गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून..

गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून..
(ललित लेख)



मु.भावेआडम हे रत्नागिरी तालुक्यातील तसं कुठे लेखी नसलेलं गाव माझं दुहेरी आजोळ आहे. गोरिवले आणि घवाळी अशी दुहेरी भावकी माझी आजोळ घरं आहे. याशिवाय इतरही बरीच नातीगोती याच गावात आहे. ती अशी एकत्र असल्याने एकाचवेळी भेटू शकतात, म्हणून जायलाही आवडतं. शिमगोत्सव हा या गावाचा लोकोत्सव. पार्वती घवाळीणीच्या कडेवर बसून मी इथला शिमगोत्सव पाहत आलो आहे. तो पाहण्याचं भाग्य आनंदाचं. दोन वर्षापूर्वी आडमच्या शिमग्याला गेलो होतो. त्यानंतर जाणे झाले नाही. यंदा योग जुळून आला आणि गांगोच्या चरणी माथा टेकला. पौर्णिमेला गांगोबा-आदिष्टीचा शिमगा सानेवर साजरा झाला. शिमगा संपला.. मी आलो, पण मन मात्र आदिष्टीच्या निर्जन सानेवर ठेवून आलोय. झरझरणारी वार्‍याची झुळुक अजूनही त्या मनाला घरी आणावीशी वाटत नाही..
यंदाच्या शिमग्यात इथं एक आधुनिक बदल दिसला. चाकरमान्यांचा ओढा या शिमग्यात मोठा असतो. यावर्षीही तो नटून-थटून आला होता. मात्र यावेळी बहुतेकसा चाकरमानी आपल्या दुचाकीवर बसून आला होता. सानेवर खूप गाड्या लागलेल्या. मी चालणारा माणूस. मला दगड-धोंड्यातून चालायला आवडतं. पण मामा म्हणाला, गाडीवरून जाऊ. आदिष्टीच्या कातळावरच्या देवळाजवळ गाडी केव्हापासून जायला लागली..? हे मला कोडचं वाटलं. चला तर चला.. पोहोचताच सानेपासून दूर मामाने चपला काढायला लावल्या. सानेवर चप्पल न्यायची नाही, हा श्रध्देचा नियम सार्‍यांनीच पाळला होता. मी रानातला माणूस, तो नियम मला काही जड नव्हता. पण सांगायची गंमत म्हणजे, भावेआडमचं नाव ज्यांच्या नावावरून पडलंय, ते परगावी असणारे खोत मात्र कातळावरची साधी गवताची तुसं पायाला डसत होती म्हणून नाजुकपणे चालत होते. ते पाहून मला हसायला येत होतचं, पण ज्या भूमीने आपली नाळ केवळ जन्मानं नाही, तर नावानंही जोडली आहे, त्यांचं तिथल्या मातीशी नातं किती बेगडी आहे, याची जाणीव ते सारं मुरडणं पाहताना झाली.
सानेवर पालखी विराजमान होती. त्यात चांदीची मोठाली तीन रुपं होती. पहिले भारदार मिशींचे श्रीदेव गांगोबा, त्यानंतर सौभाग्य लेणं ल्यालेल्या श्रीदेवी आदिष्टी आणि श्रीदेवी भराडीण. त्या मातृदेवतांना वंदन केले. कोकणात भराडी आदिष्टीची स्थानं खूप आहेत. आडोमलाही ती आहे, याचं मला कौतूक वाटलं. मग देवळात गेलो. देवूळ अजून जुनं आणि कौलारू आहे. त्याच्या भिंती अभेद्य जाडजुड चिर्‍याच्या आहेत. देवळात दोन पाषाणमुर्ती आहेत. त्या दोन्ही मातृदेवता श्री भराडीण आणि श्री आदिष्टी. मला गांगोबा कुठं दिसले नाहीत. म्हटलं, दुसरीकडे कुठे तरी स्थान असेल. मामाला विचारलं, तर तो म्हणाला, तिथचं छोटा नुसता पाषाण आहे. मला तो दर्शन घेताना दिसलाच नाही. मला पुन्हा एका गोष्टीचं नवल वाटलं. इथं स्त्रीदेवतांना पुरुष देव गांगोबापेक्षा भराडीन आणि आदिष्टी या स्त्रीदेवांचे स्थान वरचे आहे. माझी ही चिकीत्सा मातृदेवतांचा शोध घेत देवस्थानच्या काळाचा वेध घेत गेली.. गावोगावच्या कातळांवर का या देवता बसल्या असतील..? हातात तलवारी घेवून त्या शस्त्रसज्ज का असतील..?  
सानेवर आलो. तिथं अथक ढोलवादन चालू होते. मोजकी दुकानं सजली होती. भव्य वटवृक्षाची आणि इतर झाडांची छाया सार्‍या सानेवर पडली होती. चाकरमानी येत होते. देवदर्शन घेत होते. अखिल शिमग्याचं आकर्षण असलेली नवी लग्न झालेली जोडपी येत होती. देव दर्शन घेत होती. मानकर्‍यांच्या आणि मग गावकर्‍यांच्या नमस्कार करत होती. मानकरी खुर्चीत बसले होते. बाकी गावकरी चटयांवर बसले होते. मी पाहुणा होतो. मी चटईवर बसलो. भन्नाट वारं जीवाला विसावा देत होतं. वाटत होते, असाच आदिष्टीचरणी विसावा घ्यावा.
पालखी सानेवरून उठली आणि खेळू लागली. अवघे चाकरमानी आपली ताकद अजमावू लागले. ही पालखी नाचविणे म्हणजे ताकद अजमाण्याचेच काम होते. ते काही येरागबाळ्याचे काम नव्हे, हे खोतांनी जेव्हा खांद मारला आणि दोन झोक्यातच ते आटपले, तेव्हाच कळले. पालखी जडीव आणि घडीव आहे. शिवाय तिला तोडे वगैरे लावलेले आहेत. त्यात जी तीन रुपं आहेत, तीही वजनदार आहेत. लुक्या माणूस जास्तीत जास्त चारपाच हेलकावे तीला देवू शकतो. अवघ्या चाकरमान्यात दोघां-तिघांनीच ती पालखी मस्तकी शेषासारखी उचलून घेतली. मात्र दिड-दोन तास हा खेळ अथक चालू होता. सारा चाकरमानी घामाघुम होऊन आनंद लुटत होता.
हे सारे चालू असतानाच दुसरीकडे शेंडा उभा करण्याची लगबग चालू झाली. हे कोकणातल्या शिमगोत्सवातील मोठं दिव्यचं. एकीच बळ दाखविणारा हा दिव्य सोहळा. तो सुध्दा देवाच्या दारात..! सुरमाड हा भरीव आणि जड वृक्ष.  तो मध्यरात्री जंगलातून तोडून खांद्यावरून आणला जातो. चाकरमानी तो अनवाणी पायाने कोणतीही इजा न होता खांद्यावरुन आणतात. ते कसे आणतात..? ते काही मी पाहिलेले नाही. पण पहायची इच्छा आहे. कारण सुरमाड जिथं रूजलेला असतो, तिथं काही कुणी डांबरी रोड बांधलेला नसतो. मुळात तिथं रस्ता नसतो. तिथं असतात घब्या, दर्‍या, दगड-धोंडे.. मात्र हे सारं निविघ्न पार पडत आलेलं आहे. हे सारं पाहताना एकीकडे मॅनेजमेंटचे विद्यार्थी आणि दुसरीकडे अर्धशिक्षित गावकरी.. याबाबत नेमकं उत्तर शोधताना गडबडायला होतं.
हा सुरमाड उबा करायचा.. त्यालाच शेंडा उभा करणे म्हणतात. तो उभा करण्याची जय्यत तयारी सुरू झाली. बांबुच्या डेलक्या बांधून झाल्या. मग सारे जुटले. सुरमाड किंचित उचलून त्याखाली आडवे व्हलटे टाकले.. मग एकच गजर करत सारे माडाला तोरण बांधण्यास धावू लागले. माडाला येणारी झुंबर काढून त्याला आंब्याचा टाळा अडकवून ते तोरण माडाला बांधण्यात आले. शेवटी टोकाला भगवे निषाण. आता तो माड नव्या नवरीसारखा सजला.. हिरवं लेणं ल्याला. आजपर्यंत बर्‍याचवेळा हा सोहळा पाहिलाय. पण प्रत्येकवेळी ‘हे  क्रेनशिवाय कसं उभं करणार..?’ हा प्रश्न शेंडा उभा राहिपर्यंत पडतोच. यावेळीही तो पडला. खड्डा आणि खोड यांची जागा सेट झाली. आणि सार्‍यांनी गांगोबाचा जयघोष करत शेंड्याला हात घातला. त्या एकजुटीपुढे तो माडही थिजला असेल, आणि अंग चोरून बसला असला.. इतक्या सहजतेनं ते अजस्त्र झाड झटाझट वर उचलू लागलं. डेलक्यांनी त्याला आधार दिला. दुसर्‍या बाजूने शेड्याने त्याला खेचला गेला. आणि झरदिशी तो शेंडा जेव्हा उभा राहिला तेव्हा सार्‍यांच्या चेहर्‍यावर जो आनंद होता, तो अवर्णनीय. माझ्या चेहर्‍यावर वेगळेच भाव होते, काय जजमेंट आहे यार.. किती शिस्त.. कसलाही गलबला नाही.. ओरड नाही.. आणि विशेष म्हणजे हे सारं करताना कोणी नियंत्रक नाही.. वर्षानुवर्षांचा हा श्रध्दामय सराव आहे. आज काळ किती पुढं गेला. जुन्या रुढीनांही धक्का बसत चाललाय. एकीत बेकी निर्माण झालेय. गावं फुटत चालली आहेत.. आणि अशावेळीही हा कोकणच्या होळीतला शेंडा दिमाखात उभा राहतो आहे. हे सारं पाहताना खरचं कधी कधी बुचकळ्यात पडायला होतं.
शेंडा उभा राहिला. त्याची पुजा झाली. गार्‍हाणे झाले. होम पेटला, पालखीने त्याभोवती फेर्‍या मारल्या.. आडमच्या शिमग्याचं एक पर्व संपलं. हे सारं सुखनैव होतं. दगदगीत वाढणार्‍या चाकरमान्यांसाठी काळाच्या ओघात त्याची गरजही वाढेल, आणि तो दरवर्षी आणि जोरात शिमगोत्सव साजरा होईल.


- अमोल पालये. 
मु.पो.-सडये-पिरंदवणे.
मो.9011212984


Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू