काजवा


(लघु पर्यावरणकथा)

त्या अंधार्‍या घरात फक्त ते दोघेच रहायचे. एक तो निर्धन कवी, तर दुसरा स्वयंप्रकाशी काजवा. भयाण अंधारात जेव्हा कवीला घर खायला उठायचं, तेव्हा हाच काजवा आपल्या लुकलुकत्या तेजानं कवीचं मन रिझवायचा. मग कवीही त्याच्यावर सुरेख सुरेख कविता लिहायचा. राजाच्या भाटाप्रमाणे त्याची स्तुती गायचा..
दोघांची रिलेशनशिप मस्त जमली होती, पण कविच्या सुरेख सुरेख स्तुती कवितांनी काजव्याच्या डोक्यात हवा शिरू लागली. आणि तेथेच त्यांच्या अनोख्या रिलेशनशिपला सुरुंग लागला. काजवा उन्मत होऊ लागला. कवीला म्हणून लागला, ‘अरे कवड्या, किती हा तुझ्या घरात अंधार..? मी आहे म्हणून उजेड तरी पडतो! जर मी दुसरीकडे गेलो, तर कुठेतरी अंधारात चाचपडत आपटशील, आणि मरशील हो..’
कवी जोराने हसला. बोलला काहीच नाही.
.. आणि एकेदिवशी कवीची चेष्ठा करून तो काजवा त्या अंधार्‍या घरातून बाहेर गेला. आता एका श्रीमंताच्या बंगल्यात शिरावं, आणि तिथल्या माणसाचं मन रिझवावं.. असा विचार करत तो एका अलिशान बंगल्यात शिरला. संध्याकाळची वेळ होती. काजवा मनातच म्हणत होता, ‘आता या बंगल्याला बघ, कसा झळाळून टाकतो!’ काजवा बंगल्यात शिरला तेव्हातरी तो सुनसान होता.. रात्र होत आली तशी दाराशी एक मोठी कार आली. तिच्या हेडलाईटने काजव्याचे लक्ष चटकन बाहेर गेले. एक काळं शर्ट घातलेला तरूण त्या गाडीतून बाहेर आला. काजवा खुश झाला. तो त्याच्या स्वागतासाठी पुढे होत ऐटदारपणे त्याच्या डोक्यावर जाऊन बसला. त्या तरूणाने दरवाजा उघडला.. खाडखाड बटणं दाबत सारा बंगला दिव्यांनी उजळून टाकला. त्या प्रखर एलइडी दिव्यांनी काजव्याचं अंग गरगरलं. काय होतंय हेच त्याला कळेना.. आंधळा झालो की काय मी..? असेच वाटून गेले. गच्च डोळे मिटून राहिला. 
काहीवेळाने काजव्याने हळूच डोळे उघडले. जरा हुश्श वाटले. खोलीत अंधार होता. बहुधा तो तरूण आता झोपण्याची तयारी करत असावा, कारण दिवे मालवले होते, आणि तो शर्टलेस झाला होता.. काजव्याने ठरवलं, आपण आपल्या स्वयंप्रकाशानं त्याचं मन रिझवावं, आणि त्याला सुखाची झोप द्यावी.. म्हणून त्याने एक उडी घेतली आणि तो खांद्यावर आला. तो तरूण कपाटाजवळ गेला. कपाटातून एक बॉटल काढली.. फरफर.. फरफर.. सार्‍या उघड्या अंगावर बॉडीस्प्रे मारला.. काजव्याची सारी आंघोळच झाली. डिओच्या त्या गंधाने काजवा तिरमिरला, त्याच्या दिर्घ श्वासातून सारा गंध शरीरात शिरला, आणि खांद्यावरून खाली कोसळत काजव्याने प्राण सोडला.

-अमोल पालये.
मो.9011212984.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू