जाग

प्र कल्पाच्या भूसंपादनाचा पहिलाच दिवस होता. श्रीपतला सुट्टी होती. रोज गुरं घेऊन जाणार्या बापाला आज बर्याच दिवसानंतर श्रीपतने सांगितलं, ‘‘म्हातार्या आज शेतावर तू नको जाव. माझी सुट्टी हाय, मी चाललंय...’’ बापाला जरा बरं वाटलं. खरेतर गुरे घेवून जायची त्याला इच्छाच नव्हती; पण ‘म्हातार्याला जर कळलं आज जम्मनीची मापणी हाय तर म्हातारा गोंधळ घालील. त्यात सारे गावकरी अक्षरश: संतापलेले. काहीतरी कंदाल होण्यापेक्षा आपणच शेतावर गेलेले बरे...’ या विचारानं श्रीपत शेतावर गेला. गावात वातावरण तापलेलं, आदल्या रात्री सार्या गावाची गावकी मध्यरात्रीपर्यंत चालू होती. गावकीत जोराची सनसनी झाली. उभ्या गावकीत प्रकल्पावरून आडवी फुट पडली. अर्धे गावकरी प्रकल्प नको म्हणून पेटून उठले होते, तर काही प्रकल्प हवा म्हणून पुटपुटत होते. त्यावरून वादावादीही झाली. जमिनी जाणार म्हणून ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याइतपत वेळ आली. त्यामुळे आज नक्कीच काहीतरी कंदाल होणार याची श्रीपतला कल्पना आलीच होती. अगदी तस्संच झालं. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल सात-आठ गाड्या सारं रान तुडवीत गावठाणात घुसल्या... गावठाणात हा हा ...