नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई

नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई


नवरात्रीच्या शेवटच्या नवव्या माळेत एकत्रितपणे आणि एकरूप असलेल्या तीन बहिणी- श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या तिन्ही देवता केळये ग्रामी वसल्या आहेत. मात्र सडये-पिरंदवणेसह समस्त बारा वाडेकरांचा त्यांचीशी असलेला श्रध्दाभाव हा शब्दांपलिकडला आहे. या देवतांची ग्रामप्रदक्षिणा बंद झाल्यानंतरही हा श्रध्दाभाव कमी झाला नाही, यावरून जनमानसावरील ‘मातृदेवतांचे गारूड’ लक्षात येईल.


रत्नागिरी जिल्ह्यात नवलाई, पावणाई, वाघजाईची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. त्यामुळे या तिन्ही देवता सर्वांनाच परिचित आहेत. विशेष म्हणजे केळये गावातील या तिन्ही ग्रामदेवता भूमका स्वरूपातील आहेत, हे त्यांचे प्राचीनत्व अधोरेखित करते. जरी त्या भूमका असल्या तरी त्यांची पालखीतील रूपे ही अतिशय विलोभनीय आहेत. केळये ग्रामी या देवतांची एकाच ठिकाणी मंदिर नाहीत, तर ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सडये-पिरंदवणे गावाची श्री देवी भराडणीपासून सीमा ओलांडली की या तिन्ही देवतांचे कार्यक्षेत्र सुरू होते. अर्थात पलिकडच्या भागात केळये गाव लागते. या तिन्ही देवता आक्रमक आहेत. युध्दसज्ज आहेत. त्यातील वाघजाई ही शौर्यदेवता आहे. पराक्रमी आहे. हे तिच्या नावावरूनच स्पष्ठ होते. ती साक्षात वाघ या वाहनावर बसली आहे, म्हणून तीला वाघजाई म्हणातात. 


लोककथेनुसार वाघजाईसह तीन देवतांच्या पालखीला ‘चोर पालखी’ संबोधली जाते. यामध्ये चोरी-मारीचा उल्लेख नसून ‘चोर’ म्हणजे ‘गुप्त’ असा अर्थ अभिप्रेत आहे. पुर्वी वाघजाईची पालखी शिमगोत्सवात ग्रामप्रदक्षिणेला सीमा ओलांडून गावात येई, तेव्हा ती सरळ मार्गाने न येता आडमार्गाने म्हणजेच कातळ-सडा मार्गाने रात्रीची मार्गक्रमणा करे. हा मार्ग अतिशय घनदाट अरण्याचा, दगड-धोंड्याचा खडतर असा आहे. या मार्गावरून सर्वसामान्य सहसा प्रवास करत नसत, तर तो चोरट्या कारवायांसाठी चोरांनाच उपयोग ठरणारा असे. कारण या मार्गाने येणे कोणाच्याही नजरेत येणारे नसे. तद्वत तो ‘गुप्तमार्ग’ ओळखला जातो. या मार्गाने पालखी येत असल्याने तीचे बोलीभाषेत नामकरण ‘चोरपालखी’ असे झाले.


अशा चोरमार्गाने पालखी येण्यासही भलेभक्कम कारण आहे. ते कारणही मजबूत आणि विचार करण्यासारखे आहे. वाघजाई ही वाघावर बसलेली आहे. वाघ हे तीचे वाहन आहे. कोकणात वाघ या प्राण्याप्रती त्यामुळेच श्रध्दाभाव निर्माण झालेला आहे. वाघजाईची पालखी जर सरळ मार्गाने गावतून फिरली, तर तीचे वाहन वाघ याला ते उपद्रव देणारे ठरेलच, शिवाय लोकांनाही ते संकटात आणणारे ठरेल. त्यामुळे जो वाघाचा परिसर आहे, त्याच परिसरातून पालखी गेली, तर वाघजाईच्या वाहनाला कोणताही उपद्रव होणार नाही, असा हा अत्यंत दूरदृष्ट्रीचा विचार या प्रथेत केला आहे, आणि आजही तो कशोशीने पाळला जात आहे.

या तिन्ही देवस्थानचा शिमगोत्सव दणक्यातच साजरा होतो. लोककथांद्वारे नवलाई, पावणाई, वाघजाई या बसणीतील श्री रवळनाथांच्या तीन सौभाग्यवती मानल्या गेल्या आहेत. त्यामुळे बसणी आणि केळये गावचा शिमगोत्सव हा एकत्रित साजरा होत आला आहेच, शिवाय तो शांततेत साजरा होत आला आहे, हे विशेष आणि कोकणातील एकमेव उदाहरण असेल.

अगदी काहीवर्षापूर्वी या तिन्ही सौभाग्यवती देवता आपल्या पतीरायाला भेटण्यासाठी शिमगोत्सवाच्या फाल्गून पंचमीला केळये गावातून भावेआडम, टोळवाड, पिरंदवणे, सडये मार्गे बसणीत येत असत. त्यावेळी त्यांचा येतानाचा थाट.. त्यांचे होणारे स्वागत.. तो जल्लोष.. आणि दोन गावांची एकात्मता.. हे सारं चित्र अचंबित करायला लावणारं असायचं. जेव्हा या तिघी एका पालखीतून येत तेव्हा सारे 

‘इन रे इन आणि रवलनाताच्या बायका तीन रे.. होलये..’ 

असा जयघोष करत तेव्हा आसमंत दणाणून जाई. 

काळाच्या ओघात या केळये ग्रामस्थांनी पालखीच्या दिर्घ प्रदक्षिणेला आवर घातला, आणि फक्त बसणी सड्यावरून खाली उतरत बसणीत पालखी आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बसणी वगळता इतर गावांना देवीदर्शनापासून मुकावे लागले. मात्र देवीची ओटी वा दर्शनासाठी या वंचित गावकर्‍यांनी, महिलांनी बसणीत सानेवर यावे.. तेथे पाहिजे तेवढे दर्शन दिले जाईल, हा पर्याय ठेवला आणि पुन्हा नवलाई, पावणाई, वाघजाई दर्शनासाठी भाविकांचा लोंढा बसणीकडे वाहू लागला. 

पुर्वी या तिन्ही देवींची पालखी टोळवाड-पिरंदवणे मार्गे मानाची घरे घेताना बसणीत जाईपर्यंत पहाट व्हायची. मात्र ती परंपरा केळये ग्रामस्थांनी काळाच्या ओघात बंद केली. बदल स्विकारला. हे खरोखरच कौतूकास्पद म्हणावेे लागेल.

सध्या पालखीतून नवलाई, पावणाई, वाघजाई बसणी सडयावरून पंचमीला आपल्या पतीरायांना भेटण्यासाठी सायंकाळी बरोबर सहा वाजता बसणीत सानेवर विराजमान होतात. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ओटी भरणे, दर्शनाचा भव्य सोहळा पार पडतो. त्यानंतर पाच देवतांचा अपुर्व भेट सोहळा पार पडतो. तो शब्दांच्या वर्णानापलिकडचा आहे.

वाघजाई, नवलाई, पावणाई या तिन्ही देवतांच्या मागे ‘आई’ विशेषण लागले आहे, या नावामुळेच सारा जिव्हाळा दाटला आहे.

...

अशारितीने नवदिवस नवरात्रीच्या नव माळांमध्ये सडये-पिरंदवणे परिसरातील सर्व देवतांना एकत्रितरित्या सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यासार्‍या माहितीमागे विविध ग्रंथ, साहित्य, संदर्भ, लोककथा, सण-उत्सव, निरीक्षण, प्रत्यक्षभेटी यांचा अभ्यास आहे. या नव माळांना आमचे मित्र श्री. संजय मयेकर यांनी आपल्याकडील देखणी छायाचित्रे उपलब्ध करून दिली. त्यामुळे ही मालिका रंगतदार झाली. त्यामुळे त्यांचे विशेष आभार!

या सार्‍या देवतांचा आणि देवस्थानांचा सखोल शोध यापुढेही असाच चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद!

संकलक-

अमोल पालये. सडये-पिरंदवणे.-रत्नागिरी.

मो.9011212984


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू