शेतकर्‍याचा पोर

तांब्यांच्या खालच्या वाडीत गावकर्‍यांची लगबग चालू होती. धर्मी तांबीनीकडे तर जेवायलाही पुरसत नव्हती. तीच्या उत्साहाला जणू उधाणच आलं होतं. वाडीचा सोना गावकार, तांब्यांची भावकी, गावाची गावकी अशा पुर्‍या वाडीला काल संध्याकाळीच आमंत्रण देवून झालं होतं. म्हातारी गौतमीच्या तंगड्यात ताकद नव्हती तरीसुध्दा ती विड्याचं सामान, नारळ-सुपारी अशा विधीच्या सामानाच्या गठड्या बांधण्यात गुुंतली होती. घरात नातसून येणार या कल्पनेने ती हरखूनच गेली होती. गौतमीच्या नातवाचं, धर्मीच्या लेकाचं आणि प्रगतीशिल युवा शेतकरी गुरु तांबेचं लग्न अखेर ठरलं होतं. जाधव मास्तरांचा काल सकाळी ‘पोरगी बघायला या...’ असा निरोप आला आणि दोघींच्याही डोक्यावरचं मणमणाचं ओझं हलकं झाल्यासारखं दोघींना वाटलं.
 धर्मी निरोप आल्याआल्या पुरुष्या भटाकडे गेली. पोरगी बघण्यासाठी मुहूर्त मागितला, भटानं आजचीच गोरज मुहूर्ताची वेळ दिली. लगेच मुहूर्त मिळाल्याने धर्मीही खुश झाली. गावातल्या पोरांकरवी गावात धडाधड आमंत्रणं फिरली.. मानाची-पानाची जी ठिकाणं होती तिथं धर्मी स्वत: गेली. सकाळी सकाळी धर्मीनं गुरुला पेढे आणि खण आणायला बाजारात पाठविलं होतं, दुपार झाली तरी तो अजून आला नव्हता. ‘हा यनार कवा, जेवणार कवा आनि जानार कवा?’ याची चिंता धर्मीला सतावत होती. पोरगी बघायला वरच्या जाधव वाडीतच जायचे असल्याने फार वेळ लागणार नव्हता, मात्र संध्याकाळी पाच वाजताची पंचात असल्याने गुरू एव्हाना यायला हवा, अशी धर्मीची कुरकूर चालली होती.
  पोरगी बघण्याचा कार्यक्रम म्हणजेच लग्नाचा विषय गावकीच्या पंचात घालणे होय. गावकीचे जे जाणकार असतात ते या कार्यक्रमात पंचाची भूमिका घेतात, त्यानंतरच त्या लग्नावर गावकीचे शिक्कामोर्तब होते. चार पुस्तकं जास्त शिकलेल्या तरीही आपल्या शेतात राबणार्‍या गुरुच्या लग्नाचा विषय तांबेवाडीत जितका चर्चेचा होता, तितकाच तो कौतूकाचा होता. गुरु स्वभावानं गोड मुलगा होता. चार पुस्तक जास्ती शिकला तरी उध्दट नव्हता. शिकूनही पदरी नोकरी नव्हती तरी कशाची ददात नव्हती, कारण गुरु कष्टाला मागेे नव्हता. म्हणूनच आज त्याला पोरगी बघायला जायचं या आमंत्रणानेच सार्‍या बायका सुखावल्या होत्या. गाव एकच होतं; पण वाड्या दोन होत्या. मात्र दोन वाड्यांच्या गावकीत जूनी कंदाल होती. त्यामूळे जाधवांच्या पोरीबाबत बायकांच्या मनात थोडी अढी होती; पण ती आता दूर झाली होती. आता गुरूचे लग्न नक्की होणार, हीच सार्‍यांसाठी कौतूकाची गोष्ट होती. 
 दुपारचे दोन वाजले आणि एकदाचे गुरुचे आगमन झाले. धर्मीची चिंता मिटली. गुरु खुशीत होता. जी पोरगी त्याच्या मनात भरली ती त्याची जोडीदारीण होणार...! हे आता पक्क झालं होतं. बाजारातून आणलेल्या सार्‍या वस्तू आईकडे दिल्या. गुळगुळीत दाढी केली. फसफस साबण लावत आंघोळ केली. आपण बरे दिसतोय ना? याची खात्री पटण्यासाठी कितीतरी वेळा आरशासमोर जाई. स्वत:कडे पाहत मग गालात हसे... उन्हानं चेहरा रापला होता, आंघोळ केल्यानंतर जरा उजळपणा आला. जेवायला बसणार तोच, धर्मीनं बजावलं, ‘‘गुरो, थांब.  जेवायच्या आधी भराडणीच्या, धरणकरणीच्या, मारुतीच्या, सोमेश्वराच्या देवळात, वडाखाली, झर्‍याखाली इडा ठेवून ये... नंतर कसली अडचण नको येयाला...’’ आत्ताच उन्हातानातून आल्यानं गुरूला वैताग आला होता. भूकही लागली होती; पण घरात आनंदाचा क्षण होता, त्यामुळे गुरुनेही कोणाचं मन मोडलं नाही. 
 विडा-सुपारी घेऊन सार्‍या देवस्थानाचे उंबरे झिजवले. 
 ‘‘ए गुरो, थांब...’’ पांदळीतून हाक आली. धरणकरणीच्या देवळाकडे वळणारा गुरु आप्पा तोरसकराच्या हाकेनं थांबला. 
 ‘‘आरे आज पंचात हाय ना तुजी? मग हिकडं काय करतावं...? तू हिकडं ता प्वॉर तिकडं, मग आमी येवनं काय...? आप्पा विनोद करत खो-खो हसू लागला.
‘‘विडा ठेवायला देवळात गेलो होतो’
‘‘पंचात कधी, सांच्याला हाय ना...?’’
‘‘होय, आता थोड्यावेळानं निघायचे....’’
‘‘आरे मग मास्तराची पोर वाकणावर उभी काय करते?’’
‘‘...?’’ गुरु कोड्यात पडला.
‘‘आरे, तुजी व्हणारी बायको. गाड्येच्या स्टॉपावर उभी व्हती मगाशी...’
‘‘असेल कुणी पाहुणा यायचा...’’ गरुनं आप्पाची शंका दूर केेली आणि तो सटकला.
 एव्हाना गुरुच्या मांडवात गावकरी जमू लागले होते. गावकार आणि भावकीची काही माणसं यायची होती. ती आली की लगेच निघायचे. काही बायकाही सजून-धजून आल्या होत्या. सगळी हरखून गेली होती. गुरुकडे कौतूकाने पाहत होती. त्यालाही आता हूरहूर लागली होती, कधी एकदा जयूला पाहतोय असे झाले होते. त्यामुळे जेवण गेलेच नाही. भाकरीचा तुकडा मोडला आणि उठला. चांगले कपडे घातले. केस व्यवस्थित जागेवर बसवले. हलकासा अत्तराचा फवारा मारला. सारे गावकाराची वाट पाहत बसले होते. गावकर आल्याशिवाय निघता येणार नव्हते, त्यामुळे धर्मीची चुळबूळ पुन्हा वाढली होती.
  तेवढ्यात वरच्या जाधववाडीचा तातूभाऊ सायकल गडगडवीत खाली आला. कुणाशीच काही न बोलता घरात शिरला. धर्मीला हाक मारली, त्याला पाहताच धर्मी कोड्यातच पडली. शेजारच्या एक-दोघांना तातूभाऊने  घराच्या आडकूशी बोलावलं.
‘‘जरा गडबड झालेय... चायपाण्याची पंचाती पुढं ढकलाय लागलं’’
धर्मी हबकलीच. बाकीचे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले.
‘‘काय झालं तरी काय, वाडीत कोन गेलं काय?’’ एकाने शंका व्यक्त केली.
‘‘नाय नाय... तसं काय नाय, पोरीला अडचण आलेय...’’ 
‘‘अरे बापरे...’’ सारेच उद्गारले.
‘‘मास्तरांनी निरोप पाठवलाय. पंचाती पुढं ढकला, नंतर कळवू...’’
 त्या वार्तेनं सार्‍या उत्साहावर पाणी फेरलं. धर्मीच अवसानचं गळालं. गुरु हिरमुसला. गावकरी चेष्टा करत निघून गेलेे. गुरु न जेवताच झोपला. त्याच्या हळूवार मनाला घडली गोष्ट फार लागली.
 ... धर्मीचा करतासवरता आणि थोरला लेक म्हणजेच गुरु. गुरुनं मराठी विषय घेवून एम्.ए पर्यतचे शिक्षण पूर्ण केलं होतं. एवढं शिकूनही शेताच्या बांधावर राबणारा हा गावचा पहिलाच पोरगा होता. अन्यत: पोरगा दहावीपर्यंत शिकला की मुंबयचा चाकरमानी व्हायचं... तिकडून आईबापाला मनिऑर्डर धाडायची हे सुत्र ठरलेलं. गुरुनं मात्र धर्मीचा विरोध डावलून आणि गाववाल्यांच्या चेष्टेकडे दुर्लक्ष  करून हे सुत्र पार बिघडवून टाकलं. ‘‘पोर वाया गेला हो... एवढा शिकला पण दोन रुपयं कमवायची अक्कल नाय... मुंबयला जा सांगताव तं ऐकत नाय, काय करयाचं या गुरुचं...?’’ गावातल्या बायका फार टोचून बोलायच्या. गुरुला ते फार लागायचं; पण इलाज नव्हता. एवढे आपण शिकलो ते काय चाकरमानी होण्यासाठी? ही अस्वस्थता त्याला डाचत रहायची. गुरुला प्रााध्यापक व्हायची इच्छा होती; पण गरीबाच्या नशिबी कुठचं आलयं प्राध्यापक होणं...? ती इच्छा तशीच पडून राहिली. आधी पोरगा शिकला, लवकरच नोकरीला लागेल म्हणून कौतूक होत होतं; पण बाप वारल्यानंतर मात्र टिकेचा धनी होवू लागला. त्याच्यानंतर एक लहान बहिण व भाऊ शाळकरी होती. त्यांच्या शिक्षणासह कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. नोकरीचा तर पत्ताच नव्हता काय करावे काही सुचत नव्हते. गुरुसमोर प्रश्नच आवासून उभे होते.
 गुरुचा बाप मुंबैकर चाकरमानी होता. सात वर्षापूर्वीच तो हार्टअ‍ॅटकने वारला. घरांवर संकटच कोसळलं. घरचं शेत जेमतेमच होतं. त्यात काही पिकत नाही... फुकटचा पैसा जातो, गुरं-ढोरं सांभाळावी लागतात... अशा कटकटी करत गुरुच्या बापाने सातवर्षापूर्वी मुंबई गाठली आणि तो चाकरमानी झाला, आणि एकदिवशी हार्टअ‍ॅटॅकने वारला... आज त्याच्या मृत्यूनंतर लोक बोलतात, ‘‘ बोलू नये असं वावगं; पण शेती-भाती सोडून काय गरज होती मुंबयला जायाची? कितीबी अस्मानी संकट कोसळू दे... सरकार मातू दे.. ऊतू दे..; पण शेतकर्‍यांन लढलं पायजे. या देशासाठी जगलं पायजे... जो शेतात नाय टिकला तो कुठचं नाय टिकला...’’ ही टिका गुरुच्याही कानावर आलेली. ती ऐकून त्याचं मन अस्थिर झालेलं. गुरुची आई धर्मी मोलमजूरी करून थकलेली. तरीही म्हातारी गौतमी जीवापाड जपलेल्या रेड्यांची जपणूक करत होती. शेती करत नसल्याने रेडे भुईला भारच झाले होेते. कठीण परिस्थितीत रेडे विकावे या सल्ल्यावर ती आकांडतांडव करायची. ‘‘नोकरी कर.. नोकरी कर...’’ म्हणून सारे पाठिशी लागलेले; पण नोकरी मिळतच नव्हती. हात रिकामी होते; पण एम. ए. केल्यामुळे डोकं विचारी होतं. मन अजूनही सजग होतं. महात्मा फुलेंचा ‘आसूड’ वाचला होता. त्यामुळेच सजग मनानं ठरविलं, जे काही होईल ते होवो... आपलं शेतचं कसायचं. रेडे तर घरीच आहेत...’’
 या निर्णयावर आईने वेड्यात काढलं, ‘‘आरं तुझ्या बापानं शेतात काय मिळत नाय म्हणू श्यात सोडलं. मुंबयला गेेेेेला. रगात आठवलं आणि तुला शिकवलं. तू तर येड्यासारखा करया लागलास...’’ आजीला मात्र समाधान वाटलं, ‘‘तू कर श्यात. तुझ्या आज्यानं ह्या शेतात सोनं पिकवलं’’ आजीच्या बोलण्याने गुरुला उभारी आली.
 गुरुने इरादा पक्का केला. बरीच वर्षे पडीक असलेल्या शेतातलं रान साफ केलं. जमीन नांगरून मोकळी केली. खोतांच्या दाराची पायरी चढला. वर्षानूवर्षे पडीक राहिलेली त्यांची शेतं अर्धलीने मागितली. अगदीच पडीक राहण्यापेक्षा चार दाणे हाताशी लागतील या हेतूनं खोतांनी शेत दिलं. गावातील गावकर्‍यांची जी रिकामी शेतं होती, तीसुध्दा अर्धलीने घेतली. पडीक जमिनींनी बरीच वर्षे विश्राम घेतल्याने त्यांचा कस सुधारला होता, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात गुरुला चांगलचं यश आलं. भाताच्या खरेदी-विक्री संघात भाताला चांगला दर मिळाला. शेतातूनही चार पैसे गाठीला मारता येतात हा धडा आपल्या आईलाच नव्हे तर टिका करणार्‍यांना गुरुने घालून दिला. गेल्यावर्षीच्या या यशाने  गुरुला चांगलीच उभारी आली. लोकांची मनही बदलू लागली होती. अर्धलीचे मालकही खुश झाले होते. त्यांनाही आपल्या जमिनीचा वाटा मिळाला होता. हिवाळ्यात गुरु पुन्हा कामात गुंतला. मळेशेतीला कडवा, वरणा, कुळीथ, पावटा, उडीद पेरला. बरे पीक आले. घरात आयते धनधान्य आले. धर्मीचा विरोध मावळू लागला. गौतमीला नातवामुळे तरुणबळ आलं, म्हणू लागली, ‘‘आता सुनमुख बघीन, मगच मातीत जाईन..’’  
गुरुच्या मेहनतीला फळ आलं. गेल्यावेळच्या हंगामाच्या जोरावर त्यांन यावेळचाही हंगाम गाजवला. शेतजमीन तीच मात्र कृषी विद्यापिठाच्या मदतीनं चारसुत्रीचा प्रयोग केला. लोकं म्हणायची, ‘‘एवढी पातळ लावणी केली मधी काय बिछाणा घालयाचा व्हयं रं गुरू?’’ अडाणी शेतकर्‍यांसमोर गुरुनं प्रतिवाद केला नाही. त्यांच्या सवालाला  त्याने कृतीतून उत्तर दिलं. चारसुत्री पध्दतीमुळे भाताचा आवा वाढला. परिणामी लोंबही वाढली. आश्विनातल्या रणरणत्या उन्हानं कमाल केली. भाताचे दाणे टपोरे टणक झाले. सारं शेत पिवळ्या सोन्यानं मढूून गेलं. लोकांनी दसर्‍याआधीच सोनं घरात आणलं. तरी गुरुचं शेत उरकेचना. दिवाळी तोंडावर आली तरी सकाळी कापणी तर दुपारी मळणी असा सिलसिला चालूच होता. गुरुची कमाल पाहून लोकाचंही कुतूहल जागं होत होतं, ‘‘कमाल आहे बुवा तांब्याच्या पोराची. पोतीच्या पोती भरतोय. काय पीक आलंय, पोराची मेहनत फळाला आली. काय राबतोय पोर, तशीच बायको मिळूदे म्हणजे झालं...!’’ अशावेळी सार्‍या बायका खो खो हसायच्या, मग कुणीतरी म्हणायचं, ‘‘अवो कसलं काय? त्या जाधवीनीच्या पोरीबरोबर आसतो बोलत. ती काय याला गावणार हाय... दुनियेतल्या पोरी कराव्या पर जाधववाडीतल्या पोरींच्या नादाला लागू नये...’’ दोन गावकीच्या वादाची अढी अशी तोंडावर यायची. 
 गेल्या शिमग्याच्या आधीची ही गोष्ट... दुपार होत आलेली. गुरु कुळथाला पाणी लावत होता. रहाटाची  कुईकुई चाललेली. तोच मळ्यातून मोठमोठ्यानं किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. गुरुचा रहाट जागीच थबकला. काय झाले काहीच कळायला मार्ग नव्हता. कुणीतरी बाई संकट ओढवल्यागत किंचाळत होती. गुरुने रहाटावरून धडकन खाली उडी टाकली व पांदळीकडे धावू लागला. पांदळीकडे नजर जाताच गुरुही चरकला. वरच्या वाडीतल्या जाधव मास्तरांची कॉलेजहून परतणारी पोरगी डोळ्यावर गॉगल लावून किंचाळत इकडे-तिकडे पळत होती. तीच्यासमोर उधळलेला मारकुट्या बैल मोठमोठ्यानं डरकाळ्या फोडत इकडे-तिकडे धावत होता. मध्येच झाडाला, बांधाला जोरदार ढूशा देत होता. पोरीची पुरती गाळणच उडाली. मास्तरांच्या पोरीने घातलेला लाल रंगाचा टाऊझर्स पाहून बैल चांगलाच बुजला होता. त्यामुळेच तो एकाएकी उधळला होता. गुरुनं प्रसंगावधान राखलं आणि धावत बैलाच्या मागे गेला. चपळाईने बैलाची वेसण धरली आणि त्याला काबूत आणला. दुसरीकडे मात्र  हातपाय गाळून मास्तरांची पोरगी आंब्याच्या झाडामागे गलितगात्र अवस्थेत पडली होती. गुरु पाटावर धावला. पाणी आणलं. सपासप तोंडावर मारलं. ती शुध्दीवर आली घटाघटा पाणी प्यायली. गुरुने आपली बैलगाडी काढली. तीला गाडीत बसवलं आणि घरी सोडलं. जाधव मास्तर घाबरलेच. म्हणाले, ‘‘पोरा होतास म्हणूनच रे पोर वाचली. कल्याण होवो तुझं...!’’  त्या दिवसापासून गुरुच्या कष्टाच्या दुनियेत प्रेमरुपी हळूवार भावनेने प्रवेश केला... तीला जागृती मिळाली. 
 वरच्या वाडीतल्या जाधव मास्तरांची एकुलती एक पोरगी म्हणजेच जयश्री. सारे तीला जयू म्हणतात. गाववाड्यांची शिक्षणगंगा केवळ दहावीच्या संगमावरचं अजून रखडलेली आहे. यातून खालच्या वाडीतला गुरू स्वकष्टानं एम. ए. पर्यंत शिकला तर मास्तरांची पोरगी म्हणून जयूचं कॉलेज सुरू आहे. उच्चशिक्षण घेणारी ही या गावची दोनचं पोरं. फार गोरीबिरी नव्हती; पण साधेपणातही देखणेपणा होता. कॉलेजला जाणारी पोरगी, त्यामुळे ती गावात उठून दिसायची. परिणामी गावातल्या बायकांमध्ये विशेषकरून खालच्या वाडीत तीच मुरडणं खुपायचं, ‘‘... ती जाधवाची पोर बघा, नटारंगी नार नुसती...’’ अशी हेटाळणी व्हायची. ‘त्या’ दिवशी बैलाच्या पराक्रमानंतर मात्र ती कायमची घाबरूनच वावरू लागली. दुपारी कॉलेजहून परतताना पांदळीत आली की, ‘‘ए गुरो...’’ करत मोठ्यानं हाक मारायची. तो बैल नसला तरी गुरु फिरत्या रहाटावरून झटकन उडी मारून तीच्यासमोर हजर होई. मग तीला कळळं, गुरूही एम्.ए. झालाय... जयूचं मोठं काम झालं. कॉलेजच्या नोट्स आणि प्रोजक्ट पूर्ण करायला जयूनं गुरुला गळ घातली. गुरुला तीचं मन मोडता आलं नाही. कधी बैलाच्या तर कधी नोट्सच्या निमित्ताने जयूला गुरूची मदत लागू लागली. इथेच गुरुचं चित्त भरकटू लागलं. वेळीअवेळी जयूची आठवण येऊ लागली. नोट्स काढता काढता तंद्री लागू लागली. वहीच्या शेवटच्या पानावर काहीबाही नावं, चारोळ्या उमटू लागल्या. शेतावरही गुरु पहाटेच जाऊ लागला. जयूनं हाक मारण्याआधीच पांदळीत उभा राहू लागला. गुरुच्या मनात जयू पुरती भरली. अगदी हृदयात घर करून बसली. कडधान्यांची विक्री आणि भाजीपाल्याचा हिशोबही त्यामुळे थोडाथोडा चुकू लागला. पाटाचं पाणीही कधीकधी भलतीकडे वाहू लागलं. कधी तंद्री लागायची की वांदरं मळ्यात कधी शिरली हेसुध्दा कळायचे नाही... एकंदरीत काय, गुरु अंतर्बाह्य प्रेमात बुडाला होता!
 गुरुची ही अस्वस्थता सर्वात आधी कुणाच्या लक्षात आली असेल तर ती आजी गौतमीच्या. तीच म्हणाली, ‘‘पोरा, लय कष्ट केेेेेेेलसं. या म्हातारीचा वसा तू पुढं चालवणार. आता लगन कर म्हणजे मी मरयाला मोकळी.’’ गुरु काहीच बोलला नाही; पण त्यावेळी त्याच्यासमोर मुर्ती उभी राहिली ती जयूचीच. उंच... मोकळे लांब केस...! गुरु खुदकन हसला.
  गुरुची ही प्रेमविव्हल अवस्था असतानाच दुसरीकडे सकाळी मळ्यातली शिंपणी तर कधी भाजीपाल्याची वाहतूक यात गुरुचा दिवस व्यापला जायचा. त्या गडबडीतही जयूला भेटायचं ही मनाची आस कायम असायची. रोज भेटणं-बोलणं व्हायचं; पण गुुरुच्या मनातली भावना ओठावर येत नव्हती. गुरुच्या कष्टाच्या यशस्वी प्रवासाला याचकाळात आणखी एका अमुल्य गोष्टीचं कोंदण लाभलं. ‘प्रगतीशिल युवा शेतकरी पुरस्कार’ हा जिल्हा परिषदेचा पन्नास हजाराचा पुरस्कार गुरुला जाहीर झाला आणि गुरुचं जीवनच बदलून गेलं. सर्वत्रच गुरुचा नावलौकिक होवू लागला. अभिनंदनाची पत्र येवू लागली. पेपराचे रकाने भरले. फोटोही छापून आले. धर्मीचा आनंद तर गगनात मावत नव्हता. गावातही गुरुचा डंका पिटू लागला. साक्षात जाधव मास्तरांनीे जेव्हा त्याचं कौतूक केलं तेव्हा त्याचा ऊर अभिमानानं भरून आला. एकंदरीत पुढचा मार्ग सुकर झाला याची त्याला खात्री पटली.
 पुरस्कारानं गुरु खूप मोठा झाला; पण मातला नाही. धर्मीनं गुरुच्या लग्नासाठी धोशा सुरू केला. ‘‘थांब गं आये...’’ असे मोघम उत्तर देवून तो विषय आवरता घेई. निदान जयूला विचारायला तरी हवे, मग घरी सांगावे असे गुरुने ठरवले. 
 एकेदिवशी मळ्यातच गुरुने जयूला गाठले... ‘‘जयू तुला काही सांगायचंय...’’
जयू काहीशी प्रश्नार्थक हसली.
‘‘काय रे एवढं काय सांगायचंय... सांग ना..’’
‘‘इथं नको, मळ्यात चल...’’
‘‘मळ्यात... कशाला?’’
‘‘चल ना...’’
दोघंही पांदळीतून पुढं सरकली.
‘‘जयू मी तुला कसा वाटतो?’’
जयू बुचकळ्यात पडली. तीला काहीच कळेेना.
‘‘... म्हणजेे एक नवरा म्हणू मी कसा वाटेन...?’’
जयू हसली.
‘‘ तूला कोण नाकारेल. माळावरचा मर्द गडी तू. तुझ्याकडे पाहूनच कॉलेजच्या पोरींना ठेस लागेल...’’
‘‘बस कर हं कौतूक...!’’
‘‘अरे खरंच. मी खोटं कशाला बोलू..’’ 
‘‘असं म्हणतेस, मग एक विचारु?’’
‘‘विचार नं...’’
‘‘तू करशील माझ्याशी लग्न...?’’
जयू क्षणभर थबकली. आपण काय ऐकतोय यावर तीचा विश्वासच बसेना. गुरुकडे पाठ करून ती मुक उभी राहिली.
‘‘घाई नाही, विचार करून सांग...’’- गुरु.
तरीही ती काही बोलली नाही. बराचवेळ दोघंही तशीच मुक उभी होती. गुरु पुढे झाला. मागून तीच्या खांद्यावर हात ठेवला. तेवढ्यात दुर्दैवाने त्या दिवशीच्या बैलाचे पुन्हा समोरच्या पारावरच तीला दर्शन झाले. त्याच्या हंबरण्याने ती बिथरलीच. ‘‘गुरु बैल आला...’’
 ती झरकन गुरुच्या मागे जात त्याच्या पाठीला बिलगली. गुरु तीची चेष्टा करत हसू लागला, मात्र आज तीचा स्पर्श त्याला वेगळाच जाणवला. प्रेमस्पर्शाची गुलाबी ऊब त्यात होती. जयुनं यावेळी असंच बिलगून रहावं...; पण त्या बैलानं शेतात घुसून वरणा खायला सुरूवात केली होती. गुरु चरफडत बाजूला झाला. हातात सोटा घेतला व तो बैलाच्या मागे धावू लागला...
  जयूला विचारल्यावर तीनं पाठ फिरवून लाजणं. बैलाच्या भितीचं नाटक करत हळूच बिलगणं... यावरूनच तीच्या होकाराचा बहाणा गुरु समजून गेला. प्रेमपाखरु मनरूपी हिंदोळ्यावर झोका घेवू लागलं. मन उधाण वार्‍यागत घोंघावू लागलं.. रापलेल्या गालावर हसू फुटलं... डोळ्यातही मिश्किल भाव दाटले...
 पुरस्कारामुळे गुरुची किर्ती वाडीवाडीवर पोचली. चांगला पोरगा आहे; पण अजून लग्नाचा आहे. अशी कुजबूज होवू लागली. गावातल्या बायका धर्मीला स्थळं सुचवू लागल्या. एकेदिवशी खालच्या वाडीतील चंद्रभागाकाकू धर्मीकडे प्रगटली, ‘‘धर्मे टोळवाडच्या गावकाराच्या पोरीला सून करुन घेतेस काय, चांगली कामाची पोर हाय... आंगानं पण धीट हाय...’’ धर्मीचा मनानं होकार होता; पण बोलली मात्र काहीच नाही. संध्याकाळी गुरु घरी येताच विषय कानावर घातला.  गुरुला कसे सांगावे... काय सांगावे? काहीच कळेना. शेवटी धाडस केलं आणि बोलला.
‘‘कुठची पोरगी, किती शिकल्येय...?’’ 
धर्मी हसू लागली, ‘‘शिकल्याली बायकू तुला रं काय करयाची? शेताच्या बांधावर र्‍हाणारा शेतकर्‍याचा पोर तू. गावकाराची पोर हाय, कामाला पण वाघ हाय..!’’
गुरुला चीड आली,‘‘छे गं आये, मी एवढे शिकलो, आणि माझी बायको अडाणी. कसं गं जमेल आमचं...? तू कशाला काळजी करतेस, मी पाहिलेय पोरगी...!’’ अखेर गुरुच्या तोंडावर आलेच.
‘‘कोण रं बाबा...? कुठची पोरगी...?’’ धर्मीनं श्वास रोखत विचारलं.
‘‘जयू...! वरच्या वाडीतल्या मास्तरांची पोरगी.’’
‘‘बापरे, ती रं तुला खयं गावली? ती तर गाव उंडगत असते...’’
धर्मीनं मारलेल्या शेर्‍याचा गुरुला राग आला, ‘‘काहीतरीच काय आये, ती शिकलेली तरी हाय माझ्यासारखी. आणि मास्तरांची पोरगी म्हणजे स्वभावानं, गुणानं चांगलीच असणार... नव्हे आहेच...’’ गुरूनं जयूची शिफारस केली.
 धर्मीच्या बोलण्यात आता काहीच अर्थच उरला नव्हता. जयूविषयी विशेषकरून वरच्या वाडीतल्या पोरींविषयी तीच्या मनात अढी असली तरी गुरु लग्नाला तयार झाला हीच गोष्ट तीच्यासाठी सुखावह होती. गौतमीला तर परमानंदच झाला. धर्मीनं चुलत्यांच्या कानावर लग्नाची गोष्ट घातली. चुलत्यांनीही हौसेनं पुढाकार घेत जाधव मास्तरांची भेट घेतली. विशेष म्हणजे तांब्यांच्या मागणीवर गावकीत कंदाल असतानाही जाधव मास्तरांनी अडकाठी केली नाही,‘‘गुरुसारखा जावय मला मिळतोय हे माझ्या पोरीचं भाग्य म्हणायला हवं. माझी कसलीच अडकाठी नाय, आणि गावकीला मी भीक घालीत नाय. माझी पोर मी गुरुला देण्यास राजी हाय, पर पोर अजून शिकतेय... अजून तीचं दिडदोन वर्ष बाकी आहे. लग्न केल्यावर तीचं शिक्षण पूर्ण करणार असलाव तर माझी काहीच अडचण नाही, उद्या लग्न लावून देतो; पण तसं जर जमणार नसलं तर मात्र गुरुला दोन वर्ष थांबाव लागलं. आता गुरुवर हाय माझा विश्वास. तो नाय तीला शिकविल्याशिवाय रहायचा; पण घरच्यांच्या दबावाखाली नको ते घडतं, म्हणून आधीच बोललेलं बरं...’’ जाधव मास्तरांनी स्पष्टच सांगितले. चुलते मात्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. सून घरात येवनं शेताच्या बांधावर जाण्याऐवजी लिवणं-वाचणं करीत राहणार ही गोष्ट चुलत्यानांच काय धर्मीच्याही मनात बसणारी नव्हती. चुलते कोणतीच ठोस भूमिका न घेता घरी आले, सारा प्रकार धर्मीला सांगितला. धर्मीनं एका झटक्यात नकार दिला, ‘‘नाय म्हणजे नायच, लिवणं- वाचणं बाईच्या जातीला नाय जमायचं...’’ गुरु काहीच बोलत नव्हता. शांतपणे मान खाली घालून ढिम्म उभा होता. अखेर चुलत्यांनी आपला मोर्चा गुरूकडे वळवला. ‘‘गुरु तूच सांग आता काय करयाचं तं... शिकणारी सून कशी परवडलं या शेतकर्‍याच्या घरात...?’’
‘‘का नाही चालणार? ती काय कायमची शिकत राहणार आहे, दोन वर्षाचा तर प्रश्न आहे. उलट माझा बाजाराचा व्याप वाढलाय. त्यासाठी शिकलेल्याच माणसाची गरज आहे. नुसतं ओझं वाहणारी बाई काय कामाची?’’ गुरुने कोंडी फोडली. चुलते गपगार झाले. 
 धर्मी घरात जावून पुटपूटू लागली, ‘‘काय मेलीनं माझ्या पोरावर जादू केलान देवजाणं...’’ 
‘‘काहीही होवो, मला जयूशीच लग्न करायचंय...’’ गुरुनंही तीच्या बोलण्यावर प्रतित्यूर दिलं.
 पुढे मात्र कुणीच काही बोललं नाही. पोरगा वेडंवाकडं काही पाऊल टाकेल या भितीने धर्मीही गप्प राहिली. मियॉ बिबी राजी तो क्या करे काजी? म्हणत सार्‍यांनी लग्नाला मुकसंमती दिली. पुन्हा चुलत्यांनी मास्तरांकडे कबुलीचा निरोप पोचवला. गुरुही खुश झाला. गुरुला पुरस्कार मिळाल्याने जयूही खुश होती. त्यादिवशी गुरुने तीला प्रपोझ केल्यावरही ती नाही म्हणू शकली नाही; पण गुरु थेट घरीच येऊन मागणी घालेल हे तीला खरेच वाटेना. संध्याकाळीच जयूने काहीशा अस्वस्थपणे ते बोलून दाखविले, ‘‘गुरु एवढा बहाद्दर असशील असं वाटलं नव्हतं, थेट बाबांनाच विचारायंच धाडस केलसं...’’
गुरु हसला.
‘‘ तू खुश आहेस ना...?’’ गुरु तीच्या जवळ येत म्हणाला.
‘‘ए थांब थांब, जवळ येऊ नकोस. अडचण आहे...’’ 
गुरू हिरमुसत तिथेच थबकला.
‘‘मला नव्हतं रे एवढ्यात लग्नबिग्न करायचं...’’
‘‘शिकण्यासाठीच ना... चिंता नको गं करूस. लग्न झाल्यानंतर तुझं एम्. ए. च शिक्षण पुर्ण होईल, मी आहे ना...’’
‘‘तसं नव्हे रे..’’ 
‘‘... मग कसं, माय स्वीटहार्ट...! ’’ झरकन गुरुनं तीला जवळ घेतलं. त्याक्षणी दोघंही बोलणं विसरून गेली...
               ...........................................

 .... काही दिवसातचं जाधव मास्तरांकडून धर्मीला ‘पोरगी पहायला’ येण्याचा निरोप आला होता. त्या निरोपासरशी सारी धावाधाव करत धर्मीनं तयारी केली होती. घरातून बाहेर पडणार तोच वरच्या वाडीतून तातूभाऊ निरोप घेवून थडकला होता, ‘‘पोरीला अडचण आली...’’
 सार्‍यांनीच त्या निरोपावर विश्वास ठेवला; पण गुरुच्या मनात मात्र शंकेच काहूर उठलं. त्याला आठवली ‘त्या’ दिवशीची संध्याकाळची भेट... ‘त्या दिवशीही जयूने अडचण असल्याचे कारण सांगत जवळ येण्यास रोखले होते, मात्र ते आपण मानलेच नाही. उलट...’  गुरुच्या गालावर त्या आठवणीने खळी फुटली. क्षणभरच ते स्मित टिकले, कारण ‘अडचण’ महिन्यातून एकदा येईल, दोनदा कशी येईल? या शंकेवरचा विश्वास अधिकच दृढ झाला. पंचात मोडल्यानंतर जयूही कोठेच दिसली नाही. त्यामुळे खरे काय कळायला मार्ग नव्हता. पंचात पुढे ढकलली म्हणून गावातही कुजबूज होवू लागली. सुरूवातीलाच विघ्न आलं म्हणून धर्मीही जयूवर शेरेबाजी करू लागली. गुरुच्याही मनात चलबिचल वाढली. जयू आजारी असल्याचीही बातमी त्याला मिळाली. शेवटी गुरुने जयूच्या घरी जायचं ठरवलं; पण त्याचदुपारी वरच्या वाडीतल्या पोरांकरवी गुपचूप चिठ्ठी गुरुच्या हातात पडली.
 ‘‘गुरु मला माफ कर. तू मला खूप मदत केेेलीस, म्हणून तुझ्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणत गेले. मला तूला नाराज करणं फार जीवावर आलं होतं. मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. प्लीज मला समजून घे... आणि मला यापुढे भेटूही नकोस... स्वारी...’’ चिठ्ठी वाचून गुरुच्या हृदयाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या. ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचली; पण वाक्य तीच होती हृदयाला भोकं पाडणारी... घशाला कोरड पडली. जयूनं दिलेला हा हादरा गुरुला असह्य वेदना देणारा होता. त्याला काहीच कळेना, का असे केलें असेल? असं फसवायचं होतं  तर अशी जवळ आलीच का? आणि आलीस तर मग अशी हृदयात तरी का जावून बसलीस? काय सांगू घरी... आणि कोणत्या तोंडानं सांगू? केवळ आणि केवळ तुझ्यासाठीच मी हट्ट धरला होता... जयू भावनांशी खेळलीस माझ्या... कुणी दिला हा अधिकार तुला? गुरु अक्षरश: घायाळ होत होता, मात्र गुरुच्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे जयूशिवाय मिळणे कठीण होते.
 वारं सुटल्यावर केंमरं सुटायला वेळ लागत नाही. मोडलेल्या पंचातीची वाडीत कुजबूज सुरू झाली. जाधवांची पोर दुसर्‍याच कुणाबरोबर तरी पळून गेली... ही वार्ता दबक्या आवाजात सर्वत्र पसरली. गुरुच्या दुर्दैवाने ती खरी होती. धर्मीनं मात्र ‘बरं झालं...’ म्हणत सुटकेचा श्वास सोडला. गुरु दुखावेल म्हणून कुणी काही बोलत नसले तरी सर्वांची नजर गुरुला डागण्या देत होती. पंचातीच्या दिवशी जयू स्टॉपवर उभी असल्याचे आप्पा तोरसकराने पाहिले होते. त्या गोष्टीचा उलगडा गुरुला आता झाला...
 हा हा म्हणता महिना उलटला. मनानं खचलेल्या गुरुनं लग्न या विषयाचा पुरता धसकाच घेतला. कसातरी शेतात, बाजारात जायचा; पण मनचं लागायचं नाही. त्या परिस्थितीत कृषी पुरस्काराचेही वितरण झाले, गुरु गेलाच नाही. धर्मी आणि चुलते गेले पुरस्कार घ्यायला. अनेक अभिनंदन लेखही गुरुवर छापून आले. मात्र त्याला कशाचेच कौतूक उरले नव्हते. मनातल्या मनात तो कुढत राहिला... रडत राहिला... एकेदिवशी बातमी फुटली... ‘बापाचा आशिर्वाद घ्यायला नवं जोडं वाडीत आलंयं... ’ पुन्हा स्थिरावलेलं गुरुचं मन उफाळून आलं. गुरुनं गावातल्या पोरांकरवी गुपचूप जयूला चिठ्ठी पाठवली, ‘... ताबडतोब आज संध्याकाळी मळ्यात भेट, अन्यथा घरी येईन. घाबरू नकोस, एकटीच ये...’
 जयूचे लग्न झाले होते.  तीचा नवरा कुठल्याशा खासगी कंपनीत मॅनेजर होता. कॉलेजला असतानाच ती त्याच्या गळाला लागली असावी. अर्थात लग्न पळून, धक्कातंत्राचा वापर करत केलं. गुरुच्या पंचातीच्या दुसर्‍या दिवशी लग्न झालं. आदल्या दिवशी सकाळीच जयू घरातून पळून गेली होती. तीची पसंती जाधव मास्तरांना मान्य नव्हतीच शिवाय आदल्या रात्री दोघाचं भांडण झालं होतं. जयू आता सर्वस्वी दुसर्‍याची झाली होती. गुरुनेही ते मान्य केलं होतं. तीच्याविषयी राग, द्वेष काहीच गुरुने मनात ठेवला नव्हता. तरीही मनात अस्वस्थता होती. ‘जयूला माझ्यात काय उणीव आढळली...?’ ही सल तेवढी सलत होती.
 ...नवीकोरी भरजरी साडी, कानात, गळ्यात भरगच्च दागिने, गळ्यात ठसठशीत मंगळसुत्र... जयू या संध्यासमयी छानच दिसत होती. पायातील पैंजणाच्या आवाजाने गुरुला जयू आल्याची चाहूल लागली. तीला पाहताच गुरु पाळंदीतून पुढे झाला... मागून जयूही पुढे सरकली...
  ‘‘कशाला बोलवलंस? लवकर बोल... संध्याकाळ होतेय, मला उशीर होतोय...’’ जयूने गुरगुरत गुरुला सवाल केला.
 गुरुने तो प्रश्न टाळला, ‘‘कशी आहेस?’’
‘‘मी मजेत, तू कसा आहेस...?’’
‘‘हा प्रश्न तू तुझ्या मनालाच विचार ना...?’’ गुरुही गुरगुरला.
‘‘स्वारी नं गुरु... आता विसर नं ते...’’
‘‘मी ते केव्हाच विसरलोय, तरीही एका प्रश्नांच उत्तर हवयं... माझ्यात अशी काय उणिव होती की, तू मला नाकारलंस...?’’
जयू शांतपणे उभी राहिली. बराचवेळ...
‘‘जयू मला उत्तर हवयं...’’ गुरुने इशारा दिला.
‘‘गुरु तू दिसायला स्मार्ट आहेस... हुशार, कष्टाळू आहेस; पण तुझ्या त्या गावठी जगण्यात मला इंटरेस्टच नव्हता रे... तुझी ती गुरंढोरं... शेतीवाडी आणि शेणामातीत जगण्याचा मला फार उबग यायचा. तुझ्याशी लग्न करून मला काय मिळालं असतं... ना गाडी, ना बंगला... आधी मला वाटलं तुला पुरस्कार मिळाला म्हणजे सरकारी नोकरीच मिळाली; पण कसलं काय... तुझ्याशी लग्न म्हणजे शेतकर्‍याच्या पोराशी लग्न... ते तर मला अजिबात नको होतं. माझ्याही काही इच्छा, आकांक्षा आहेतच ना, आणि मला नाही वाटलं शेताच्या बांधावर राबत, रहाटाच्या पाण्यावर हिंदकाळत... उन्हातानातून गोफण फिरवत त्या पूर्ण होतील... तुला भले पुरस्कार मिळो; पण शेतकर्‍याच्या पोराशी लग्न नको... अशा लग्नात मला कसलाच रोमॅण्टिकपणा दिसत नाही. तिथं केवळ कष्ट.. कष्ट... आणि कष्टच. तरीही भविष्याची चिंता संपायची चिन्हे नाहीत...’’
 ‘‘बस कर जयू...’’ 
गुरु संतापाने किंचाळलाच. हातपाय रागानं सणकू लागले होते. जयूच्या एक कानाखाली लावून द्यावी, असे वाटले होते; पण सारा संताप गिळत तो मुठी आवळत उभा होता...
 ‘‘होय, मी आहे शेतकर्‍याचा पोर, कष्ट करतो. स्व कष्टाचं खातो. कुणाची हुजरेगिरी नाही करत... जयू चालती हो इथून... क्षणभरही माझ्यासमोर उभी राहू नकोस...’’ गुरुचा रुद्रावतार पाहूनचं जयूनं घरची वाट धरली होती... जयू गेली खरी; पण जाताना नव्या वास्तवाची जाण गुरुला करून दिली...


   

लेखकाचे नाव-  अमोल अनंत पालये.
                        मु. पो.- सडये, पिरंदवणे.
                        ता. जि.- रत्नागिरी.
                        पिनकोड- 415617.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू