Posts

Showing posts from August, 2018

मनोगत

Image
स.न.वि.वि. ‘गावकीच्या पारावर’ आपणां सर्व वाचक, हितचिंतकांचे हार्दिक स्वागत!  आजपर्यंत लिहता-लिहता आपणां सर्वांच्या ज्या शुभेच्छा मिळाल्या, त्याच शुभेच्छ्‌यांच्या जोरावर आज हे ब्लॉगच्या घरात पहिले पाऊल टाकत आहे. यानिमित्ताने प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून अवघ्या जगभरात पोहोचण्याची संधी मिळाली आहे. लहानपणापासूनच ग्रामीण जीवनाची साथसंगत लाभली. हे ग्रामीण जीवन जितकं मजेदार आणि वैविधतेनं नटलेलं आहे, तितकचं ते समस्यांनी वेढलेलं आहे. इथं एकमेकाविषयी कमालीचा जिव्हाळा आहे.. मायेचा उबारा आहे.. या जिव्हाळ्यामुळे इथला माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. इथं अज्ञान आहे.. रूढी आहेत.. परंपरा आहेत.. आणि त्यातही तो कमालीचा बांधला गेला आहे. हेच चित्र आयुष्याच्या उभारत्या टप्प्यावर माझ्याभोवती पिंगा घालू लागलं, आणि कागदावर उतरू लागलं. यथावकाश चाचपडत चाचपडत ग्रामीण कथा लेखनाचा प्रारंभ झाला.  आजपर्यंत मी लिहलेल्या सार्‍याच कथांची पार्श्‍वभूमी ग्रामीण आहे.. प्रत्येक कथेत एक गाव आहे.. गावात गावकर आहे.. कधी तो खलनायक आहे.. कधी तो गावाचा कर्ता कारभारी आहे.. विषेश म्हणजे सार्‍याच कथा ‘जिव्हाळा’, ‘आरती’, ‘व

गावकीच्या पारावरून..!

Image
नमस्कार मंडळी! गाव म्हटलं की गावात गावकी येते.. गावकी आली की गावकीचा पार हा आलाच. गावकीचा पार हे गावकर्‍याचं जणू तीर्थक्षेत्रचं आहे. गावातला प्रत्येकजण दिवसातून एकदा तरी गावकीच्या पारावर चरणधुळ घालतोच. हा पार अत्यंत सार्वजनिक.. त्यामुळे त्याच्याठायी सार्‍यांना आसरा मिळतो. सबब तो दिवसच काय रात्रीचाही गजबजलेला असतो. गावातली प्रत्येक बित्तंबातमी या पारावर प्रथम येते, आणि वार्‍यासारखी गावात पसरते. प्रत्येक बातमीची या पारावर सपट परिवार महाचर्चेप्रमाणे सखोल चर्चा होते.. ते धागेदोरे.. सारे पुरावे.. यावर जोरदार घमासान.. आणि कुजबूज होत असते. गावाची सुख आणि दु:ख मांडणारा गावकीचा पार एक प्रतिनिधी आहे. गाव जाणून घ्यायचा तर आधी पारावर जायलाच हवं. गावात कोण आजारी आहे.. मग त्याच्या तब्बेतीत सुधारणा आहे काय..? याची बातमी सर्वात आधी मिळेल ती पारावरच! कुणाचं लग्न ठरतंय, आणि कोणाचं लग्न का मोडलं..? तेही सविस्तर ऐकायला मिळेल ते पारावरच! काल रात्री परबीनीकडे कोण आलं होतं..? आणि आज कोणाकडे बायांचं भजन आहे.. आणि उद्या कोणाकडे कोंबडा कापला जाणार आहे.. बबन आज शाळेत का गेला नाही..? नंदी गुरवीनीच्या घरात

पालकी जडावली

Image
हा तं काय झालं. ढोलताशाच्या दनक्यात आनी गंगीन रांगोलीनं काडलील्या सोनपावलांवर पाय टाकीत रवलनात म्हाराज रवलनाताचे पयल्या फलीचे मानकरी, आनी रवलनाताचे लय मोटे पुंजारी.. झिंगाटवाडीचे सरपंच तात्या गावकरांकडे पालकीतनं आलं. गंगीन पाय धुवून रवलनाताला घरात घेतलानं, सोता तात्यांनी पालकीला खांदा देलानी व्हता.  देव तात्यानंच्या घरात बसलंं. मंग सोता तात्या आनी गंगी गावकारीनं जोडयेनं पुंजा करया बसली. दोगावानी हात जोडलानी, आनी रवलनाताला ‘देवा बा रवलनाता, गुंडुंबा धावीची परिक्षा देताय. त्याला यास देस रं बा म्हाराजा..’ म्हनून गार्‍हानं घातलानी. नारल फोडलानी. पेढं वाटलानी. आनी मंग तात्यानंच्या खलात देव खेलया लागला.. आता तात्या मानकरी म्हनू तेंचेकडं रवलनात नाचतू, आमी साधमानूस. आमचीकडं फकस्त येतू, पावनाचार घेतू.. आनी जातू.. आसो. तं ता थोडाथोडाका नाय खेलतं. तात्या जोवपरयानं तेला जायाची परवानगी देत नाय. तोवपरयानं ता तितचं खेलत र्‍हानार.. आता तेला खेलवनार्‍यांची काय कमी नाय. ही झो गरदी. चाकरमनान्यांनंला तं काय सांगया नुको. आक्का दिस पन तं पालकी नाचवीत र्‍हातीलं. आता पालकी नाचवाय प्वारांनंला ज्वोर येया ह

डीजे

Image
स काळी घाई-घाईनेच कोपरेकरांकडे लग्नाचं देवक ठेवून झालं, सुटलो बुवा...! म्हणत बंड्या कोपरेकरांन जणू सुटकेचा श्‍वासच सोडला. बंड्याच्या लेकाचं- मन्याच लग्न आरंभलं होतं. सोमवारी साखरपुडा झाला आणि आज सकाळी देवक ठेवण्याचा कार्यक्रम पुर्‍या गावकीनं झटापटी पार पाडला... प्रसंगच तसा बाका कोपरेकरांच्या भावकीवर ओढवला होता. मन्याच्या लग्नाचा मुहूर्त आणि भावकीतल्या दिप्या कोपरेकराच्या गर्भार बायकोचे दिवस एका घटीकेलाच बहूधा भरणार होते. तशी कुणकुणच यजमान्याला आणि पूर्‍या गावकीला लागली होती. काल रात्रभर तीच्या पोटात कणकणत होतं. त्या कणकण्यानं यजमाननींच्या पोटात जास्तीच धास्ती उठली होती. खरेतर तीच्या नऊ महिन्यांचा विचार आधी कुणाच्या लक्षातच आला नव्हता; पण जेव्हा बोलबाला झाला तेव्हा मात्र यजमान्यासमोर लग्नावर ओढवणार्‍या सुवेराची चिंता गडद होवू लागली होती. अशावेळी बंड्याला काय करावे काही सुचत नव्हते. ऐन लग्नाच्या काळातच ती बाळंत झाली तर कोपरेकरांच्या भावकीवर सुवेर येणार आणि मग लग्न करता येणार नाही. सगळ्या आनंदाचा अक्षरश: विस्कोट होणार... पावणी रडत-कुडत राहणार... पोरांबाळांची, मुंबैकर चाकरमान्यांची मन

फुल परमिशन

Image
दु पारी बारा पंचावन्नचं लेक्चर संपल, आणि त्याला जरा हलकं वाटलं. तो बाहेर आला. गर्दीच्या कोलाहलात काही पोर चिंचेच्या झाडाखाली.. काही कॅन्टीनकडे... काही लायब्ररीकडे धावत होती. सकाळचं कॉलेज असल्याने त्याने काही खाल्लं नव्हंत. भूक चांगलीच लागली होती. त्यात सायकोच्या लेक्चरला त्याचं डोक मॅडमने पिकवलं होतं. तोच समोर त्याला त्याचा हरी दिसला. खरे त्याचे नाव सागर, पण त्याच्या बापाचे नाव श्रीहरी (कट्‌ट्यावर कुणीच कुणाला नावाने हाक मारत नाही, बापाचे नाव हीच एखाद्याची ओळख) सागर येताना कट्टयावर दिसला रे दिसला की एकच कोलाहल होतो,  ‘‘... दे रे हरी खाटल्यावरी... मग एकच खॅक... खॅक...’’  तो त्याच्याकडेच सरकला, सागर नुकताच आला होता. सेंट वगैरे मारून. याने छेडलं,  ‘‘काय रे काय विषेश... वाढदिवस परवा झाला...’’ ‘‘नाय रे सहजचं... झालं लेक्चरं...?’’ लेक्चरचं नाव काढताच तो वैतागला, ‘‘.. ऐला त्या सायकोच्या कॅटरीनाने डोकं खाल्लं यार... चल जावया कॅन्टीनमध्ये, वैंताग आला यार नुसता...’’  तो म्हणाला.‘‘... हं जा तू, आता बारा पंचावन्नचं लेक्चर संपलं ना, आता ती येईल, आमची अपॉमेंट ठरलेय...’’- सागर ‘‘ऐला खरचं...

पुन्हा नव्यानं..

Image
सीन सैराट:  आर्चीचा उद्वेग होतो आणि ती पर्शाला म्हणते,  ‘‘ पर्शा, झक मारली आणि तुझ्याबरोबर आले, असं आता वाटून राह्यलंय...’’  असाच उद्वेग त्यांच्या मनात तीन महिनाभरापूर्वी आला आणि ती त्याला म्हणाली...  ‘‘गेलास उडत...’’ मग तोही म्हणाला,‘‘अरे जा जा... तुझ्यासारख्या छप्पन भेटतील...’’ ‘‘भेटतील ना? मग जा ना... वाट कसली बघतोस, शेवटी माझ्यासारख्याच हव्या ना...’’ त्यांच्या आयुष्यात असा हा जोरदार भुकंप झाला...  आता या गोष्टीला तीन महिने उलटले. दोघांची भेट नाही. संवाद नाही, आणि साधं दर्शनही नाही... ती आता कुणाबरोबर आहे? किंवा तो काय करतो? याचा दोघांनाही थांगपत्ता नाही. कॉलेजच्या कट्‌ट्यावरही हे जाहीर झालंय, की या दोघांच जे काही चाल्लं होतं ते संपलं... त्याने तीचा आणि तीने त्याचा मोबाईल नंबरही डिलीट करून टाकला.. मनातूनही पुरता विसरून टाकला. सगळ्या मेसेजवर आणि फोटोवरही ‘क्लीअर’ मारला.. नको त्या आठवणी... ‘‘काय मॅड पोरगा आहे, जरा दुसर्‍या मुलाशी बोललं की हा बसला रूसून... याचं मनच संशयी, याला वाटतं आपण एखाद्या मुलाशी बोललो म्हणजे त्याचं आणि आपलं काहीतरी आहे...’’  अशी तीची धुसफूस मनातल्या

सालंतला पाऊस

Image
पान्यासाठी पाय रानावनात धावतात गुरांढोरा पोटासाठी बोंडा खावनं जगतात तापलेल्या उन्हात पाय चरचरतात अन् सालंतल्या माझ्या मनात काजवं लुकलुकतात... वैशाखाच्या राती काजव्यांनी  पेटवल्या ज्योती टप टप थेंब पडला धुंद झाली माती अन् सालंतल्या माझ्या मनात मेघ गानी गाती... नदयतलं पानी हौर मोठा मारतं परयातनं, पांदळीतनं वाटा खय खय काढतं अन् सालंतलं मन  माझं त्यात  पोवानी मारतं... भरतीचं पानी वरवर चढतं पावसाचं पानी दरयाकडं पलतं पोटूशा बोयरांनी खाजाण सलसलतं अन् सालंतलं मन  माझं वल्गनीला धावतं... तुंब-तुडूंब  सरावन गोठता वरसून ढग  घागरी वतता खवललेल्या दरयानं माझं सालंतलं मन लय लय भिता... आषाढ म्हणजे पावसाची झड झाड पडं.. घर पडं.. कुठंतरी बुडाल्याची रडं तरी सालंतलं मन  माझं भिजाया धडपडं... सालंतल्या मनात  पावसाची गानी चिंब भिजल्यापेक्षा कधी झोडपल्याची.. कधी वाट पाहण्याची भलीबुरी कहानी... अमोल पालये, रत्नागिरी.

कोकणातील गूढ कातळ-शिल्प

Image
को कणासारखा गुढ प्रदेश महाराष्ट्रात अन्यत्र कोठे नसेल. येथे रूढी- प्रथा, परंपरा आणि भुतं-खेतं अगदी देव-देवस्की, जारण-मारण यांचे जेवढे गुढ येथे आहे तेवढे गुढ कोठे आढळणे कठीण. या सार्‍या गुढांमागचे रहस्यही कोणाला अजून स्पष्ठपणे उलगडता आलेले नाही. कोकणात सध्या आणखी एक गुढ सध्या चर्चेेत आहे. ते म्हणजे कोकणातल्या जांभ्या दगडांवर कोरलेल्या कातळशिल्पांचे. कोणी कोरली असतील ही कातळशिल्प? का कोरली असतील? कधी कोरली असतील? काय असेल या कातळशिल्पांचा अर्थ? या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे सध्या तरी अनुत्तरीतच आहेत. ती उत्तरे शोधण्याचे स्तुत्य प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. कातळशिल्पांच्या गुढांमागचे रहस्य उलगडेल तेव्हा उलगडेल, पण त्याआधी आपल्याला त्या कातळशिल्पांचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोकणात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. कोकणवासियांनी आपल्या वहिवाटीच्या कातळावर गडगे घालून, कलमे लावून आणि चिरे खणी काढून ही कातळशिल्पे अज्ञानापोटी नष्ट करायला सुरूवात केली आहे. रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कातळ भाग आहे. या कातळभागावर अनेक गुढ आकृत्या आहेत. त्याच कातळशिल्पां

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू

Image
तु म्हाला दगडाच्या घडीव आणि ताशीव ‘डोणी’ माहित आहेत..?  नाही ना.. मग, ‘घिरट’...? बरं, ‘इरलं.. लामणदिवा.. तवी.. आयनापेटी.. कोनाडा.. माहित्येय?  नाही ना माहित... अर्थात जे माहितच नाही ते पाहण्याची गोष्ट दुरच..  नव्या पिढीला कोड्यात टाकणारी ही नावं आहेत आपल्याच कोकणातील जुन्या गृह संस्कृतीतील हरवलेल्या वस्तूंची. खरचं या वस्तू हरवल्या आहेत..  त्यातील काही आता शोधूनही सापडणे कठीण, आणि समजा सापडल्याच तर त्या आता केवळ एखाद्या वस्तू संग्रहालयातच ठेवाव्या लागतील. कोकणातील प्रत्येक घरात दैनंदिन वापराच्या अशा अनेक वस्तू होत्या की, ज्या कालौघात काळाच्या उदरात गडप झाल्या. कोकणात रस्ते आले. वीज आली, आणि हातात स्मार्टफोनही आला. त्यामुळे बैलगाडी गेली. उजेड पाडणारा कंदील गेला. पोरांच्या हातातला ‘विटीदांडू’ जावून ‘टॅब, स्मार्टफोन आला.. कालाय तस्मै नम:.. दुसरं काय?१२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार यांनी मिळून गावगाडा चालायचा, त्यामुळे आजच्यासारखे यंत्रयुग नसूनही स्वातंत्र्यपूर्व काळात खेडी समृध्द होती. सुतार नांगर बनवायचा. लोहार हत्यारं घडवायचा. कुंभार मडकी बनवायचा. मग कुंभाराकडचे मडके शेतकर्‍याने घ्यायच

दुसर्‍याचं दु:ख

Image
श निवारचा आठवडा बाजार असल्यानं एस.टी.ला तुफान गर्दी होती. तरीही कंडक्टर काही केल्या डबल बेल देण्याचं नाव काढत नव्हता. तीनच्या सीटवर चार चार माम्या-मावश्यांनी जागा अडवली होती. शिवाय एसटीच्या मधल्या बोळात जी जागा उरते त्यातही जेमतेम उभे राहू इतकीच जागा होती. गंम्मत म्हणजे एसटीत केवळ माणसंच नव्हती.. प्राणीही होते. आठवडा बाजार असल्यानं माम्यानी रानमेव्याचा सारा बाजार काचक्या-बोचक्यांनी आणला होता.  कुणाच्या आंब्याच्या टोप्या शिगोशिग भरल्या होत्या. काहींकडे काजू, काहींकडे करवंद.. कोकमं, कैर्‍या, सोललेले काजूगर, रामफळं.. असा बराजसा रानमेवा पिशव्यातून डोकावत होता. आधीच एसटी खचाखच भरलेली, त्यात या पिशव्यांनी जागा व्यापलेली.. आणि भरीस भर रस्त्यावरचे खड्‌डे एसटीला जणू नाचवत होते.. आणि त्या नाचाच्या तालावर आतली माणसं आणि पिशव्याही डोलत होती. त्यात उभ्याने एसटीची दोरखंड हाती धरून असणारे कामगार, शाळेचे विद्यार्थी, पेन्शनर एकमेकांला जणू दे धक्का करत होते. मग जरा कुठे गाडी आदळली की ड्रायव्हरच्या नावानं उद्धार होत होता..  गंम्मत म्हणजे जरा गाडीनं ब्रेक दाबता दाबता क्ररर.. केलं की, एका मावशीच्या पि