जय देवा साहित्याच्या म्हापुरूषां उबा र्‍हा..

जनसेवा ग्रंथालय, रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित आणि अमोल पालये यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार्‍या साहित्यिक गुढीप्रसंगी घालण्यात येणार्‍या गार्‍हाण्याची पेशकश खास वाचकांसाठी..

जय देवा विवेकसिंधुकर्त्या मुकुंदराजा, महानुभावाच्या चक्रधरा, आळंदीच्या ज्ञानेश्वरा, वारकर्‍यांच्या नामदेवा, चोखा, बंका, गोरा, कान्होपात्रा, जयदेवा भानुदासा, जर्नादना, एकनाथा, रंगनाथा, विष्णुदासा, जय देवा देहुच्या तुकोबा, समर्था रामदासा, मुक्तेश्वरा, पंडिताच्या वामना, जय शिवकल्याणा, रमावल्लभदासा, गोसावी मोरया, मोरोपंता, श्रीधरा, रामजोशी, होनाजीबाळा, जय देशपांड्यांच्या पुरूषोत्तमा, तेंडुलकरांच्या विजया, अत्रेेंच्या प्रल्हादा, जय शिरवाडकर, दांडेकर, माडगुळकर आदी बारावेशीच्या बारागावाच्या बारा साहित्यपुरुषांनो उभे र्‍हावा..
होय म्हाराजा..
तसाच माय मराठीच्या मायमावल्यानों उबे र्‍हावा..
बाय अहिराणी, बाय कोंकणी, बाय कोल्हापूरी, बाय खानदेशी, बाय चंदगडी, बाय चित्पावनी, बाय देहवाली, बाय वारली, नागपुरी, बेलगावी, मालवणी, कुडाली, व्हराडी, संगमेश्वरी, ंभंडारी बोल्यांनुं तुमकां आज व्हया टिकानी हाका मारतंय, तं हाकेला हाक देवनं सामनी उब्या र्‍हावा.. कल्यान करा.. रकक्षण करा.. सांबाल करा गं माय मावल्यांनो..
होय म्हाराजा..
तसाच देवा म्हाराजा साहित्याच्या म्हापुरषा उबा र्‍हा...
आज चैत्र पाडव्याला साहित्याची गुढी करून तुमच्याम्होर गार्‍हाना घालताव हाय ता मान्य करून घे. काय चुकमाक झाली आसलं.. यडावंगाल झाला आसलं. इकडची काडी तिकड झाली आसलं.. सुलट्याचं उलटं झालं आसलं.. तं सगला निस्तरून वडाची फांंदी पिपलाक लावनं.. पाचाचे पंच्चीस करानं..सगल्यांनला साहित्य सेवेच्या आनी वाचनाच्या मारगाला लावा रं देवा म्हाराजा साहित्य पुरूषा..
होय म्हाराजा..
तसाच जय देवा म्हाराजा साहित्यपुरूषा उबा र्‍हा..
जनसेवावाल्यांनी आज साहित्याची गुडी उबी केल्यानी हाय. पुस्तकांशी नाती सांगनारी ही सगली तुजी प्वारा-बाला, मुलामानसा, जनसेवाचं गावकरी, मानकरी, कामकरी आज तुमच्याम्होेर जमलीलं हायतं. लोकानंला शिकून सवरून शानीसुरती करयाचा तेंनी वसा घेतलांनी हाय. उतनार नाय, मातनार नाय.. घेतला वसा टाकनार नाय.. आशी पदराला गाट बांदून आज जनसेवालं साहत्याची, पुस्तकांची, लोकांची शेवा करीत आलीलं हायतं. तेंच्या कारयात तेंनला यास देस.. वाचकांचो आशीरवाद तेंनला भरभरानं मिलानं दे..तेंचा पिरेम तेंनला लाभानं दे.. वाचकांचो आनी तेंचो गोडीगुलाबेंचो सवसार नांदू दे.. इचार, आचारांनी ती सगली मंडली यकत्र नांदान वाचनसंस्कृतीची गुढी गगनात फडकानं दे रं साहित्यपुरषा म्हाराजा...
होय म्हाराजा..
तसाच देवा म्हाराजा साहित्य पुरूषांनो उबे र्‍हावा..
आज व्हयाटिकानी व्हयी साहित्याची गुढी उबी केलीली हाय. साहित्याचा हा तोरानं बांदलीला हाय. पुस्तंकाची पुंजा केलीली हाय.. पुस्तकांची व्हयी सान मांडलीली हाय. या सानंवर उबं र्‍हावनं आज साहित्यपुरषां तुला गाराना घालतावं हाय. देवा म्हाराजा साहित्यपुरूषा, वाचनार्‍याक ढिगबर वाचयाची वानशा देस.. लिवनार्‍याच्या हातात ताकत देस..मनात इस्वास देस.. आनी डोसक्यात आक्कलं देस... बोलनार्‍याच्या तोंडारं सरस्वती नाचानं दे.. लिवनार्‍याच्या लेकनेत साहित्याचो गोडवो दिसानं दे.. इचारांचो तडाको उडानं दे... नाविन्याचो ध्यास लागानं दे.. प्रतिभेची साथ मिलानं दे.. आसा सगला मंगल करून रत्नागिरीच्या साहित्याचो झेंडो जगबर मिरानं दे रं साहित्यपुरषा म्हाराजा..
होय म्हाराजा..

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू