'ऍन एनिमी ऑफ द पीपल' ने स्पर्धेत रंगत!
'ऍन एनिमी ऑफ द पीपल' ने स्पर्धेत रंगत!
(हौशी राज्य नाट्य स्पर्धा)
रत्नागिरी : अमोल पालये.
सत्य मांडण्याची किंमत किती भयंकर असू शकते, याचे दर्शन 'ऍन एनिमी ऑफ द पीपल' या नाटकातून राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रार्थमिक फेरीत घडले. स्टार थिएटर, रत्नागिरी यांनी सादर केलेले हे प्रसिध्द नाटककार हेन्रिक इब्सेन यांचे असून तन्मय राऊत यांनी या नाटकाचा मराठी अनुवाद केला आहे.
कथा: नाटकाची कथा डाॅ.स्टाॅमस स्टाॅकमन या प्रामाणिक वैद्यकीय अधिकार्याभोवती फिरते. थाॅमसच्या संकल्पनेतून साकारलेली स्नानगृहे हा सर्वच क्षेत्रात ओत्स्यूक्याचा विषय ठरला आहे. ही स्नानगृहे गावाच्या पर्यटनाचे, अर्थव्यवस्थेचे,विकासाचे केंद्र बनली आहेत. स्नानगृहांची संकल्पना जरी थाॅमसची असली तरी ती उभी राहिली नगराध्यक्ष अर्थात थाॅमसचा भाऊ पीटर यांच्या आघाडीमुळे. त्यामुळे याच्या श्रेयवादाची चर्चाही शहरात जोरात आहे. थाॅमसचे तिकडे लक्ष नाही, त्याचे लक्ष लागले आहे ते स्नानगृहातील पाण्याच्या रिपोर्टसकडे. अखेर पाण्याच्या रिपोर्टसमधून धक्कादायक माहिती समोर येते. स्नानगृह उभारणीतील तांत्रिक चुकांमुळे स्नानगृहातील जमिनीखालच्या पाईपमधून जाणारे पाणी हे विषारी झाले असून त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे. त्यासाठी स्नानगृहांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. हे सत्य जेव्हा थाॅमस सर्वांसमोर आणू पाहतात, तेव्हा नगराध्यक्ष त्याला स्वत:च्या स्वार्थापोटी विरोध करतो. दुरुस्तीचा खर्च अवाढव्य होईल, शिवाय स्नानगृहे दोन वर्ष बंद ठेवावी लागतील, यामुळे पर्यटक येणे बंद होतील, आणि गावाची अर्थव्यवस्थाच कोलमडेल.
तरिही लोकांचे प्राण वाचविण्यासाठी थाॅमस वर्तमानपत्राच्या माध्यमातून लेख स्वरुपात आपले सत्य सर्वांसमोर आणू पाहतात, तेथेही स्वत:च्या स्वार्थापायी वर्तमानपत्रांचे संपादक, स्थानिक नेते यांचा हे सत्य उघडकीस आणायला विरोध होतो.
अखेर थाॅमस जनतेच्या दरबारात जायचे ठरवतात. तेथेही त्यांना जाण्यास अटकाव केला जातो. अखेर सभा आयोजित केली जाते. अनेक निर्बंध घालत सभा सुरु होते, थाॅमस (गणेश राऊत) सत्य मांडू पाहतात, मात्र नगराध्यक्ष पीटर (स्वानंद मयेकर), नेते असलक्सन (तन्मय राऊत), संपादक हाॅस्टेड (कौस्तूभ केळकर) यांनी सभेचा ताबा घेतल्याने जनताही थाॅमस यांच्या विरोधात जाते, अखेर सत्य मांडू पाहणार्या थाॅमस यांना 'जनतेचा शत्रू' घोषित करुन त्यांना बहिष्कृत केले जाते.
अनुवादित कथा इतकी चांगली, तर मुळ कथावस्तू किती सुंदर असेल, याची कल्पना येते. या अनुवादात भाषासौंदर्य-सौष्ठवाने अधिक मजा आली असती. एक परदेशी चित्र उभे करणे, कसोशीचे, पण अभिनयातून सर्वच पात्रांनी सत्य विरुध्द स्वार्थाचा संघर्ष चांगला उभा केला, त्यामुळे या नाटकाने स्पर्धेत रंगत यायला सुरुवात झाली!

Comments
Post a Comment