रावण चाले... धरतरी हाले...!

 

टाळ-मृदुंगाच्या साथीनं लयदार म्हण्णीत मंतरलेली रात्र संपून पहाट व्हायला आलेली... तरीही जागचं कुणी हललेलं नाही. बारीक पोरं मांडवात टाकलेल्या चटया, गोणपाटावर आडवी-तिडवी पडलेली.. रात्री जेवल्या-खावल्यानंतर ठाण मांडून बसलेल्या बाया-बापड्यांच्याही आता डोळ्यांवर झाक आलेली... तरीही कुणालाही उठावं, घरी जावं असं वाटत नाही.. इतक्यात अचानक ढोल-ताशे वाजू लागतात.. रंगमंचावरून ‘रावण चाले.. धरतरी हाले..’ अशी रणदुदुंभी गर्जू लागते. क्षणात भर मांडवात गोंधळ उठतो.  सारी बाया-बापडी ताशांच्या आवाजाने सावध होतात. आपल्या पोरां-बाळांना हलवून-डोलवून ‘‘आरं ए, उटा.. उटा.. रावन आला..!’’ अशी  हाकाटी मारतात, ...आणि ‘रावण आला..’ हा शब्द कानी पडताच, अख्खा मांडव ‘याजसाठी केला होता अट्टाहास...’ प्रमाणे दुसर्‍या क्षणाला जागा होतो. पटापटा सारी पोरं उठून बसतात... रावणाच्या वाटेचा वेध घेतात... प्रेक्षकांच्या खूप मागून कुठूनतरी ढोल-ताशे वाजत असतात. त्यांच्यासमोर आगीचे बोतेवाले, तलवारी फिरविणारे आणि जल्लोष करणारे खेळे असा शाही लंकापती रावण सीता स्वयंवरासाठी जनकराजाच्या दरबारात येत असतो.. लगेच बाया-बापडी रावणाच्या वाटेतली अंथरूंण बाजूला करतात.. लंकेचा राजा तो.. त्याला वाट नको द्यायला..? तो जसाजसा जवळ येतो, तसतसा सार्‍या प्रजाजनाचा उर अक्षरश: भरून येतो, आणि सारा प्रेक्षक त्या लंकाधीशाला जणू मानवंदना देण्यासाठीच उभा राहतो..
कोकणातल्या नमनातल्या रावणाचा हा शाही आगमनसोहळा काल आणि आजही जबरदस्त रोमहर्षक, उत्कंठावर्धक असाच आहे. प्रेक्षकांचं या रावणावर जीवापाड प्रेम आहे. नुसतंच प्रेम नाही, तर श्रध्दाही आहे. नाहीतर कोण पहाटे येणारा रावण येईपर्यंत त्याला पहायला थांबलं असतं. आमच्याकडची एक म्हातारी, तर रावण संपल्याशिवाय उठायचीच नाही. ते तीला फार पाप केल्यासारखं वाटायचं. इतकी तिची रावणावर श्रध्दा.. हे म्हातारीचं उदाहरण. लहानग्या पोराचंही तसंच. त्यानांही झोप ती येणारच, पण ‘रावण आला..’ म्हटल्यावर टुनकण उभी राहणार.. लोकांना ‘आक्रमक नेता’ आवडत असतो, आक्रमक नेताच लोकांना हिरो वाटतो. रावणाच्या लोकप्रियतेचं गमक तेच असावं. अख्ख्या नमनातलं सर्वात आक्रमक सोंग कोणतं असेल, तर ते रावणाचं. अलिकडे रत्नागिरी जिल्ह्यात रावण नृत्याच्या स्पर्धा होऊ लागल्यात, इतकं हे रावणाचं वलय वाढतंय.
नमनातला रावण कोणत्याही गावाचा असो, तो जबरदस्तच असतो. त्याचं कारण अभिनय, खणखणीत आवाज आदी. आहेच, पण सोबत रावणाचं सोंग डोक्यावर चढवल्यावर येणार भारावलेपण हेही आहे. बर्‍याचदा संध्याकाळी झेपा टाकणारा कलाकार पाहून हा रात्री रावण नाचवणार कसा..? असा प्रश्न पडणारं चित्र पहायला मिळतं, पण रावणाचं सोंग कलाकाराच्या डोक्यावर चढलं, आणि त्याने झेप खाल्ली, किंवा तो ढेपाळला, असं कधी झालं नाही... हेच ते भारावलेपण. हे भारावलेपण उतरण्याचा क्षण घाबरविणारा. कलाकाराच्या डोक्यावर रावण असेपर्यंतच कोकणात रावणाचं भारावलेपण दिसतं, सोंग एकदा उतरलं की, तो कलाकार हतबल होतो. यालाच रत्नागिरीत ‘रावण लागला’ असे म्हणतात. यासाठीच भूमिका संपल्यावर रावणाच्या अंगावरून नारळ काढावा लागतो. स्वत: रावणाला आणि प्रेक्षकालाही ‘भारावून’ टाकणार्‍या लंकाधीश रावणाचं आणि रामायणातल्या खलनायकाचं कोकणातल्या नमन-खेळ्यात काय स्थान आहे, याचीच ही कथा..
 

कला आणि नृत्य
नमन-खेळे ही जरी एकत्रित संकल्पना गृहित धरली जात असली, तरी त्यात बराच फरक आहे. नमन म्हणजे ज्यात गणनाट्य आहे, बतावणीतले संवाद आहेत, गवळण आहे, कंसवध आहे, वगनाट्यातले राक्षस, जादुगार, देव-देवता आहेत, आणि फार्सा आहे. म्हणजे नृत्य, गीत, संवाद, नाट्य असा चौफेर सादरीकरणाचा संगम आहे. त्यामुळे नमनाचं वर्गीकरण हे लोकनृत्यात न होता, ते लोककलेत होतं. नमनात नाचणार्‍या कलाकारांना खेळे म्हणतात. या खेळ्यांचा खेळ म्हणजेच नमन. पण हे खेळे जेव्हा शिमगोत्सवात गावभोवनीला बाहेर पडतात, तेव्हा सादर होणार्‍या कलेत फक्त गाणी आणि नृत्य यांचाच समावेश असतो, त्यात संवाद नसतात, की युध्दनाट्य. त्यात टिपर्‍याचाही समावेश असतो, त्यामुळे त्यांची ओळख ही टिपरी खेळे अशी होते. त्यामुळे शिमग्याचे खेळे हे लोकनृत्यातच येतात.


नमन एक विधीनाट्य
दुसरं असं की, नमन-खेळे ही जरी लोककला असली, तरी ते खरेतर एक विधीनाट्य आहे. आपण लग्नानंतर सत्यनारायण घालतो. पुजा करतो, आरती करतो. आता आरती ही एक विधी झाली. तसंच नमनाचं आहे. रत्नागिरीच्या खलाटी-वलाटीला शिमग्यात देवाची पालखी उठण्याआधी मृदुंगावर फिरत्या खेळ्यांची ‘थाप’ पडल्याशिवाय म्हणजेच खेळे नाचल्याशिवाय पालखी सहाणेवरून उठणार नाही, आणि सानेवर गावकीचं नमान झाल्याशिवाय देवाचं रुपं उतरणार नाही. इतकी ही लोककला गावोगावच्या धार्मिक विधींशी बांधून ठेवलेली आहे. इतकंच काय, वैयक्तिक जीवनातही हाच नियम लागू आहे. एखाद्याचं लग्न झालं तर ‘लग्नाची आरत’ म्हणजे लग्नाचे खेळे नाचवावे लागतात. खेळ्यांचा नारळ, विडा, साखर, चहा-पावडर, तांदुळ.. असा बराच सामग्रीचा मान-पान खेळ्यांना द्यावा लागतो.


खलनायकही श्रध्देय
...असे हे नमन एक विधीनाट्य असल्याने साहजिक नमनात काम करणारे खेळे-कलाकार यांनाही सादरीकरण काळापुरते का होईना, देवत्व प्राप्त होतं, अशी जनमानसाची श्रध्दा आहे. मग ते देवत्व अनार्य राजा संकासूर, आणि रामायणाचा खलनायक रावण यालाही चुकवलेलं नाही. नमनात संकासुराचा उल्लेख ‘संकासुरा रे महावीरा’ असाच केला आहे. संकासुराला तर नवसही बोलले जातात. ते नवस पुर्ण झाल्यानंतर कमरेचे चाळ, संकासुराला जेवण, संकासुराला ड्रेस अशी सामग्री नवसपुर्ती म्हणून दिली जाते. सांगायचा मुद्दा इतकाच की, कोकणात नमन-खेळे ही केवळ लोककला नाही, तर ते एक सालाबादी विधीनाट्यही आहे.


रावणाचं वलय
अलिकडे रत्नागिरीत व्यावसायिक नमन मंडळांची संख्या खूप वाढली आहे. त्यातून पारंपारिकतेला मोठा धक्का बसतोय. पण पारंपारिक नमनातल्या रावणाचं वलय आजही टिकून आहे. हल्ली आयोजक मंडळवाल्यांना तुम्ही रावण नाचवणार ना..? असं आवर्जून विचारतात. बर्‍याचदा होतं काय, गावकीअंतर्गत नसलेल्या मंडळांना नमन हे विधीनाट्य असल्यामुळे रावणासारखी ‘मानाची सोंगं’ नाचविण्याची मुभा मिळणे कठीण जाते, मग व्यावसायिकवाले अशी सोंग नमनात न नाचविताच आपला प्रयोग वेगळ्याप्रकारे रंगवितात. मात्र प्रेक्षक हुशार असतो, तो रावणाचीच मागणी करतो. रावणाशिवाय नमन म्हणजे, मिठाशिवाय जेवण.. व्यावसायिक नमनात इतका सारा डामडौल दाखवला, सीन्स दाखवले, पण रावणच नाय दाखविला. हे म्हणजे, लाखाचा बंगला, लाखाची गाडी, पण पायात नाय चप्पल उपेग काय..? तसं झालं. नमनात रावण नसेल, तर चरफडणारा प्रेक्षक फक्त कोकणातच. रावणाचं इतकं मजबूत स्थान नमनात आणि प्रेक्षकांच्या ह्दयात आहे. 


नमनात रावणाचं कुटुंब
नमनात पाच सोंग मानाची मानली जातात. पारंपारिक नमन-खेळात ती नाचवावीच लागतात. यात पहिलं मानाचं सोंग संकासुराचं, दुसरं गणपतीचं, तिसरं नटव्याचं, चवथं रणवीराचं, आणि पाचवं लंकाधीश रावणाचं. यात रंभो (रणबावली), शुर्पनखा, हातघोडे, वाघ अशा दोन नंबर मानाच्या सोंगाचा समावेश असतो. यातील शुर्पनखा ही रावणाची बहिणच आहे. तर रंभो ही तर रावणकुळातील त्राटिकांसम लढवय्यी स्त्री आहे. काही जुने खेळे ती रावणपत्नी मंदोदरीही असल्याचे सांगतात. तीला ‘रणबावली’ म्हणतात. रण अधिक बावली म्हणजे म्हणजे युध्दातील विरांगणा असा त्याचा अर्थ आहे. याशिवाय त्राटिकाही येते. ती रावण कुळातीलच. नमनात तीला ‘रावणाची बहिण’च बोलतात. सांगायचा मुद्दा हाच की, नमनात रावणचं काय, रावण कुटुंबियालाही मोठं मानाचं स्थान आहे.


रावण एकटाच उतरार्धात
..असं म्हणतात, वाघ एकटा येतो. नमनातल्या मानाच्या सोंगात सगळ्यात आक्रमक कोण असेल, तर तो रावण. तो एकटा येतो. संकासूर, गणपती, नटवा, रणवीर ही चार सोंगं नमनातल्या पुर्वांधात येतात. तर रावण उतरार्धांत सर्वात शेवटी येतो, पण शेवटी येऊनही तोच भाव खावून जातो. रावणाचं हे राजेपण जपलं जातं. तो फिरत्या, गावभोवनीच्या खेळ्यात नाचायला नसतो. कदाचित यामागे रावणाचं सोंग जड असल्याचे कारण असू शकेल. दुसरं म्हणजे शिमगोत्सवातील फिरत्या खेळ्याचा प्रयोग नाट्यात्मक नसतो. ते फक्त नृत्य असतं. संकासूर, गोमू, गणपती अशी नृत्यात्मक सोंगे आहेत. रावणाचे तसे नाही. सीता स्वयंवर घडविणारे, नाट्यात्मक प्रसंगातील सोंग आहे, त्यामुळे फिरत्या खेळ्यात रावण नसावा.


रावणाची फळी
नमन-खेळ्यातील सर्वात जड सोंग असेल ते रावणाचेच. त्याला ‘रावणाची फळी’ असेही म्हणतात. एका आडव्या फळीवर मध्यभागी कलाकाराचा मुकुट, आणि डाव्या-उजव्या बाजूला चार-चार रावणाची मुखे. असा प्रत्यक्षात नऊ तोंडाचाच रावण असतो. हेही कदाचित बॅलन्ससाठी असू शकेल. अलिकडच्या फायबर मुखवट्यामध्ये मात्र दहा तोंडे साकारलेली दिसून येतात. लाकडी सोंग हे पुर्णत: भरीव असते. त्यामुळे ते सर्वात जड. त्यात ते आडवे डोक्यावर ठेवायचे, आणि नाचवायचे. म्हणजे तोल सांभाळणे ही मोठी कसरत. यासाठी तेे व्यवस्थित बांधावे लागते. रावण डोक्यात घालण्याआधी डोक्याला मुंडासं बांधावं लागतं. मग त्यावर मुखवटा, नाहीतर तुमच्या डोक्याचे भजे झाले समजा. मुंडाश्यामुळे सोंग व्यवस्थित फिट्टं बसतं. शिवाय फळीला दोन दोर्‍या बांधून त्या काखेतून ताणून घ्याव्या लागतात, म्हणजे नाचताना सोंगाला दोन्ही बाजूनी ताणा मिळाल्याने तोल जाण्याचा धोका टळतो.


बारावं नमन रावणाला
रावणाचं आकर्षण सार्‍यांनाच. अगदी अभ्यासकांनाही. रामायणाचा खलनायक असूनही नमनासारख्या विधीनाट्यात रावणाचे स्थान कसे काय..? असा अत्यंत सहज प्रश्न अनेकांना पडतो. मुळात नमन-खेळे ही लोककला मौखिक. या लोककलेचा कोणतंही साहित्य हे लिखित नाही. त्यामुळे हे मौखिक साहित्य अभ्यासणं, आणि जाणकारांकडून माहिती घेणं, या दोन संशोधन पध्दतीनेच नमनासारख्या विधीनाट्यात रावणाचे स्थान कसे काय.. या प्रश्नाच्या उतराकडे जाता येईल. रामायण ही राम नावाच्या राजाची कथा आहे. राम-रावण युध्दात रामाचा विजय झाला. इतिहास जेत्याच्या बाजूने लिहला जातो, त्याचप्रमाणे राम या राजाचे श्रेष्ठत्व अधोरेखित करताना रावणाला खलनायकत्व प्राप्त होणे साहजिक होते.
नमनात मात्र रावणाचे हे खलनायकत्व थोडे बाजूला ठेवले गेल्याचे दिसते. त्याचे महत्वाचे कारण असे की, नमनात त्याला गायलेले नमन. नमन-खेळ्यांची सुरूवात ही बारा/सोळा नमनाने होते. यातील बारावे नमन हे ‘हो बारावं नम्मानं हो.. दशमुकी रावना’ किंवा ‘सकासुरा रावना’ असे गायले जाते. प्रस्थापित देवतांना टाळून नमनात अनार्य राजांना गायलेलंं नमन हे विशेष आहे. बारा नमनात धरतीमाता आहे. गणपती आहे. ग्रामदेवता आहेत. शंकराचे काशीखंड, अष्टभैरव, मंडपी दिवा.. अशी आगळी-वेगळी नमनं आहेत.


रावण: विद्ववान ते शिवभक्त
पुराणकथांनुसार रावण हा अतिशय विद्वान असल्याचे नमुद आहे. त्याचे आजोबा सप्तर्षीपैकी पुल्यस्य ऋषी. या पुलस्य ऋषींचा पुत्र विश्रवा ऋषी यांच्यासोबत राक्षस कुळातील कैकसी हिचे लग्न झाले. दोन वेगवेगळ्या संस्कृतींमधला हा विवाह होता. विश्रवा हे जसे ऋषी होते, तशीच कैकसी ही शिवभक्त होती, हेही ‘गोकर्ण शिवलिंग’ या कथेत पहायला मिळते. त्यामुळे घरातले चांगलेच संस्कार रावणावर झाल्याचे त्यांच्या चरित्रावरून पहायला मिळते. रावणही महान शिवभक्त होता, हे कित्येक कथांवरून स्पष्ठ होेते. स्वत:च्या मातेसाठी त्याने शिवाचे आत्मलिंग आणण्याचा प्रयत्न केला. या शिवभक्तीसोबत त्याची मातृभक्तीही दिसून येते. रावण वेदांचा जाणकार होता. तो सामवेदामध्ये निपूण होता. त्याने विपुल ग्रंथसंपदा लिहली. त्याने शिवतांडव निर्मिती केली. त्याने युध्दीषा तंत्र, प्रकुठा, कामधेनू आदीसारखी ग्रंथसंपदा लिहली. त्याने आयुर्वेदावर ‘अर्कशास्त्र’ लिहलं. रावणानं विविध प्रकारचा ‘भात’ बनविण्याचे तंत्र विकसित केले. रावण कवीही होता. त्याची ‘शिवतांडव’ ही काव्यरचना ऐकून शिवही प्रसन्न झाला होता. त्याला संगीताची विशेष आवड होती. रुद्रविणेत तो पारंगत होता. चार वेद, वेदांगे याचे त्याला सखोल ज्ञान होते. असा रावण रामायणात खलनायक होतो, तो इतिहास जेत्याच्या बाजूने लिहल्यामुळेच.. खलनायकसंदर्भात राहता राहिला प्रश्न त्याने केलेल्या अत्याचारा संबधित कथांचा. पण तशा कथा इद्रांदीसारख्या प्रस्थापित देवतांच्याही आहेत.
रावणावर लावलेला सर्वात मोठा आरोप म्हणजे त्याने दुसर्‍याची अर्थात रामाच्या पत्नीचं त्याने केलेलं सीताहरण. त्याने जर सीताहरण केले नसते, तर त्याचा मृत्यू झाला नसता, असेही म्हटले जाते. पण नमनातील रावण आणि अद्भूत रामायणातील कथा याही आरोपाला कलाटणी देतात. त्यासाठी नमनातील रावण समजून घेणं गरजेचं आहे. प्रचलित रामकथेनुसार इतकंच माहित असतं की, सीता ही जनकाची मुलगी होती. जनकाने स्वयंवर मांडला. त्या स्वयंवरात लंकाधीश रावणाला शिवधनुष्य उचलता आलं नाही. त्याची फजिती झाली, आणि तो अपमानित होवून ‘एक ना एक दिवस सीतेला पळवून नेईन, तरच नावाचा रावण..!’ अशी प्रतिज्ञा करून निघून गेला. पुढे काही काळाने सीता वनवासात असताना रावणांन गोसाव्याचे रुप घेऊन सीताहरण केलं... ही कथा आपणांस माहित असते..
सीता ही जनक राजाची पोटची कन्या नव्हे, याबाबतची कथाही आपणांस माहित असते. जनक राजाला ती रानात, शेतात आढळली. तीचा त्याने संभाळ केला. पण ती खुद्द लंकापती रावण आणि मंदोदरीची कन्या होती.. हे जर तुम्हाला कोणी सांगितले तर..? तर ते खरे वाटणार नाही, मात्र ‘अद्भूत रामायणातील कथा’ आणि नमनातील रावण हेच सांगतोय, ‘सीता ही माझ्या पोटची कन्या आहे..., आणि सीतेला लंकेचं अर्ध राज्य देऊन तीचं कन्यादान करायचं आहे..’ हे सारं ऐकूनच खूप अचंबित व्हायला लावणारं आहे, पण नमनातला रावण हेच आपल्या बतावणीतून बोलतोय. सुरूवातीला सीता ही जनक नव्हे, तर रावणाची मुलगी होती, असं जे अद्भूत रामायणातील दोन कथा सांगत आहेत, त्या सारांशाने पाहू...


अद्भूत रामायणाची कथा
अद्भूत रामायणानुसार, जेव्हा लंकापती रावण त्रेतायुगातील तीन जगाच्या स्वामित्वासाठी ध्यानधारण करत होता. तेव्हा त्याच्या तपस्येमुळे सर्व देवतांना त्रास होऊ लागला. ते सारे देव ब्रम्हदेवाकडे गेले. तेव्हा ब्रम्हदेवाने रावणाला अमरत्वाचे वरदान दिले. त्यानंतर रावण सारी क्षेत्रं जिंकू लागला. यज्ञ संस्कृतीला विरोध करू लागला. यातूनच त्याने गुत्समद ऋषींच्या आश्रमातील अभिमंत्रित दुधाचं कमंडळू पळविलं, आणि ते लंकेत आणून ठेवलं. एकदा रावण युध्दस्वार्‍यांमध्ये रमला असता रावण पत्नी मंदोदरीने त्या कमंडळूतील अभिमंत्रित द्रव्य पिऊन टाकलं, त्यामुळे तीला गर्भधारणा झाली. हे तीला उमगताच तीला या गोष्टीची फार भिती वाटली. कारण त्यावेळी रावण तीच्याजवळ नव्हता. अशा परिस्थितीत जर आपल्याला मूल झाले, तर राजवाड्यातील स्त्रिया आपल्या चारित्र्याबद्दल वाईट बोलतील. राज्यात आपली चेष्टा होईल, या भीतीने राणी मंदोदरी पुष्पक विमानाने कुरूक्षेत्रात आली. तिथेच तीने एका मुलीला जन्म दिला, आणि एका कलशात ठेवून ती तेथून निघून गेली. तीने मुलीला जिथं सोडलं, तो प्रदेश मिथीला प्रांताचा राजा जनक याचा होता. तो त्या प्रदेशाततून मार्गक्रमण करत असताना मुलीच्या रडण्याच्या आवाजाने तो स्तब्ध झाला, तेव्हा त्याला कलशातील मुलगी दृष्टीस पडली. पुढे त्याने त्या मुलीचे संगोपन केले. तीचे नाव सीता ठेवले, जनक राजाची कन्या म्हणून ती जानकी असेही तीला ओळखू लागले.


सीता रावणाची कन्या
दुसरी कथा असे सांगते की, रावणाने कुबेराकडून लंका जिंकून घेतली. तो लंकाधीश झाला. राज्यकारभाराची सुरूवात झाली, आणि भविष्यवेत्त्यांनी, ‘तुला होणारं पहिलं अपत्य तुझ्या लंकेच्या विनाशास कारण होईल..’, अशी भविष्यवाणी केली. रावणाला या भविष्यवाणीवर विश्वास नव्हता, पण रावणाचा मामा मारिच ही भविष्यवाणी ऐकून हादरला. एवढे कष्टाने मिळविलेलं राज्य एका अपत्यापायी जाणार, असे वाटून तो चिंतेत पडला. पण रावणाने त्याची समजूत काढली.
मंदोदरीला यथावकाश पहिली मुलगी झाली. यावेळी भविष्यवेत्यांचे ते भविष्य आठवून या मुलीला त्वरीत मारून टाकावे, असे मामा मारिचने रावणाला सुचविले. पण रावण मामावरच उसळला. त्याने असे कदापि होणार नाही, असे ठामपणे सांगितले. (म्हणजे पहिली स्त्री भ्रूणहत्या रावणानं रोखली म्हणायची..) या प्रकारामुळेे रावण सावध झाला. तो कुठेही गेला तरी त्या मुलीला सोबत घेऊ जाऊ लागला. एकदा तो मध्यभारतात मामा मारिचसोबत युध्दासाठी गेला होता. सोबत अर्थातच त्याची मुलगी होती. तीचे रक्षण करण्याची जबाबदारी मामा मारिचवर सोपवून रावण युध्दातील आघाडीवर गेला. मामा मारिच याच संधीची वाट पाहत होता. त्याने तीला मारण्याचा विचार केला, पण त्या कोवळ्या जीवाकडे पाहून त्याचेही धैर्य झाले नाही. त्याने एका विश्वासू सेवकाला आज्ञा दिली, व रावणाच्या मुलीला दूर, घनदाट जंगलात नेऊन मारण्यास सांगितले. तो सेवकही मामाची आज्ञा पाळून जंगलात गेला. तो मुलीला मारणार इतक्यात त्याला जंगलातून कुणाच्यातरी बोलण्याचा आवाज ऐकू आला, आणि तो घाबरला. त्यामुळे त्या मुलीला न मारताच त्याने तीला तिथेच टाकले, आणि तो उंच झाडावर लपून बसला. याचवेळी मिथीला नगरचा राजा जनक त्याच्या शेतावरून सैनिकांसोबत राजवाड्याकडे परतत होता. त्याला त्या मुलीचे रडणे ऐकू आले. त्याने ती मुलगी परमेश्वराचा प्रसाद मानून राजवाड्यात नेली. तीला सांभाळली. तीच ही सीता.
दुसरीकडे त्या सेवकाने मामाला आपण मुलीला मारले असे खोटेच सांगितले, आणि मामाने ‘तीला हिंस्त्र श्वापदांनी खाल्ले..’ असे रावणालासुध्दा खोटेच सांगितले. या गोष्टीचा रावणाला प्रचंड संताप झाला. काही वर्षांनी जेव्हा जनक राजाने सीतेचा स्वयंवर मांडला, तेव्हा रावणाला आश्चर्य वाटले. कारण जनकाला तर मुलगी नव्हती, मग ही मुलगी कोण..? असा त्याचा संशय बळावला. त्याने आपली गुप्तचर तपास यंत्रणा कामाला लावली. तेव्हा जनकाला सीता जंगलात सापडल्याचे कळले. पुढे एक एक लिंक लागत गेली, आणि ‘त्या’ सेवकाकरवी रावणाला सारी सत्यकथा समजली. पुढे त्याने आपली कन्या सीता परत मिळविण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.
खरेतर अयोध्या हे लंकेपेक्षा छोटे राज्य. रावणासारख्या सम्राटाची मुलगी अयोध्येसारख्या एका छोट्या राज्याची राणी व्हावी, हे काही रावणाला बिल्कुल आवडले नव्हते, आणि शोभणारेही नव्हते. तरीही रामासारख्या सद्गुणी मुलाबरोबर तीचे लग्न होतेय, ही बाब त्याच्यासाठी समाधानाची बाब ठरली. पण ते समाधानही अगदी अल्पघटकेचे ठरले. कारण लग्नानंतर सीतेला अर्थात रावणाच्या मुलीच्या वाटयाला, एका राजकन्येला थोडाथोडका नव्हे तब्बल 14 वर्षांचा वनवास आला. एका अर्थानं बापाच्या दृष्टीकोनातून लेकीला लाभलेला हा सासुरवासच म्हणावा लागेल. हे काही रावणाला आवडले नाही. बाप एवढा सर्वाधिपती असताना लेकीनं कंदमुळं खावी... तीनं वल्कलं नेसावी.. तीने सर्वत्याग करावा.. हे कोणत्या बापाला आवडेल..? याचसाठी त्याने पुन्हा आपल्या लेकीला आपल्या माहेरी आणण्याचा प्रयत्न सुरू केला. कदाचित त्याने आपली बहिण शुर्पनखा हिला म्हणजे सीतेच्या आतेलाही तिकडे त्यासाठीच कदाचित पाठविले असेल, पण शुर्पनखा तिकडे गेल्यावर लक्ष्मणाने तीला अक्षरश: विद्रुप केलं. तीचं नाक-कान कापलं. आधीच रावण जावयावर संतापलेला. त्यात बहिणीवर असा हल्ला करणं, त्याला सहन झालं नाही, आणि त्यातूनच त्याने आपल्या लेकीला, सीतेला आता काहीही करून आपल्या लंकेत आणायचंच.. असा निर्धार केला. पुढे तो गोसाव्याचे रूप घेऊन पर्णकुटीत आला.


पोटची कन्या देईन!
वरील दोन्ही कथा जरी वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही कथांमध्ये सीताही रावण-मंदोदरीचीच कन्या असल्याचा उल्लेख मात्र सेम आहे. या दोन्ही कथा जनमानसात अपरिचितच. मात्र असे असलेे तरी पारंपारिक नमनातील रावण हे पात्रही या दोन कथांनाच दुजोरा देत असल्याचे दिसते. नमन-खेळ्यात रावणाचे आगमन हे सीता स्वयंवरातच होत असते. या सीता स्वयंवरात रावण येतो. तेथे जनकराजा आणि रावण यांच्या सवाल-जबाब रंगतात. रावण स्वयंवरासाठी मांडलेल्या धनुष्याबाणाजवळ जातो. ते फार जड असल्याने ते उचलताना त्यांच्या अंगावर कोसळते. तेव्हा तो लंकापती रावण घायाळ होतो, आणि जनकराजाकडे याचना करत म्हणतो, ‘‘अहा रे जनकराजा, माझ्या छातीवर शिवधनुष्य कोसळले आहे... नाकाने रक्ताच्या गुठल्या वाहत आहेत... तोंडाने फेसांचे पूर वाहत आहेत... अशावेळी माझ्या छातीवरील जो वीरपुरूष शिवधनुष्य उचलेल, त्याला माझी पोटची कन्या आणि अर्ध राज्य देईन रे..’’
हे संवाद सद्यकालीन नाहीत. ते म्हण्णी आख्यानातील आहेत. याचा अर्थ ते जुने आहेत. शिवाय ते मौखिकरित्या आहेत. रत्नागिरीतील सर्वच नमनातल्या रावणाचा संवाद हा असाच आहे. सांगायचा मुद्दा हाच की, येथे रावण सीतेला आपली पोटची कन्या स्पष्ठपणे म्हणतो आहेच, शिवाय तीला कन्यादान म्हणून लंकेचे अर्धे राज्य देईन म्हणतो. या दोन्ही कथा, आणि नमनातील रावणाची बतावणी हा सारा दस्ताऐवज सार्‍या रामायणालाच कलाटणी देणारा आहे.
नमन-खेळे या लोककलेचं रावणाबाबतचं विशेष हे की, त्यांनी रावणाला नमन गात देवत्व तर दिलं आहे. शिवाय ‘सीता पोटची कन्या..’ असं म्हणून त्याला त्याची बाजू मांडण्याचंही स्वातंत्र्य दिलं आहे. इतकेच काय, तर त्याची चांगली बाजू घेताना त्याला ‘कपया’ म्हणजे कपटी रावण असेही म्हणण्याचे धारिष्ट दाखवले आहे. नमनात पुर्ण रामायण असेल, तर रावणाचा वध नमनात दाखवला जातो. अन्यथा नमनात रावण येतो तो सीता स्वयंवरातच. स्वयंवरात रावणाची फजिती होते, असे जरी कथानकात असले तरी नमनात स्वयंवरावेळी रावणाची फजिती अधोरेखित न होता, त्याचा दरारा.. त्याचा पराक्रमच अधोरेखित होत आला आहे.


गणनाट्यातील रावण
अलिकडे 90 च्या दशकानंतर नमनात ‘गणनाट्य’ हा प्रकार आला. यातून गणेश अवतार वा गणेश लिलासंदर्भात कथानाट्य सादर करण्यात येऊ लागली. त्यांना लोकपसंतीही चांगली मिळू लागली. व्यावसायिक नमन मंडळांनी अनेक गणनाट्ये विविध ट्रिकसिनद्वारे रंगमंचावर आणली. उदा. गजासूराचा वध, नरान्तक-देवान्तक, सिंदूरासुराचा वध अशी अनेक कथानके सादर होत असतात. यातून गणेश महिमा वर्णिला जातो. यात एक कथा नाट्य बर्‍याचदा असते. ते म्हणजे ‘गोकर्ण महाबळेश्वर शिवलिंगाची कथा’. ही कथा गणपतीने केलेले रावणाचे गर्वहरण या आशयाने सादर केली जाते.
नमनातला पडदा उघडतो.. समोर एक वृध्द स्त्री.. अर्थात रावणाची शिवभक्त माता कैकसी शिवनामाचा जप करत असते. तीच्यासमोर मातीचं शिवलिंग असतं.. इतक्यात रंगमंचावर
नारायण.. नारायण..
नारद चालला आकाशी मारगानं..
चालला लंकेच्या मारगानं..
असे गाणे गात नारदाची स्वारी येते. तेथे लंकापती रावणाची माता मातीच्या शिवलिंगाची पूजा करते, हे काही रावणासारख्या सम्राटाला शोभादायक नाही, असे बोलून नारद रावणाला खिजवतो. ..आणि मग काय, नारदाचे ते चिडवणे ऐकून रावण डोक्यात आगच घालून घेतो. आणि ‘..असाच कैलासावर जातो. भगवान शंकराची आराधना करतो, आणि माझ्या मातेसाठी भगवान शिवाचे आत्मलिंगच घेऊन येतो..’ अशी प्रतिज्ञा करून सटकतो. इकडे नारद महाचतुर.. तोही
‘झाले कळीचे साधन..
माझे नाव नारायण..’
असे गाणे गात अंतर्धान पावतो. रावण भगवान शंकराची घोर तपश्चर्या करतो. साधा-भोळा शंकर रावणावर प्रसन्न होतो, आणि रावणाच्या इच्छेनुसार त्याच्या आईसाठी आपले आत्मलिंग रावणाला देऊन टाकतो. रावण अत्यंत आनंदित होतो, आणि भव्य असे शिवाचे आत्मलिंग घेऊन तो लंकेकडे प्रयाण करतो..
रावण.. रावण..आत्मलिंग घेऊन..
चालला.. चालला..आत्मलिंग घेऊन..
अशा सुंदर चालीत त्याचे लंकेकडे निर्गमन होत असतानाच सारे देव चिंतेत पडतात. कारण शिवाचे आत्मलिंग लंकेत रावणाच्या ताब्यात गेले, म्हणजे साक्षात शिवच रावणाकडे गेला. हे रोखण्यासाठी देवतांची फिल्डिंग लागते. अखेर नारद इथंही हजर होतो, आणि त्याच्या सल्ल्यानुसार सारे देव गणपतीचा धावा करतात. गणपती प्रगट होतो आणि, ‘सार्‍यांना निश्चिंत रहा..’ असा दिलासा देऊन गणपती कामगिरीवर निघतो.
पुढे होतं काय की, रावण लंकेत जात असता संध्याकाळ होते. रावण हा धर्मपरायण माणूस. त्याला संध्याकाळ होताच संध्या करायची आठवण होते. इतका मोठा सम्राट असूनही त्याला कामाधामात सुध्दा धर्माचरणाची आठवण व्हावी, आणि त्यासाठी तो व्याकुळ व्हावा, यावरूनच रावणाचे चरित्र कसे होते असेल, याची कल्पना येते. आता संध्या करायची म्हणजे, हे आत्मलिंग जमिनीवर ठेवायला हवे, आणि जर का ते जमिनीवर ठेवले, तर शंकराने सांगितल्याप्रमाणे ते तेथेच स्थापन होणार. हे रावणाला टाळायचे असते. ते शिवलिंग त्याने त्याच्या लाडक्या आईसाठी आणले होते, आणि ते लंकेत जाणे आवश्यक होते. यासाठी रावण शोधाशोध करतो. तर तेथे त्याला एक बाल गुराखी दिसतो. रावण त्याला हाक मारतो, आणि सांगतो, ‘बाळा, संध्याकाळ झाली. मला संध्या करायची आहे. जरा हे शिवलिंग सांभाळतोस का..? फक्त माझी संध्या होईपर्यंत तरी हे शिवलिंग खाली ठेवू नकोस. मी लगेच येतो.’ तो बाळ हो म्हणाला, ते शिवलिंग गुराख्यानं घेतलं, आणि रावण संध्येसाठी निघून गेला. हीच संधी साधून काहीवेळानं त्या गुराखी बाळानं अर्थात गणपतीनं रावणाला मोठ्याने ओरडून ‘लिंग जड झालंय, मी खाली ठेवतो..’ असे सांगितले, आणि ते तेथेच खाली ठेवले. रावणानं आल्यावर पाहिलं तर आत्मलिंग खाली ठेवलेलं. त्याला धक्काच बसला. त्याने ते खूप हलवून हलवून उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते रावणाला उचललं गेलं नाही. झालं इतकंच की, रावणानं सर्वशक्तीनिशी ते हलवलं, त्यामुळे त्या आत्मलिंगाचा आकार हा गायीच्या कानासारखा झाला.. हेच ते गोकर्ण महाबळेश्वर शिवलिंग.


मातृभक्त, धर्मपरायण रावण
...ही अशी कथा गणनाट्यात सादर होते. यातून रावणाचे गर्वहरण वा रावणाची फजिती कमीच दिसते, त्याउलट दिसते रावणाची प्रगाढ मातृभक्ती.. रावणाला कुंभकर्ण नावाचा भाऊ होता. सत्यधर्मानं वागणारा अशी ओळख असलेला बिभीषण नावाचा भाऊ होता. त्यांना शिवाकडे न पाठविता  त्याने स्वत: शिवाची तपश्चर्या केली. शिवाला प्रसन्न करून घेतलं, आणि मातेसाठी आत्मलिंग आणलं.. रावण इतका धर्मपरायण की, कठीण काळ आणि सर्वसत्ताधीश असतानाही त्यानं आपली धर्मपरायण वृत्ती सोडली नाही, हे या कथेतून अधोरेखित होते.
नमनातील ‘रावण महिमा’ पाहिल्यानंतर आता थेट अवघ्या प्रेक्षकजनांचे उत्कंठापर्व असणार्‍या ‘सीता स्वयंवराकडे’ वळूया.. कारण येथेच लंकाधीश रावणाचे वाजत गाजत आगमन होत असते, आणि त्याच्या शाही आगमनाकडे सार्‍यांचे लक्ष चातकासारखे लागलेले असते.


म्हण्णी हे पंचप्राण!
नमनातल्या कोणत्याही सादरीकरणाचा ‘म्हण्णी’ हा पंचप्राण आहे. म्हण्णी म्हणजे ‘..जे लयबध्द म्हटले आहे ते..’ मग ते गाणे असेल असे नाही. नमनात संवादही जेव्हा लयबध्द होतो, तेव्हा त्याला म्हण्णी असे म्हणतात. दुसरं म्हणजे ही म्हण्णी कधीच, कुठेच लिहलेली नाही. ती लिहलेली नाही, आणि केवळ म्हटलेली आहे, म्हणूनही म्हण्णी अशीही नमनातल्या काव्याची व्याख्या करता येईल. पारंपारिक नमन हे पुर्णत: ‘म्हण्णी’वर चालायचे. ही म्हण्णी म्हणणारा सर्व पुराणकथा, इतिहास, महाभारताचा जाणकार असतो. त्यामुळे ही म्हण्णी त्याच्या ‘ओठावर’ असते. अजूनही रत्नागिरी जिल्ह्यात अनेक दुर्लक्षित झालेले पारंपारिक नमन कलावंत आहेत. त्यांच्या मुखात आजही अस्खलित संगमेश्वरी बोलीतील म्हण्णी लपलेली आहे, दुदैैव हे की, आजच्या व्यवसायिक नमनातून म्हण्णी हा प्रकार पुर्णत: बाद करण्यात आला आहे, त्यामुळे म्हण्णी म्हणणारे मागे पडू लागलेे आहेत. म्हण्णी म्हणणारे मागे पडू लागल्याने या म्हण्णीचे जे मौखिक हस्तांतरण होते, ते आपसूकच थांबले आहे. हे मौखिक साहित्याचे हस्तांतरण थांबणं ही कोकणच्या सांस्कृतिक इतिहासाच्या र्‍हासाची सुरूवात आहे. हे आताच थांबवलं नाही, तर कधीच शक्य होणार नाही. ही म्हण्णी तातडीनं कागदावर येणं अत्यंत गरजेचं आहे.


‘म्हण्णी रामायण’
म्हण्णी म्हणतो त्याला म्हण्णीवाला म्हणतात. नमनात अशी अनेक आख्याने आहेत, जी केवळ मौखिक आहेत. आपणांस सर्वाना गदिमांचे गीतरामायण माहित असते. त्यावरील सुधीर फडकेंचे सुंदर सुरावटीचे गीत रामायण आपण दरवर्षी ऐकतही असतो. पण ज्या कोकणात जन्मलो.. वाढलो, तिथल्या पिढीला मात्र नमनातले ‘म्हण्णी रामायण’ही तीतकेच सुंदर, तालाचे आहे, रोमहर्षक आहे, हे माहित नसते. 90 च्या दशकानंतर नमनाच्या व्यावसायिकरणाला सुरूवात झाली. यावेळी म्हण्णीतून सादर होणार्‍या वगाचे रुपांतर पुर्णत: नाट्यात झाले. संवादात झाले, आणि म्हण्णी बाजूला पडली. त्याआधी मात्र गण-गौळणच काय अख्खे रामायणही ‘म्हण्णी’ रुपात अखंडरित्या म्हण्णीवाला गात रहायचा, आणि तो गात असताना समोर पात्र येत, आणि ती कधी मुक, कधी संवादी असा अभिनय करत. उदा. रामायणात कैकयी आणि दशरथ राजाचा ‘वचनपुर्ती’ संवाद चालू असले तर म्हण्णीवाला पुढील म्हण्णी म्हणायचा.
कयकया बोलते राजा दशरंताला।
पुतरं रामाला वनवासा पाटवा॥
कयाकया बोलते राजा दशरंताला।
चवदा वरसं वनवासा पाटवा॥
कयकया बोलते राजा दशरंताला।
राज्य तं द्यावं हो माज्या भरताला॥
राजा तो बोलतो कयकया मातेला।
नको गं धाडू तू राम वनवासाला॥

वरील ओळीत राजा दशरथ आणि माता कैकयी यांचा संवाद चालू आहे. हा संवाद पद्यात बांधला आहे. या लयबध्द संवादालाच ‘म्हण्णी’ असे म्हणतात. हीच म्हण्णी म्हण्णीवाला आणि त्याचे साथीदार- धरकरी गात असताना समोर दुडक्या चालीनं (अभिनेते प्रभाकर मोरे स्टाईल) राजा दशरथ आणि कैकयी यांचे नृत्य चालू असते. अशाच रितीने श्रावण बाळ काशीला जातो.. राम-लक्ष्मणाचा जन्म होतो. ते मोठे होवून त्राटिकेचा वध करतात.. मग सीता स्वयंवराला जातात. तिथं रावण येतो.. ते अगदी रावण वध होईस्तोवर न थकता हे ‘म्हण्णी रामायण’ चालू असतं.
म्हण्णीचं आणखी एक काम असतं. एखादं पात्र येण्यापुर्वी वा एखादा प्रसंग सुरूवात होण्यापुर्वी त्याची पार्श्वभूमी तयार करणे. उदा. रावण रंगमंचावर येतो तो सीतास्वयंवरात. तो येण्याआधी रावण कसा आकाशी मार्गानं चालला आहे. मग त्याचा रथ कसा धावतो आहे. त्याचं लक्ष कसं मिथिला नगरीवर पडलं आहे, याचं लयबध्द वर्णन म्हण्णीवाला करतो, आणि मगच रावणाची इन्ट्री होते.
नमनात आणखी दोन गोष्टी महत्वाच्या असतात. त्या म्हणजे एक मृदुंगी आणि दुसरे धरकरी. कलाकारांच्या अंगात एखादे पात्र शिरविण्याचे काम या दोन गोष्टी करत असतात. नमनाची नेपथ्यरचना ही ‘झुलत्या फळी’ची आहे. मध्यभागी म्हण्णीवाला आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घोळदार झगे घातलेले, डोक्यावर मुंडासं बांधलेले, गळ्यात रंगी-बेरंगी पट्टे बांधलेले आणि हातात टाळ घेतलेले धरकरी. पुर्वी त्यांची संख्या चाळीसएक असायची. त्यांची दोन रांगांची एक झुलती भिंतंच असायची.. एकदा काय झालं जेष्ठ नाटककार आणि घाशीराम कोतवाल या गाजलेल्या नाट्यकृतीचे लेखक विजय तेंडूलकर मुंबईच्या रस्त्यावरून आपल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयातून रात्रीचे एकटेच निघाले होते. चालता चालता त्यांना कुठूनतरी वस्तीतून ‘बेदंम बेदंमनाम.. बेदम बेदमनाम.. बेदंबेदंनाम..नाम..’ असा मृदुंगाचा आवाज ऐकू आला. त्यांना कुतूहल वाटलं, ते पहायला गेले. तर त्यांना मुंबईकर चाकरमान्यांच्या  खेळ्यांची भली झुलती भिंत, आणि त्यांच्यासमोर नाचणारा लाकडी सोंगाचा गणपती दिसला. हीच झुलती भिंत वापरून त्यांनी पुढे ‘शिरी गनराय नर्तन करी..’ म्हणत ‘घाशीराम कोतवाल’ हे गाजलेलं नाटक लिहलं. याच झुलत्या भिंतीच्या नेपथ्यासमोरच रावणाचे आगमन होते. रावणाचे आगमन होण्याआधी राम-लक्ष्मणाचा जन्म होतो. त्यासाठी झुलत्या खेळ्यांसमोर एक पाळणा टांगला जातो. त्या पाळण्यात राम-लक्ष्मणाच्या लाकडी बाहुल्या. सोबत कौसल्या, कैकया, सुमित्रा या राजमाता पाळणा जोजवत असतात, आणि म्हण्णीवाला सूर धरतो..
आ रं व्ह रो व्हो..
कुलभुषना। दशरतनंदना ॥
निदरा करी बाला
मनमोवना। राम लक्षुमना ॥धृ0॥
बाला.. जो जो जो जो रे
पालना लांबविला
अयोध्येेशी। दशरताचे वंशीं ॥
पुतरं जल्मला रुशीकेशी।
कवसंल्येचे कुशीं ॥1॥
रत्नजडित पालक।
झलके अमोलिक ॥
वरती पहुडलं कुलदीपक ।
तिरभुवननायक ॥2॥
हलवी कवसल्या
सुंदरी। धरुन ज्ञानदोरी ॥
पुष्पें वरशीलीं सुरवरीं।
गरजती जयजयकारी ॥3॥
इश्वयापका रघुराया।
निदरा करि बा सकया ॥
तुजवर कुरवंडी करुनियां।
सांडिन आपली काया ॥4॥
बाला जो जो जो रे..
पाळणा संपला की पडदा. हा पडदाही दोर्‍यावरचा नाही. तर हाताने तो धरायचा. वेळप्रसंगी हातानेच वर करायचा, आणि खाली करायचा. हेही एक अनोखे नेपथ्यच. पाळणा गाऊन झाला की, विश्वमित्र अयोध्येला येतात. ते राम-लक्ष्मणाला यज्ञ रक्षणासाठी वीर योध्दे म्हणून घेऊन जातात. राम-लक्ष्मण आणि विश्वमित्र अरण्यातून जात असतानाच ते रावणाची बहिण त्राटिका हिच्या प्रदेशात येतात. तीला चाहूल लागताच रंगमंचावर ताटकोचं सोंग घातलेला, अंगाला काळा बुका लावलेला, हातात, कमरेला आंब्याचे टाळे बांधलेला कलाकार ताटको बनून कुकारे मारत येतो. तीला म्हण्णीवाला साज चढवितो..
रावनाची भैन आली
ताटको रं.. रामा रं..
रावनाची भैन आली
ताटको रं.. लक्षुमना रं..

म्हण्णीवाला या ताटकोला विचारतो,
म्हण्णीवाला: अगो म्हटलं ताटको..
ताटको: उहू..
म्हण्णीवाला: दशरथाची बालकं आज तुज्या वधाला निघाली, तरी तू सत्यधरमानं.. सत्यकरमानं आनी नित्यनेमानं तुजं मरन कुटं हाय ते सांगून द्यावं बरं..
ताटको: माजं मरनं मस्तकाशी हाय..!
म्हण्णीवाला: (म्हण्णी)
अरं मस्तकाशी बान मार
रामा-लक्षुमना..
मस्तकाशी बान मार
रामा-लक्षुमना..
...आणि राम ताटकोच्या मस्तकावर बाण मरतो. पण ताटको मरत नाही. ती फसवते म्हणून म्हण्णीवाला तीच्यावर चिडतो, आणि तीला पुन्हा तुजं मरणं कुठे आहे विचारतो. तेव्हा ती छाती, पोट, पाय, गुडघा असे एक एक अवयव सांगून फसवते, अखेर राम तीचा वध करतो. त्राटिका गेली, की मग मिथीला नरेश राजा जनकाचा दरबार भरतो, आणि तेथे स्वयंवरासाठी सारे जमतात. येथेच रावणाचे आगमन होते. त्यासाठी म्हण्णीवाला पार्श्वभूमी तयार करतो..


म्हण्णी:
हो मिथुले नगरी.. हो मिथुले नगरी..
जनक हो राजा.. राज्य हो करीतो..
मिथुले नगरी जनकराजा
राज्य करीतो हाये.. रामा हरी।
त्याची कन्या जानकी काय
उपवर झाली हाये.. रामा हरी।
जनकराजानं काय तीचा लग्नाचा
स्वयंवर मांडला हाये.. रामा हरी।
देशोदेशी-नगरोनगरी काय
पत्रिका धाडल्या हाये.. रामा हरी।

गाणे:
कन्या रं उपवर झाली हो..
सीता हो काय सुंदरी हो..
स्वयंवर काय मांडिला हो..


स्वयंवरासाठी देशोदेशी नगरोनगरीचे
राजे काय आलं हाये.. रामा हरी।
इश्वमितरं आनी काय राम
लक्षूमन आलं हाये.. रामा हरी।

गाणे:
इश्वमितरं चाललं मिथिलेला..
हो निघून चाललं मिथिलेला..


इतक्यात काय आकाशी मारगानं
लंकापती रावनाचा रत चाल्ला हाये.. रामा हरी

गाणे:
अरं आकाशातून रत चालला..
लंकेच्या रावनाचा हो..
आली रं सवारी रावनाची.. रावनाची
आली रं सवारी रावनाची.. रावनाची
बेदमं बेदंम नाम.. बेदंमबेदंमनाम..
बेदमं बेदंम नाम.. बेदंमबेदंमनाम..


रावण: अहा रे जनकराजा,
जनक: अहं..
भरसभा, भरमंडप दादी आहे की बेदादी रे?
जनक: अहा रे लंकाधीशा,
रावण: अहं..
जनक: भरसभा दादी आहे रे..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: हा गलबलाट कशाचा चाललाय रे..
जनक: अहा रे लंकाधीशा
रावण: अहं..
जनक: हा गलबलाट माजी कन्या सीता लग्नास उपवर झाली आहे. तीच्या स्वयंवराचा गलबलाट चाललाय रे..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: या स्वयंवराचा पण तरी काय मांडलाय रे..
जनक: अहा रे लंकाधीशा
रावण: अहं..
जनक: जो कोणी वीरपुरूष या शिवधनुष्याला बाण लावील..
रावण: अहं..
जनक: आनी हे धनुष्य अय्यागमनी उडवेल..
रावण: अहं..
जनक: त्याच वीरपुरषाला माजी कन्या सीता वरमाल घालेल रे.
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: देशोेदेशी- नगरोनगरीच्या राजांना तू स्वयंवराची पत्रिका पाठवलीस रे..
जनक: अहं..
रावण: मग या लंकापती रावणाला तू पत्रिका का नाही पाठवलीस रे?
जनक: अहा रे लंकाधीशा
रावण: अहं..
जनक: तुला पत्रिका कोणासोबत पाठवावी रे?
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: मला पत्रिका त्या वायुसोबत पाठवावी रे..
जनक: अहा रे लंकाधीशा
रावणण: अहं..
जनक: वायुदेव तुझ्या लंकेत खेळत असल्याने तुला पत्रिका कुणासोबत पाठवावी रे..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: मला पत्रिका त्या वरूणासोबत पाठवावी रे..
जनक: अहा रे लंकाधीशा
रावण: अहं..
जनक: वरूणदेव तुझ्याघरी पाणी भरत असल्याने तुला पत्रिका कोणसोबत पाठवावी रे..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: मला पत्रिका त्या अग्नीसोबत पाठवावी रे..
जनक: अहा रे लंकाधीशा
रावण: अहं..
जनक: अग्नीदेव तुझ्या लंकेत अन्न शिजवत असल्याने तुला पत्रिका कोणासोबत पाठवावी रे..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: मला पत्रिका त्या ब्रम्हदेवासोबत पाठवावी रे..
जनक: अहा रे लंकाधीशा
रावण: अहं..
जनक: ब्रम्हदेव सृष्ट्रीचे भविष्य लिहण्यात मग्न असल्याने तुुला पत्रिका कोणासोबत पाठवावी रे..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: मला पत्रिका त्या सटवीसंगे पाठवावी रे..
जनक: अहा रे लंकाधीशा
रावण: अहं..
जनक: सटवी तुझ्या घरी बाळंतपण करत असल्याने तुला पत्रिका कोणासोबत पाठवावी रे..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: नवग्रहांच्या पायर्‍या केल्या.
जनक: अहं..
रावण: तेहतीस कोटी देवांना बंदीवान केले. तेथे या यत्किंचित धनुष्याची काय कथा रे..? नाही या धनुष्याला बाण लावून सीतेला चोरून नेली तर नावाचा रावण नाही..

गाणे:
रावन चाले.. धरतरी हाले..
रावन चाले.. धरतरी हाले..
रावन निंगाला बानाशी रे..
हात लावतो बानाला रे..
बान आला आला उरावरी रे..
रावन करतो हरीहरी रे


तेत्तीस कोटीचे बल
व्हते धनुश्यबानावरी
देवा धावरे लवकरी
संकट पडलं भारी

रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: माझ्या छातीवर शिवधनुष्य पडले आहे रे..
जनक: अहं..
रावण: माझ्या नाकानं रक्ताचे बुडबुडे वाहू लागलेत रे..
जनक: अहं..
रावण: तोंडाने श्वास कोंडला आहे रे.. छातीत उर भरून आला आहे रे..
जनक: अहं..
रावण: अशावेळी जो कोणी वीरपुरूष माझ्या छातीवरचे हे शिवधनुष्य उचलून अय्यागमनी उडवेल त्याला माझी पोटची कन्या देईन, आनी अर्धे राज्य देईन रे..
जनक: अहा रे लंकाधीशा
रावण: अहं..
जनक: मोठ्या बढाया मारत होतास. पण आता असा वीरपुरूष नाही रे..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: शेरास सव्वाशेर असा कोणीतरी वीरपुरुष असेल रे..
जनक: तर मग ऐक..
जनक:
दशरथाचे वंशी
कौसल्येचे कुशी
श्रीरामचंद्र तुज्या छातीवरील
बाण उचलतील..
रावण: अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: रामाने डाव्या पायाच्या अंगुष्ठ्याने स्पर्श करून माझ्या छातीवरील धनुष्य उचलून त्याला दोरी लावली आहे. सीतेने त्याला वरमाळा घातली आहे. अहा रे जनकराजा
जनक: अहं..
रावण: भरसभा भरमंडपात माझा हा धडधडीत अपमान मी कधीही विसरणार नाही. अहा रे जनकराजा, एक ना एक दिवस नाही गोसाव्याचे रूप घेवून सीतेला चोरून नाही नेली तर नावाचा रावण नाही..

गाणे:
कपया रावना.. कपया रावना..
एक वेल सीता नेईल चोरून
लंकेच्या रावना.. लंकेच्या रावना..
एक वेल सीता नेईल चोरून

आट्यापट्याचा खेल रावना
तीरकमट्याचा बान रं..
रावन होेवून येशी रं..
रंक होवून जाशी रं..

हो रं हो.. इतली कता इतं
र्‍हायली म्होरं वरतंमान काय
चाललं हाये.. रामाहारी।


...अशारितीने रावण नाच करतो. संताप करतो, आणि निघून जातो. आता उरते नमनाची समाप्ती. त्यासाठी म्हण्णीवाला समारोपाकडे अर्थात नमनाच्या आरतीकडे वळतो..

आरतीची म्हण्णी:

सडये हो गावी
आसन घालिये
सुकाई मावले
झेंडा झलकला
कावडीचा हो
घोडा वलकला
सुकायचा हो..
घोडा वलकला
सोमेश्वराचा हो
घोडा वलकला
सोमेश्वराचा

उटा उटा ‘तात्या’बा
पुजा करीतो सृष्ट्रीची हो
सेवा मांडिली देवाची
पयली आरत करू कोन हो
पयली आरत करू धरतरे माते
दुसरी आरत करू कोना हो
दुसरी आरत तुलशी माते
तिसरी आरत करू कोना हो
तिसरी आरत तिरभुवना
चवती आरत करू कोना हो
चवती आरत चांदसुरयाला
पाचवी आरत करू कोना हो
पाचवी आरत पाची पांडवाला
साव्वी आरत करू कोना हो
साव्वी आरत सावल्या विटोबाला
सातवी आरत करू कोना हो
सातवी आरत सातरुशीला
आठवी आरत करू कोना हो
आटवी आरत आटभैरीला
नववी आरत करू कोना हो
नववी आरत नवखंडाला
दहावी आरत करू कोना हो
दहावी आरत काशीखंडाला
अकरावी आरत करू कोना हो
अकरावी आरत हनुमंताला
बारावी आरत करू कोना हो
बारावी आरत खेलत्या गड्याला
बारावी आरत करू कोना हो
बारावी आरत बसल्या सभेला

उजला उजला पंचारती हो
उजला उजला पंचारती
सभे ओवालू चंद्रज्योती हो
सभे ओवालू चंद्रज्योती
आरतीत घातलंय मानिकमोती हो
आरतीत घातलंय मानिकमोती
मानिकमोती ओवित व्हते हो
मानिक मोती ओवित व्हते
सुटला पदर बाय खोवित व्हते हो
सुटला पदर बाय खोवित व्हते

देवाची आरती ओवालूया हो
देवाची आरती ओवालूया
सोमेश्वर देवा तू माझा सारती
देवाची आरती ओवालूया
रवलनाथ देवा तू माझा सारती
देवाची आरती ओवालूूया हो
देवाची आरती ओवालूूया

आगडलो रे बागडलो
आगडलो रे बागडलो
उटा रं उटा
भरपूर खेल झाला
बोरी गं बोरी
गडावरच्या बोरी
भरपूर खेल झाला
सड्यावरच्या पोरी

काली निली हो घोडी
वर देव सुवर्नाचा
बसून स्वार झाला हो
सुकाई देवराया
काली निली हो घोडी
वर देव सुवर्नाचा
बसून स्वार झाला हो
रवलनाथ देवराया

झाली आठवनी त्याची
केली पाठवनी हो
झाली आठवनी
त्याची केली पाठवनी
पाटाचं पानी
आडवं गेलं हो
पाटाचं पाणी आडवं गेलं
कोल्हापूरच्या भवानीनं
मान्य केलं
धरतरे मातेला हात लाविला
बसल्या सभेला रामराम केला हो
बसल्या सभेला रामराम केला
राम..राम..

...इथं रावण आख्यानासह नमनाचा खेळही संपतो असं नाही, कारण यापुढे ‘झगे उतरणी’ म्हणूनही प्रकार सादर होत असतो. मात्र खर्‍याअर्थाने समाप्ती ती रावणानेच.
लेखात ‘म्हण्णी रामायणाचा उल्लेख केला आहे, ते नेमके कशापध्दतीचे आहे, याबाबत म्हण्णी रामायणचा काही अंश येथे वाचकांच्या माहितीसाठी म्हण्णी स्वरूपात उपलब्ध करून देत आहे..

म्हण्णी रामायण:

कता सांगतो रामायनाची

राम-लक्षुमन सीता वनाला

गोदावरीच्या किनार्‍याला

पंचवटीच्या आशरंमाला

रावनाची भैन शुरपंनका

राज्य करते त्याही वनाला

तीनं पाह्यलं देव रामाला

शुरपंनका बोले रावनाला जी..जी..जी..

नवरी करावं हो मला.. जी..जी..जी..

राम बोलू लागला शुरपंनकेला जी..जी..जी.

लक्षुमन पती शोभेल तुला.. जी..जी..जी..

शुरपंंनका ती बोलू लागली..जी..जी..जी...

बोलू लागली लक्षुमनाला जी..जी..जी..

लगनं करावं मला..जी..जी..जी..

लक्षुमन बोले शुरपंनकेला..जी..जी..जी..

लक्षुमन बोले तो शुरपंनकेला

तू विचार त्या रामाला

शुरपंनका बोले लक्षुमनाला

खावून टाकीन सीतामाईला

रामाला राग तो आला

लक्षुमनाला खूना ती केली

नाक-कान ते कापीले

शुरपंनका ती गेली रागाला

निंगून गेली ती लंकेला

शुरपंनका बोले ती बांधवांना

लक्षुमन धावून तो आला

लक्षुमनाने नाक-कान कापिलं

शुरपंनका बोले रावनाला

गोदावरीच्या किनार्‍याला

मामा मारिच रुप घेवंन चालला

चालला गोदावरीच्या किनार्‍याला

मोटयावना हरीन चालला

हरीन चालला हो..

सीता बोले देव रामाला

देव रामाला हो..

हरनाची चोली शिवावी हो

चोली हो..

हरन चाललं मोट्या वनाला

मोट्या वनाला हो..

राम गेला हरन सोधाया

हरन सोधाया हो..

रामाने बान काय सोडीला..

आवाज आला तोंडी रामाचा हो

सीता बोलते लक्षुमनाला हो

कोनी मारलं माज्या रामाला

निगून जावे राम शोधाला

लक्षुमन गेला राम शोधाला

रुप धरीलं गोसाव्याचं

निंगून आला सीतेच्या वनी त्यावेला..

भिक्षा मांगतो त्यावेला.. त्यावेला..

भिक्षा घेवून सीता आली त्यावेला..

रावनाने सीता उचलिली त्यावेला..

घेवून चालला आकाशी मारगांन त्यावेला..

... हे म्हण्णी आख्यान असे संपूर्ण रामायण संपेपर्यंत अखंड चालत राहते. आणि प्रत्येक प्रसंगानुसार पात्र समोर येतात, आणि आपला मुक अभिनय करत राहतात. काळाच्या ओघात म्हण्णी रामायणातील म्हण्णी मागे पडली, त्यांच्या जागी संवाद आले, आणि नाटकरुपात रामायण रंगू लागले.

...असा हा नमनातला रावण. सर्वांना मातृभक्त रावण, शिवभक्त रावण माहित असतो. नमनातला रावण मात्र ‘सीता माझ्या पोटची कन्या आहे’ हे सांगू पाहणारा. खरेतर रामायण- महाभारत हे हिंदू धर्मियांचे पुजनीय ग्रंथ. त्यात राम हे तर आराध्य दैवत. त्या श्रीरामाचा खलनायक नमन-खेळ्यांनी पुजनीय केला, ही सर्वात मोठी बंडखोरी म्हणावी लागेल. संकासुराचेही तेच. त्याने वेद पळविले, म्हणून तो राक्षस ठरला. पण नमन-खेळ्यात तोच ‘महावीर’ ठरला आहे. वंदनीय ठरला आहे. नवसाची पुर्ती करणारा ठरला आहे. हे खलनायक नमन-खेळ्यात कसे काय आले..? हा सर्वात मोठा संशोधनाचा प्रश्न. मात्र खलनायकांनाही मानाचं स्थान देवून त्यांच्याविषयी असलेला पुर्वग्रह दूर करण्याचे काम नमन-खेळ्यांनी केलेले आहे.

अलिकडे दसरोत्सवानिमित्त रावण दहन केले जाते, कोकणात तशी परंपरा नाही. कोकणात दहन नाही, रावण नाचवला जातो. अलिकडे असे पाहण्यात आले की, लांजासारख्या ठिकाणी ‘रावण नृत्य’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अशा स्पर्धा कोकणात होणे, म्हणजे कोकणची संस्कृती दूरवर पोहोचविणे, आणि त्यातून पर्यटनवृध्दी घडविणे, हे दोन कामे अगदी सहज होवून जातील. त्यामुळे अशा स्पर्धांना प्रोत्साहन मिळायला हवे.

वेस बदलली, की बोली बदलते. नमन-खेळ्यातील म्हण्णी-आख्यानांचेही तसेच झाले आहे. जसजसा गाव बदलतो, तसतसे नमन-खेळ्यातील म्हण्णी-आख्यानांचे शब्दसौंदर्य बदललेले दिसून येते. हे शब्दसौंदर्य एकट्याने पकडणे, त्याचे संकलन करणे हे खरेच आव्हान आहे. यासाठी त्या त्या गावातील, मंडळातील युवकांनीच त्यांच्या मंडळातील बुजुर्गांंच्या मुखी असलेले म्हण्णीरुप नमन कागदावर उमटवणे गरजेचे आहे.

काळाच्या ओघात म्हण्णीतील काही जुन्या शब्दांचा अपभ्रंशही झाला आहे. त्यामुळे काही म्हण्णींचा सुसंगत अर्थ लावणे कठीण जाते. तो अर्थ व्यवस्थित लागला, तर या लोककलेच्या मुळाशी जाणे सहज सोपे होईल, यात शंका नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे, राज्य सरकार राज्य नाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा भरविते, त्यासाठी मोठमोठी बक्षिसे देते. कोकणातील नमन-खेळ्यांच्या बाबतीत मात्र तसे होताना घडत नाही, ते घडले तर नियमावलीच्या माध्यमातून नमनासारख्या लोककलेत निर्माण झालेला बिघाड रोखता येईल, शिवाय या कलेला राजाश्रय मिळण्याची ती एक सुरवात असेल. ..आणि यातील काहीच झाले नाही तर..? ..तर नमन हे होतच राहिल, मात्र त्याचा ताबा हा पुर्णत: व्यावसायिक नमन मंडळे घेतील, आणि त्यांनी ताबा घेतल्यावर नमनातले मुळ सौंदर्य हरवले जाईलच, शिवाय म्हण्णी-आख्यानं-बतावणीत दडलेलं कोकणचं सांस्कृतिक धन नष्ट होवून जाईल. यासाठीच ‘नमन महोत्सवा’चं हे पहिलं पाऊल महत्वाचं ठरो, या सदिच्छा!

- अमोल अनंत पालये, रत्नागिरी.

मो.9011212984.


Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू