गावकीच्या पारावरून..!
नमस्कार मंडळी!
गाव म्हटलं की गावात गावकी येते.. गावकी आली की गावकीचा पार हा आलाच. गावकीचा पार हे गावकर्याचं जणू तीर्थक्षेत्रचं आहे. गावातला प्रत्येकजण दिवसातून एकदा तरी गावकीच्या पारावर चरणधुळ घालतोच. हा पार अत्यंत सार्वजनिक.. त्यामुळे त्याच्याठायी सार्यांना आसरा मिळतो. सबब तो दिवसच काय रात्रीचाही गजबजलेला असतो.
गावातली प्रत्येक बित्तंबातमी या पारावर प्रथम येते, आणि वार्यासारखी गावात पसरते. प्रत्येक बातमीची या पारावर सपट परिवार महाचर्चेप्रमाणे सखोल चर्चा होते.. ते धागेदोरे.. सारे पुरावे.. यावर जोरदार घमासान.. आणि कुजबूज होत असते. गावाची सुख आणि दु:ख मांडणारा गावकीचा पार एक प्रतिनिधी आहे. गाव जाणून घ्यायचा तर आधी पारावर जायलाच हवं. गावात कोण आजारी आहे.. मग त्याच्या तब्बेतीत सुधारणा आहे काय..? याची बातमी सर्वात आधी मिळेल ती पारावरच! कुणाचं लग्न ठरतंय, आणि कोणाचं लग्न का मोडलं..? तेही सविस्तर ऐकायला मिळेल ते पारावरच! काल रात्री परबीनीकडे कोण आलं होतं..? आणि आज कोणाकडे बायांचं भजन आहे.. आणि उद्या कोणाकडे कोंबडा कापला जाणार आहे.. बबन आज शाळेत का गेला नाही..? नंदी गुरवीनीच्या घरात काल काय कंदाल पेटली होती..? रवळनाथाची राखण कधी आहे..? कुणी कसला गणपती बनवायला दिला..? भात कापून झालं काय..? अशा गुगलवरही न मिळणार्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पारावर मिळतील.. असा हा गावगाड्याचं अविभाज्य अंग असलेला गावकीचा पार आहे.
हा ब्लॉग म्हणजे असाच एक गावकीचा पार आहे. गावातील माणसाचं.. तेथील सुख-दु:खाचं तो प्रतिनिधीत्व करतोय. तेथल्या प्रथा-परंपरा, लोककला, आणि रोजचा गावगाडा आहे तरी कसा..? हेच येथे कथारूप मांडत आहे. आपण सर्व वाचकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, आणि आपल्या प्रतिक्रीया जरूर कळवाव्या..!
आपला-
अमोल पालये.
सडये-पिरंदवणे.
(रत्नागिरी.)
Comments
Post a Comment