श्री जोगेश्वरी

 श्री जोगेश्वरी

(दुसरी माळ)


जुन्या मंदिराचे चित्र

सडये-पिरंदवणेतील साडेतीनशे वर्षांपूर्वीचे श्रीजोगेश्वरी मंदिर रत्नागिरीपासून 12 कि.मी. अंतरावर कोतवडे गावाजवळ आहे. सडये-पिरंदवणे हे एक छोटंसं निसर्गरम्य गाव. त्याची एक वाडी- टोळवाडी. त्याला लागूनच भावे-अडोम, केळ्ये, वेेत्तोशी व बसणी ही गावठाणातील खाडीलगतची वस्ती. अलीकडे व पलीकडे डोंगर व मध्ये पावसाळ्यात तुडुंब भरून खळाळत वाहणारा ओढा. काही वर्षांपूर्वी पूल बांधला गेला आणि ही गावं रत्नागिरीच्या जवळ 12 कि.मी.वर सरकली. 

रिक्षाने रत्नागिरीहून पिरंदवण्याला अर्ध्या तासात पोहोचता येऊ लागले. पिरंदवणे येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या श्रीजोगेश्वरी (जुगाई) मंदिरातील श्रीजोगेश्वरी म्हणजे साठे, साठये, साठये, गोंधळेकर, गोवंडे, धारू तसेच अन्य काही कुटुंबीयांची कुलदेवता. इतिहासाची पाने मागे उलटली तर 13 व्या शतकापासून पिरंदवणे, टोळवाडी येथे साठयांची वस्ती असल्याची नोंद आहे. पूर्वजांना मिळालेल्या इनामाच्या सनदेत जमिनीच्या दळ्यांची नावे सापडतात. इ. स. 1635 च्या सुमारास श्रीजोगेश्वरी मंदिराची स्थापना झाल्याचा उल्लेख सापडतो. पुढे साधारण पाऊणशे वर्षांनी चुन्याच्या बांधकामाचे एकास एक असे तीन घुमट असलेले टुमदार मंदिर उभे राहिले. पुढे भक्तजनांना बसण्यासाठी विस्तीर्ण जागा असून बाजूला जांभा दगडाच्या बैठका असलेले सभास्थान बांधण्यात आले. हेमाडपंथी बांधणीचे हे देऊळ शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. श्री परशुराम देवस्थानची छोटी प्रतिकृती असाही या मंदिराचा बोलबाला आहे. पुढे 20 वर्षांनी देवीच्या पांढर्‍या (मार्बल) दगडातील मूर्तीची स्थापना करण्यात आली. 

टोळवाडी शाखेचे पाचव्या पिढीतील मोरभट महादेव भट व त्यांचे चुलतबंधू शंकरभट पनभट यांचे पणजोबा महादेव भट हरभट यांना दृष्टांत झाला व श्रीजोगेश्वरी देवीने नवरात्र उत्सवात मी नेवरेकार्यातीखाली पुसाळे गावातील 12 वाडयांपैकी सडये येथे येत असल्याचे सांगितल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार पिरंदवण्याच्या श्री सोमेश्वराच्या आवारातच या श्रीजोगेश्वरी देवीची स्थापना त्यांचे नातू महादेव भट बाळंभट यांनी इ. स. 1635 मध्ये केल्याचे इतिहास कथन करतो. 

मंदिराच्या आतील भाग

स. 1840 च्या आसपास महादजी हरभट यांनी जोगेश्वरी मंदिरासमोर श्री हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली. या मंदिराच्या जवळच ग्रामदेवता श्री सुकाईदेवीचे छोटे मंदिर आहे. कालांतराने श्रीजोगेश्वरी मंदिराच्या आवारात विहिरीची बांधबंदिस्ती करून दोन खोल्यांची धर्मशाळा बांधून घेतली गेली. बाहेरून उत्सवासाठी, पुराणकीर्तनासाठी येणार्‍या मंडळींची सोय झाली. अनेकांचे मदतीचे हात पुढे आले आणि परिसर सुशोभित केला गेला. इ. स. 2002 मध्ये पिरंदवणे येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने, शृंगेरीच्या जगद्गुरू शंकराचार्याचे मार्गदर्शन घेऊन, साठे, साठये, साठये कुलपुरस्कृत न्यासाच्या विद्यमाने या पुरातन व स्वयंभू श्रीजोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. अर्थात, मंदिराच्या अंतर्गत वास्तुशैलीला कोणताही धक्का न लावता पंचधातूच्या मूर्तीला सप्तनद्यांचा जलाभिषेक करून शंकराचार्य जयंतीला तिची स्थापना करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत श्रीमंत बाजीराव पेशवे, त्यांचे गुरू श्री ब्रम्हेंद्रस्वामी यांनी श्रीजोगेश्वरी मंदिरास भेट दिल्याची आणि श्रीजोगेश्वरी, श्री सोमेश्वर व श्री सुकाई देवालयांना एकत्रितपणे काही जमिनी इनाम दिल्याच्या नोंदी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीला असताना या मंदिरात बर्याचवेळा आल्याचा उल्लेख आहे. त्यांची दोन व्याख्यानेही या आवारात झाली होती.


साठे मंडळींना धार्मिक विधी व पुराणाचे अधिकार पिढीजात असल्याने चैत्री पौर्णिमेस गोंधळ आणि नवरात्र उत्सवात रोजचे पुराण व धार्मिक कार्यक्रम मंदिरात साजरे होतात. दरवर्षी शंकराचार्य जयंती आणि नवरात्रात ललिता पंचमीला देवीचा उत्सव साजरा केला जातो. अप्रतिम कलाकुसरीने सजलेल्या चांदीच्या प्रभावळीत देवीची मूर्ती बघताना डोळ्यांचे पारणे फिटतेच. मंदिर पिरंदवण्यातील मुख्य रस्त्यावरच असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे हे अगदी नित्य भेटीचे स्थान आहे. डोंगराच्या कुशीत, चिटपाखरू दिसणार नाही अशा निर्जन परिसरात, हिरव्या वनश्रीच्या छायेत, ध्वनिप्रदूषणाच्या अभावात, गर्दी, गोंगाट, कोलाहल यांपासून मुक्त, नीरव शांततेची, एकांताची अनुभूती देणार्या ठिकाणी श्रीजोगेश्वरी देवीचे वास्तव्य म्हणजेच दर्शनाच्या निमित्ताने सर्वाना निसर्गसान्निध्याचे, सहवासाचे आवतणच!

(सदर लेख इंटरनेटवरून साभार घेतला आहे.- संकलक: अमोल पालये.)


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू