Posts

Showing posts from 2020

मी हिजडा.. मी लक्ष्मी

Image
  मी हिजडा.. मी लक्ष्मी - लेखक: लक्ष्मी नारायण त्रिपाठी. (पुस्तक परिचय) पत्रकारितेच्या सुरूवातीला एका वृत्तपत्रातील मुलाखतीने माझे लक्ष वेधले होते. साधारण 2010 सालची गोष्ट असेल.. ती मुलाखत एका वेगळ्या व्यक्तिीची होती. छायाचित्रांमुळे ती मुलाखत चांगली सजली होती. ठाण्यातील पत्रकार अशोक गावकर यांनी त्या मुलाखतीतून त्या व्यक्तिचं म्हण्णं मांडण्यासाठी तीला पुरेपूर जागा दिली होती. दोन-तीनवेळा तरी ती मुलाखत मी वाचली. त्या व्यक्तिचं त्या मुलाखतीमुळे माझ्यावर गारुड निर्माण झालं. त्यानंतर काही दिवसातच त्या व्यक्तिची जन्मकथा.. व्यथा मांडणारी लघुकथा मी लिहली. ती माझी प्रकाशित न झालेली पहिली लघुकथा. ‘धु्रव’ तीचं नाव. पण अखेरपर्यंत ती कथा कधीच मार्गा लागली नाही. कारण, त्या व्यक्तिला पुरेपूर जाणून घेणं, माझ्यासारख्याला शक्य नव्हतं. मुळात मी तेव्हा लिहतच नव्हतो.. ती मुलाखत आणि माझी पहिली कथा जिच्यामुळे लिहली गेली, ती असामी म्हणजेच ‘मी हिजडा.. मी लक्ष्मी’ या पुस्तकाची लेखिका आणि तृतीयपंथी- लक्ष्मी नारायण त्रिपाठी. आयबीएन लोकमतवर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लोकप्रिय गे्रट-भेट कार्यक्रमातही तीची मुला

नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई

Image
नववी माळ: श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई नवरात्रीच्या शेवटच्या नवव्या माळेत एकत्रितपणे आणि एकरूप असलेल्या तीन बहिणी- श्री नवलाई, श्री पावणाई, श्री वाघजाई यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या तिन्ही देवता केळये ग्रामी वसल्या आहेत. मात्र सडये-पिरंदवणेसह समस्त बारा वाडेकरांचा त्यांचीशी असलेला श्रध्दाभाव हा शब्दांपलिकडला आहे. या देवतांची ग्रामप्रदक्षिणा बंद झाल्यानंतरही हा श्रध्दाभाव कमी झाला नाही, यावरून जनमानसावरील ‘मातृदेवतांचे गारूड’ लक्षात येईल. रत्नागिरी जिल्ह्यात नवलाई, पावणाई, वाघजाईची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. त्यामुळे या तिन्ही देवता सर्वांनाच परिचित आहेत. विशेष म्हणजे केळये गावातील या तिन्ही ग्रामदेवता भूमका स्वरूपातील आहेत, हे त्यांचे प्राचीनत्व अधोरेखित करते. जरी त्या भूमका असल्या तरी त्यांची पालखीतील रूपे ही अतिशय विलोभनीय आहेत. केळये ग्रामी या देवतांची एकाच ठिकाणी मंदिर नाहीत, तर ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सडये-पिरंदवणे गावाची श्री देवी भराडणीपासून सीमा ओलांडली की या तिन्ही देवतांचे कार्यक्षेत्र सुरू होते. अर्थात पलिकडच्या भागात केळये गाव लागते. या तिन्ही देवता आक्रमक

आठवी माळ: श्री धरणकरीण

Image
आठवी माळ: श्री धरणकरीण धरणकरणीचे  स्थान सडये-पिरंदवणे क्षेत्रातील अंत्यत निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री धरणकरणीला आठवी माळ अर्पण करीत आहे. या परिसरातील ही एकमेव जलदेवता आहे. तिच्या नावातच ती ‘जलासरा’ असल्याचे सुचित होत आहे.  पिरंदवणेच्या टोळवाडीचा चढ चढला की पुढे मोरेश्वर मंदिराजवळच शिंदेवाडी येथे श्री धरणकरणीचे छोटेसे मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. धरणकरणी स्थानाशेजारील  ग्रामदेव श्री सप्तेश्वराचे निसर्गरम्य मंदिर. काही देवता या भूमका असतात. त्या भूस्थळातून अवर्तीण झाल्याच्या खुणा दाखवतात. काही क्षेत्रदेवता असतात. त्या दूर निर्जन वस्तीत कोठेतरी सड्यावर, माळावर, कातळावर एकट्याच वसलेल्या असतात. तर काही देवता या जलदेवता असतात. त्या पाण्याच्या मुखाशी, स्थानाशी आढळतात. कोकणात त्यांना ‘जलासरा’ म्हणतात. या जलासरांचे वैशिष्ठ हे की, त्या जलरूप असल्याने त्यांना जलदेवता म्हणतात. पाण्याच्या ठिकाणीच त्यांची वस्ती असते.  निसर्गरम्य  वाडी काहीवेळा नदी हीच देवी, मातास्वरूप पुजली जाते. (अर्थात नद्यानीच एकेकाळी या देशाला समृध्द बनविले. भारतात सिंधू, सरस्वती या नद्यांना देवतेचेच स्वरू

सातवी माळ: श्री महालक्ष्मी

Image
सातवी माळ: श्री महालक्ष्मी सातव्या माळेचं हे दैवत म्हणजे अखंड बसणी पंचक्रोषीसह चाकरमान्यांचा अतीव श्रध्देचा विषय आहे. महालक्ष्मीचा नवरात्रीतला थाट.. महालक्ष्मीचा शिमगोत्सवी रूबाब.. आणि भक्तांमध्ये महालक्ष्मीचा असलेला दरारा.. हे सारंच न्यारं.. भव्य.. विलोभनीय आहे. महालक्ष्मीविषयी लिहावे तेवढे थोडे, बोलावे तेवढे कमी आहे. सातव्या माळेत फक्त महालक्ष्मीचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न.. बसणी गावातील महालक्ष्मी-रवळनाथ हे देवस्थान सडये-पिरंदवणेसह बारा वाड्याचं ग्रामदैवत आहे. यामध्ये प्रामुख्याने पिरंदवणे, वाडाजून, सडये, बसणी, आरे, काळबादेवी, कासारवेली याअंतर्गत येणार्‍या अनेक वाड्यांचा समुह महालक्ष्मीचरणी लीन झालेला पहायला मिळतो. (यातील रवळनाथ हा कोकणचा स्वामी आणि शेतकर्‍यांचा देव आहे. रवळनाथाचा भक्त संपद्राय हा अखंड कोकणात मोजता येणार नाही एवढा मोठा आहे. मात्र या लेखमाळांमध्ये फक्त ‘देवी’ंचा शोध घेत असल्याने महालक्ष्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया.)  रत्नागिरीत महालक्ष्मीची देवालये मोठ्या संख्येने आहे. सडये-पिरंदवणे केंद्रस्थान गृहित धरून कोतवडे बाजारपेठ येथे महालक्ष्मी मंदिर आहे. त्याचप्रमाण

सहावी माळ: श्री केळबाई

Image
 सहावी माळ: श्री केळबाई आजची सहावी माळ सडयेतील मयेकर कुटुंबियांचे कुलदैवत श्री केळबाई देवीच्या नावाने वाहत आहे. शिवलकर कुटुंबियांचे कुलदैवत सातेरीचा जसा मोठा भक्तसंपद्राय आहे, त्याप्रमाणे मयेकर कुंटुंबियांच्या केळबाईचाही खूप मोठा भक्तसंपद्राय रत्नागिरीसह सिंधुदुर्ग-गोव्यात आहे. रत्नागिरीसह सडये गावातील मयेकर बांधव हेही शिवलकर कुंटुंबियांप्रमाणे गोव्या राज्यातील ‘मये’ या गावचे आहेत. पोर्तुर्गीज काळात त्यांनी स्थलांतर केल्यानंतर आपलं कुलदैवत श्री केळबाई देवी आपल्यासोबत घेवून आले. सडये पंचक्रोशीत या कुलदैवताचे मंदिर कोठेही नव्हते, मात्र अलिकडे सडये गावच्या सीमाक्षेत्र परिसरात आरे या गावी केळबाई देवीची मुर्ती स्थापना करण्यात आली आहे. मुर्ती पाषाणाची असून अतिशय सुंदर आहे. याठिकाणी देवीची नैमित्तिक पुजा, सण-उत्सव मयेकर बांधवातर्फे साजरे करण्यात येतात. सिंधुदुर्गात देवीला बाई म्हणण्याची प्रथा आहे. अवघ्या कोकणातील प्रसिध्द लोकदैवत भराडीला रत्नागिरीत भराडीण देवी असे संबोधतात, तर सिंधुदुर्गात तीला भराडीबाई असे म्हणतात. केळबाईलाही असेच बाई उपनाव लावण्यात आले आहे. देवीचे मुळ स्थान केळ या वृक्षाखाल

पाचवी माळ: सातेरीचा देव्हारा

Image
पाचवी माळ: सातेरीचा देव्हारा शिवलकर बांधवांचे कुलदैवत:  श्री सातेरी देवस्थान, शिवोली-गोवा कोकणात सर्वात मोठा भक्ती संपद्राय कोणता असेल तर तो रवळनाथ आणि सातेरी.  ‘सडये’ या गावाचे नामाभिमान गोव्यातील सडये या गावावरून देण्यात आले आहे. त्याला कारणही तसेच ठाम आहे. गोव्यातील सडये या गावातील तमाम शिवलकर, मयेकर ही कुटुंबे गोव्यातून रत्नागिरीत पोर्तूगीज काळात स्थलांतरीत झाली. तेव्हा त्यांनी येथे येताना आपली संस्कृती येथे आणलीच, मात्र आपलं गावही ते येथे येताना घेवून आले. ते गाव म्हणजे आजचे सडये.  रत्नागिरीतील सडये गावाच्या खाडीकिनारी भागात शिवलकरांची वस्ती आहे. हे शिवलकर गोव्यातील शिवोली गावचे. त्यांची कुलदेवता म्हणजे सातेरी. तीच्यावर त्यांची प्रगाढ श्रध्दा. या सातेरीचे भव्य देवस्थान सडये येथे नाही, मात्र श्रध्देकारणे काही वर्षापूर्वी शिवोली सेवा मंडळ, सडये- शिवलकरवाडी यांनी देवस्थान उभारले आहे. हे देवस्थान पहायला गेल्यास छोटेखानी आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख येथे ‘सातेरीचा देव्हारा’ केला आहे.  दैंनंदिन पुजा येथे होत असते. काही वर्षापासून येथे घटस्थापनेचा उत्सव साजरा केला जातो. येथिल देवस्थान नवे

चौथी माळ: श्री भराडीण

 चौथी माळ: श्री भराडीण सडये-पिरंदवणेच्या सड्यावरील निर्जन भागात श्री भराडीण मातेचे देवस्थान आहे. काही वर्षापुर्वीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने तेथे छोटेखानी मंदिर उभारले आहे. सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या भराडीबाईची (देवीची) यात्रा प्रसिध्द आहे. ती भराडी आणि सडयेच्या सड्यावरील भराडीण वेगवेगळी नसून एकच आहे. सडये-पिरंदवणेच्या आसपास कासारवेलीतही सडा भागात भराडीण देऊळ आहे. भराडीण ही सुध्दा भुमका स्वरुपातील देवी आहे. सड्यावरील देवळात तीची चार भुजा, मुख अशी कोरीव मुर्ती नाही. तर आहेत ते केवळ पाषाण.  कोणत्याही गावात स्री देवता मोठ्या संख्येने आढळतात. सडये-पिरंदवणे त्याला अपवाद नाही. या सार्‍या देवस्थानांमागे गुढ इतिहास दडलेला आहे. हा इतिहास सडये-पिरंदवणेच्या संस्कृतीशी निगडीत आहे. सड्यावरील देवळात भराडीण एकटीच नाही. तीच्यासोबत अन्य गणगोतही आहेत. (ते कोण? याचा शोध चालू आहे.) सिंधुदुर्गात भराडणीला बाई म्हणतात. (देवी अपवादाने.) सडयेतील भराडीणही कुणी देवी नसावी, तर ती एक महापराक्रमी लढाऊ वृत्तीच बाईच असावी. कारण ती गावात न वसता सडये-पिरंदवणेच्या सीमेवर वसली आहे. सीमेवर देशाचे रक्ष

तिसरी माळ: श्री जाखमाता

 तिसरी माळ: श्री जाखमाता सडये-पिरंदवणेच्या सडा-कातळ भागात श्री जाखमाता देवीचे प्राचीन स्थान आहे, आज ते कमालीचे दुर्लक्षित झाले आहे.  कोकणात जाखमातेची अनेक मंदिरे आहेत, तेथे मोठा उत्सवही साजरा केला जातो. सडये-पिरंदवणेतील श्री श्रेत्र जाखमाता देवस्थान सीमेवर वसले आहे. सडये-पिरंदवणे आणि केळ्ये या दोन गावांच्या डोंगरी सीमेवर जाखमातेचे स्थान आहे. ही देवी सीमेवर वसली असल्याने तीला क्षेत्रदेवता असे म्हणतात. क्षेत्रदेवता या गावांच्या-सीमांचं रक्षण करतात. म्हणून सड्ये-पिरंदवणे गावांचे रक्षण जाखमाता करते अशी भाविकांची श्रध्दा आहे. जाखमातेचीही मुर्ती नाही. तीसुध्दा भुमका-तांदळा स्वरुपातील देवता आहे.  केवळ प्रासंगिक वेळी तिथे आज पुजा अर्चा होते. तर काही भाविकांकडून वार्षिक पुजाविधी केला जातो. विशेष म्हणजे संगमेश्वरात जाखमातेचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. येथिल शिंपणे उत्सवाला सडये-पिरंदवणेतून युवक मोठ्या संख्येने जातात, मात्र स्वत:च्या जन्मभूमीतील क्षेत्रदेवता जाखमातेकडे कुणीच जात नाही.  कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची मंदिरेही आहेत. जाखडी या कोकणातील पारंपरिक नृत्यकलेच्या नावाशी साधर्

श्री जोगेश्वरी

Image
 श्री जोगेश्वरी (दुसरी माळ) जुन्या मंदिराचे चित्र सडये-पिरंदवणेतील साडेतीनशे वर्षांपूर्वीचे श्रीजोगेश्वरी मंदिर रत्नागिरीपासून 12 कि.मी. अंतरावर कोतवडे गावाजवळ आहे. सडये-पिरंदवणे हे एक छोटंसं निसर्गरम्य गाव. त्याची एक वाडी- टोळवाडी. त्याला लागूनच भावे-अडोम, केळ्ये, वेेत्तोशी व बसणी ही गावठाणातील खाडीलगतची वस्ती. अलीकडे व पलीकडे डोंगर व मध्ये पावसाळ्यात तुडुंब भरून खळाळत वाहणारा ओढा. काही वर्षांपूर्वी पूल बांधला गेला आणि ही गावं रत्नागिरीच्या जवळ 12 कि.मी.वर सरकली.  रिक्षाने रत्नागिरीहून पिरंदवण्याला अर्ध्या तासात पोहोचता येऊ लागले. पिरंदवणे येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या श्रीजोगेश्वरी (जुगाई) मंदिरातील श्रीजोगेश्वरी म्हणजे साठे, साठये, साठये, गोंधळेकर, गोवंडे, धारू तसेच अन्य काही कुटुंबीयांची कुलदेवता. इतिहासाची पाने मागे उलटली तर 13 व्या शतकापासून पिरंदवणे, टोळवाडी येथे साठयांची वस्ती असल्याची नोंद आहे. पूर्वजांना मिळालेल्या इनामाच्या सनदेत जमिनीच्या दळ्यांची नावे सापडतात. इ. स. 1635 च्या सुमारास श्रीजोगेश्वरी मंदिराची स्थापना झाल्याचा उल्लेख सापडतो. पुढे साधारण पाऊणशे वर्षांनी चुन्

गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून..

Image
गांगोबा-भराडीन-आदिष्टीच्या सानेवरून.. (ललित लेख) मु.भावेआडम हे रत्नागिरी तालुक्यातील तसं कुठे लेखी नसलेलं गाव माझं दुहेरी आजोळ आहे. गोरिवले आणि घवाळी अशी दुहेरी भावकी माझी आजोळ घरं आहे. याशिवाय इतरही बरीच नातीगोती याच गावात आहे. ती अशी एकत्र असल्याने एकाचवेळी भेटू शकतात, म्हणून जायलाही आवडतं. शिमगोत्सव हा या गावाचा लोकोत्सव. पार्वती घवाळीणीच्या कडेवर बसून मी इथला शिमगोत्सव पाहत आलो आहे. तो पाहण्याचं भाग्य आनंदाचं. दोन वर्षापूर्वी आडमच्या शिमग्याला गेलो होतो. त्यानंतर जाणे झाले नाही. यंदा योग जुळून आला आणि गांगोच्या चरणी माथा टेकला. पौर्णिमेला गांगोबा-आदिष्टीचा शिमगा सानेवर साजरा झाला. शिमगा संपला.. मी आलो, पण मन मात्र आदिष्टीच्या निर्जन सानेवर ठेवून आलोय. झरझरणारी वार्‍याची झुळुक अजूनही त्या मनाला घरी आणावीशी वाटत नाही.. यंदाच्या शिमग्यात इथं एक आधुनिक बदल दिसला. चाकरमान्यांचा ओढा या शिमग्यात मोठा असतो. यावर्षीही तो नटून-थटून आला होता. मात्र यावेळी बहुतेकसा चाकरमानी आपल्या दुचाकीवर बसून आला होता. सानेवर खूप गाड्या लागलेल्या. मी चालणारा माणूस. मला दगड-धोंड्यातून चालायला आवडतं. पण मामा म

दारीचा केशरी आंबा..

Image
 दारीचा केशरी आंबा.. (ललित लेख) दारीचा केशरी आंबा.. केशरी आंबा.. आंबा वाढत जायी.. आंबा वाढत जायी.. परवा एका लग्नाच्या सोहळ्यात गावकारणीच्या मुखातून हे लग्नगीत ऐकले, आणि दारच्या केशरी आंब्याची आठवण झाली. आमच्या घराच्या मागच्या बाजूसच त्याचे हे भले मोठे झाड होते. म्हणजे अजूनही आहे.. पण आता ते नुसते झाड आहे. आंबे त्यावर धरतच नाहीत.  एकेकाळी तो गच्च धरायचा. पानं कमी, आणि आंबे जास्त. दे दणादण रात्रभर कोसळत रहायचा. थोडासा लांबुडका.. त्याच्या पोटावर एक काळा डाग असायचा. ढास मारला की वरची साल फुटायची. आतमध्ये टच्च भरलेला आमरस. पुर्ण पिकला तरी बाहेरून हा आंबा कच्चाच दिसायचा. शेवटपर्यंत त्यांची साल हिरवीच असे, मात्र आतमध्ये तो रसाळलेला असायचा. त्याचे खर्‍या अर्थाने वर्णन करावे, तर ‘काय भुललासी वरलिया रंगा’ असेच करावे लागेल. तो रंगाने जितका केशरी होताच, तितकाच ‘केसरी’ही होता. अंगठाभर लांबीचे पातळ तंतूमय केस कोयीपासूनच त्याला असत. हे केस आंब्याच्या रसाला गच्च बांधून ठेवत. त्यामुळे आंबा पुर्ण सोलला, आणि मग यथेच्छ ओरपला तरी त्याचा एकही बुंद खाली पडत नसे. आंबा पडू द्यायचा, आणि मग थंड करूनच खायचा. तरच

पहिली माळ: श्री सुंकाई

Image
पहिली माळ: श्री सुंकाई सडये-पिरंदवणे-वाडाजून या गावची ग्रामदेवता म्हणून पुजली जाणार्‍या सुंकाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या बरोबर तिन्ही गावांच्या मध्यावर आहे. फार कर्मकांडात, आणि सण-उत्सवात न रमणारी अशी ही शांतप्रिय देवी आहे, असे सुंकाईबाबत म्हणावे लागेल. सुंकाई बसणीच्या महालक्ष्मीप्रमाणे मुर्तीस्वरूप नाही. ती तांदळा स्वरूप आहे. हा तांदळाही साळुंकेत बसविला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनही पाहता ती मोठी शिवपिंडच भासते. मात्र ही साळुंका आसनस्वरूप आहे. तर तांदळा हीच मुख्य देवता आहे. महाराष्ट्रात तांदळा स्वरूपात अनेक देवीस्थानं आढळतात. त्यांचे तांदळा अर्थात निर्गुण-निराकार स्वरूपामुळे त्यांचा उगम कधीचा आहे, हे सांगणे तसे कठीणच. कोकणात भूमका आणि तांदळा स्वरूपात देवीची देवस्थाने आहेत. ती जितकी प्राचीन तितकीच जागृत मानली जातात. सुंकाई त्यापैकीच प्राचीन देवस्थान असावे. सुंकाई नावात विशेष अर्थ जाणवत नाही. कदाचित मुळ शब्द ‘सुखाई’ असण्याची दाट शक्यता आहे. सुख देणारी आई ती सुखाई.. सामान्यत: बोलीभाषेत सुखाईचा अपभ्रंश होऊन कालौघात ‘सुंकाई’ असे नामाभिमान झाले असण्याची शक्यता दाट आहे. सुंकाईचे विशेष म्हणजे तीच्

सखुचं भूत

Image
सखुचं भूत पाऊस विसावला होता, पण वारं काही थांबल्या थांबत नव्हतं. झाडं नुसती राक्षसी पिळवटत होती. वैतागवाडीच्या सार्वजनिक पार्‍याच्या खळ्यात तर पातेर्‍याचा नुसता खच झाला होता. चिखल, पाणी, वार्‍याने वातारवण चांगलंच गारठलं होतं. आधीच अमावास्या, त्यात पावसाच्या ढगांनी काळोख डोळ्यावर येत होता. चाकरमान्यांच्या राखणीला आलेले गावकरी घरी जाण्यासाठी पार्‍याच्या पडवीत बसून वारा विसावण्याची वाट पाहत होते. इतक्यात एखादी झुंड यावी तसाा वारा पार्‍याच्या पडवीत घुसला. त्यापाठोपाठ मोठ्याने काहीतरी पडल्याचा धडामधुम आवाज झाला. क्षणात पार्‍यासहित गावातले सगळे दिवे गेले, आणि आतापर्यंत शांत असलेल्या पार्‍यात एकच कालवा झाला. ‘‘पेटला..पेटला..पेटला.. सखुच्या डागंतला पिंपल पेटला..!’’ खालून कुणाचीतरी एकच किंचाळी ऐकायला आली. त्या किंचाळीने गावकर्‍यांच्या काळजात धस्सच झाले. पण मागोमाग आणखी दोघांतिघांचे स्पष्ठ आवाज आले. तसे सारे भानावर आले, आणि कापर्‍या अंगानं दूर टक लावून पाहू लागले. रामाने चाचपडत रॉकेलचा दिवा पेटवला. पार्‍याच्या खिडकीतून आत वाकून पाहिलं. सगळी सुनशान शांतता, आणि मिट्ट काळोख. आतमध्ये दहा-बारा चाकरमा

बारा नमनाची म्हणणी

Image
बारा नमनाची म्हणणी (ओळख नमन/खेळ्यांची) कोकणची लोककला म्हणून ओळख असलेल्या नमन-खेळ्यांची सुरूवात ही बारा/सोळा नमनाने होत असते. देवतांना या नमनातून वंदन केले जाते. ही वंदनं प्रत्येक गावानुसार वेगवेगळी असतात. मात्र पहिले नमन हे धरती मातेलाच असते, आणि दहावे नमन हे दशमुखी रावणाला असते. हे एक यात साम्य आढळून येते. यामध्ये पहिले नमन धरती मातेला असण्यामागे ठोस कारण आहे. नमन/खेळे ही प्रामुख्याने कोकणातील कुणबी समाजाने जोपासलेली लोककला. कुणबी समाज हा शेतकरी असल्याने त्याचे नाते धरणी मातेशी जवळचे आहे. साहजिकच नमनामध्ये पहिले नमन हे धरणी मातेलाच असते. दुसरी गोष्ट रावणाला नमन करण्याची.. रावण दुष्ट..रावण खलनायक.. रावणाने सीतेला पळविली.. ही रावणाची नकारात्मक बाजू असूनही रावणाला नमनात बारा नमनात स्थान मिळाले आहे, अनेकांना हे कोडे वाटते, आणि नव्या पिढीला खटकणारे वाटते. मात्र याबाबत नमन/खेळ्यातील बुजूर्ग रंगकर्मी जे सांगतात, ते विचार करायला लावणारे आहे.  सुंकाई नमन मंडळ, सडये या मंडळाचे रंगकर्मी कै.पु.ल.माने यांनी सांगितले की, इतिहास हा नेहमी विजयी होणार्‍याच्याच बाजूने लिहला जातो. रावण पराभूत