एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

हा.. हा.. म्हणता सडयेतील विद्यार्थी गुणगौरवाला एक तप उलटलं. खर्‍या अर्थाने आज गुणगौरव ‘नांदता’ झाला आहे. या कार्यक्रमामुळे सडयेची शैक्षणिक ‘क्वालिटी’ प्रथमच सर्वांसमोर आली. याआधी हे असं होत नव्हतं. ते घडलं. यातून विद्यार्थ्यांना जी अफाट प्रेरणा मिळाली, तीला तोड नाही. बारा वर्षापुर्वी गावात एकही ‘सायन्स’चा विद्यार्थी नव्हता. आज तो आहे. बारा वर्षापुर्वी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणजे काय ते गावाला ठावूक नव्हतं. आज या कार्यक्रमामुळे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करणार्‍या पोरांची फळी तयार होत आहे. 





या कार्यक्रमाचे विशेष हे की, कमालीचे चोख नियोजन. त्यात कधीच ढिसाळपणा दिसला नाही. या कार्यक्रमात मुळातच सुरूवात करताना कार्यक्रमाची ध्येयं, धोरणं ठरवून घेतलेली होती, आणि त्यानुसार वाटचाल घडत राहिली. हा सारा प्रवास रम्य असला तरी याची सुरूवात खडतर होती. या प्रवासाची वाटचाल या गुणगौरवाचा शुभंकर म्हणून तप पुर्तीनिर्मित्त..

सन 2009.. कॉलेजला असल्यामुळे डोक्यात अगदी तेव्हापासूनच नवं काही करण्याच्या कल्पना सुचत होत्या. त्याचदरम्यान शिवलकरवाडीतील प्रतिष्ठित नागरिक श्री. हरिश्चंद्र शिवलकर हे अचानक भेटले. आदल्याच वर्षी त्यांची लाडकी लेक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रगतीताई शिवलकर हिचे निधन झाले होते. तीच्या स्मरणार्थ काहीतरी व्हावं असं त्यानं वाटत होतं. ..आणि अचानकरित्या त्यांनी माझ्याकडे ‘सडये विद्यार्थी गुणगौरवा’ची संकल्पना बोलून दाखविली. म्हणाले, ‘अमोल, मी तुला 1000 रु. देतो. त्याचा मला हिशोबही नको. पण या 1000 रुपयांतून तू गावातील मुलांना ‘राणीताई’च्या स्मरणार्थ फुल न फुलाची पाकळी द्यावी. ते कसं करायचं. कुणाच्याहस्ते करायचं. ते मला माहित नाही. आम्हाला बोलवलं नाहीस तरी चालेल. पण हे सारं तू करायचं..’






डोक्यात काहीतरी चमकावं तसं झालं. मी या सार्‍यासाठी नवखा होतो. मला काहीच कळत नव्हतं. पण यानिमित्ताने सडये गावात प्रथमच एक ऐतिहासिक मुहुर्तमेढ रोवता येईल. आपण त्याचे शुभंकर होवू.. आणि त्यानिमित्ताने आपलीच आपल्याला ताकद अजमावता येईल, ही खात्री झाली. तयारीला लागलो. कोणताही उपक्रम करायचा म्हटला की, हाताशी कार्यकर्ते असावे लागतात. माझ्याकडे तसं काहीच नव्हतं. गावकमिटी होती, पण तीचा माझा कसलाच सुवेर-सुतक संबंध नव्हता. ती कमेटी काही मदत करेल, ही आशाही व्यर्थ होती. कारण गुणगौरव म्हणजे काय, ही संकल्पनाच गावात रुजायची होती. लोकांनी हा विषय कसा असतो, ते त्यांनी नीटसे पाहिलेही नव्हते. त्यामुळे त्याचे आयोजन करणे ही फार दुरची बाब होती. त्यामुळे गुणगौरव करणे हे एक आव्हान होते. 

गावकमिटीपुढे गेलो. सारा प्रस्ताव निगुतीने मांडला. गावकमिटीला हे नवं होतं. त्यांनी एकच सवाल केला. हे सारं करणार कोण..? मीसुध्दा पुर्ण तयारीने यात उतरलो होतो. त्यामुळे ‘हे सारं मी करणार..’ हे सांगून उठलो. आयुष्यात पहिल्यांदा या गुणगौरवाच्या निमित्ताने सडयेच्या ‘गावकी’ची पायरी चढलो. ..अखेर तयारीला सुरूवात झाली. कागदी आराखडे मांडत गेलो. अशावेळी मदतीला हाक मारली तर धावून येणारा एक वर्गमित्र माझ्याकडे तेव्हा होता. त्याचं नाव दिपेश खवळे.






त्यालाही हा प्रस्ताव आवडला, आणि आम्ही जोरदार तयारीला लागलो. जबर शिस्तबध्द नियोजन झाले. त्यावर्षी दुदैवार्ने दोन दु:खद प्रसंग घडले. त्यामुळे गावपूजा आटोपती झाली. पण पुजा आटोपती झाली असली तरी पहिला गुणगौरव अतिशय देखणा झाला. सडयेत शैक्षणिक असं काही घडू शकतं, याची ती नांदी होती. ती नांदी काळाच्या ओघात किती यशस्वी झाली, ते आज आपण सारे पाहत आहात. पहिला कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, मात्र तो करत असताना प्रचंड मनस्ताप मला, दिपेशला आणि खुद्द श्री. हरिश्चंद्र शिवलकर यांना झाला. पुढल्या वर्षापासून श्री.शिवलकर यांनी या विषयातून माघार घेत आपली देणगी स्थगित केली. दिपेशसारखा कार्यकर्ताही खचला, आणि दूर झाला. ..आणि मी मात्र एखाद्या सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा, तशागत मीच जन्माला घातलेल्या गुणगौरवाला गावकर्‍यांच्या साथीने चालवत राहिलो.. 

कार्यक्रमाला 12 वर्षे होत आहेत. एक तप होत आहे. आता नवा संकल्प आहे, या कार्यक्रमाला गावकीवर अंवलंबून न ठेवता त्याला आर्थिक आत्मनिर्भर करण्याचा.. बारा वर्षात आणखी एक चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे हा कार्यक्रम हाती घेऊन त्याची धुरा समर्थपणे वाहणारी उच्चशिक्षित पिढी निर्माण झाली. यावर्षीचा गुणगौरव या पिढीकडे हस्तांतरित करताना डोळ्यात आनंदाश्रू आहेत. मनात ‘इवलेसे रोप लाविले दारी.. त्याचा वेलू गेला गगनावरी..’ ही आनंदाची भावना आहे. सध्या इतकेच!


- अमोल पालये, सडये-पिरंदवणे.


Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू