सहावी माळ : श्री धरणकरीण

 सहावी माळ : श्री धरणकरीण



नवरात्रीच्या सहाव्या माळेत आज जाणून घेऊया सडये-पिरंदवणे-वाडाजून या महालातील साती आसरा पैकी एक असलेल्या श्री धरणकरीण देवीविषयी...

सडयेतून पिरंदवणेमार्गे थेट टोळवाडीतून मयुरेश्वराच्या मंदिरापुढे असणार्‍या घनदाट रस्त्याने अवघी पाच मिनीटे गेल्यावर नदीच्या निसर्गरम्य जलाशयात श्री धरणकरीण ही देवता वसली आहे. हे ठिकाण इतके निसर्गरम्य आहे की, या क्षेत्राचा पर्यटन-तीर्थक्षेत्रदृष्ट्या विकास झाला, तर ते एक सुरेख असे ‘क’ वर्गातील पर्यटनस्थळ निर्माण होईल. घनदाट जंगल आहे, मोठमोठाल्या पाषाणातून पाण्याचा स्त्रोत वाहत आहे, त्याचा खाली निचरा होत आहे, आणि याच पाषाणाच्या, आणि जलाशयाच्या एका कडेला श्री धरणकरीण देवीचे छोटेखानी, टुमदार मंदिर आहे. पुढे एक छोटेखानी पुलही आहे, ज्यावरून वाहने जातात, आणि त्या पुलावरून खालील दृश्य फार सुंदर दिसते. पावसाळ्यातील या परिसराचे वातावरण खूपच रम्य असे असते.


या देवीचे नाव धरणकरीण, वस्तूत: तेथे प्राचीन बांधलेले धरण नाही. नदीच्या उतरंडीतून मोठमोठाल्या पाषाणांचे अडथळे पार करत पाणी खाली कोसळते, ते पुन्हा पाषाणांमुळे अडते आणि साचते. हेच निसर्गनिर्मित धरण., आणि हेच निसर्गरूप म्हणजेच धरणकरीण. याच निसर्गनिर्मित धरणामुळे या देवीचे नाव धरणकरीण असे झाले असावे. अन्यथा साती आसरांना ‘मावल्या’ नावाने ओळखले जाते.  सद्यस्थितीत गणपती विर्सजनासाठी एक सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे, मात्र त्यावरून या देवीचे नाव धरणकरीण पडलेले नाही. ते खूप प्राचीन आहे. धरणकरीण या नावाच्या देवता गावरहाटी जलस्थानी आढळतात. येथूनच जवळ असलेल्या कोतवडे-लावगणवाडी येथेही नदीस्थळी धरणकरीण देवीचे स्थान आहे. 

ज्या देवता अशा जलाशयाच्या ठिकाणी असतात त्यांना जलदेवता म्हणतात. अशा देवतांना बोली भाषेत ‘साती आसरा’ असेही म्हणतात. वस्तुत: तो प्रमाण शब्द ‘सात अप्सरा’ असा आहे. सात अप्सरा म्हणजे सप्त (सात) मातृका (मातृदेवता अर्थात मुळ देवता) असा होय. या नेहमी सात या संख्येत असतात. काही अभ्यासकांच्या मते त्या जलाशयात आश्रय करून राहतात, म्हणून त्या ‘आश्रय’ आहेत. अर्थात आसरा आहेत. सातीआसरा हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. याबाबत अनेक अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत. ती सारी मते सडये-पिरंदवणे-वाडाजून महालातील ‘धरणकरीण’ देवी या जलसरादेवीसंदर्भात लागू पडतात. 

साती आसरांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते तशीच ती तीन रस्ते अथवा तीन पायवाटा जेथे एकत्र मिळतात तिथेही असते असे मानले जाते. धरणकरीण देवीही जलाशयाच्या ठिकाणी, घनदाट झाडीत वसली आहे. लढाईतील वीराला जे मरण प्राप्त होते, त्याप्रमाणे या आसरांचे स्वरूप आहे. त्यांना देवतेच्या मैत्रिणी संबोधिले जाते, असा समज आहे. या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात. श्री सोमेश्वर देवस्थानच्या देवराईतही कुंवार तळ—नावाचा जलाशय आहे. तेही जलसरांचेच स्थान आहे. तळी किंवा जलाशय यांना जेथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्ती बसवितात. दुर्गा भागवत यांच्या मते या देवतांचे प्रतीक म्हणून सात दगड शेंदूरचर्चित करून त्यांची पूजा केली जाते.


धरणकरीण या जलासरादेवतेसोबतच सडये-पिरंदवणे-वाडाजून या क्षेत्रात आणखी एक जलासरा देवता आहे, ती म्हणजे जांभळादेवी. त्यासंदर्भात माहिती पुढील लेखमालेत पाहू. धरणकरीण ही देवता जलदेवता असल्याने तीची मुर्ती नाही. तेथील पाषाण आणि वाहते झरे हे निसर्ग रूप म्हणजेच धरणकरीण म्हणावे लागेल. येथे असलेल्या छोटेखानी मंदिरात तीन पाषाण आहेत. त्यांची रचना भराडीण देवीसारखीच आहे. मध्यभागी भराडीण बाजूला दोन भराडी. त्याप्रमाणे मध्यभागी धरणकरीण, बाजूला तीचे दोन सेवक.


या देवता सामान्यतः शांत असतात, परंतु पाणवठ्याशी गैरवर्तन करणार्‍यांना, अस्वच्छता पसरवणार्‍यांना किंवा तिथे अपेयपान/अभक्ष्य भक्षण करणार्‍यांना त्यांचा कोप किंवा बाधा होते अशी श्रद्धा आहे. ज्यांना यांचा त्रास होतो किंवा नवस असतो, ते पाणवठ्याशी जाऊन त्यांची माफी मागतात किंवा ‘उतारा’ सोडतात. त्यांची नित्यनियमित पूजा-विधीही होत असतो.पाण्यात आत्महत्या केलेल्या तरुण मुली किंवा बाळंतपणात मृत्यू पावलेल्या स्त्रियांचेही साती आसरा हे रूप असते, असेही काही भागांत मानले जाते.


-श्री.अमोल अनंत पालये.

मो.9011212984.


Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई

दुसरी माळ | श्री जोगेश्वरी