Posts

Showing posts from December, 2018

जाग

Image
प्र कल्पाच्या भूसंपादनाचा पहिलाच दिवस होता. श्रीपतला सुट्टी होती. रोज गुरं घेऊन जाणार्‍या बापाला आज बर्‍याच दिवसानंतर श्रीपतने सांगितलं, ‘‘म्हातार्‍या आज शेतावर तू नको जाव. माझी सुट्टी हाय, मी चाललंय...’’ बापाला जरा बरं वाटलं. खरेतर गुरे घेवून जायची त्याला इच्छाच नव्हती; पण ‘म्हातार्‍याला जर कळलं आज  जम्मनीची मापणी हाय तर म्हातारा  गोंधळ घालील. त्यात सारे गावकरी अक्षरश: संतापलेले. काहीतरी कंदाल होण्यापेक्षा आपणच शेतावर गेलेले बरे...’ या विचारानं श्रीपत शेतावर गेला. गावात वातावरण तापलेलं, आदल्या रात्री सार्‍या गावाची गावकी मध्यरात्रीपर्यंत चालू होती. गावकीत जोराची सनसनी झाली. उभ्या गावकीत प्रकल्पावरून आडवी फुट पडली. अर्धे गावकरी प्रकल्प नको म्हणून पेटून उठले होते, तर काही प्रकल्प हवा म्हणून पुटपुटत होते. त्यावरून वादावादीही झाली. जमिनी जाणार म्हणून ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याइतपत वेळ आली. त्यामुळे आज नक्कीच काहीतरी कंदाल होणार याची श्रीपतला कल्पना आलीच होती. अगदी तस्संच झालं. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल सात-आठ गाड्या सारं रान तुडवीत गावठाणात घुसल्या... गावठाणात हा हा म्हणता बा

शेतकर्‍याचा पोर

Image
तां ब्यांच्या खालच्या वाडीत गावकर्‍यांची लगबग चालू होती. धर्मी तांबीनीकडे तर जेवायलाही पुरसत नव्हती. तीच्या उत्साहाला जणू उधाणच आलं होतं. वाडीचा सोना गावकार, तांब्यांची भावकी, गावाची गावकी अशा पुर्‍या वाडीला काल संध्याकाळीच आमंत्रण देवून झालं होतं. म्हातारी गौतमीच्या तंगड्यात ताकद नव्हती तरीसुध्दा ती विड्याचं सामान, नारळ-सुपारी अशा विधीच्या सामानाच्या गठड्या बांधण्यात गुुंतली होती. घरात नातसून येणार या कल्पनेने ती हरखूनच गेली होती. गौतमीच्या नातवाचं, धर्मीच्या लेकाचं आणि प्रगतीशिल युवा शेतकरी गुरु तांबेचं लग्न अखेर ठरलं होतं. जाधव मास्तरांचा काल सकाळी ‘पोरगी बघायला या...’ असा निरोप आला आणि दोघींच्याही डोक्यावरचं मणमणाचं ओझं हलकं झाल्यासारखं दोघींना वाटलं.  धर्मी निरोप आल्याआल्या पुरुष्या भटाकडे गेली. पोरगी बघण्यासाठी मुहूर्त मागितला, भटानं आजचीच गोरज मुहूर्ताची वेळ दिली. लगेच मुहूर्त मिळाल्याने धर्मीही खुश झाली. गावातल्या पोरांकरवी गावात धडाधड आमंत्रणं फिरली.. मानाची-पानाची जी ठिकाणं होती तिथं धर्मी स्वत: गेली. सकाळी सकाळी धर्मीनं गुरुला पेढे आणि खण आणायला बाजारात पाठविलं होतं, दुप

विडे ठेवण्याची परंपरा:एक चिंतन!

Image
विडे ठेवण्याची परंपरा: एक चिंतन! कोकणातल्या शेतकर्‍यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरण्याची परंपरा आहे. काय आहे ही परंपरा..? याचं हे मनोवेधक चिंतन.. कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकर्‍यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. नरक चतुर्दर्शीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो. तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते. अर्थात तो समृध्द बनलेला असतो, त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता, लोकोत्सव असतो. गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देवदिवाळीपासूनच सुरू होतात. नरक चतुर्दर्शीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. देवदिवाळीलाही ती आहे. मात्र देवदिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या बैलाचा.. गायीचा! आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची, त्यांना तेल लावायचं. गोठा सारवायचा. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढायच्या. गोठ्यात दिवे लावायचे. दिव्याने गुरांना ओवाळायचं. मग गुरांना आंबोळ्या खायला घालायच्या..! स्वत: आधी दुसर्‍याचा विचार..जगाचा विचार.. विशेषत: आपल्या गुरा-ढोरांचा विचार शेतकर्‍यांशिवाय या जगात को

काजवा

(लघु पर्यावरणकथा) त्या अंधार्‍या घरात फक्त ते दोघेच रहायचे. एक तो निर्धन कवी, तर दुसरा स्वयंप्रकाशी काजवा. भयाण अंधारात जेव्हा कवीला घर खायला उठायचं, तेव्हा हाच काजवा आपल्या लुकलुकत्या तेजानं कवीचं मन रिझवायचा. मग कवीही त्याच्यावर सुरेख सुरेख कविता लिहायचा. राजाच्या भाटाप्रमाणे त्याची स्तुती गायचा.. दोघांची रिलेशनशिप मस्त जमली होती, पण कविच्या सुरेख सुरेख स्तुती कवितांनी काजव्याच्या डोक्यात हवा शिरू लागली. आणि तेथेच त्यांच्या अनोख्या रिलेशनशिपला सुरुंग लागला. काजवा उन्मत होऊ लागला. कवीला म्हणून लागला, ‘अरे कवड्या, किती हा तुझ्या घरात अंधार..? मी आहे म्हणून उजेड तरी पडतो! जर मी दुसरीकडे गेलो, तर कुठेतरी अंधारात चाचपडत आपटशील, आणि मरशील हो..’ कवी जोराने हसला. बोलला काहीच नाही. .. आणि एकेदिवशी कवीची चेष्ठा करून तो काजवा त्या अंधार्‍या घरातून बाहेर गेला. आता एका श्रीमंताच्या बंगल्यात शिरावं, आणि तिथल्या माणसाचं मन रिझवावं.. असा विचार करत तो एका अलिशान बंगल्यात शिरला. संध्याकाळची वेळ होती. काजवा मनातच म्हणत होता, ‘आता या बंगल्याला बघ, कसा झळाळून टाकतो!’ काजवा बंगल्यात शिरला तेव्ह