नववी माळ : श्री जांभळादेवी.
नववी माळ : श्री जांभळादेवी.
सडये-पिरंदवणे-बसणी ‘महाला’तील 9 मातृदेवतांची ओळख घडवत असताना आज शेवटच्या नवव्या माळेत जाणून घेऊया याच परिसरातील आद्य जलासरा (साताआसरा) असलेल्या श्री जांभळादेवी विषयी...
(निवेदन : वस्तूत: प्रस्तूत लेखक श्री जांभळादेवी या देवस्थानाजवळ प्रत्यक्ष मार्गदर्शकाअभावी गेलेला नाही. मात्र अनेक ग्रामस्थांकडून जांभळादेवीविषयी जे वर्णन, माहिती मिळते, त्या माहितीच्या आधारे अभ्यास करून पुढील लेखन आणि चित्रण करत आहे. लेखामध्ये दिलेली छायाचित्रे ही मुळ जांभळादेवी ठिकाणची नव्हेत, भाविकांनी दिलेल्या माहितीवरून जांभळादेवीची ‘एआय’ प्रतिमा निर्माण केली आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी, लवकरच या क्षेत्राला भेट देऊन, त्यासंदर्भात इत्यंभूत माहिती देऊच... - अमोल पालये)
झरे हीच जांभळादेवी
सडये-पिरंदवणे परिसरतील श्री धरणकरीण या देवतेविषयी आपण सहाव्या माळेत जाणून घेतले. श्री धरणकरीण जशी जलासरा (सातीआसरा) देवतांपैकी एक आहे, अगदी त्याच गटातील श्री जांभळादेवी ही देवता आहे. सध्याचे वाडाजून आणि उंबरवाडी (कोतवडे) यांच्या सड्यावरील सीमाक्षेत्रावर श्री जांभळादेवीचे स्थान आहे. तीला कोणतेही मुर्तीस्वरूप नाही, वा धरणकरीण देवीसारखे पाषाणरूपही नाही. ती जलदेवता असल्याने एका तळ्यात पाझरणारे पाणी, त्या पाण्याचा उगम म्हणजे जांभळादेवी होय. सड्यावरील सीमाक्षेत्रावर श्री जांभळादेवी या तळ्यात वसली आहे. येथे एक जुनाट, चिरेबंदी, छोटेखाणी तळे आहे. या तळ्यातच काही झरे आहे. ते कायम जिवंत असतात. अत्यंत छोटे झरे हे देवतास्वरूप आहेत. या तळ्यातील पाणी अत्यंत पवित्र मानले जाते.
सात्वीणाचे स्थान
जांभळा देवीच्या नावात जांभूळ या वृक्षाचा उल्लेख आहे. जांभूळ या वृक्षास्थानाजवळ या देवतेचे स्थान असते, असे काही अभ्यासक म्हणतात. कोकणात ‘सात्वीण’ वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. हा वृक्ष आडरानातील मातृदेवता, जलासरा यांचे मुळस्थान मानला जातो. सड्यावरील जांभळादेवीचे स्थान हे जांभूळ या वृक्षाऐवजी ‘सात्वीण’ वृक्षाखालीच असल्याचे मानले जाते. कधीकधी जांभळादेवी देवराईतल्या दुर्मिळ वृक्षस्थानीही असते, उदा. सात्वीण वृक्ष. मात्र या देवतेला जांभळादेवी किंवा जांभळाई हेच नाव सर्वत्र आढळून येते.
सात अप्सरा
ज्या देवता अशा जलाशयाच्या ठिकाणी असतात त्यांना जलदेवता म्हणतात. अशा देवतांना बोली भाषेत ‘साती आसरा’ असेही म्हणतात. वस्तुत: तो प्रमाण शब्द ‘सात अप्सरा’ असा आहे. सात अप्सरा म्हणजे सप्त (सात) मातृका (मातृदेवता अर्थात मुळ देवता) असा होय. या नेहमी सात या संख्येत असतात. काही अभ्यासकांच्या मते त्या जलाशयात आश्रय करून राहतात, म्हणून त्या ‘आश्रय’ आहेत. अर्थात आसरा आहेत. सातीआसरा हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. याबाबत अनेक अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत.
कुमारिका
साती आसरांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते तशीच ती तीन रस्ते अथवा तीन पायवाटा जेथे एकत्र मिळतात तिथेही असते असे मानले जाते. जांभळा देवीही जलाशयाच्या ठिकाणी, घनदाट झाडीत वसली आहे. लढाईतील वीराला जे मरण प्राप्त होते, त्याप्रमाणे या आसरांचे स्वरूप आहे. त्यांना देवतेच्या मैत्रिणी संबोधिले जाते, असा समज आहे. या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात. श्री सोमेश्वर देवस्थानच्या देवराईतही कुंवार तळ—नावाचा जलाशय आहे. तेही जलसरांचेच स्थान आहे. तळी किंवा जलाशय यांना जेथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्ती बसवितात. दुर्गा भागवत यांच्या मते या देवतांचे प्रतीक म्हणून सात दगड शेंदूरचर्चित करून त्यांची पूजा केली जाते.
या देवता सामान्यतः शांत असतात, परंतु पाणवठ्याशी गैरवर्तन करणार्यांना, अस्वच्छता पसरवणार्यांना किंवा तिथे अपेयपान/अभक्ष्य भक्षण करणार्यांना त्यांचा कोप किंवा बाधा होते अशी श्रद्धा आहे. ज्यांना यांचा त्रास होतो किंवा नवस असतो, ते पाणवठ्याशी जाऊन त्यांची माफी मागतात किंवा ‘उतारा’ सोडतात. त्यांची नित्यनियमित पूजा-विधीही होत असतो.पाण्यात आत्महत्या केलेल्या तरुण मुली किंवा बाळंतपणात मृत्यू पावलेल्या स्त्रियांचेही साती आसरा हे रूप असते, असेही काही भागांत मानले जाते. यामुळे वाडाजून सड्यावरील श्री जांभळादेवीविषयी जनमानसात प्रचंड गुढ आहे. ते गुढ अभ्यासण्यासाठी, उकलण्यासाठी आणि देवीविषयी अधिक जाणून घेण्याविषयी सर्वांनी या स्थानाला भेट देण्याची गरज आहे.
9 माळांचे लेखकाचे मनोगत
‘9 दिवस, 9 माळा याप्रमाणे सडये-पिंरदवणे-बसणी या एकच महालातील 9 आडमार्गावरील, आद्यदेवता, मातृदेवता, गणमाता, संरक्षण देवता, जलासरा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा फक्त शोध आहे, या देवतांचा सखोल अभ्यास करून त्यांची नेमकी माहिती समोर येण्याची आवश्यकता आहे. यातील काही देवता या लोकमानसात आल्या आहेत, काही लोकांपासून अनभिज्ञ आहेत, भावी पिढीला ही स्थाने कळण्यासाठी त्या देवता उजेडात येणे आवश्यक आहे. जाखमाता, भराडीण यासारखी क्षेत्रे ‘श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टने विकसित करावी, ही पहिल्या टप्प्यातील मागणी करून हे निवेदन संपवितो.)
-श्री.अमोल अनंत पालये.
मो.9011212984.



Comments
Post a Comment