दारीचा केशरी आंबा..

 दारीचा केशरी आंबा..
(ललित लेख)



दारीचा केशरी आंबा.. केशरी आंबा..
आंबा वाढत जायी.. आंबा वाढत जायी..
परवा एका लग्नाच्या सोहळ्यात गावकारणीच्या मुखातून हे लग्नगीत ऐकले, आणि दारच्या केशरी आंब्याची आठवण झाली. आमच्या घराच्या मागच्या बाजूसच त्याचे हे भले मोठे झाड होते. म्हणजे अजूनही आहे.. पण आता ते नुसते झाड आहे. आंबे त्यावर धरतच नाहीत. 
एकेकाळी तो गच्च धरायचा. पानं कमी, आणि आंबे जास्त. दे दणादण रात्रभर कोसळत रहायचा. थोडासा लांबुडका.. त्याच्या पोटावर एक काळा डाग असायचा. ढास मारला की वरची साल फुटायची. आतमध्ये टच्च भरलेला आमरस. पुर्ण पिकला तरी बाहेरून हा आंबा कच्चाच दिसायचा. शेवटपर्यंत त्यांची साल हिरवीच असे, मात्र आतमध्ये तो रसाळलेला असायचा. त्याचे खर्‍या अर्थाने वर्णन करावे, तर ‘काय भुललासी वरलिया रंगा’ असेच करावे लागेल. तो रंगाने जितका केशरी होताच, तितकाच ‘केसरी’ही होता. अंगठाभर लांबीचे पातळ तंतूमय केस कोयीपासूनच त्याला असत. हे केस आंब्याच्या रसाला गच्च बांधून ठेवत. त्यामुळे आंबा पुर्ण सोलला, आणि मग यथेच्छ ओरपला तरी त्याचा एकही बुंद खाली पडत नसे. आंबा पडू द्यायचा, आणि मग थंड करूनच खायचा. तरच त्याची गोडी अवीट असे. रायवळात रायवळ.. देखणा रायवळ.. असा तो केशर्‍या आंबा होता. त्याच्या केशरी रंगामुळे त्याची साठं ही अतिशय रंगतदार असायची. पाहतानाही गच्च भरलेल्या झेंडुच्या फुलांच्या ताटाप्रमाणे भासायची.. तो इतका पिकायचा की त्याला काही सुमार नसायचा. आणि म्हणूनच त्याची बहुधा किंमत कमी होत गेली. धबाधब पडलेला केशर्‍या आंबा थोडासाच कोणाच्या तरी पोटात जायचा, अन्यथा खाली पडून सडून जायचा, नाहीतरी गुरं खावून टाकायची.
तसं झाड बुंध्यापासून मजबूत आणि सरळसोट होतं. घरापासूनही दूर होतं. म्हणजे धोक्याचं नव्हतं.. तरीही त्यांच्यामागे पनवती लागलीच. कुणाकडे लग्नसोहळा असला की, यजमान्याची पहिली नजर त्याच्यावरच जावू लागली. आणि ‘शोभनं’ फोडण्यासाठी कुर्‍हाडीचा एकेक घाव केशर्‍या आंब्याच्याच एका एका फांदीवर दरवर्षी पडू लागला. असे करता करता त्याच्या सार्‍या फांद्याच संपल्या. उरला फक्त उभा दांडा. आता केशर्‍या आंबा नुसताच उभा असतो. ना त्याला मोहर येत.. ना आंबे धरत..  तग धरायलाच ताकद उरली नाही.. कतृत्व गाजवायचे हातच छाटून टाकले.. मग कुठून धरणार आंबे? 
मे महिन्याच्या दिवसात त्याच्याकडे पाहिलं की फार वाईट वाट्टं.. हे असले भोग भोगण्यापेक्षा मेलेलं बरं. पण मेलेलं बरं म्हणून काही मरण येत नसतं. भोग हे भोगावेच लागतात. हेच विटंबनेचं भोग भोगत केशर्‍या ठामपणे उभा आहे. दिसामासी आपल्या जुन्या अंगाला हिरवी पालवी फोडतो आहे. त्याची जगण्याची जिद्द काय हेतूने आहे हे, त्या केशर्‍या आंब्यालाच ठावूक.

- अमोल पालये.
मो.9011212984.
सडये-पिरंदवणे.


Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू