, पुढे वर्तमान काय घडले आहे..’ असे म्हणू लागला आहे. अशा परिस्थितीत ‘संगमेश्वरी बाज’मधून अस्खलित ग्रामीण शब्दांचा गोडवा काय आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न जोरदारपणे केला गेला, आणि तोच बोलीभाषेचा साज रसिकप्रिय ठरला. ‘वसाड्या, नरकांड्या, पनवत्या, फटकी आली, पोकल बांबूच फटकं, वलान, घलान, जकनीचा आंबा, झगं, अकरित झो मरनाच्या भायरं बेफाट..’ हे गावातूनही गायब होत असलेले सेक्रेटरीच्या तोंडचे शब्दवैभव पुन्हा एकदा ऐकून गावकर्‍यांनाही हे लोकनाट्य आपले वाटले. ‘प्रभाकर’ नव्हे तर ‘परबाकर..’ हा जो नावाच्या उल्लेखाचा आग्रह आहे, तो खर्‍या चाकरमान्याला आपण गावचे असल्याची आठवण करून देतो. ‘भोकाचं वडं’ आणि ‘केंबरीज् चाय’ ची रेसिपी गावातल्या मंडळींना तशी नवी नाही, पण प्रभाकरच्या रेसिपी सादरीकरणामुळे ते भोकाचे वडे जितके लज्जतदार बनतात नाही, त्याला तोड नाही. (या प्रसंगात पार्श्वसंगीतकार मोरेंचेे विशेष कौतूक! भोकाचे वडे तेलात पडल्यापडल्या ते जे फोडणी देतात ना, ते चुलीजवळ घेवून जातं.)
लग्न सोहळ्यात उखाण्यांना भारी महत्व आहे. हल्ली टिव्ही, सिरीअल्सनीही  हे उखाणे उचलले आहे. पण अस्सल संगमेश्वरी उखाणा काय आणि किती लांबीचा असतो, हे तमाम महिला वर्गांनी जरा संगमेश्वरी साजमध्ये जरूर ऐकावे. ‘भाजीत भाजी मेथीची..’ या उखाण्यापलिकडेही संगमेश्वरी बोलीचे शब्दवैभव किती समृध्द आहे, याचा उलगडा बाजमधील मावशीच्या दिर्घ, पल्लेदार उखाण्यातून होईल. ‘सभापती गणपती नाचतो, पायात घुंगूर वाजतो..’ ही  नमन-खेळ्यातली म्हण्णी मी लहानपणी ऐकली होती. (आताच्या खेळ्यांनी म्हण्णी पेटार्‍यात टाकून दिलेय.) खूप वर्षानंतर प्रथमच ही म्हण्णी, आणि त्यावर हातात सोंग मिरवत दुडदुड नाचणारा गणपती बाजमध्ये पहायला मिळत आहे. सांगायचा मुद्दा हाच की, बाजने कोकणच्या संस्कृतीतून जे जे हरवत चाललं आहे, ते ते कशोशीने शोधण्याचा प्रयत्न केला आहे, आणि पुन्हा एकदा नव्याने त्याच कोकणासमोर आणले आहे.
प्रत्येक बोलीची स्वतंत्र शब्दरचना असते, तशीच तीला एक लय असते. ती लय एकदा मुठीत सापडली की ऐकणारा मंत्रमुग्ध होतो. संगमेश्वरी बाजमध्ये संगमेश्वरी बोलीची ही लय आपल्या खर्जातल्या आवाजाने सेक्रेटरी (सचिन काळे) आणि परभाकर (प्रभाकर डाऊलकाका) यांनी नेमकी पकडली आहे. मृदुंगाला आजपर्यंत ‘धुधुंनाम.. धुधुंनाम..’ हा शब्दप्रयोग ऐकला होता. वाचला होता. पण तात्या गावकर (सुनिल बेंडखळे) यांनी मृदुंगाचा नवा शब्दध्वनी ‘बेदम..बेदम.. बेदम्बेदमनामं..’ हा इतका बेमालूम आणि नेमका शोधून काढला आहेे की, त्या शब्दध्वनीपुढे खरा मृदुंग फिका पडेल.
हा नेमकेपणाच या लोकनाट्याचा मजबूत आधार ठरला आहे. रिअर्सल आणि प्रयोगातील सातत्य यामुळे सादरीकरणात हा नेमकेपणा येत असतो. दोनशेपार प्रयोगानंतर बाजमध्ये हे नेमकेपणाचे गणित उत्तम साधले गेले, आणि म्हणूनच हे लोकनाट्य दिवसेंदिवस विकसित होत गेले. ‘हे असे न करता तसे केले तर..’ याची समज अनेक प्रयोगानंतर येत गेली, आणि त्यानंतर आलेल्या विकसितपणाला ‘सर्वांगसुंदरता’ प्राप्त झाली.
या विकसितपणामुळे ‘बाज’ची मुळ संहिताही कदाचित थोडी मागे पडली असेल. दिवसेंदिवस नवनवं स्विकारता स्विकारता प्रयोगाची लांबीही वाढत जातेय, याचीही भिती वाटून नाईलाजास्तव कटछाटही झाली असेल. मात्र ती कटछाट करणे हा नाईलाजच होता. कारण बोलीभाषेचा गोडवा दाखवणे हा या लोकनाट्याचा हेतू होता खरा, पण त्या हेतूला आधार होता तो कोकणातल्या लोककला, लोकनृत्य, संस्कृती, रुढी-परंपरांचा. हा सारा कोकणचा बाज दोन तासांच्या प्रयोगात सविस्तर दाखवणे हे प्रचंड आव्हानच होते. कारण कोकणातल्या पारंपारिक नमनाचा हिशोब करायचा झाला तर त्याचीच लांबी रात्री दहा वाजता सुरू होते, आणि पहाटे संपते. इतकी ती लांब असायची. त्यामुळे सार्‍या सांस्कृतिक कोकणचे दर्शन घडविणे हे अशक्यच होते. तरीही नमन-खेळे यातली पारंपारिकता आणि आधुनिकता हे दोन्ही पैलू बाजमध्ये कौशल्याने दाखवले जातात. ‘चला की हिरा निरा तारा..जाऊ बाजारा..येईल नंदलाला..उशिर झाला..’ अशा तालावर येणार्‍या पारंपारिक गवळणी आणि ‘ललला..ललला..’ करत येणार्‍या मॉर्डन गौळणी हा फरक दाखवतानाही तात्यांनी नेमकेपणा अचुक शोधला आहे.
बाजमधील तात्या (सुनिल बेंडखळे) यांच्याकडे शाहिरी गायकी भारदस्त आहे, ती या लोकनाट्याला अधिक रंगतदार करून गेली. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे जाकडी, नमनाची ओळख अत्यंत गतीने पण रंगतदारपणे घडत गेली. कोकणात कोणीही कितीही बॅरिस्टर असूदे, गावचा नायक असतो तो गावकरच! उठ म्हटल्यावर उठायचं.. बस म्हटल्यावर बसायचं.. का म्हणून विचारायचं नाही! अशा हुकूमशाही स्वरूपाचे वास्तविक पात्र कोकणातल्या गावकीत गावकराचे असते. गावाचा कारभार हाकण्याच्या जबाबदारीमुळे हा वचक गावकाराने निर्माण केलेला असतो, आणि तो समस्त गावकीनेही मान्य केलेला असतो. बाजमध्ये हा वास्तवातल्या गावकाराचा वचक दिसत नाही. दिसतो तो विनोदात उडून जातो. उदा. तात्या मुंबईकर्‍याला विचारतात, ‘‘तू आलास खयलीकडं..?’ मुंबईकर म्हणतो, ‘कोकणात.’ त्यावर तात्या जे उत्तर देतात ते वास्तवातल्या गावकाराच्या वचक प्रवृतीचे सुचक. मुंबईकराने ‘कोकणात.’ म्हटल्यावर ‘मं इतं आमी सांगू तचं खरं!’ अशा पध्दतीने त्याला दामटवतात. त्यांच्या या विधानावर इतका हास्यकळ्ळोल होतो की, वास्तवातला गावातला गावकर त्यात नाहिसा होतो, आणि मजेशीर, मिस्किल तात्या उभा राहतो. 
अगदीच जुन्या काळातला गावकर शोधून आता दिसणेही कठीण. तो दिसायला उन्हात रापून काळाकभिन्न.. डोक्यापासून सगळे केस पांढरेधोट.. डोक्यावर कायम मळकट गांधी टोपी, कमरेचा लंगोट गोल फिरवून घेतलेला, आकडी-कोयती, अंगावर एखादा टॉवेलवजा पंचा, बाकी उघडाबंब.. कधी सणावारालाच तो पेटीतलं धोतर काढतो. बाजमधला तात्या अजून तरणा आहे. नुकताच तो मुंबईच्या मिलमधून रिटायर होवून गावाकडे आला आहे, आणि त्याने खास बॅटरी आंब्याचा उद्योग सुरू केला आहे. तो जेव्हा पिकलं पान होईल, तेव्हा बाजमध्ये आणखी रंगत येईल.
वास्तवातल्या गावकराचा वचक जर कदाचित बाजमध्ये दिसला असता तर तात्या हिरो न होता संगमेश्वरी बाजचे खलनायक झाले असते. तमाशातील लोकनाट्यात लावणी नृत्यांगना स्त्रीपात्र असते, आणि त्यात खलनायकही असतो. तसा बाज हे लोकनाट्य असूनही त्यात खलनायकही नाही, आणि स्त्रीपात्रही नाही. त्यातूनच नमनातली मावशी आणि गौळण ही दोन सोंगाडी स्त्रीपात्र जमेस धरली तरी खलनायकाचा शोध मात्र अपुर्णच राहतो, आणि खलनायक नसूनही हे लोकनाट्य रंगत राहते, लोकांना भावते हे विशेष.
या विशेषाचे प्रमुख कारण असावे ते म्हणजे गावातल्या लोकांना लाभणारा पुन:प्रत्ययाचा आनंद. लोकनाट्य म्हटले की, त्याला ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक अशी कथा असते. बाजला तशी कथा नाही. कोण्या मुंबैकर्‍याला कोकणचा सांस्कृतिक ठेवा दर्शवणे, इतकाच कथाविषय या लोकनाट्याचा आहे. पण मुंबैकर्‍याला दाखविण्याच्या निमित्ताने जे सांस्कृतिक वैभव दाखवले जाते, ते सारा प्रेक्षक पाहतो. आणि त्यात प्रेक्षकाला पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. हा पुन:प्रत्ययाचा आनंद नेहमीच्या लोककला-लोकसंस्कृती दर्शनापेक्षा वेगळ्या पध्दतीने मिळतो, त्याचे पुन्हा एकदा कारण हेच की, हा आनंद नष्ट होत चाललेल्या बोलीभाषेतून मिळतो. इथल्या संगमेश्वरी बोलीभाषेचा गोडवा बाजमध्ये फणसाच्या गर्‍यासारखा दाटला आहे. हा गोडवा जर त्यातून वेगळा काढला तर त्याचे ‘चारकांड’ होईल. (चारकांड म्हणजे गरे नसलेला भाग. कोकणात नुसती बकबक करीत र्‍हाणार्‍या माणासालाही चारकांड म्हणतात.) त्यामुळे संगमेश्वरी बोली भाषा हेच या लोकनाट्याच्या यशस्वीतेचे मर्म आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
पुन्हा एकदा म्हणण्याचे कारण म्हणजे, बोलीभाषेतून यश संपादन करणारे हे बहुधा दुसरे नाटक असावे. यापुर्वी हा पायंडा ‘वस्त्रहरण’ या मालवणी नाटकाने घातला. वस्त्रहरणला जेष्ठ लेखक पु.ल.देशपांडेचा आशीर्वाद लाभला, आणि पुढे जे घडले ते सार्‍या महाराष्ट्राने पाहिले. ‘संगमेश्वरी’ बाजलाही असाच महाराष्ट्रातल्या जेष्ठ साहित्यिकांचा, नाट्यलेखकांचा आशीर्वाद मिळावा, अशी आशा आजच्या द्विशतकपुर्ती सोहळ्यानिमित्त व्यक्त करतो, आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
संगमेश्वरी बाजचे सारे कलाकार, तंत्रज्ञ यांना पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

-अमोल पालये, रत्नागिरी. 
(प्रस्तूत लेखक संगमेश्वरी बोलीचे नवोदित लेखक आहेत.)

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू