पुन्हा नव्यानं..

सीन सैराट: 
आर्चीचा उद्वेग होतो आणि ती पर्शाला म्हणते, 
‘‘ पर्शा, झक मारली आणि तुझ्याबरोबर आले, असं आता वाटून राह्यलंय...’’ 
असाच उद्वेग त्यांच्या मनात तीन महिनाभरापूर्वी आला आणि ती त्याला म्हणाली... 
‘‘गेलास उडत...’’
मग तोही म्हणाला,‘‘अरे जा जा... तुझ्यासारख्या छप्पन भेटतील...’’
‘‘भेटतील ना? मग जा ना... वाट कसली बघतोस, शेवटी माझ्यासारख्याच हव्या ना...’’
त्यांच्या आयुष्यात असा हा जोरदार भुकंप झाला... 
आता या गोष्टीला तीन महिने उलटले. दोघांची भेट नाही. संवाद नाही, आणि साधं दर्शनही नाही... ती आता कुणाबरोबर आहे? किंवा तो काय करतो? याचा दोघांनाही थांगपत्ता नाही. कॉलेजच्या कट्‌ट्यावरही हे जाहीर झालंय, की या दोघांच जे काही चाल्लं होतं ते संपलं... त्याने तीचा आणि तीने त्याचा मोबाईल नंबरही डिलीट करून टाकला.. मनातूनही पुरता विसरून टाकला. सगळ्या मेसेजवर आणि फोटोवरही ‘क्लीअर’ मारला.. नको त्या आठवणी...
‘‘काय मॅड पोरगा आहे, जरा दुसर्‍या मुलाशी बोललं की हा बसला रूसून... याचं मनच संशयी, याला वाटतं आपण एखाद्या मुलाशी बोललो म्हणजे त्याचं आणि आपलं काहीतरी आहे...’’ 
अशी तीची धुसफूस मनातल्या मनात चालू झाली होती.तर दुसरीकडे तो- 
‘‘ऐला या पोरी ना, समजूनच घेत नाहीत, जरा आपण भेटायला बोलावलं तर किती भाव खाणार... आणि दुसर्‍या कुणी बघितलं नाही तरी त्याच्या मागे धावत जाणार...’’ 
खरेतर दोघांनी सारं काही विसरायचं ठरवूनही ‘ते आयुष्य’ त्यांना विसरता येत नव्हतं... सुरूवाती- सुरूवातीला ही धुसफूस चालली, पण नंतर मात्र दोंघानाही आठवणी छळू लागल्या. सकाळ तीच्या ‘जीएम्’ने व्हायची... आता नेहमीप्रमाणे मोबाईल चेक होतो पण, तीचा मेसेज नसतो... तर तीला कॉलेजला निघण्यापुर्वी त्याचा फोन यायचा.. मग तो न्यायला यायचा... आता ती एकटीच जाते.. खाचखळग्यातून... आपटत- धोपटत.. रस्त्यावरची पोरं वाकून पाहतात. पुढे गेल्यावर फस्सकन् हसतात.. तेव्हा तीला त्याची आठवण येते, तो असायची तेव्हा तीला रस्त्यातल्या खड्यांची जाणीव नसायची.. उलट गाडी जरा जरी सरकली तरी ती त्याच्यावर खेकसायची.. ‘हं मुद्दाम खडड्‌‌‌यात घालतोस ना गाडी..?’ तो फक्त हसायचा. पण ते तसं नव्हतं, याची जाणीव तीला आता होवू लागली. ...त्याउलट त्याची परिस्थिती... सकाळंच कॉलेज, त्यामुळे दुपारी भुक लागायची. ती घरचा डबा आणायची. तेव्हा बरचं काही खायला मिळायचं. आता वडापाववरचं भागवावं लागतं..एकंदरीत दोघांनाही उणीव भासतेय... आपण अधुरं असल्याची. मग दोघांनाही परस्परांविषयी काहीतरी कट्‌ट्यावर ऐकायला मिळतं आणि दोघांनाही अस्वस्थ व्हायला होतं.. विसरायचं म्हणून काही दोघांनाही विसरता येत नाही... मग मनातल्या मनात दोघंही कुढत राहतात... जळत राहतात.. एकदा तर तीनं समोरून जावूनही त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, मग अधिकच कडवटपणा आला.. त्या दोंघाचीही अवस्था मात्र त्यांच्या मित्र-मैत्रिणींना पाहवेना...पुन्हा काही दिवस निघून जातात.. 
एक दिवशी त्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये एक अनोळखी नंबर दिसला, कट्टयावर असताना कुणीतरी सेव केला असणार.. नंबर व्हॉट्‌सऍपचा होता. त्यावरचा डीपी आलिया भट्टचा होता... हा कुणाचा नंबर? त्याला प्रश्‍न पडला... त्याने लगेचच ‘हाय’ करून ‘हु आर यू? ’ केले... तिकडून ‘सोनू’ टोपणनाव आले... कधीही न ऐकलेले...त्यादिवसापासून एक नवी ओळख सुरू झाली... नवा संवाद फुलू लागला. नवे मेसेज... नवे जोक्स... नव्या कविता... सारं काही नवनविन. मागचं जे जे घडलं ते ते विसरायला ते एक निमित्त मिळालं... मग त्याने फ्रेण्डमध्ये चौकशी केली, 
‘‘कोण रे ती आपल्या ग्रुपवर नवीन आलिया...?’’
मग कट्‌ट्यावर एकच खसखस पिकली... 
‘‘कारे तुला का चवकशा...? सम्याची बहिण आहे ती पुण्याची... भारी हाय नै. येते कधी कधी रत्नागिरीत, पुढल्यावर्षी आपल्याच कॉलेजला येणार आहे... आपली ओळख आहे, म्हणूनच तीला गृपवर टाकली, तू टाक विचार करून.. नायतरी तुझी पहिली भानगड आता संपलीच आहे... एकटाच आहेस...आगे बढोेेे...’’
तीलाही तो आवडला असावा, त्याच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला... पहिलं सारं काही विसरून तो कामाला लागला... भेटण्याआधी तीला कल्पना द्यावी, असे म्हणून त्याने तीला सारी कल्पना दिली... तीने काहीच हरकत घेतली नाही...भेटण्याचा दिवस, वेळ ठरली... तो आरे-वारेच्या समुद्रकिनारी केव्हाची वाट पाहत होता. परंतू कुणीही आलं नाही, तेवढ्यात त्याचं समोर लक्ष गेलं.. समोर पाहतो तर ती... (जी यापूर्वीच त्याला सोडून गेली होती..) तो घाबरला, हीनं आपल्याला पाहिलं तर? तो तिला दिसू नये म्हूणन एका झाडामागे लपून राहिला... आणि तो गु्रपवरच्या ‘आपल्या आलिया’ला फोन करू लागला... 
‘‘कुठे आहेस? मी केव्हाची वाट पाहतोय...’’
पलिकडचा आवाज अगदी जवळूनच येत होता. तो अक्षरश: गोंधळलाच कारण फोेनवर जी बोलत होती ती त्याच्यासमोरच होती...
‘‘अरेच्चा हे असं कसं झालं...?’’ 
आणि मग त्याला कट्‌ट्यावर आपली लिंक पुन्हा जोडण्यासाठी कसे प्रयत्न झाले, त्यात आपण आणि ती सुध्दा कशी फसली हे आठवतं गेलं... तो तीच्या पुढ्यात गेला, 
‘तुला माहित होतं सारं..?’ 
ती गालात हसली.. ती हसली, तो फसला.. मग दोघं आधी एकमेकांना स्वारी म्हणाली. त्या दिवसापासून बिघडलेला एक संवाद पुन्हा नव्याने सुरू झाला...

- अमोल

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू

नाटकात काम करतानाच इच्छा मृत्यू येणारे नटवर्य ‘शंकर घाणेकर’ (shankar ghanekar)