जाग


प्रकल्पाच्या भूसंपादनाचा पहिलाच दिवस होता. श्रीपतला सुट्टी होती. रोज गुरं घेऊन जाणार्‍या बापाला आज बर्‍याच दिवसानंतर श्रीपतने सांगितलं, ‘‘म्हातार्‍या आज शेतावर तू नको जाव. माझी सुट्टी हाय, मी चाललंय...’’ बापाला जरा बरं वाटलं. खरेतर गुरे घेवून जायची त्याला इच्छाच नव्हती; पण ‘म्हातार्‍याला जर कळलं आज  जम्मनीची मापणी हाय तर म्हातारा  गोंधळ घालील. त्यात सारे गावकरी अक्षरश: संतापलेले. काहीतरी कंदाल होण्यापेक्षा आपणच शेतावर गेलेले बरे...’ या विचारानं श्रीपत शेतावर गेला. गावात वातावरण तापलेलं, आदल्या रात्री सार्‍या गावाची गावकी मध्यरात्रीपर्यंत चालू होती. गावकीत जोराची सनसनी झाली. उभ्या गावकीत प्रकल्पावरून आडवी फुट पडली. अर्धे गावकरी प्रकल्प नको म्हणून पेटून उठले होते, तर काही प्रकल्प हवा म्हणून पुटपुटत होते. त्यावरून वादावादीही झाली. जमिनी जाणार म्हणून ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याइतपत वेळ आली. त्यामुळे आज नक्कीच काहीतरी कंदाल होणार याची श्रीपतला कल्पना आलीच होती. अगदी तस्संच झालं.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल सात-आठ गाड्या सारं रान तुडवीत गावठाणात घुसल्या... गावठाणात हा हा म्हणता बातमी पसरली, कुणीतरी सांगितलं, ‘‘अरं चला. तोंडा काय बघताव? कंपनीची माणसा शिरली कुर्याटात... आणि सतीचा चौथरा फोडला... हे ऐकताच लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. सारी बाया-बापडी शेताकडं धावू लागली, रागाच्या भरात  प्रत्येकानं हाताला मिळालं ते शस्त्र घेतलं होतं... तीन-चारशेंचा जमाव धावत येतानाच पाहून कंपनीवाले गडबडले. शिव्यांच्या लाखोल्यात मागचा पुढचा विचार न करता गावकर्‍यांनी तुफान दगडफेक केेेेेेेेेेली. खचाखच गाड्यांच्या काचा फुटल्या. सारे गावकरी अधिकार्‍यांशी कचाकचा भांडू लागले. वातावरण चिघळू लागलं होतं. त्यात गावचा सरपंच आणि श्रीपतसारखे काही भिडू सरुवातीपासूनच कंपनीच्या गोटात गेले होते. प्रकल्पसमर्थक मंडळी शांतपणे सारी मजा पाहत होती; मात्र अर्धे गावकरी संतापले होते. हातघाईवरून एकमेकांची कॉलर धरण्यापर्यत प्रकरण जाताच राँग राँग करत पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलिसांनी आक्रमक ग्रामस्थांना थोपविण्यासाठी हवेत गोळीबार करताच गावकरीही पेटले. सार्‍या माळरानात गावकर्‍यांची धरपकड अन् धावाधाव सुरू झाली. त्या संधीचा फायदा घेत कुणीतरी विरोधकांन श्रीपतच्या शेतातलं खोपटं पेटवलं... 
 ‘‘आरं, बंड्या  मुडदं श्यात बळकावाया आलं बघ... आरं श्यात आणि तुझं खोपाट पोलिसांनी जाळलं रे...’’ श्रीपतच्या बापाला कुणीतरी लांबूनच ओरडत ही बातमी सांगितली अजूनपर्यत कशाचाच पत्ता नसलेल्या म्हातार्‍याच्या अंगाचा तीळपापडच झाला. संतापलेला म्हातारा बंड्या अंगात त्राण नसतानाही बोंबा मारत शेताकडं धावत सुटला; पण एव्हाना अर्ध शेत आणि खोपट्याची राखरांगोळी झाली होती. बंड्याला हे सारं डोळ्यापुढं बघवेेना. तो तडक भडकणार्‍या आगीच्या दिशेने धावत निघाला, ‘‘मेल्याचं वाटोळं झालं नाय तं... चालतं व्हा माझ्या आगरातनं...’’  म्हातारा टाहो फोडत बोंबलत होता, बाप धावत असताना खालून श्रीपत धावत आला व बापाला थोपवू लागला; पण शेताची अवस्था बघून बापाचं अवसानच गळून गेलं. संताप, चीड उफाळून आली... डोळ्यादेखत जीवापाड जपलेलं शेत जळताना पाहून जीव गुदमरू लागला... डोळ्यासमोर अंधारी आली... खेळ संपला होता. बोंब मारत घायाकुतीला आलेल्या बंड्याच्या शरीरातून प्राण निघून गेला होता.
 ‘त्या’ दिवशी पेटलेलं आंदोलन, गावकरी, पुढार्‍यांची झालेली धरपकड... सारंच अचानक घडलं. भूसंपादनाच्यावेळी प्रशासनानं काही काळ नमतं घेतलं. जिल्हाधिकार्‍यांनी त्याचवेळी भूसंपादन स्थगितीचा आदेश दिला होता.  वातावरण निवळावं म्हणून पुढार्‍यांना, गावकर्‍यांना सोडण्यात आलं होतं. त्यानंतर गावही थोडसं निवळलं; पण सार्‍या गावात वादळापूर्वीची शांतता पसरलेेेेेली होती. कधी संतापाचा भडका उडेल हे सांगता येत नव्हते. पेपराचे रकानेच्या रकाने भरून येत होते. गावकरी गटा-गटाने बोलत असत; पण एक होतील तो गाव कसला. त्या आंदोलनानंतर लोक एकत्र येण्याऐवजी त्यांच्यातच कंदाल होवू लागली. भूसंपादनाच्या दिवशी जी जाळपोळ झाली ती पोलिस किंवा कंपनी प्रशासनामुळे नव्हे तर श्रीपतसारखे गावकरी कंपनीला मिळाले  म्हणून रागातून गावतल्याच पोरांनी श्रीपतचं रान पेटवून दिलं होतं. वर्तमानपत्रातून या गोष्टी चव्हाट्यावर येताच गावात एक गाव- बारा भानगडी अशी स्थिती निर्माण झाली. प्रकल्पाविरोधात लढायचं राहिलं बाजूला इथं गावकर्‍यांमध्येच धुसफुस सुरू झाली. आपला बाप भूसंपादनाच्या धक्याने नव्हे तर शेत जाळलं या धक्याने मेला ही वस्तूस्थिती श्रीपतलाही माहिती होती, मात्र या गोष्टीचं त्याने भांडवल केलं नाही. अर्थात त्यात त्याचा स्वार्थही दडला होता.
  पंचक्रोशीत आलेल्या नव्या संकटाने आता जूनी खोडंही बोलायला लागली होती, ‘‘मेल्यांच्या पोटावर चेपायला आमच्या जम्मनी घ्यायला आलायंत मोठ्ठं... हात लावून तर बघा नाय एकेकाच्या नरडीचा घोट घेतला तर...’’ तीव्र संतापानं चिडलेल्या म्हातार्‍या बायका बोलता बोलता मात्र मुळूमुळू रडू लागत.
 गाव सुखासमाधानानं नांदत होेेेेेेेेेतं. बारा बलुतेदारी जरी संपली असली तरी बलुतेदारीच्या खुणा गावात दिसत होत्या. गावात तशा कोणत्या सोयीसुविधा नसल्या तरी गाव खावूनपिवून सुखी होतं. अशातच गावावर दृष्ट पडली... गावकर्‍यांच्या दारावर धडाधड नोटीसा चिकटल्या आणि अडाणी बिचार्‍या गावकर्‍यांची बोबडीच वळली. गावात म्हणे कसलासा प्रकल्प येतोय आणि त्यासाठी आमच्या जमिनी हव्यात म्हणे सरकारला.. ग्रामपंचायतीने सभा बोलावली होती. लोकांना सांगायला; पण कसली सभा अन् कसलं काय. गावकर्‍यांना माहितीच नाय... नोटीशीवर भूसंपादनाची तारीख पाहून पायाखालची जमीनच सरकली.
 श्रीपत आपल्या बापाला म्हणाला, ‘‘म्हातार्‍या आपलं कुर्याटातलं सम्द शेतं कंपनीला दिलं तर बक्कळ पैसा मिळलं... कायमची दगदग जायलं...’’ श्रीपतचे  बोल ऐकताच बापाच्या सुरकूतलेल्या तोंडावर भयानक संताप साठला, ‘‘पोरा काय बोलतुयास, डोकं ठिकाणावर हाय काय भोसडीच्या? मला इच्यारल्याबिगर सगळं करयाला निगालास... आरं शेतकर्‍याची अवलाद हायेस का सैतान?’’ असा सुरू झालेला वाद इतका वाढला की श्रीपतच्या बापाच्या जीवावर उठला.
 श्रीपत काय किंवा सरपंच काय, सारेच कंपनीला मिळाले होते. यामुळे गावकर्‍यातं असंतोष अधिकच खदखदत होता. पोरगाच कंपनीच्या गोटात गेेल्याने ‘एक गावकरी भूसंपादनाच्या धक्यानं मेला...’ याचा कुणी फायद्यासाठी गवगवा केला नाही. श्रीपतसारखे अन्य गावकरीही होते. त्यांच्या गप्पाही ऐन रंगात येत, ‘‘आयला, पहिली नॅनो मीच आणणार...!’’ श्रीपतही मग सांगे, ‘‘आरं कदाचित आपली घरंदारंही जातील. मग सरकार आपलं नव्या जागेत पुनर्वसन बी करलं... या वसाड गावात र्‍हाण्यापेक्षा नव्या ठिकाणी बरचं होईल...’’ त्यातलाच एखादा शहाणा सांगे, ‘‘आरं कंपनी आपल्याला बक्कळ पैसा देल; पण ता किती दिवस पुरयाचा? आणि एकदा आपलं प्वॉट भरणारं श्यातच गेलं तर पिकवायचं काय अन् खायाचं काय?’’ त्या शहाण्याला मग सारेच गप्प करत, ‘‘आरं गप की, शुभ बोल नार्‍या तं नार्‍या म्हणे मांडवाला आग लागली... प्रकल्प होणारच, झालाच पाहिजे...!’’
 बाप मेला, मार्गातला काटा गेला; पण बाप होता तोपर्यत सारा कारभार सांभाळून होता. आता श्रीपतला नोकरी सांभाळून सारं करावं लागे. त्यात गुरं चरावयास सोडणं, त्यांचा शेणगोठा शिवाय शेतीवाडी... हे सारं सांभाळणं श्रीपतच्या डोक्याचा तापच होवून बसला. त्यामुळे शेत प्रकल्पात गेलं की गुरं विकायची असं श्रीपतने ठरवलं. श्रीपत प्रकल्पाच्या बाजूने म्हणून त्याला कुणी मदतही करेना. यावर्षीच काय ते शेत करायचं आणि पुढच्या वर्षी शेताला रामराम करायचा असं  ठरवून श्रीपत शेताच्या कामाला लागला. आंदोलनात सारं शेत जळलं होतं. त्यामुळे श्रीपतला कवळ न तोडताच शेताची आयती भाजावळ करून मिळाली होती. बाप मेल्यावर श्रीपतला कंपनीकडून मदतीचा ओघ वाहत आला. त्यामुळे प्रकल्प कधी येणार? याकडे त्याचे डोळे लागले होते. 
 दिवस झरझर सरकत होते. मेघ भरून आले. रिमझिम धारांनी मृगाचा पाऊस सुरू झाला. सार्‍या माळव्याची  श्रीपतने नांगरणी करुन हळवं भात पेरलं. कोंबरी फुटली. भात लावणीला आलं. लोकं आपापल्या शेतात गुंतली. कुणी मदतीला येत नाही पाहून श्रीपतने स्वत:च बायको पोरांसह लावणीला सुरूवात केली. लावणीच्या वेळी काळवंडलेलं शेत श्रावणाच्या पावसात तरारुन आलं. एकेक आवा मुठीमुठीचा झाला. शेत वाढलं. हा.. हा.. म्हणता फोफावलं. श्रावण, भाद्रपद, आश्विन सरला. श्रीपतला भात पाहूनच भरून येत होतं. एकेक लोंबी झुपकेदार झाली होती. डोलणार्‍या शेतातून जणू श्रीपतचा बापच हसत होता. कामधंद्यावर  जाता-जाता श्रीपत एखादी फेरी शेतावर मारे. मध्येच प्रकल्पाविषयी बातम्या कानावर येत, त्या ऐकून श्रीपत सुखावून जाई...
         ...................................................

  हळव्या भातानं चांगलीच बोहनी केली होती. शेत कापायलाच झालं होतं.  श्रीपत दिवसा बायकोला शेतावर राखणीला पाठवू लागला, तर रात्री स्वत: जाई. बापाचं खोपटं जळलं म्हणून सतीच्या पारावर झोपे. शेताच्या मंद वार्‍यात त्याला छान झोप लागे...
    ... शेताभोवती पाखरं घिरट्या घालू लागली होती. बुजगावणं करूनही दाद देईनात. उन रणरणत होतं. आंबील-भात खाऊन श्रीपत विसावला होता. तेवढ्यात कसलीतरी धडधड ऐकू आली. श्रीपतला वाटले, विमान-बिमान असेल. हळूहळू आवाज मोठ्याने येऊ लागला. एक अजस्त्र बुलडोझर कुर्याटात शिरला होता. उभ्या पिकाला आडवं करत होता. आपल्या हिंस्त्र दातांनी सारं ओरबाडत होता. श्रीपतचं अवसानचं गळालं. सैरावैरा धावत बुलडोझरच्या आडवा गेला. मात्र बुलडोझरचं ते आक्राळ-विक्राळ धुड थांबायला तयारच नव्हतं. श्रीपत मोठमोठ्यानं बोंबलत होता. दयेची भीक मागत होेता; पण बुलडोझर पुढेच सरकत होता. अखेर श्रीपत बुलडोझरच्या पुढ्यात आडवाच झोपला. बुलडोझरने आपल्या हिंस्त्र दातांचा फणा श्रीपतवर उगारला. तो दाता मस्तकावर आदळताच....
 श्रीपत स्वप्नातून जागा होत मोठमोठ्यानं खर्‍या बोंबा मारू लागला. मात्र त्या ऐकण्याआधीच सारं गाव झोपेत गुडूप झालं होतं. दरदरून घाम फुटलेल्या श्रीपतला नंतर मात्र झोप लागलीच नाही!
 पहाटेच हातात विळा घेतला अन् सरसर शेत कापायला घेतलं.. अंगणात भाताच्या भार्‍यांचे ढिगच्या ढिग लागले होते. गावकर्‍यांना बोलावूनही कुणी कामाला येईना म्हणून श्रीपतने स्वत:च मळणीला सुरुवात केली; पण भात काही आटपेनाच. श्रीपतने युक्ती केली. वाडीतनं 10-12 बाटल्या दारु आणली. गावातल्या गड्यांना दिली. गडी खुष! सारे मळणीला आले. मळणीत रंग भरु लागला. बेवडे बोल घुमू लागले. ‘अरे वैत वैत...’ स्वर सापडला, ‘‘सुपारी खाल्ली रंग नाय.. रंग नाय... तुुुंबडी भरून दे दादा... लवकर दे दादा...’ मळणीच्या जुन्या गाण्यात भाताच्या भार्‍यांचा तणारा खाली होवू लागला. भाताची रास धम्मक पिवळ्या सोन्याप्रमाणं दिसू लागली. किती दमला होता श्रीपत; पण ती भाताची रास पाहूनच त्याचा दम कुठल्या कुठे पळून गेला. उर आनंदाने भरुन आला होता. पावशेरने सार्‍यांना बेभान केले होते. श्रीपत तेवढा शुध्दीवर होता. श्रीपतच्या प्रत्येक आयंड्याला भात खळ्ळंकन खाली पडत होेतं. ‘‘... आयला काय लोंबार हाय, सोनेरी झुंबरावानी! पुढच्या येळंला ह्येच बियाणं करयाचं...’’ श्रीपत मोठ्या उत्साहानं बोलला. तेवढ्यात बेवड्यातल्या एका शहाण्यानं श्रीपतला वास्तवात आणलं, ‘‘आरं पण पुढल्या खेपेला आपलं शेत कुठं र्‍हाणार हाय? तिथं तर कंपनीची धुर सोडणारी चिमणी असणार हाय...’’ त्या बेवड्यानं श्रीपतला गपगार केल; पण तो काहीवेळच गप्प राहिला, ‘‘आनं मी श्यात कुठं पिकवू?... हि ढिगांनी येणारी लक्षुमी मी पुढल्या येळंला कुठनं आणू? हे माड, त्यांचे नारळ, सुपार्‍या, कोकमं, काजू, आंबे कोण देईल मला? नाय बा माझ्यानं तसलं पाप होणारच नाय...’’ मळणी गती घेत होती, त्यापेक्षा अधिक गतीनं श्रीपतचं मन परिवर्तनाकडे धावत होतं. ‘‘या या लक्ष्मीला मी नाय घालवणार... नाय नाय मी तीची पुजाच करीन! माझ्या पोटावर धोंडा पाडून नाय घ्यायाचा माला...’’ श्रीपतची आयंड्याभोवतीची मुठ आवळली होती... वज्रनिर्धार झाला होता.
 मळणी झाली. भाताच्या राशीचा ढीग श्रीपतच्या उंचीपेक्षा मोठा झाला. मन मोकळं झालं. सुखात आनंदून निघालं. काही दिवसातच प्रकल्पाविरोधात शमलेलं आंदोलन जागं करण्यासाठी जागा झालेल्या श्रीपतने गावकी बोलावली. आता श्रीपत नव्या लढ्याचं नेतृत्व करणार होता. प्रकल्प हटविण्यासाठी स्वत: लढणार होता.



लेखकाचे नाव- अमोल अनंत पालये.
                 मु. पो.- सडये, पिरंदवणे.
                 ता. जि.- रत्नागिरी.
                 पिनकोड- 415617.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू