सातवी माळ: श्री महालक्ष्मी

सातवी माळ: श्री महालक्ष्मी



सातव्या माळेचं हे दैवत म्हणजे अखंड बसणी पंचक्रोषीसह चाकरमान्यांचा अतीव श्रध्देचा विषय आहे. महालक्ष्मीचा नवरात्रीतला थाट.. महालक्ष्मीचा शिमगोत्सवी रूबाब.. आणि भक्तांमध्ये महालक्ष्मीचा असलेला दरारा.. हे सारंच न्यारं.. भव्य.. विलोभनीय आहे. महालक्ष्मीविषयी लिहावे तेवढे थोडे, बोलावे तेवढे कमी आहे. सातव्या माळेत फक्त महालक्ष्मीचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न..


बसणी गावातील महालक्ष्मी-रवळनाथ हे देवस्थान सडये-पिरंदवणेसह बारा वाड्याचं ग्रामदैवत आहे. यामध्ये प्रामुख्याने पिरंदवणे, वाडाजून, सडये, बसणी, आरे, काळबादेवी, कासारवेली याअंतर्गत येणार्‍या अनेक वाड्यांचा समुह महालक्ष्मीचरणी लीन झालेला पहायला मिळतो. (यातील रवळनाथ हा कोकणचा स्वामी आणि शेतकर्‍यांचा देव आहे. रवळनाथाचा भक्त संपद्राय हा अखंड कोकणात मोजता येणार नाही एवढा मोठा आहे. मात्र या लेखमाळांमध्ये फक्त ‘देवी’ंचा शोध घेत असल्याने महालक्ष्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया.) 


रत्नागिरीत महालक्ष्मीची देवालये मोठ्या संख्येने आहे. सडये-पिरंदवणे केंद्रस्थान गृहित धरून कोतवडे बाजारपेठ येथे महालक्ष्मी मंदिर आहे. त्याचप्रमाणे कोतवडे उंबरवाडीतही महालक्ष्मी मंदिर आहे. त्यानंतर हे तिसरे बसणीतील महालक्ष्मी मंदिर. रत्नागिरीत अन्यत्रही महालक्ष्मीची मंदिरे आहेत. बसणी, कोतवडेची महालक्ष्मी जरी मुर्तीस्वरूपात असली तरी काही महालक्ष्मी या निर्गुण-निराकार तांदळा, पाषाण-भूमका स्वरूपात आहेत. बसणीची महालक्ष्मीची पाषाण मुर्ती जितकी देखणी आहे, तितकेच तीचे पालखीतील ‘रूपे’ही विलोभनीय आणि सुवर्णकांतीचे आहे. 


महालक्ष्मी म्हटलं की सामान्यत: कोल्हापूरनिवासिनी कथित महालक्ष्मीशी संबंध भाविकांकडून जोडला जातोच. मात्र कोल्हापूरची देवी ही महालक्ष्मी नाहीच, तर ती अंबाबाई आहे. ही अंबाबाई सिंधुदुर्गातील भराडीबाई, केळबाई यांच्या कुळातील असण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी हे देवीचे रूप म्हणजे विष्णुपत्नी. सामान्यत: विष्णूपत्नी लक्ष्मी म्हटलं की, कमळात विराजमान आणि भक्तांवर कृपाशिर्वाद देणारी शांतमुर्ती. बसणी येथील महालक्ष्मी मात्र तशी न दिसता ती कायम युध्दसज्ज आहे. तिच्या हातात तलवार आहे. एका हातात ढाल आहे. नेत्र रोखून पाहणारे आहेत. ती शांत नाही, ती आक्रमक आहे.. त्यामुळे बसणीची महालक्ष्मी ही क्षेत्रदेवता असण्याची दाट शक्यता आहे. क्षेत्रदेवता असल्याने तीच्यावर क्षेत्राचे रक्षण करण्याचे जबाबदारी सोपवलेली असल्याने ती कायम शस्त्रसज्ज आहे. क्षेत्र देवता म्हणण्याला आणखी एक बाजू मजबूत करते, ती म्हणजे देवीचे पारंपारिक विधी. क्षेत्रदेवतेसंबधी जे जे विधी केले जातात, तेच विधी या महालक्ष्मीसंदर्भात केले जातात. उदा.बळ वगैरे.


आतापर्यंतच्या सहा देवतांमध्ये सर्वांत भक्तप्रियतेचा मान महालक्ष्मीकडे आहे. त्याला कारणही तसेच आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे महालक्ष्मीचा दरारा प्रचंड आहे. पालखीतून ती चालताना रवळनाथ या पुरुष देवाच्याही पुढे ती चालत असते. हा तिचा दरारा ‘मातृसत्ताक कुटुंबपध्दती’कडे निर्देश करतो, असे म्हणायला हरकत नाही. इथल्या भक्तांची तिच्यावर जितकी श्रध्दा आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक जीव मुंबैकर चाकरमान्यांचा तीच्यावर आहे. तीला खांद्यावर घेवून मिरवण्याची हौस म्हणजे धावपळीतल्या मुंबईकराच्या जगण्याचं ‘टॉनिक’ आहे.

रवळनाथ

एखांद देवस्थान लोककथांमुळे अधिक लोकप्रिय होतं. बसणीची महालक्ष्मी त्याला अपवाद नाही. तिच्या लोककथा अत्यंत रोचक आहेत. 

लोककथा 1.- ती श्री रवळनाथांची बहिण आहे. तर लोककथा 2.- केळये गावातील ग्रामदेवता नवलाई, पावणाई, वाघजाई या तीच्या भावजया आहेत. लोककथा 3.-रवळनाथ-महालक्ष्मी जरी भावंड असली तरी मानवी प्रवृतीचे गुणदोष त्यांना लावत त्यांचे परस्परात वैचारिक मतभेद असल्याचे सांगतात. 

या लोककथांचे पालन करण्यासाठी या दोन्ही देवतांच्या पालख्या कधीही समोरासमोर आणल्या जात नाहीत. (वर्षातून फक्त एकदा दोन्ही भावंड, आणि तीन भावजया यांची भेट घडविण्याचा दिव्य सोहळा पार पडतो.) अशी लोककथा आणि प्रथा असणारं हे कोकणातलं एकमेव देवस्थान असेल.


महालक्ष्मीच्या लोकप्रियतेचं आणखी एक कारण म्हणजे तीची आक्रमक वृत्ती. सळसळत्या तरूणाईला शांत नव्हे, आक्रमक नेता आवडतो. (उदा. भारतीय राज्यव्यवस्था) महालक्ष्मी ही आक्रमक आहे. तीच्या हातातील तलवार-ढाल हे शौर्याचे प्रतिक आहे. म्हणूनच महालक्ष्मीच्या बगाडा उत्सवात तरूणाई उभारलेल्या लाटेवर स्वार होवून चित्तथरारक खेळ करते, आणि महालक्ष्मीला अभिप्रेत शौर्याचे दर्शन घडविते.

सुरूवातीला म्हटल्याप्रमाणेच महालक्ष्मीविषयी लिहावे तेवढे थोडेच आहे.. जे सहसा माहित नाही, त्याचा उल्लेख केला आहे. सध्यातरी एवढेच.


-अमोल पालये, सडये-पिरंदवणे.

मो.9011212984.

Comments

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू