चौथी माळ: श्री भराडीण

 चौथी माळ: श्री भराडीण


सडये-पिरंदवणेच्या सड्यावरील निर्जन भागात श्री भराडीण मातेचे देवस्थान आहे. काही वर्षापुर्वीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने तेथे छोटेखानी मंदिर उभारले आहे.

सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या भराडीबाईची (देवीची) यात्रा प्रसिध्द आहे. ती भराडी आणि सडयेच्या सड्यावरील भराडीण वेगवेगळी नसून एकच आहे. सडये-पिरंदवणेच्या आसपास कासारवेलीतही सडा भागात भराडीण देऊळ आहे. भराडीण ही सुध्दा भुमका स्वरुपातील देवी आहे. सड्यावरील देवळात तीची चार भुजा, मुख अशी कोरीव मुर्ती नाही. तर आहेत ते केवळ पाषाण. 

कोणत्याही गावात स्री देवता मोठ्या संख्येने आढळतात. सडये-पिरंदवणे त्याला अपवाद नाही. या सार्‍या देवस्थानांमागे गुढ इतिहास दडलेला आहे. हा इतिहास सडये-पिरंदवणेच्या संस्कृतीशी निगडीत आहे. सड्यावरील देवळात भराडीण एकटीच नाही. तीच्यासोबत अन्य गणगोतही आहेत. (ते कोण? याचा शोध चालू आहे.) सिंधुदुर्गात भराडणीला बाई म्हणतात. (देवी अपवादाने.) सडयेतील भराडीणही कुणी देवी नसावी, तर ती एक महापराक्रमी लढाऊ वृत्तीच बाईच असावी. कारण ती गावात न वसता सडये-पिरंदवणेच्या सीमेवर वसली आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान राहतात. सैनिक राहतात. भराडीण गावाची रक्षणकर्ती आहे, अशी भाविकांची श्रध्दा आहे. भराडीण जर रक्षणकर्ती असेल असेल. ती सीमेवर राहत असेल तर ती नक्कीच लढवय्यी असणार.. एका भुप्रदेशाची प्रमुख असणार.

कदाचित भराडणीचा कुठेना कुठे तरी संदर्भ मातृसत्ताक कुटुंबपध्दतीशी असण्याची शक्यता आहे. मातृसत्ताक पध्दतीतील ती शुरवीर रणरागिणी असावी. जेणेकरून आज तीचा डंका सर्वत्र वाजत असावा. तीचा उत्सव एकेकाळी जोरात व्हायचा, असे जाणकार सांगतात. ‘भराडणीशी नमन झाले..’ असे उल्लेख मिळाले आहेत. आज मात्र मोजकेच भक्त भराडीणला जाऊन पुजाविधी करत असतात. सडयेतील काही भाविक दिवाळीदिवशी भराडी-जाखमाता-सुखाई दर्शनाचा त्रिवेणी संगम साधत असतात.

रत्नागिरीचे पेंटर नंदू सोहनी हे भराडणी देवींचे निस्सीम भक्त आहेत. अगदी दूरवरूनही ते याठिकाणी हजेरी लावत असतात. चहुबाजुंनी पसरलेला काळा विस्तीर्ण कातळ.. वार्‍याची शीळ आणि निरव शांतता.. असे हे सर्वांग सुंदर स्थळ आहे.


-अमोल पालये.

सडये-पिरंदवणे, मो.9011212984.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू