सातवी माळ : श्री देवी मानाई

सातवी माळ : श्री देवी मानाई



आजच्या माळेत माहिती घेऊया, श्री देवी मानाईची. मानाई हीसुध्दा सडये-पिरंदवणे-बसणी या महालातील प्रमुख देवता. कालपर्यंत ती दुर्लक्षित राहिल्याने सहसा कुणाला ठाऊक नव्हती, मात्र अलिकडेच बसणी येथे मानाई स्वतंत्र मंदिरात विराजमान झाली आहे.

बसणीतील महालक्ष्मी-रवळनाथ पंचायतन देवस्थानात श्री देवी मानाईचे छोटेखानी, टुमदार मंदिर उभारण्यात आले आहे. यापुर्वी तीला स्वतंत्र मंदिर नसल्याने एका ती बाजूला होती, आणि ती कुणाच्या नजरेस येत नव्हती. बसणीतील चंदरकर परिवाराने पुढाकार घेऊन तीच्यासाठी सुंदर-सुरेख वास्तू उभारली आहे, आणि त्यात श्री देवी मानाई विराजमान झाल्याने मानाई ही नवी देवी मानली जाऊ लागली आहे, वस्तूत: ती नवी देवता नाही, ती रवळनाथा इतकीच जूनी, प्राचीन देवता आहे. 


शस्त्र धारण करणार्‍या मानाईचे ग्रामरक्षण हा कार्यविभाग आहे.  त्यामुळे ती रवळनाथांच्या शेजारी आहे. बसणीचे रवळनाथ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर त्यांच्या सहकारी देवता वाघजाई, नवलाई, पावणाई (केळ्ये) या येतात. या जशा रवळनाथाच्या ग्रामरक्षणातील सहकारी देवता आहेत, तशाच मानाई आणि इटलाई यादेखील रवळनाथाच्या ग्रामरक्षण कार्यातील सहकारी देवता आहे. नवलाई-वाघजाई-पावणाई आणि मानाई-इटलाई हे मातृदेवतांचे पंचक आहे. 

मानाईचे महत्व समजण्यासाठी मातृदेवता म्हणजे काय, हे अतिशय थोडक्यात समजून घेणे गरजेचे आहे. प्राचीन ग्रामीण भारतात मातृसत्ताक कुटुंबपध्दती म्हणजे स्त्रीयांच्या सत्तेची कुटुंबपध्दती होती, आज त्याउलट पितृसत्ताक म्हणजे पुरूषकेंद्री आहे. मातृसत्ताक काळातील स्त्रीया या प्रचंड शूर, आणि महापराक्रमी होत्या. ग्रामरक्षण आणि टोळ्यांची आक्रमणं त्या स्त्रियांनी लढाई खेळून लिलया उलथवून लावली होती, आणि त्या वीर स्त्रियांची पुढे वाहवा झाली,  त्याच स्त्रिया पुढे पुजनीय देवता झाल्या. आज सर्वच गावांमध्ये देवतांची मंदिरे ही सड्यावर आढळून येतात, त्याचे कारण त्या सीमा-रक्षणकर्त्या देवता असल्याने, सीमांवर डोळ्यात तेल घालून, हाती तलवार घेऊन लढाईसाठी सज्ज आहेत. 


मानाई ही सडये-पिरंदवणे-बसणी महालातील प्रमुख लढाऊ गणमाता आहे, मातृदेवता आहे. तीच्या मानाई शब्दाची फोड केली असता मान अर्थात अधिकार असा अर्थ निघतो. याचा अर्थ मानाई ही येथील प्रमुख अधिकार देवता म्हणून तीला गणली गेली आहे.


- श्री.अमोल पालये.

मो.9011212984.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई

दुसरी माळ | श्री जोगेश्वरी