वाडाजूनच्या सड्यावर 30 कातळशिल्पांचा खजिना!


दिवाळीदिवशी वाडाजूनच्या सड्यावर
शोधला 30 कातळशिल्पांचा खजिना!

सडयेच्या तरूणांनी शोधली मानवासह रेड्यांची मोठाली पावलं, गुढ चाव्या, प्राणी आणि मडके

सहभागी तरूण आणि तरूणी.
 

रत्नागिरी : नरकचतुर्दशी म्हणजे पहाटेचे अभ्यंगस्नान, दिवाळी फराळ आणि फटाक्याची आतषबाजी.. हा सारा नेहमीचा रिवाज टाळत सडयेतील तरूणांनी सलग तिसर्‍या वर्षी नरकचतुर्दशी दिवशी कातळशिल्प शोधयात्रा काढली. या शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर थोडाथोडका नव्हे, तर तब्बल तीसेक ठाशीव, सुस्पष्ठ कातळशिल्पांचा समुह आढळून आला. छोटी, मध्यम आणि मोठाली अशी एकूण 10 रेड्यांची पावलं या ठिकाणी आढळून आली आहेत. 10 मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर 2 मोठाल्या चाव्याकृती आकृत्या, 2 प्राणी, 1 मडके अशी 30 चित्रे प्रथमच आढळली आहेत.
सडयेतील तरूण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढत असतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गुढकथांनी  प्रसिध्द असलेल्या ठिकाणी गेली होती. बारा रेड्यांची जोतं आणि बारा माणसांच्या दुर्घटनेच्या कथित दुर्घटनेठिकाणी जावून या तरूणांनी सर्व अंधश्रध्दांना मुठमाती देण्याचा प्रयत्न या यात्रेनिमित्त केला.
या पदयात्रेद्वारे सडे-कातळ धुंडाळून त्यावरील पाण्याचे स्त्रोत, प्राचीन देवस्थाने, देवराया, पाण्याची टाकी, बारव, कातळशिल्पे, घाट्या, सड्यावरील जीवसृष्टी, रानटी झाडे आणि त्यांचे औषधी उपयोग आदी.ची माहिती सडयेतील तरूण-तरूणी, विद्यार्थी एकत्रितरित्या बुजुर्गांच्या मदतीने घेत असतात. सडयेतील शालेय विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे भावी पिढीला निसर्गवाचन होते. परिसर-भूगोलाची माहिती मिळते. इतिहास-संस्कृती याविषयी ज्ञान मिळते. गेली दोन वर्षे काढलेल्या पदयात्रेत सडयेच्या सड्यावरील कातळशिल्पे शोधून त्यांचे संवर्धन प्रयत्न करण्यात आले आहेत. याशिवाय टाकी, बारव उजेडात आणण्याचे काम केले आहे.
यावर्षीची पदयात्राही अशीच वैशिष्ठपूर्ण ठरली आहे. सकाळी 9 वा. सडये देवस्थान येथून ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी या शोधयात्रेचे संस्थापक सदस्य आणि वाटाडेे म्हणून काम पाहणारे स्व.सुरेश उर्फ आप्पा धुमक यांना श्रध्दाजंली वाहून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली.

 

रेड्यांची ठाशीव पावले.
ओघवती माहिती
यावर्षीच्या पदयात्रेचे मार्गदर्शन सडये-पिरंदवणे-वाडाजून परिसराची इत्यंभूत माहिती असणारे रानमाणूस श्री.आत्माराम धुमक यांनी केले. रानवाटा, गावांच्या सीमारेषा, जमीन मोजणीच्या जुन्या ऐरणी, रानटी औषधी झाडे आणि त्यांचे उपयोग, प्राचीन बांधीव घाट्या, कातळशिल्पे आणि त्यामागच्या दंतकथा याबाबत सार्‍या प्रवासात ओघवती माहिती दिली.

 

कातळावर पाणीस्त्रोताजवळ फुललेली कमळे.
 

रानकमळांची बाग
विस्तीर्ण पसरलेल्या आणि रणरणत्या उन्हात तापलेल्या कातळावर एकेठिकाणी पांढर्‍याशुभ्र रानकमळांची सुरेख बागही द़ृष्टीपथास आली. 

 

 

8 किमीची पदयात्रा
कातळशिल्प प्रवासाला सुरूवात करताना वाडाजून या गावची भव्य घाटी लागली. गर्द झाडीच्या छायेतून पदयात्रेने कातळावर प्रवेश केला. वाडाजून या गावापासून सुमारे 8 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विस्तीर्ण कातळावर आत्माराम धुमक यांनी कातळशिल्पांचा समुह दाखविला तेव्हा सारे यात्रेकरू अक्षरश: अचंबित झाले. अत्यंत सुबक, ठाशीव, सुस्पष्ठ अशा अनेक आकृत्या एकाच ठिकाणी पाहून सारे कुतूहलात दडले. काही आकृत्यांचा अर्थबोध होत होता, तर काही गुढ होत्या. 

रेड्याचे 8 फुटांचे पाऊल.
अद्भूत रेडेबावलं
यावेळी बोलताना आत्माराम धुमक म्हणाले की, या जागेला ‘रेडेबावलं’ असे म्हणतात. या कातळशिल्पांच्या शेजारीच एक शेतजमीन आहे. या शेतजमीनीत मोठ्या प्रमाणात नाचणी, वरी, भातशेतीचे उत्पादन पुर्वी घेतले जाई, मात्र प्राचीन काळी एकेवर्षी लावणी करत असताना केलेल्या चिखलात बारा रेड्यांची जोते, बारा नांगर्‍यांसह रुतली, आणि गतप्राण झाली, आणि तेव्हापासून या जागेला गुढ वलय निर्माण झाले. म्हणून या जागेला रेडेबावलं म्हणतात.

रेडयांची मोठाली पावलं
या कातळशिल्पांचे निरीक्षण करता याठिकाणी रेडे किंवा घोडा यांच्या पायांचे ठसे कोरलेले दिसून आले. काही ठसे हे छोटे, काही मध्यम तर काही मोठाले कोरलेले आहेत. मोठाल्या पावलांची लांबी 8 फूट, आणि रुंदी 6 फूट इतकी आढळून आली. अशी दहा पावले सुस्थितीत दिसून आली. एका पावलाशेजारी ‘भाला’ या शस्त्राची आकृतीही कोरलेली दिसून आली. याशिवाय मानवाची पावलंही आढळून आली आहेत. मानवी पावलांची संख्याही 10 आहे. ती चांगली खोलगट असून, काही ठिकाणी जोडपावलं, तर काहीठिकाणी चालीची पावलं रेखाटलेली आहेत. या सार्‍या पावलांची दिशा ही पश्चिमेकडे जाताना दिसत आहे. 

तीन लंबाकृती प्राणी
याशिवाय तीन प्राणीही चितारलेले आहेत. तिन्हीही प्राणी लंबाकृती आहेत. एकाचे तोंड निमुळते आहे. त्यांच्या डोळ्यांची खोबणी खोलगट आहे. एक प्राणी विमानाच्या आकृतीसारखा आहे. एक माशासारखा प्राणी आहे. एक शंखाकृती आकृतीही आहे. एक मडकेही चितारलेले आहे. 

गुढ चावीकृती आकृत्या
या सार्‍या आकृत्यांमध्ये दोन आकृत्या या ‘चावी’ आकाराच्या आहेत. दोन्ही चाव्या मोठाल्या आहेत. चावीचा पुढील काडीचा लांब भाग 6 फूट लांब आहे. चावीचा मागील भाग आयताकृती आहे. हा आयतही 6 फूट लांब आणि 4 फूट रुंद आहे. या आयताच्या मध्यभागी 2 चौकोन असून त्यामध्येही काही आकृतीबंध काढण्यात आलेले आहेत. अशी एकूण 30 चित्रे दृष्टीपथात आली, प्रत्यक्षात त्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता दाट आहे. काही ठिकाणी गवत रुजल्यामुळे ती झाकली गेली आहेत, मात्र काही ठिकाणी त्यांची सुस्पष्ठता, सुबकता आणि रेखीवपणा नजरेत भरण्यासारखा आहे.

 

रानमानसाचा सन्मान
पदयात्रेत सहभागी झालेल्या तरूणांनी सुरूवातीला सर्व रेखाचित्रांची स्वच्छता केली. त्यानंतर काही अस्पष्ठ होणार्‍या चित्रांचे रंगाने रेखाकंन केले.  त्यानंतर या चित्रांचे निरीक्षण करून चित्राकृतींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. रेड्यांच्या पावलांची चित्रे म्हणूनही कदाचित या परिसराला ‘रेडेबाऊल’ असे नाव पडले असेल, असाही तर्क तरूणांनी व्यक्त केला. पदयात्रेच्या शेवटी पदयात्रेतील संस्थापक सदस्य श्री.अनंत धुमक यांनी रानमाणूस वाटाडे श्री.आत्माराम धुमक यांचा श्रीफळ, वस्त्र देऊन सन्मान केला, व सहकार्याबद्दल धन्यवाद मानले.
पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे संकल्पक अमोल पालये, मारूती धुमक आणि अनंत धुमक यांनी मेहनत घेतली. पदयात्रेत सुरज माने, निखिल पालये, रोशनी पालये, तेजस्विनी पालये, वेदिका तांबे, तनिष्क लोखंडे, आत्माराम धुमक आदी. सहभागी झाले होते.

ग्रामपंचायतीला साकडे
या कातळशिल्पांची ओळख सर्वदूर व्हावी, यासाठी कातळशिल्प शोधयात्रा पदयात्रींनी सडये-पिरंदवणे-वाडाजून गु्रप ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले आहे. कातळशिल्पांचे संवर्धन व्हावे, त्याठिकाणी संरक्षक कठडे बांधावेत, मुख्य मार्गावर फलक लावण्यात यावे, अशा मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
















Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू