रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीची कौतूकास्पद कलाकृती : 'मेला तो शेवटचा होता!'
रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीची कौतूकास्पद कलाकृती : 'मेला तो शेवटचा होता!'
(राज्य हौशी नाट्य स्पर्धा परिक्षण)
रत्नागिरी : अमोल पालये.
राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्रार्थमिक फेरीत रत्नागिरी केंद्रावर सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला. पहिल्याच दिवशी स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, कोळंबे-रत्नागिरी या संस्थेने 'मेला तो शेवटचा होता' हा नाटयप्रयोग सादर केला. विजय खानविलकर यांनी या नाटकाचे लेखन केले असून रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी दशरथ रांगणकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते.
'मेला तो शेवटचा होता... ' ही कलाकृती भटक्या-विमुक्त समाजातील स्मशानजोगी या समुदायातील अन्यायग्रस्त, शोषित कुटुबाची ज्वलंत कहाणी उभी करते. गिरीजा(सावली पवार)- तुळाप्पा (अजित हातिस्कर) हे स्मशानजोगी दांम्पत्य आणि इंदर (सुरज पाटील) आणि आंशी (गौरी सावंत) ही त्यांची किशोरावस्थेतील मुले. तुळाची १७ वी पिढी स्मशानात परंपरेच्या नावाखाली खपतेय. वर्चस्ववादी वृत्तीचा सरपंच सुभानराव ( निलेश साळवी) गावावर प्रचंड दहशत बसवून आहे, त्यात तुळाप्पाचे कुटुंब अक्षरश: भरडले गेलेय. त्याची मुले शाळेतही जात नाहीत. त्यांनी स्मशानजोग्याची परंपरा सांभाळावी, शाळेत कशाला जावं? हे तुळाप्पाच्या मनात इतकं बिंबवलंय की, तोही या परंपरेचा एकनिष्ठ वाहक बनलाय. स्मशानात रहायचं. मेल्या मढ्यावरचा पिंड खायचा. अस्थी जमवायच्या. अशामुळे नाका-तोंडात राख जाऊन, धुर जाऊन असाध्य रोग होऊन त्याच्यासहित त्याच्या १७ पिढ्या बरबाद झाल्यात हे सुजाण ग्रामसेवक भिवाप्पा (अतुल पाटील) सांगितल्यानंतरही तुळाप्पा ही परंपरा सोडायला तयार होत नाही. भिवाप्पा त्याच्यासहित त्याच्या मुलांच्या मनातील अंधकार दूर करुन त्यांच्यात ज्ञानाची ज्याेत पेटविण्याचा प्रयत्न करतो. सरकारी मदतीतून जमीन, घर यासाठी प्रयत्न करतो. मुलांना शाळेत पाठवतो. पण स्मशानजोग्याची पोरं शिकली तर स्मशानजोग्याची परंपरा कोण सांभाळणार? मढ्यावरचा पिंड कोण खाणार? आणि मेलेल्याला मुक्ती कशी मिळणार? यामुळे हैराण झालेला सुभानराव भिवाप्पालाच मारुन टाकतो. पुढे समज आलेली आंशी थेट सुभानरावावरच गुरुगुरु लागते तेव्हा सुभानरावाची वाईट नजर तीच्यावरच पडते, आणि तो आंशीला पळवून नेतो. रोगग्रस्त तुळाप्पा लेकीच्या शोधासाठी जातो, त्यालाही संपवले जाते. उरतात फक्त गिरिजा आणि बंडखोर झालेला इंदर! आता इंदरवर खरी वेळ येते ती तुळाप्पा म्हणजे इंदरचा बाप मेल्याने स्मशानजोगी परंपरा आपल्या खांद्यावर घेण्याची... मढ्यावरचा पिंड खाण्याची, आणि परंपरेचा पाईक होण्याची! सुभानराव इंदरवर पिंड खाण्यासाठी दबाव टाकतो, पण इंदर ठामपणे नकार देतो. त्याचं बंड पाहून सुभानराव हादरतो, तो गिरिजावर दबाव टाकतो, ती बळी पडते, आणि पिंड खाण्यास जाते. तेव्हा इंदर जोराचा विरोध करुन तो पिंड मातीत घालतो.
...इथेच सुभानरावाच्या अन्यायी वर्चस्वाला सुरुंग लागतो, सारा गाव हतबल होतो, आणि मढं टाकून निघून जातो. इंदरही मोठया निर्धारानं, परंपरा झुगारुन बापाची तिरडी एकट्यानेच उचलतो आणि गाव सोडून निघून जातो!
राज्य हौशी नाट्य स्पर्धेत गावपाड्यातील नाटकवाल्यांनी सहभागी व्हावे, हे या स्पर्धेत अपेक्षित आहे, आणि या कलाकृतीने ते पुर्णत: दाखवून दिले. स्वामी पिता माऊली ट्रस्ट कोळंबे यांनी सादर केलेल्या या कलाकृतीतील सर्वच कलाकार हे पारावरच्या रंगभूमीवरचे होते. अगदी गावातील ज्येष्ठांनीही नाटकात हौशीनं सहभाग घेतला, आणि अभिनय वठवला. गावातल्या लोककलांमधल्या कलाकारांकडून इतकं शिस्तीचं काम करुन घेणं हे दिग्दर्शीय काम फार त्रासिक. दशरथ रांगणकर यांनी याबाबत फार मेहनत घेतलेय. सर्वांची वेशभुषा खूपच चांगली. नाटकातील प्रसंग पाहता प्रकाशयोजनेला खूप स्पेस होती. स्पर्धेचं नाटक हल्ली खूपच पाॅलिश्ड होत चाललंय, त्यादृष्टीने पारावरच्या, लोककलाकारांच्या संवादफेकीवर, अभियावर अजून मेहनत घ्यावी लागेल. यादृष्टीनं पहिलं पाऊल टाकणार्या सर्व कलाकाराचं कौतूक!

.jpg)



Comments
Post a Comment