विडे ठेवण्याची परंपरा:एक चिंतन!

विडे ठेवण्याची परंपरा: एक चिंतन!


कोकणातल्या शेतकर्‍यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरण्याची परंपरा आहे. काय आहे ही परंपरा..? याचं हे मनोवेधक चिंतन..

कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकर्‍यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. नरक चतुर्दर्शीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो. तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते. अर्थात तो समृध्द बनलेला असतो, त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता, लोकोत्सव असतो. गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देवदिवाळीपासूनच सुरू होतात.
नरक चतुर्दर्शीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. देवदिवाळीलाही ती आहे. मात्र देवदिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या बैलाचा.. गायीचा! आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची, त्यांना तेल लावायचं. गोठा सारवायचा. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढायच्या. गोठ्यात दिवे लावायचे. दिव्याने गुरांना ओवाळायचं. मग गुरांना आंबोळ्या खायला घालायच्या..! स्वत: आधी दुसर्‍याचा विचार..जगाचा विचार.. विशेषत: आपल्या गुरा-ढोरांचा विचार शेतकर्‍यांशिवाय या जगात कोणी करत नसेल. नरकचतुर्दशीला आधी आपल्या पोटोबाची सोय केली आहे, तर देव दिवाळीला गुरांढोरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची रित शिकवलेली आहे, अशी ही शेतकर्‍याची संस्कृती आहे.
देव दिवाळीचा महत्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या घरात हा विधी पार पडतो. या पंरपरेतही उर भरून येणारा अर्थ दडला आहे. तो समजून घेतला की, या परंपरेचे जतन इथल्या शेतकर्‍यांच्यात कसा आत्मविश्वास रूजवित आहे, ते समजून येेईल. देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचे स्मरण केले जाते. सम्राट बळी हा कृषीप्रधान राजा होता. गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता. चांगल्या राजांची नेहमीच आठवण काढली जाते. राम, कृष्ण हे आदर्श राजे मानले जातात. तसाच बळीराजा हाही एक आदर्श राजा होता, हेच या कथांमधून समोर येतेे. दशावताराचा संदर्भ लक्षात घेता, हे राजे प्राचीन युगांचे प्रतिनिधी आहेत. आणि आज इतक्या वर्षानंतरही त्यांची आठवण काढली जातेय. या सर्व राजात बळीराजाचे वेगळेपण खूप उठून दिसणारे आहे. हा राजा शेतकर्‍यांचा आहे. आणि म्हणूनच राम-कृष्णाच्या खूप आधीच्या काळात होऊन गेलेल्या बळीराजाची आजही आवर्जून आठवण केली जातेय, ती त्यामुळेच!
‘इडा टळो..पीडा टळो..माझ्या बळीचं राज्य येवो..’ 
या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देवदिवाळीला होतो. बळीचे राज्य कसे न्यायी राज्य होते. तेथील जनता कशी सुखी-समाधानी होती. हे सारे चित्र या एकाच उक्तीतून काहीही न सांगता समोर दिसते. हजारो वर्षानंतरही आज  शेतकर्‍याला दुसर्‍या कुणाची नव्हे तर, कधीकाळी होऊन गेलेल्या बळीच्या राज्याचीच आस लागली आहे, यावरून बळीराज्याची कल्पना येते.

केरळमध्ये ओणम सण बळीराजाच्या स्मृृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. तेथे बळीराजा ओणममध्ये घरोघरी येणार, अशी कल्पना मांडून त्याच्या स्वागताची तयारी केली जाते. तर कोकणात थेट बळीच्या राज्याची मुर्त संकल्पनाच मांडून ‘इडा-पीडा टळो..’अशी करूणा भाकली जाते. या प्रथेचे बारकावे लक्षात घेतले तर त्यामागची भावना अधिक सुस्पष्ठ होत जाते. त्यासाठीच या प्रथेची ही चिकित्सा..
कोकणातल्या मुख्य घरात ओटीवर विडे ठेवण्याचा (भरण्याचा) कार्यक्रम पार पडतो. ओटी या जागेला कोकणात मानाची जागा आहे. ती सार्वजनिक जागा आहे. घराचा कारभार घरातला कारभारी ओटीवर बसून हाकत असतो. अशा कारभार हाकण्याच्या जागेवर हा विडे ठेवण्याचा कार्यक्रम पार पडतो. 
सर्वात आधी ‘कणा’ घातला जातो. सध्याच्या भाषेत याला ‘रांगोळी घालणे’ म्हणतात. ही रांगोळी फुलांफुलांची नव्हे किंवा ओम, स्वस्तिक अशा प्रतिकांची नव्हे, तर ती चौकोनात घातली जाते. मोठ्या चौकोनाला चारी बाजूनी बंदिस्त करून तो कणा म्हणजेच चौकोन सुबक केला जातो. चौकोनाची टोकं सांधणारा जो सांधा रांगोळीने काढला जातो, त्यालाच कणा मोडणे असे म्हणतात. त्यामुळे या रांगोळीत कणा काढणे..आणि कणा मोडणे.. असे शब्दप्रयोग आहेत. यातून बळीराज्याच्या पायाभरणीची संकल्पना कशी रेखीव आहे, ते स्पष्ठ करतात. बरे ही रांगोळी दगडाची नसते. ती एकतर तांदळाची किंवा मग भाताच्या तुसाची.. म्हणजे येथेही शेतीशी संबधित गोष्ठीचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो.
या कण्यावर अर्थात रांगोळीवर धोतर अंथरले जाते. शुभ्र धोतर हे स्वच्छ चारित्र्याचे प्रतिक. ते घालण्याआधी सर्व गावकर्‍यांना धोतर पांघरणार्‍यांनी ‘गादी घालायला हुकुम काय..?’ हे विचारावे लागते. (यावरून बळीच्या राज्यात जनतेला, मतदाराला काय किंमत होती..? हे या गादी मांडण्याच्या अर्थात सत्ता स्थापनेच्या विधीवरून लक्षात येईल.) येथे धोतर अंथरणे ही संकल्पना गादी घालणे, अशी गृहित धरलेली आहे. ही गादी म्हणजे बळीराजाची राजगादी. त्यामुळेच खाली अंथरलेली शुभ्र धोतराची गादी ही बळीराज्याच्या स्वच्छ, पारदर्शक कारभाराची मुख्य खुण आहे, हेच यातून प्रतित होते. 
कणा मोडून त्यावर राजगादी मांडून झाली की मग, त्यावर तांदळाचे चौकोनी मंडळ काढले जाते. हेही मंडळच असावे. स्वस्तिक ओम वगैरे नाही.. त्या चौकोनी मंंडळाच्या मध्यभागी पाच पाने त्यावर अख्खी ओली सुपारी.. हा साक्षात बळीराजा. आता उरलेल्या चार कोपर्‍यावर तशीच पाच पाने, त्यावर ओली सुपारी असे चार विडे.. हे चार दिशांचे चार खंडोबा.. अर्थात बळीराज्याचे चार दिशांचे मुख्य सेनापती. त्यानंतर उरलेल्या जागेवर एक पान, त्यावर सुपारीचे एक खंड, खोबर्‍याचा तुकडा.. अशी पन्नास शंभर पाने मांडली जातात. हे स्वतंत्र विडे म्हणजेच बळीराज्यातील शेतकरी जनता यांचे प्रतीक.. 
..अशी राजगादी मांडून झाली की, घरातील कर्त्यांपुरुषाने त्या राजगादीची पुजा करायची.. ही पुजा काही पोथीत सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार किंवा शोडषोपचाराची नव्हे. जशी भावेल तशी..(अर्थात गावकर सांगेल तशी..) प्रथम मधल्या बळीराजाची पुजा. मग खंडोबांची पुजा.. मग इतरांची पुजा.. त्यात गंध, फुल आणि गुळाचा नैवेद्य.. ही पुजा झाली की, मग सर्व उपस्थितांना अक्षतांचे वाटप केले जाते. सर्वजण त्या गादीभोवती राज्याभिषेकासाठी उभे राहतात. घरातील कर्ता पुरूष प्रथम आपली प्रार्थना करतो. सुख-शांती मागतो. इडा-पीडा टळो.. बळीचं राज्य येवो, अशी प्रार्थना करतो. त्यानंतर स्वत: गावकर प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना व्यापक इच्छा आकांक्षेची असते. त्यात तो कुटुंबासहित गावाचे, गुरांचे, चाकरमान्यांचे, मुलांचे अशा सार्‍यांचे कल्याण करण्याची इच्छा व्यक्त करत असतो. ही कल्याणाची इच्छा व्यक्त करत असताना सार्‍यांनी आपल्या हातातील अक्षता धारेप्रमाणे त्या राजगादीवर सोडायच्या असतात. हा जणू बळीराजाच्या राज्य स्थापनेचा राज्याभिषेकच!
यानंतर हे विडे देव, वडिलथोर, गावकरी यांना वाटून त्यांचा सन्मान करायचा असतो. (हा असा सन्मान करायची रित बहुधा सणांमध्ये कमीच दिसायला लागली आहे. देवदिवाळीत ती मात्र आवर्जुन दिसते.) त्यानंतर समाप्ती. हा क्षण अत्यंत भावपुर्ण. ती राजगादी सार्‍यानी मिळून टोक धरून उचलायची, ‘इडा टळो.. पीडा टळो.. माझ्या बळीचं राज्य येवो.. चांगभलं.. चांगभलं..’ असा जोराने जयघोष करून ती गादी.. ते बळीचं राज्य घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात स्वाधीन करून त्याला आशीर्वाद द्यायचा..!
हे दृश्य सुक्ष्म नजरेनं पाहिलं, तर अक्षरश: भारावून जायला होतं.

गेली कित्येक वर्षे ही परंपरा डोळे भरून पाहतोय.. आणि दरवर्षी ती तितकीच नित्य नुतन भासते आहे. मंगळवार दि.15 डिसेंबर रोजी देवदिवाळी कोकणात साजरी होतेय. तर दुसरीकडे आज दिल्ली दरबारी हजारोंच्या संख्येने देशभरातील शेतकरी बळीराज्याची आस लावून लढतो आहे. त्यानिमित्ताने ही प्रथा मनात अधिकच गहिरी होते आहे.

-लेखक: अमोल पालये.
मो.9011212984.

Comments

  1. जो फोटो आहे तो चुकीचा आहे, हा फोटो कृष्णाचा भाऊ बलरामाचा आहे, आणि माहिती सुद्धा अर्धवट आहे.
    कोकणात, आपल्या नमन ( खेळे ) दश अवतारा मध्ये तर याच बळी राजाच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात विष्णू चा 5 चा अवतार वामन घालताना दाखवतात
    एका बाजूने त्याला मारतात पण आणि दुसऱ्या बाजूने त्याचे राज्य पुन्हा यावे म्हणून प्रार्थना सुद्धा करता, हे अज्ञान म्हणायचे की अजून काही???

    ReplyDelete
    Replies
    1. सध्या नमन ह्या लोककलेत जे सादरीकरण केले जाते त्यात संकासुर त्यानंतर आरती (गण) आणि त्यानंतर गवळण असा एकंदरीत क्रम असतो.गवळण ह्या कलाप्रकारात मुख्य पात्र हे राधा आणि कृष्णाचे असते.आणि शेवटी ओळख सांगताना कृष्ण (विष्णू) आपले सारे अवतार सांगतो.त्यामुळे कदाचित त्या अवतार क्रमात वामन हा देखील अवतार असल्या मुळे वामन हा बळीचे मस्तक आपल्या पायाखाली घेताना दिसत असावा.मुळात पारंपरिक कलाप्रकार हे लिखित स्वरूपात पुढच्या पिढीपर्यंत न जाता बहुतांश वेळा मौखिक रुपाने जात असल्या मुळे काळाच्या ओघात त्यात काही प्रमाणात अगोदर त्यात नसलेल्या गोष्टी देखील समाविष्ट केल्या गेल्याची बाब नाकारता येत नाही.अर्थात ही आता काही अंशी आपली देखील जबाबदारीच मानली पाहिजे आणि त्या साठी सर्वात अगोदर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत.असा प्रश्न आपण येथे मांडला त्यासाठी मी आपले आभार मानतो.आपण सर्व नमन प्रेमींनी अश्या गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू