सालंतला पाऊस
पान्यासाठी पाय
रानावनात धावतात
गुरांढोरा पोटासाठी
बोंडा खावनं जगतात
तापलेल्या उन्हात
पाय चरचरतात
अन् सालंतल्या
माझ्या मनात
काजवं लुकलुकतात...
वैशाखाच्या राती काजव्यांनी
पेटवल्या ज्योती
टप टप थेंब पडला
धुंद झाली माती
अन् सालंतल्या
माझ्या मनात
मेघ गानी गाती...
नदयतलं पानी
हौर मोठा मारतं
परयातनं, पांदळीतनं
वाटा खय खय काढतं
अन् सालंतलं मन
माझं त्यात
पोवानी मारतं...
भरतीचं पानी
वरवर चढतं
पावसाचं पानी
दरयाकडं पलतं
पोटूशा बोयरांनी
खाजाण सलसलतं
अन् सालंतलं मन
माझं वल्गनीला धावतं...
तुंब-तुडूंब
सरावन गोठता
वरसून ढग
घागरी वतता
खवललेल्या दरयानं
माझं सालंतलं मन
लय लय भिता...
आषाढ म्हणजे
पावसाची झड
झाड पडं.. घर पडं..
कुठंतरी बुडाल्याची रडं
तरी सालंतलं मन
माझं भिजाया धडपडं...
सालंतल्या मनात
पावसाची गानी
चिंब भिजल्यापेक्षा
कधी झोडपल्याची..
कधी वाट पाहण्याची
भलीबुरी कहानी...
अमोल पालये, रत्नागिरी.
Comments
Post a Comment