संकल्पच्या ‘वॉरंट’ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले!
संकल्पच्या ‘वॉरंट’ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले!
(राज्य हौशी नाट्य स्पर्धा)
रत्नागिरी : अमोल पालये.
पोलिस ठाणी, कोर्टकचेर्या यात अडकून गावाचं नाव बदनाम होऊ नये, वाद गावातच मिटवून गावासाठी तन-मन-धनाने कार्यरत राहणार्या दाजी सरपंचाची नाट्यमय कहाणी रत्नागिरी येथे राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत बुधवारी संकल्प कलामंच, रत्नागिरी यांनी ‘वॉरंट’ या नाटकातून सादर केली. गंगाराम गवाणकर यांनी या नाटकाचे लेखन केले होते, तर चंद्रकांत कांबळे यांनी दिग्दर्शन केले होते. क्षणक्षणाला बदलत राहणारी नाट्यमयता, हे या नाटकाचे विशेष, त्यामुळे या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
कथा: दाजी सरपंच हे गावातील बडे प्रस्थ. गावासाठी ते अगदी तन-मन-धन अर्पून कार्यरत आहेत. गावाचा नावलौकिक व्हावा, गावाची गुन्हे, पोलिस, कोर्टकचेर्या यात अडकून बदनामी होऊ नये, यासाठी ते फार जपतात. आणि यातूनच ते गावातील मुलांनी कबड्डीसारख्या खेळातून प्राविण्य मिळवावे, यासाठी जसे प्रयत्नरत राहतात, तसेच गावात घडलेले गुन्हे पोलिस ठाण्यापर्यंत न जाऊ देता स्थानिक पातळीवर त्यांचे निवारण करतात. कुणा तरूणीवर अत्याचार झाला असेल, तर आरोपी तरूणाला चांगली ‘समज’ (गुरांसमोर) देतात, आणि त्या मुलीच्या पुनर्वसनासाठी त्या मुलीचे त्या मुलाबरोबर स्व:खर्चाने लग्न लावून देतात, तर कधी शेताच्या बांधावर दोन भावांमधील झालेल्या जमिनीच्या वादातून मारहाण झाली असेल, तर जमिनीचे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करतात.
सर्व गावात काहींना काही गुन्हे घडत असताना वैभववाडीत मात्र कित्येक वर्षात एकही गुन्हा घडलेला नाही, याचे विशेष वाटून पोलिस खात्याची नजर वैभववाडीवर पडते, आणि सरपंच कायदा हातात घेत असल्याचा आरोप करत दाजी सरपंचाविरोधात ‘वॉरंट’ काढले जाते. आपली बदली गडचिरोलीला होण्यावाचून वाचवायची असेल, आणि दाजी सरपंचांना आपले वॉरंट रद्द करायचे असेल, तर त्यांनी गावातून एकतरी आत्महत्येची केस द्यावी, अशी अट पोलिस डी.के.सावंत घालतात. हे ऐकून दाजी फार हतबल होतात, अशावेळी पोलिस त्यांना त्यांच्या मतिमंद मुलाचे लग्न गावातील गरीब, आजारी अशा माली या मुलीसोबत लावण्याचे सुचवितात, आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे तसे लग्न होतेही... पुढे मालीची आत्महत्या होण्याच्या द़ृष्टीने पोलिस मालीचा छळ करायला सांगतात, मात्र माली इतकी सुंदर, सुस्वभावी असते की, दाजी आणि त्यांच्या पत्नीला तीचा छळ करणे, शक्यच होत नाही. मालीचा सार्यानाच लळा लागतो. अखेरीस मालीची आत्महत्या होण्यासाठी पोलिस इरेस पेटतात, तेव्हा मतिमंद असलेला गोविंदाच तीच्या संरक्षणासाठी उभा राहतो, आणि पोलिसांचा प्लॅन पुरता फसतो, पण आता दाजी सरपंचांना अटक होण्यावाचून पर्याय उरत नाही. अशावेळी ग्रामसेवक वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचे दाजी सरपंचाच्या कार्याचे गौरवोद्गार काढणारे पत्र वाचून दाखवितात, आणि आलेले पोलिस हतबल होऊन निघून जातात.
चांगल्या दिग्दर्शनामुळे हे नाटक अधिक प्रेक्षणीय झाले. प्रकाशयोजनेतून उभा केलेला सकाळचा प्रहर छान रंगला. नेपथ्यही देखणे होते. गोविंदा (सुयोग बारगोडे) ही भूमिका विशेष वठली. माली (सुकन्या शिंदे) या भूमिकेला कमी जागा होती, तीसुध्दा खूप समजून-उमजून झाली. दाजी सरपंच (कृष्णकांत साळवी) यांचा दरारा, रुबाब, आणि हतबलताही सारेच अभिनयातून व्यक्त होत होते.

Comments
Post a Comment